February 22, 2025
Only a person who turns crisis into opportunity can become an entrepreneur: Vinaya Gore
Home » संकटाचे संधीत रुपांतर करणारी व्यक्तीच उद्योजक बनू शकते: विनया गोरे
काय चाललयं अवतीभवती

संकटाचे संधीत रुपांतर करणारी व्यक्तीच उद्योजक बनू शकते: विनया गोरे

 शिवाजी विद्यापीठात नवोपक्रम, स्टार्टअप परिषदेचा समारोप

कोल्हापूर: आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या संकटाचे रुपांतर संधीत करणारी व्यक्तीच चांगली उद्योजक बनू शकते, असे प्रतिपादन अमेरिकेतील गोरे उद्योग समूहाच्या प्रमुख विनया गोरे यांनी येथे केले.

शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या ‘विकसित भारत-२०४७ साठी नवोपक्रम आणि स्टार्टअप्स’ या विषयावरील ‘शिक्षण, उद्योग आणि शासन परिषद १.०’मध्ये दुसऱ्या दिवशीच्या प्रथम सत्रात त्या बोलत होत्या.

विनया गोरे म्हणाल्या, अनेक लोकांचा असा गैरसमज आहे असतो की अमेरिकेत स्टार्टअपना मोठ्या प्रमाणात संधी आहे. प्रत्यक्षात सर्वेक्षण असे सांगते की, अमेरिकेतील ८० ते ९० टक्के स्टार्अप अयशस्वी होतात. त्याला संकल्पनेपासून ते उभारणीपर्यंत अनेक बाबी कारणीभूत असतात. शिवाजी विद्यापीठाकडून प्रोत्साहित केलेल्या स्टार्टअपच्या बाबतीत एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे प्रत्येक प्रकल्पाला व्यवस्थित मार्गदर्शन व सहकार्य पुरविले जाते. एखाद्या संकल्पनेचे स्टार्टअपमध्ये रुपांतर करण्याच्या दृष्टीने ही फार महत्त्वाची बाब असते. मात्र, त्यापुढे जाऊन उद्योजक, व्यावसायिक होऊ इच्छिणाऱ्यांनी आपले नेटवर्किंग वाढविण्यावर भर दिला पाहिजे. समाजामध्ये निरनिराळ्या घटकांशी जर आपण योग्य पद्धतीने सहसंबंध प्रस्थापित केले, तर त्याचा आपल्याला दूरगामी लाभ होतो.

उद्योगात यशस्वी होण्यासाठी तीन बाबी फार महत्त्वाच्या असल्याचे सांगून विनया गोरे म्हणाल्या, आपल्याकडे हार्ड स्कील भरपूर असतात, मात्र सॉफ्ट स्कील्सच्या बाबतीत आपण कमी पडतो. त्यामुळे चांगले उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांनी आपले सॉफ्ट स्कील्स विकसित करण्यावर भर द्यायला हवा. त्यानंतर भावनिक बुद्धिमत्ता ही बाबही फार आवश्यक ठरते. जगात कुठेही गेले तरी कमीअधिक प्रमाणात माणसे भावनिक असतात. त्यांच्या भावनांना आपल्याला योग्य पद्धतीने हात घातला यायला हवा. तिसरी बाब म्हणजे सर्जनशील पद्धतीने समस्या सोडविता यायला हव्यात. कोणतीही समस्या सामोरी आली की भावनेपेक्षा वस्तुनिष्ठ आणि कृतीशीलतेने तिचा विचार करून त्यावर सर्जनशील आणि कायमस्वरुपी तोडगा योजण्याचा विचार करता यायला हवा. त्याखेरीज, ग्राहकांनी आपल्या उत्पादनाकडे येण्याची अपेक्षा न बाळगता ग्राहक जिथे आहेत, अशा ठिकाणी आपले उत्पादन कसे तातडीने पोहोचविता येईल, याचा विचार करायला हवा. त्याचप्रमाणे आजकाल डिसरप्टिव्ह इनोव्हेशनला प्रचंड संधी आहेत. याचे प्रमाण कमी असले तरी एखाद्या संकल्पनेमध्ये तशा प्रकारची क्षमता असल्यास ती ओळखता यायला हवी. तसे झाल्यास जगामधील प्रचलित बाबींचा चेहरामोहरा बदलून टाकता येते. त्यामुळे आपल्या संकल्पनेचा अगदी स्टार्टअपच्या पुढे तिथवरचा विचार करता येतो का, हेही पाहण्याची आवश्यकता आहे, असे त्या म्हणाल्या.

जगातल्या दोनशे कंपन्यांचा आढावा घेतला असता योग्य वेळ, चांगले सहकारी आणि चांगले काम, संकल्पनेमधील सच्चेपणा, योग्य बिझनेस मॉडेल आणि अंतिमतः निधी हे घटक याच प्राधान्यक्रमाने त्यांच्या यशात वाटा उचलत असतात, असेही गोरे म्हणाल्या.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading