February 6, 2023
appeal-to-participate-in-gandhi-vichar-jagar-programme
Home » गांधी विचार जागर कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

गांधी विचार जागर कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

हा केवळ ‘गांधी जागर’ नव्हे,
हे तर स्वतःच अंतर्मुख होत जाणे.. ~

● कशासाठी हा विचार जागर :

महात्मा गांधी यांचे विरोधक ‘गांधी युग संपलं’ असं म्हणत असतात. परंतु गांधी युग खऱ्या अर्थाने आता सुरू झालं आहे. कारण महामानवांच्या विचारांची उपयुक्तता कठीण काळातच अधिक आवश्यक असते. महात्मा गांधींना जाऊन यावर्षी 75 वर्ष पूर्ण झाली. पण जगातला असा एकही क्षण नाही, की गांधींचे स्मरण कोणत्या ना कोणत्या कारणाने, निमित्ताने केले जात नाही.

महात्मा गांधींनी आपल्याला अहिंसेचा मार्ग दिला असला तरी आपण आज सर्वाधिक हिंस्र बनत गेलो. गांधीजींनी आपल्याला शांततेचा विचार दिला, मात्र आपण अशांततेचा कल्लोळ माजवला. शोषित-गोरगरीब-कष्टकरी वर्ग निवस्त्र पाहून गांधीजी संपूर्ण हयातभर साध्या पंचावर राहिले. आपण मात्र पोशाखी जगण्यासाठी गरिबांच्या श्रमावर आणि त्या श्रमाला हीन लेखत उभे राहिलो. गांधींनी स्वदेशीचा विचार दिला, आपण मात्र आपली भूमीच नापीक केली. गांधीजींनी जात आणि धर्माचा राजकारणासाठी कधीच उपयोग केला नाही. आज मात्र गांधींच्या नावालाच प्रतिरोध करत “जात आणि धर्मा”चं हिणकस राजकारण केलं जातंय. अखेर हे एवढं टोकाला गेले आहे, की एका बाजूला संख्येने अल्प असलेला विचारशील भारत, तर दुसऱ्या बाजूला बहुसंख्य हिंसक भारत, अशी स्पष्ट विभागणी झालेली दिसते. हे सर्व पाहता अंतिमत: आज पुन्हा गांधी विचारांचीच कास धरल्याशिवाय देशापुढे दुसरा पर्याय नाही.

● विचार जागराचे औचित्य ::

या सगळ्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधीजींच्या 75 व्या स्मरण वर्षानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा बॅ• नाथ पै सेवांगणचे (मालवण) विद्यमान अध्यक्ष ऍड• देवदत्त परुळेकर यांच्या संकल्पनेतून बॅ• नाथ पै सेवांगण तर्फे 28 आणि 29 जानेवारी 2023 या दोन दिवसांच्या कालावधीत “गांधी जागर” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम म्हणजे केवळ गांधी विचारांचे श्रवण वा उजळणी नाही, तर गांधी विचारांच्या डोळस अनुकरणाचे एक पुढचं` पाऊल आहे.

● मान्यवरांचा सहभाग ::

या दोन दिवसांच्या कार्यक्रमात चंद्रकांत वानखेडे, निरंजन टकले, हेमंत देसाई, संजीवनी खेर, प्रा• नवनाथ तुपे, मुकुंद कुळे, सुभाष वारे, सुशील धसकटे, प्रमोद चुंचवार, प्रा• राजेंद्र मुंबरकर, प्रा• प्रिया सुशील आदी मान्यवर मंडळी सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने कवी अजय कांडर लिखित “अजूनही जिवंत आहे गांधी” (हर्मिस प्रकाशन) या सध्या बहुचर्चित असलेल्या दीर्घ काव्यसंग्रहावर उपरोक्त काही मान्यवरांच्या सहभागाने स्वतंत्र चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले आहे.

आज जगाला कधी नव्हे एवढे महात्मा गांधी कालोचित ठरत आहेत, अशा वेळी कोकणातील नामवंत कवी अजय कांडर यांना ही महात्मायिका लिहायची प्रेरणा झालीय, हेही कालोचितच आहे. ‘ज्याचा कोणी नाही बाली त्याला महात्मा तारी’ ह्यावर ठाम श्रद्धा असल्याशिवाय हे काव्यमंदिर बांधायची प्रेरणा होऊच शकत नाही. बुद्ध-कबीर येशू यांच्या मार्गाने पुढे गेलेल्या मोहनदास करमचंद गांधींना विविधतेत एकता दिसली होती. म्हणूनच माणसामाणसांतील भेदभावांना त्यांनी मूठमाती दिली होती. सभ्यता, संस्कृती, प्रतिष्ठा ह्यांचं मोल कळलं होतं.
विकृतीला संस्कृती बनवू पाहणाऱ्यांना आडवा येतोय तो ‘गांधीविचार.’ त्याला संपवायचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत. पण इतिहासाची पाने फाडली तरी गांधी विचार फाडता येत नाही. एकदा महात्म्यावर तीन गोळ्या झाडून त्याला मारलं होतं,
पण अजूनही जिवंत आहे गांधी!
गर्दीत राहणं सोपं असतं, पण एकांडा शिलेदार गर्दीची पर्वा करत नाही. सत्य माहीत असताना ते न सांगता राहणं हा भित्रेपणाच नव्हे तर गुन्हा आहे.. सत्याधिष्ठित मत मांडायला हिंमत जरूर लागते. ही हिंमत आपल्या इमानाशी एकनिष्ठ असणाऱ्यांकडेच असते. अजय कांडर ह्यांच्या निष्ठेला व
जिद्दीला आमचा सलाम.

दामोदर मावजो
भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक

● अंतर्मुख होण्यासाठी आत्मशोध ::

आपली बौद्धिक समृद्धता होण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा आहेच! आज आपल्या आजूबाजूला नेमकं “जात आणि धर्म” याचे आभासी मोनोलिथ उभे करून समाजात आणि माणसामाणसात द्वेष आणि भेदाची दरी कशी उभी केली जातेय, त्यातून एक माणूस म्हणून आपलं जगणंच कसं अधिकाधिक अशांत-अस्थिर- द्वेषमूलक होत आहे, हे समजून घेत, या परिस्थितीत आपली स्वतःची काय भूमिका असली पाहिजे, याचाही एक आत्मशोध घेत अंतर्मुख होत जाणे म्हणजे “गांधी-विचार जागर” होय!

● सर्वांसाठी आणि मोफत ::

या दोन दिवसीय “गांधी जागर” कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या रसिकांसाठी जेवण आणि निवासाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. या “विचार-जागरा”मध्ये अधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बॅ• नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी केले आहे. या “गांधी विचार जागरा”मध्ये सहभागी होणाऱ्या रसिकांनी बॅ• नाथ पै सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर (94 22 94 62 12) यांच्याशी संपर्क साधावा असे, आवाहन बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Related posts

महिलांचे हक्काचे व्यासपीठ वडगणेतील चंद्रप्रभा शंकरराव पाटील वाचनालय

प्रसार माध्यमांनी स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात योद्ध्यांच्या शौर्यगाथा पुढे आणाव्यात – नरेंद्र मोदी

तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार अन् प्रतिभा पुरस्कार जाहीर

Leave a Comment