November 21, 2024
ramesh-salunkhe-article-on-reading-movement
Home » तळमळ वाचन चळवळ रुजवण्याची…
मुक्त संवाद

तळमळ वाचन चळवळ रुजवण्याची…

भडकलेल्या भावनांमध्ये केव्हाही विचारांना सोयिस्कर तिलांजली दिलेली असते. पूर्वी खंडण-मंडण, पूर्वपक्ष-उत्तरपक्ष, पूर्वरंग-उत्तररंग असे छान शब्द होते. एकमेकांची बूज राखून माणसं विचारविनिमय करायची. आता हे अत्यंत अभावानं दिसतं आहे. ती परंपरा होती आपली. भावनातिरेकाच्या गदारोळात आज अस्तंगत होते आहे. विचारांची लढाई हातघाईवर येऊन ठेपली आहे. मुद्यांची चर्चा गुद्यांवर केव्हा येऊन ठेपेल याचा काहीच भरवसा राहिला नाही.

रमेश साळुंखे.
प्रमुख, मराठी विभाग, देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर, जि. कोल्हापूर.
मोबाईल 9403572527

…काय वाढून ठेवलं असेल पुढ्यात कुणास ठाऊक? असा विचार डोक्यात घोळवतच त्या ग्रंथालयाकडे आपसूकच मी मला ओढून घेऊन जात होतो. पाऊसनव्हता पण वर आभाळात मळभ दाटून आलेलं होतं. महापूरही बराचसा ओसरला होता. तरीही त्या पठ्ठयानं आपलं बरं वाईट अस्तित्व साऱ्या शहरभर विस्कटून टाकलं होतं. सैरभैर. घरं, माणसं, दुकानं, देवळं सारं काही परत एकदा स्थिरस्थावर होत असल्यासारखं वाटत होतं. गल्ली बोळातल्या घरांमधील भिजलेला सारा बाडबिस्तरा रस्त्यारस्त्यांवर उन खात तसाच पडून राहिला होता. विचित अशी दुर्गंधी गावभर पसरली होती. माणसं एकमेकांशी बोलत नव्हती. मूकपणानं आवरत सावरत होती.

अशातच एका खूप जुन्या आणि माझ्या अत्यंत आवडत्या अशा सार्वजनिक ग्रंथालयात जाण्याचा योग आला. मुद्यामच आणला तो योग. महापुराच्या तडाख्यातून वाचलेल्या त्या घनिष्ठ मित्राच्या सांत्वनासाठी. जवळपास पंधराएक वर्षांचं जिवाभावाचं नातं या वाचनालयाशी होतं माझं. नंतर नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं लांब जावं लागलं. तरीही सुरुवातीची तीन-चार वर्षे हटकून ते नातं सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला मी. पण नंतर तेही अशक्यच वाटू लागलं. प्रत्येक आठवड्याला शंभर सव्वाशे किलोमीटर पुस्तक बदलण्यासाठी जाणं आणि नावावर घेतलेलं पुस्तक निम्याहूनही कमी वाचून होणं हे असं सुरू झालं. शिवाय महाविद्यालयावरचं ग्रंथालयही चांगलंच समृद्ध होतं. तिथंही मिळायची हवी ती पुस्तकं. मग अनिच्छेनच ताटातूट करून घेतली मी त्या ग्रंथालयाची. पण आब राखून असलेल्या या सार्वजनिक ग्रंथालयाशी असलेलं नातं मात्र अद्यापही तसंच राहिलं आहे.

तर त्या दिवशी संध्याकाळ झालेली. सातएक वाजले असतील. बाहेर रस्त्यावर दिवे लागलेले होते. वाचनालयाचा चिंचोळा रस्ता ओलांडून आत गेलो. तर भपकन् भिजल्या पुस्तकांच्या कुंद वासानं हे असं स्वागत केलं. महापुरानं त्याच्या कसल्याबसल्या पाण्यानं कितीतरी पुस्तकं नासवून टाकली होती. अवकळा सगळी. समोर भल्यामोठ्या काचेच्या कपाटात मांडलेली नवी पुस्तकंही आत्मगंध विसरून अंग चोरून उभी असल्यागत दिसत होती. साऱ्या वातावरणातच एक उदासवाणा झाकोळ पसरून राहिला होता. एखाद दुसऱ्या वाचकाची चाहूल सोडली तर त्या भल्या थोरल्या ग्रंथालयात सारा शुकशुकाटच. सारा उत्साहच पार मावळून गेलेला. ग्रंथालयाच्या प्रवेशद्वारावर तेवढा जेमतेम उजेड. प्रकाशाकडून अंधाराकडे. आता पुन्हा एकदा सगळ्याच गोष्टींचा उलटा प्रवास सुरू झाला आहे की काय? की आपल्या आजूबाजूला घडणारं अगदी सुतासारखं ठीकठाक चाललं आहे आणि आपल्यालाच ही असली एकटं पाडणारी निराशा वेढून राहिली आहे?

विषण्ण अगदी ! पूर्वीही अनेकदा तसं वाटायचं. पण ग्रंथालयात आल्यावर सारी मनावरचं ओझं पळून जायचं कुठंतरी. अगदी हलकं हलकं तरंगल्यासारखं वाटायचं. पुस्तकांच्या कपाटांसमोरून फिरताना राजमहालात हिंडल्याला भास व्हायचा. उगीचच अंगात दहा हत्तींचं बळ आल्यागत वाटायचं. पुस्तकं म्हणजे थकल्या भागल्या जीवाला म्हणजे बुडत्याला केवळ काडीचा नव्हेत; तर भल्या मोठ्या ओंढ्यांचा आधार असल्यागतच की. पण हा असला आधार आता हवाय कुणाला आणि कितपत? काय गत करून टाकली आहे आपण पुस्तकांची? ग्रंथालयांची? आत सगळा व्याकूळ करणारा अंधार. आणि हात पाय दुमडून घेऊन ओल्या दमट काळोखात वाचकांकडे डोळे लावून बसलेली, पुराच्या पाण्यातून कशीबशी जगली वाचलेली हजारो सर्द पुस्तकं. अंधार, काळं मांजर आणि त्याचे विलक्षण चकाकणारे तेजस्वी डोळे. पुस्तकं हाताळून, पाहून, स्पर्श करून नावावर घेऊन जाण्याची सुंदर रीत तर इथेही केव्हाच हद्दपार झालेली. हव्या त्या पुस्तकाचं नाव संगणकावर टाकायचं. नंबर घ्यायचा, शिपायाकडं द्यायचं मग तो दिवा लावून पुस्तकाच्या कपाटाआड जाणार शोधल्यासारखं करून दिवा बंद करून मख्ख चेहऱ्यानं चिठ्ठी परत करत ‘नाहीय ते’. इतकंच म्हणणार. हे असं अदृश्य पिंजरे वाचकांसमोर उभे केल्यामुळं पूर्वी हवं ते पुस्तक समजा नाहीच मिळालं; तरीही आपसूकपणानं दुसरंच एखादं सुंदर पुस्तक नकळत हाती लागायचं. आणि मन अगदी हरखून जायचं. आज तेही मार्ग बंद. आधीच असलेल्या उल्हासातला हा असला फाल्गुन मास. बऱ्याच ठिकाणी थोड्याफार फरकाने हा असलाच अनुभव उरल्यासुरल्या वाचकांना सातत्याने येणारा.

तर खूप वर्षे तुटपुंज्या पगारावर राबणारा लाकडी स्टुलावर आक्रसून बसलेला ओळखीचा राजाभाऊ शिंदे नावाचा हसरा शिपाई भेटला. प्रामाणिक. पापभिरू. हवं ते पुस्तक चटकन शोधून देणारा. थकून गेलेला वाटला अगदी. उदासवाणं हसला. सावकाश उठून जवळ आला. हातात हात घेऊन भरभरून बोलला. ‘आलास, बरं झालं रे. कालपास्नच उघडलं आहे बघ ग्रंथालय. काहीच राहिलं नाही. बरीच पुस्तकं वर वाळत घातली आहेत. उन तर कुठं पडतय नीट. वीजपण सकाळीच जोडली आहे. सगळं बंद होतं. हे इथं गळ्यापर्यंत पाणी होतं. पुस्तकं वरच्या मजल्यावर नेईपर्यंत पिठ्ठा पडला. वाचतील तेवढी वाचवली.

लगदा झालेली गाडीभर पुस्तकं फेकून दिली आहेत. बरं, मग बरा आहेस ना? ओळख ठेव बाबा गरिबाची. आता तीनच महिने राहिली आहे नोकरी माझीपण, मग काय…बघू पुढं काय करायचं ते. पुन्हा कधी आलास तर ये बाबा घराकडं. चहा घेऊया ? चल !’ काय बोलायचे ते सुचेचना. गप्पच उभा राहिलो. न बोलताच डावीकडं पाहिलं तर पुढ्यातच एका काऊंटरमागे पुस्तकांची देवघेव करणारी वाचकांची वाट पहात बसलेली एक सौभाग्यवती. आणि स्वच्छ काचेसमोर ठीकठाक बसलेला क्लार्क नावाचा नव्यानं भरती केलेला रोजंदार माणूस. ‘इथंच राबू पूर्णवेळ, होईल काम आपलं’ या आशेवर सेवानिवृत्त झालेली कितीतरी माणसं आपल्याही नजरेसमोरून निघून गेलेली. काही मूकपणानं कायमचीच या जगातून निघून गेलेली. पुस्तकांच्या उंचच उंच कपाटांमधून जेमतेम प्रकाशात पुस्तकं पाहताना हे असलंच काहीबाही डोक्यात भिरभिरत राहिलं… आणि आताशा कितीदा जातो आपण ग्रंथालयात? पुस्तकांशी, पुस्तकांशी निगडित असलेल्या माणसांशी कितपत नातं राहिलं आहे आपलं? असे कितीतरी प्रश्न सहज चाळवले गेले मनात आणि झरकन शहारूनच गेलो.

पंचवीस एक वर्षे होऊन गेली असतील. थोडं बहुत शिक्षण झालं आणि शिकण्या- शिकविण्याच्या हेतूनं दिवसभरात पाच सहा महाविद्यालयावर जायचो. वर्षातून दोनदा पगार. एक दिवाळीला आणि दुसरा मे महिन्याच्या सुट्टीत. यासाठीही लाचार करून घ्यायचे लोक. पण आपल्याला काही कमी पडतय असं नव्हतं वाटत तेव्हाही. तर मुलांना शिकवून झालं आणि वेळ मिळाला, आणि मिळायचा बरं का वेळ तेव्हाही. तर हटकून त्या प्रत्येक महाविद्यालयामध्यल्या ग्रंथालयात एखादी तरी फेरी न चुकता असायचीच. तसा तेव्हाही न वाचणारा लाब्ररीयन आणि पुस्तकांचा ढीग पुढ्यात घेऊन गप्पा मारत काम करतो आहोत असं भासवणारे बरेच शिपाईमामा बऱ्याच ठिकाणी हमखास असायचेच. हे असं सार्वत्रिक चित्र आजही कुठंही आणि केव्हाही हटकून पहायला मिळतं. वाचणारा ग्रंथपाल आणि पुस्तकांवर मनापासून प्रेम करणाराही एखादा दुसरा असायचा; नाही असं नाही. पण ते तोंडी लावण्यापुरतंच वा हाताच्या बोटांवर मोजता येण्यापुरतंच.

ग्रंथालयात जाणारे वाचकही विशेषत: पन्नाशी-साठीच्या वयाचे खूप असायचे. आजही असतात पण त्यांचीही संख्या आता रोडावली आहे, हे न्नकी. मनगटावर छोटीशी रंगीबेरंगी कापडी पिशवी अडकवून कपाटांच्या सांदरीत पुस्तक चाळत उभे असलेले खूपदा दिसायचे. उंच, सडपातळ, सोनेरी किंवा पूर्ण काळ्या फे्रमचा स्वच्छ चष्मा घातलेले, शुभ्र विजार घातलेले अथवा पॅन्टीला बेल्ट न लावता नीट इनशर्ट केलेले, डोक्यावरचे विरळ होत चाललेले पांढरे केस तेल लावून नीट मागे फिरवून बसवलेले, तोंडात बचाळी बसवलेले असे मोजकेच पण दिसायची माणसं वाचनालयात. स्त्रियाही दिसायच्या अधूनमधून पण त्यांचीही संख्या तशी फार कमीच. वाचनाच्या बाबतीत आजच्यापेक्षा सारंच काही पूर्वी आलबेल होतं; अशातलाही भाग नाहीच. साहित्याचं वाचन हे माणसाचं पोट भरण्याचं आणि त्याहीपेक्षा आपलं आणि समाजाच्या सर्वांगिण उन्नतीचं सर्वात सुंदर प्रयोजन आहे; हे मान्यच केले पाहिजे. पण या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे आजकाल आपलं अक्षम्य दुर्लक्ष होतं आहे, हेही आपण आपल्या मनाशी कबूल केलं पाहिजे.

कोणत्याही काळात अगदी मन लावून एक आंतरिक गरज म्हणून वाचणारी माणसं तशी कमीच होती. आतून उर्मी असेल आणि वाचनातल्या आनंदाची ज्याला इज्जत असेल; तो माणूस वाचनाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं खोटं समर्थन कधीच कुणापुढं करणार नाही; हे मुद्याम सांगायला नकोच. तरीही आजकाल वाचणाऱ्या माणसांचं वाळवंट झपाट्यानं वाढू लागलं आहे. एवढं मात्र निश्चित. गंमत म्हणजे हा संवाद मी वाचणाऱ्या माणसांसोबतच करतो आहे. न वाचणाऱ्या माणसांपर्यंत हे सारं कसं पोहोचवायचं हा खरा मूलभूत प्रश्न आहे. मारून मुटकून, जुलूम जबरस्तीनं करण्याचा आणि करवून घेण्याचा हा उद्योग नव्हेच. अगदी ज्ञानोबांचे शब्द उसणे घेऊन बोलायचं तर ‘अति हळूवारपण चित्ता आणूनिया…’ असंच सांगितलं आणि बोललं पाहिजे. पण कधी, कसं आणि कुणाशी असाच हा एक भला मोठा प्रश्न होऊन बसला आहे आपल्यासमोर.

सरकारी अनुदानावर चालणारी जी काही वाचनालयं माझ्या वाट्याला आली किंवा मी त्यांच्या वाट्याला गेलो तिथेही चित्र काही फारसं वेगळं आहे; अशातलाही भाग नाही. अपवाद सोडला तर पुस्तकांच्या कपाटांसमोर उभं राहून कोणतंही पुस्तकं हाताळून हवं ते पुस्तक तेव्हा घेऊन घरी जाता येत असे. असं कोणतंही पुस्तक विशेषत: नाटकांचं दररोज एक घरी वाचनासाठी म्हणून मी घेऊन जायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते वाचून परत द्यायचा आणि दुसरं आवडतं पुस्तक घरी आणायचा. हा रतीब बहुतेकदा मे महिन्यात आणि दिवाळीच्या सुट्टीत माझ्याकडून हमखास घातला जायचा. आता इतकं वाचन होतं का आपल्याकडून ? तर अर्थातच नाही. अखंडीत वाचीत जावे… सोडाच. छोडो कल की बातें… पण खंडित का होईना, हवं ते वाचायला थोडी थोडी उसंत मिळते आहे. तर या अशा आधुनिक काळाचे उपकारच मानले पाहिजेत नाही का?

खूप नटवल्या सजवल्या गोष्टी, खूप स्वस्तात दिल्यासारखं करून वर पत्ताही लागणार नाही अशाप्रकारे माणसांपासून पळवून नेण्याचा चंग बांधलेला काळ हा. माणसांचं केवळ बाहुलं करणारा, वस्तूकरण करणारा. मन, शरीर, आत्मा, नातीगोती, कुटुंब, समाज यांच्याशी निष्ठूरपणे नाते तोडावयास भाग पाडणारा. तीच जीवनरीत ठरू पाहणारा. ‘वाचू नका, विचार करू नका, फ्नत आमचं ऐका आणि त्याबरहुकूमच कृती करा’, असं सांगणारा काळ हा. माणसांजवळ भरपूर वेळ आहे; पण निर्भेळ, सात्विक आणि सुंदर असा वेळच नाही कुणाकडे कुणासाठी असा हा काहीसा विचित्र काळ. आणि या अशा काळाची काळीकुट्ट सावली आपल्यावर. ती सावली पसरुन राहिली आहे आपल्यावर याचाचा थांगपत्ता लागू न देण्याचा काळ. खूप काही हिरावून, हिसकावून ओरबडून घेण्याचा काळ हा.

म्हणूनच या काळाच्या वाचनाची अपरिहार्यता अधिकच. इतर कशाने कोणत्या माध्यमाने याची पूर्तता होण्याची शक्यता तशी धूसरच. काळाचं अथवा ग्रंथांचं वाचनच या सगळ्यांवरची पुटं खरवडून काढू शकतं हे अगदी निर्विवाद सत्य. आपल्या सर्वांनाच ते स्वस्थ म्हणजे स्वत:मध्ये स्थित ठेऊ शकतं हे खरं… तथापि हा सांगणाऱ्यांचा पक्ष जरूर आहे. पण ऐकणाऱ्यांचा ? त्यावर हुकूम कृती करणाऱ्यांचा?

वाचन हे एक सर्वांगसुंदर छंद आहे, याची जाणीव आपण झपाट्याने विसरत चाललो आहोत. आपले आणि आपल्या भवतालाचे खरंच भले व्हावं; अशी जर मनापासून इच्छा असेल तर वाचनासारखा पर्याय दुसरा नसावा. आजकाल शाळेत जाऊन लिहिणे-वाचणे शिकलेल्यांची संख्या कमालीची वाढली आहे. प्रत्येकक्षेत्रात शाखा आणि उपशाखांचं पीक जोमानं वाढलेलं आहे. पूर्वी अर्थातचे या साऱ्यांचं प्रचंड दुर्भिक्ष होतं. पुस्तकं, दूरदर्शनवरील असंख्य वाहिन्या, मोबाईल, इंटनेट, किंडल, हजारोअ‍ॅप्स असलं काही नव्हतं. जे शाळा महाविद्यालयांमध्ये गेलेले नाहीत किंवा जाण्याची संधी मिळालेली नाही, अशा हजारो लोकांना निरक्षर-अडाणी समजलं जायचं. पण ते व्यापक अर्थानं अडाणी असे नव्हतेच. आपलीच त्यांच्याकडं पाहण्याची दृष्टी कोती होती.

अगदी गावोगावी, वाड्या वस्त्यांवरही भजनं, कीर्तनं लोककला, सण समारंभ, चालीरीती, परंपरा अशी मनोरंजनाची आणि प्रबोधनाचीही शेकडो माध्यमं माणसाच्या आयुष्याला अगदी पूर्वापार खेटून उभी होती. माणसांना भरपूर वेळ असायचा. हे सारं अनुभवाचं संचित माणसांच्या जगण्याचा एक अविभाज्य घटक होता, डोळाभरून पहायची आणि अनुभवायची हे सारं माणसं. माणसं संथ सावकाश चालायची-बोलायची. निसर्गाशी स्वत:शी आप्तस्वकियांशी, पक्षी, पाखरं, फुलं, अगदी गोठ्यातली जनावरं यांच्याशीही माणसं आत्मियतेनं बोलायची. परस्परांच्या सुखानं आनंदून जायची आणि दु:खाने कळवळून जायची माणसं. ही शिकलेल्यांच्या दृष्टिकोनातून आलेली अशी निरक्षरता असूनही आपल्या समाजव्यवस्थेत चांगल्या आचार, विचार आणि उच्चारांची नीट जपणूक व्हायची. आज इतके काही ज्ञान विज्ञानाच्या अनंत रंगी ढगांनी आपलं अवघं आयुष्यच कवेत घेतलेलं आहे; की विचारता सोय नाही. आणि या अशा ढगांना पाहून भरजरी पिसारे फुलवून कोट्यवधी मोर आपल्या घरोघरी नाचत आहेत. ना साद-पडसाद ना संगीत. या अशा चवचाल माध्यमांच्या सावटात विचारांच्या, भावनांच्या आणि संवेदनांना आपण पारखे होऊन बसलेलो आहोत. ना खेद ना खंत, असं होऊन बसलं आहे सारं.

तसं पाहिलं तर आपण काहीच वाचत नाही आहोत; असंही नाहीच की. वर्तमानपत्रं, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, किंडल, झालंच तर फेसबुक, इन्स्ट्राग्राम इत्यादी माध्यमांवरील असं काहीबाही अखंड वाचतोच की आपण. पूर्वीपेक्षा अधिकच वेळ देतो की आपण वाचनाला. पण अशा वाचनातून किती अभिरूची, किती समाजभान, समाजभान सोडाच किती आत्मभान मिळतं आपल्याला? शांत बसून आपण विचारतो का आपण स्वत:ला हे? का हे असं स्वत:शी बोलण्याचा वेळही आपण आपल्या आयुष्यातून कायमचाच आपणच हद्दपार करून टाकला आहे? काय वाचलं पाहिजे आणि कसं वाचलं पाहिजे; हे एकदा नीट समजलं की मग वाचलेल्या गोष्टींचं व्यवहारात उपयोजन कसं करायचं, ही गोष्ट नंतरची. नीट वाचन करणारे शेकडो लोकच मग वाचून विचारात मुरविलेलं नीट आचरणात आणण्यासाठी जिवाचं रान करतात. म्हणून किती वाचलं यापेक्षा वाचलेलं किती वाचन आपल्या आकलनाच्या कक्षेत आलं आहे हे महत्त्वाचं. शिवाय विचारांची किती उलथापलथ झाली आपल्यात, काही बदल घडताहेत का आपल्यात, काही नवी जाणीव होतेय का आपल्या आत? हे महत्त्वाचं. त्यामुळं अशा प्रकारच्या केवळ पाठांतराला तसा काहीच अर्थ नाही.

अन्यथा अर्थेविण पाठांतर । कायसा करावे । व्यर्थची मरावे । घोकूनिया ।। असा सज्जड दम तुकोबांनी भरलेलाच आहे की. वाचनापेक्षा अनुभवणं कधीही चांगलंच की ! चांगल्या ग्रंथांचं आणि त्याच्या वाचनाचं महत्त्व पूर्वापार अनेकांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि त्यावरहुकूम तसा कित्ताही त्यांनी गिरवलेला आहे. म्हणूनच ते मोठे, थोर लोक. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदासादी संतांनी ग्रंथांच्या उपयोजनाचे महत्त्व चांगलंच जाणलं होतं. मातृभाषेचाही या साऱ्यांना सार्थ असा अभिमान होता.

उगीच नाही म्हणून ठेवलं नामदेवरायांनी, ‘नामा म्हणे ग्रंथ । श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी । अनुभवावी।।’ ओवी नुसती वाचावी, असं नाही म्हटलेलं त्यांनी. तर ती अनुभवावी-आचरणात आणावी असं त्यांचं प्रेमळ सांगणं आहे . शब्दांना रत्नं आणि प्रसंगी शस्त्रंही केलेल्या तुकारामबुवांनी शब्दांनाच जीवीचे जीवन असं म्हणून शब्दांचेच धन जन लोकांमध्ये उदार हस्ते वाटून दिलं आहे. ही धनसंपदा अखंड मानवजातीच्या उद्धाराकरिता अजरामर असे विसाव्याचे क्षण ठरलेले आहेत. अशा विभूतीमत्त्वांनी वाचलेलं- लिहिलेलं प्रत्यक्ष आचरणात आणलं, त्यामुळं ते थोर आणि वंदनीय ठरले.

रामदासांनीही हाच कित्ता गिरवला अखंडीत वाचीत जावे । दिसामाजी काहीतरी लिहावे ।। अशी त्यांचीही शिकवण आहेच की. तथापि या त्यांच्या सांगण्यालाही चारशे वर्षे उलटून गेलीत; पण अजूनही आपल्या समाजात वाचन संस्कृती रुजली नाही ती नाहीच. उत्तरोत्तर ती अधिकच क्षीण ठरते आहे. कधी पाहणार आपण गांभिऱ्यांनं या साऱ्यांकडं ?

याच्याही आधीच सांगायचं तर आपल्याला मम्मटाची साक्ष काढता येते. लिहिण्याच्या आणि वाचनाच्या संदर्भात या गृहस्थाने यश, अर्थप्राप्ती, व्यवहारज्ञान, जिज्ञासा, आनंद वाचन-लेखनाच्या संदर्भातील आपली मते नोंदवून ठेवलेली आहेत. शिवाय जिज्ञासापूर्ती, जीवनानुभूती, आत्माविष्कार, इच्छापूर्ती, स्वप्नरंजन, पलायनवाद असेही अनेक मुद्ये अगदी प्राचीन काळापासून चर्चिले गेले आहेत. इतका भला मोठा आपल्या सर्वांच्याच ‘काखेत भरलेला कळसा’ असूनही… आता तर प्रचंड वेगाने वाचनच गैरलागू आणि निरर्थक होऊ लागले आहे. याची ना खेद ना खंत असे सगळे आपले होऊन बसले आहे. स्पर्धेने ( ज्याचा तसा आपल्या खऱ्या आयुष्याशी कोणताच संबंध नसतो.) केवळ आपल्याला अंधच नाही तर मुकं आणि बहिरंही करून सोडलेलं आहे.

समाजातला विचार संपून भावनेचं थैमान सर्वत्र दिसू लागले आहे. भावना आणि विचार हातात हात घालून चालू लागल्या; की ते केवळ चालणे रहात नाही तर त्याचे गीत, संगीत, नृत्य आणि नितांत सुदंर शिल्पही बनते. ते तनामनाला खूप अवीट असा आनंद देते आणि शांतवतेही आपल्याला आतून. वर्तमान सामाजिक, राजकीय वातावरणात जिथे भावना आहेत तिथे विचार नाहीत आणि जिथे विचार आहेत तिथे भावनांचा, संवेदनशीलतेचा मागमूसही नाही. या दोहोंमधील एकात्मतेचा अभाव आपलं अवघं जगणं-मरणं विरजवून टाकतो आहे. भडकलेल्या भावनांमध्ये केव्हाही विचारांना सोयिस्कर तिलांजली दिलेली असते. पूर्वी खंडण-मंडण, पूर्वपक्ष-उत्तरपक्ष, पूर्वरंग-उत्तररंग असे छान शब्द होते. एकमेकांची बूज राखून माणसं विचारविनिमय करायची. आता हे अत्यंत अभावानं दिसतं आहे. ती परंपरा होती आपली. भावनातिरेकाच्या गदारोळात आज अस्तंगत होते आहे. विचारांची लढाई हातघाईवर येऊन ठेपली आहे. मुद्यांची चर्चा गुद्यांवर केव्हा येऊन ठेपेल याचा काहीच भरवसा राहिला नाही.

आणखी एक सांगायचं, तर सजग इतिहासदृष्टी असेल तर वर्तमानातला आणि भविष्यातलाही प्रवास सुखाचा होण्याची शक्यता निश्चितच दुणावत असते. वाचनामुळे भूत, भविष्य आणि वर्तमानाची प्रखर आणि सत्य अशी जाणीव होते. हे असे वाचन करणे अत्यंत निकडीची गरज असते सर्वांसाठीच. पण अशाही प्रकारच्या वाचनाच्या अभावामुळे तीही कमीच होऊ लागली आहे. इतिहास-पुराणांचं वाचन करण्याऐवजी आपण लोकप्रियतेचा सवंग हव्यास असलेल्या मालिका घरबसल्या पाहण्याचा चंगच जणू काही बांधलेला आहे की काय? असा संशय घ्यायला भरपूर जागा आहे.

इतिहास-पुराणादिकांचं उदात्तीकरण करणं, वस्तुनिष्ठतेला फाटा देणं, आभासी वास्तवाचा मारा करून वास्तवातील समस्यांपासून दूर नेणं आणि जाहिरातींच्या माध्यमातून पुष्कळ नफा कमावणं हा हेतू बऱ्याचदा या मालिकांच्या प्रसारणामागं असतो. हा कावा लक्षात घेऊन आपण आपला सांस्कृतिक-सामाजिक बचाव करणं आपल्या सर्वांच्याच हिताचं आहे. तात्पर्य काय तर अशा प्रकारच्या समाज माध्यमांचा आणि प्रसार माध्यमांचा विवेकीपद्धतीने वापर झाला पाहिजे. खरे तर या माध्यमांनीच विवेकनिष्ठ जीवनपद्धतीचा स्वीकार करायला हवा. पण नजीकच्या काळात तरी ते प्रचंड दुरापास्त वाटतं आहे. जीवघेणी स्पर्धा, रटरटत असलेला चंगळवाद आणि हव्यासी अर्थकारण अशा बदफैलीपणाच्या गर्तेत अडकलेल्या माध्यम संस्कृतीचा अश्व जोपर्यंत स्वत:ला स्वत:च आवर घालत नाही; तोपर्यंत हे सुदिन येण्याची शक्यता खूप धूसर आहे. ही शक्यता समाजधार्जिनी बनून प्रकटण्याची चिन्हे आपण कायमची गमावून बसलेलो आहोत की काय? अशी धास्ती वाटावी अशा वातावरणात दुदैवाने आपण जगतो आहोत. हे आपण मान्य केलं पाहिजे.

आई, बाबा, आजी, आजोबा यांच्याकडून गोष्टी ऐकत ऐकत महापुरूष घडले; हा केवळ आपल्याच देशातला नव्हे; तर जगभरातला आवर्जून सांगितला जाणार इतिहास आहे. हा इतिहासही आपण झपाट्याने विसरू लागलो आहोत. हे आपल्याकडून विसरले जाऊ लागले आहे; याचेही आपणास आता काही वाटेनासे झाले आहे. विभक्त कुटुंब पद्धतीच्या नावाखाली आजी आजोबांपासून लहानगी मुलं दुरावली आहेत. जिथं आजी आजोबा आहेत त्यांच्याकडे गोष्टी आहेत पण तिथं मुलांना सुनांना आणि नातवंडांना गोष्टी ऐकण्यास वेळ नाही. मोबाईल आणि दूरदर्शनवरील आभासी कार्यक्रमांनी त्यांच्या पुरता वेळ भस्मासुरासारखा खाऊन टाकलेला आहे. उरल्यावेळेचं ऑनलाईन शिक्षणाचं रहाटगाडगं मुलांच्या माथ्यावर फुटतं आहे. यातून मुलांचा बौद्धिक, भावनिक आणि मानसिक विकास किती झाला, समाजभानाचं घोडं कुठं पेंड खातं; असे प्रश्न अलहिदाच ठरत आहेत.

चांगल्या वाचनाच्या सवयींकडे पुरूषवर्गाचे दुर्लक्ष होते आहे; हे खरेच. पण त्याहून काकणभर अधिकच दुर्लक्ष स्त्रियांचे होते आहे का? आणि ते तसे असेल तर अधिकच चिंता करण्याजोगं आहे ते. ज्या समाजात स्त्रियांचे वाचनाकडे अक्षम्य दुर्लक्ष होते; त्या संस्कृतीची निकोप वाढ निश्चितच खुंटते. अपवाद सोडला तर खूप जुजबी झालं आहे स्त्रियांचंही वाचन आता. हे देखिल मान्यच केलं पाहिजे. पूर्वी स्वयंपाक बनवण्याशी संबंधित खूप पुस्तकं मिळायची.

आताही कमी प्रमाणात का होईना पण प्रकाशित होतात तसली पुस्तकं. तथापि त्यांचीही जागा आता यूट्यूबने घेतलेली आहे. जगभरातला कोणताही पदार्थ घरबसल्या कधीही करता येतो आपल्याला. ही तशी चांगलीच सोय आहे की. अशा नवनव्या गोष्टींना नाकारण्यात काहीच अर्थ नाही. पण चांगले ग्रंथ विकत वा ग्रंथालयातून आणून सवड काढून ते वाचण्यातला जो आनंद आहे; तो कोणत्याही पर्यायी माध्यमांमुळे भरून निघणं सद्याच्या घडीला तरी शक्यच नाही. पुस्तकांना स्वत:चे म्हणून एकप्रकारचे विशिष्ट असं व्यक्तिमत्त्व असतं. रंग, रूप, रस, गंध, नाद अशा साऱ्या संवेदना एकजीव होऊन पुस्तकाच्या रूपात, आकारात, घाटात आनंदाने नांदत असतात. आणि त्या संवेदना आनंदानं आपल्याला हळूवारपणे आपल्यात सामावून घेत असतात. या अशा जागा अन्य कोणतंही माध्यम घेऊ शकत नाही. ही आजतरी काळ्या दगडावरची स्वच्छ अशी पांढरी रेघ आहे.

चांगल्या वाचनाचा संबंध थेटपणे चांगल्या संस्कारांपाशी येऊन ठेपतो. लहान मुलांचा अधिकांश वेळ आईच्या आगेमागे खर्च होत असतो. अर्थातच आतातर दोघेही कमावते असल्याने आई-बाबांच्या सहवासाचीही वानवा आहेच. म्हणून तर या प्रश्नाकडं अतिशय गांभिर्यानं पाहण्याची कधी नव्हती इतकी गरज निर्माण झाली आहे. धावपळीच्या आणि धकाधकीच्या या अशा जगण्यानं आपले पुरते बेहाल करून सोडलेले आहे. या अशा सगळ्या धबडग्यात त्या आई म्हणवून घेणाऱ्या मातेच्या वाचनाची काय परवड होत असेल; याची कल्पनाच न केलेली बरी. किती टी. व्ही. पाहतो आपण ? किती वेळ देतो मोबाईलसाठी? पार्लरसाठी कितीवेळ खर्च करतो आपण? लायब्ररीत किती जातो आपण? आता मग ती पुस्तकं वाचणार कधी आणि रामायण, महाभारतातल्या, इसापनीती वगैरेतल्या गोष्टी सायंकाळी लवकर घरात येऊन, सगळे कामकाज आटोपून, तो मोबाईल कुठेतरी दूर फेकून देऊन, निजताना आपल्या मुलांना गोष्टी सांगणार कधी? मग प्रश्न उरतो कार्टून शो मधल्या गोष्टी ऐकून-पाहून कोणते कसे आणि केव्हा संस्कार करणार आपण आपल्या लहानग्यांवर? इथे प्रश्न केवळ स्त्रियांचा आहे असे नव्हे. आधुनिकीकरणाने जे आणि जसे जीवन आपल्याला जगायला भाग पाडलेले आहे; ते तसे जगूनसुद्धा प्रत्येक मातापित्याने आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत, याबद्दल दुमत होण्याचे कारणच नाही. गोष्ट ऐकण्याची प्रंचड तहान लागली आहे मुलांना. आपण मात्र अशाप्रकारच्या तहान भुकेच्या सकस अन्नापासून निर्दयपणानं तोडतो आहोत. त्यामुळे मुलांच्या आचार विचारांवरही आजारपणात चढते तशी संस्कारांची, चुणचुणीतपणाची आणि बाह्य पोशाखी नटवेपणाची सूज दिसू लागली आहे केवळ. हे बळकट, बलदंड असे बाळसे नाही सूज आहे ही. हे ओळखलं नाही ना आत्ताच आपण; तर भविष्यात आपल्यासमोर काय वाढून ठेवलं असेल; याची कल्पनाच न केलेली बरी.

शास्त्रीय साहित्य किंवा सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या माणसांचं ललित साहित्याचं वाचन कितपत आहे? हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहेच की. कोणकोणत्या ग्रंथालयात पुस्तकांसाठीच्या सभासदतत्त्वाचं खातं आहे आपलं? ग्रंथालयातली बात तर सोडाच मोबाईलवर किती चांगली पुस्तकं डाऊनलोड केली आहेत आपण? त्यातली सलग अशी किती पुस्तकं वाचून झालीत आपली? किती वाचायची शिल्लक आहेत?

आकाशवाणीवर वाचनाचे किंवा रंगमंचावर अभिवाचनाचे प्रयोग होतात हल्ली. खूप वेळ देऊन मोठ्या परिश्रमपूर्वक एकएक शब्द जिवंत करत अप्रतिम वाचन करताता कितीतरी लोक. बहुतकदा हे असलं सारं अक्षरसंचित विनामूल्यच असतं. जाऊन शांतपणे बसून ऐकायचं एवढंच करायचं असतं आपल्याला. पण अशा कार्यक्रमांना श्रोत्यांची संख्या किती असते? तुम्हीच निवडा पुस्तकं, ती वाचाही तुम्हीच आणि तुमचं तुम्हीच ऐका ! असा सगळा कारभार आपला.

दरवर्षी विविध प्रकारच्या सभा-संमेलनात खूप पुस्तकं खपतात. हौसेनं विकत घेतली जातात ती. पण घेतलेली वाचली किती जातात? किती चर्चा होते वाचलेल्या पुस्तकांवर? घरांमध्ये, मित्रमंडळींमध्ये कितीशी चर्चा होते पुस्तकांवर? या सर्वांचे कोणतेही कोष्टक अथवा आकडेवारी हाताशी लागत नाही. तथापि हा सारा उल्हासातल्या फाल्गुन मासातलाच प्रकार आहे; असे चित्र जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी दिसते आहे. हा असा सार्वत्रिक आढळणारा वाचनाच्या संदर्भातला साराच नन्नाचा पाढा असेल; तर मग खुंटलेच की सगळे! हे परवडण्यासारखे नाही आपल्याला. वाचणारे काही सन्माननीय अपवाद असतीलही. आहेतही अगदी निश्चितपणानं. पण त्यांची संख्या किती? तर तीही हाताच्या बोटांवर मोजता येण्याजोगी. वाचन ही गरजच आपल्या आयुष्यातून हद्दपार होऊ लागली आहे का?

आपल्या आवश्यक गरजांचा प्राधान्यक्रम-प्राथमिक गरजा एकदा नीट बसून ठरवूनच टाकल्या पाहिजेत आपण. तसे आपल्या मनाशी काही पक्के केले आहे का आपण; हे एकदा नीट पाहिले पाहिजे आपण. अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजांनंतर कोणत्या गोष्टीचा विचार करतो आपण. वाचन, छंद, प्रवास या गोष्टींना मग लगेच स्थान देतो का आपण? नीट पाहिलं तर कितीतरी अनावश्यक गोष्टींनी आपलं जगणं झाकोळून गेलेलं आहे. खऱ्या, सहज, साध्या आणि सात्त्विक आनंदाला पारखे झालेलो आहोत आपण. अनावश्यक गोष्टी त्या मिळाल्या काय आणि नाही मिळाल्या काय तसा काहीच फरक पडत नाही. खरंतर पुस्तकांच्या वाचनामुळं आपला कुटुंबकबिला स्थिरस्थावर होत असतो. घरं होत असतात आपली. पोटं भरत असतात. मग ज्या गोष्टींवर आपली सारी मदार आहे; त्या गोष्टीला आपल्या घरात स्थान किती असावं? आपल्या घरात अभ्यासिकेला जागा किती? पुस्तकांना कपाटं होती?

कितीही मोठं घर असलं तरी ते वन-टू-थ्री-फोर अशा ‘बीएचके’च्या पलिकडं जात नाही. बहुतांश ठिकाणी हे असंच दिसतं आहे. याला चांगलं लक्षण म्हणता येईल का? अशी देखणी चकचकीत घरं पाहून बाहेर पडताना हमखास मनात येतं, मग ‘बाबारे, कसा आणि कधी होशील तू शहाणा; कशी होतील मग तुझी मुलं संस्कारित? कशामुळं झालास तू इतका मोठा?’ एकांत आणि एकांतातलं वाचन ही एक मूल्ययुक्त शिदोरी आहे; आणि तीच या अशा घरादारांमधून कळत-नकळत हद्दपार होते आहे.

रसिक वाचकांच्या संदर्भात खूप सारे लेखक लोक म्हणतील, ‘डोक्याला प्रंचड मनस्ताप देणारं जे जग आहे, ते विलक्षण गुंतागुंतीचं ठरू लागलं आहे; ते आमच्या आयुष्याचा भाग बनले आहे. आणि म्हणून आमचे लिखाण तशाच प्रकारचे अवतरणार. तर वाचकही म्हणतील आधीच नसत्या कटकटी खूप झाल्या आहेत; तर हे दुर्बोध साहित्य वाचून आणखी कटकटी कशाला वाढवून घ्या. त्यापेक्षा कुठेही आणि कधीही उपलब्ध होणारे हास्ययात्रा-हास्यजत्रा असले कार्यक्रम पाहिलेले काय वाईट? लेखकानं काय आणि कसे लिहावं? हा जसा त्याचा व्यक्तिगत प्रश्न असतो. आणि तो रास्तही मानला पाहिजे. वाचकाने आपली वाचनाची आवड जोपासली की आपसूकच तो लेखकाने जे आणि जसे लिहून ठेवलेले आहे? त्या पातळीपर्यंत निश्चितच येऊ शकतो. आपली अभिरूची टप्याटप्याने घडवत जाणे; यासारखा दुसरा कोणता पर्याय असू शकेल असेही वाटत नाही. त्यामुळे आजकालचे चांगले कथात्म साहित्य वाचताना वाचकांची दमछाक होते हे मान्य. तथापि असे साहित्य आपल्याला आपल्या भवतालाची उत्तम जाण करून देत असते. इतकेच नव्हे तर सत्वयु्क्त जगण्याची वाट ते प्रशस्त करत असते; हे खरेच आहे. कोणत्याही प्रकारच्या साहित्याकडून केवळ मनोरंजनाची अपेक्षा ठेवणे यात तसे पाहिले तर काहीच अश्लिल नाही. मर्ढेकर, चित्रे, ग्रेस, जी. ए. अशी असंख्य लेखक पहिल्या अथवा दुसऱ्या वाचनातही कळत नाहीत; हे खरेच आहे पण यांच्या लेखनाशी एकदा का मैत्र जुळले; की मग त्यातून मिळणाऱ्या आनंदाला पारावार रहात नाही. अशा लेखकांच्या लेखनातून व्यापक जीवनानुभूतीचे दर्शन घडते. मानवी मन, त्यांच्या जगण्याच्या-सुखदु:खाच्या नानापरि पाहता येतात. नवी भाषा, नवे प्रांत, नवा आशय, विषय, नानाविध प्रदेश, दुर्लक्षित माणसं सारं काही साहित्यात येत असते. आजही ते भरभरून येते आहे; ते वाचले पाहिजे. भवतालाशी या जीवनातल्या बऱ्यावाईटाशी जोडून घेणे यातच माणसाचे माणूसपण आहे न? मग वाचनाला पर्याय कसा काय असू शकतो? नाहीतर निराशेचं, अस्वस्थतेचं आणि दिसागणीक वाढणाऱ्या मनोविकारांचं वाळवंट दबा धरून बसलेलंच आहे की बाहेर.

बर्टोल्ड रसेल यांनी लिहिलेला एक लेख वाचत होतो परवा. त्यांच्याही एका विधानाचा उल्लेख या संदर्भात करायला हरकत नाही. ‘मानवी जीवनातील परमोच्य गोष्ट कोणती असेल तर ती स्वांतत्र्य. स्वातंत्र्याशिवाय चांगलं व्यक्तिमत्त्व अशक्य असतं.’ असं म्हणतात ते. आपण तळामुळातून स्वतंत्र? आपण दिवसेंदिवस अधिकच परतंत्र बनत चाललो आहोत; हे एकदा मान्यच केलं पाहिजे नाही का आपण? न दिसणाऱ्या शेकडो व्यक्तींनी आपल्याला परतंत्र करून सोडलं आहे. किती लोकांची किती पाळत आपल्यावर? अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषा, रहनसहन असे कितीतरी प्रश्न हरघडी निर्माण होतातच आहेत. सर्वसामान्य माणसाला अज्ञानात ठेवून त्याच्यावर वैचारिक, मानसिक, बौद्धिक… अशी गुलामगिरी लादणं; हा विचार केंद्रस्थानी ठरतो आहे. सत्ता, मत्ता यापलिकडं कुणाला कशाशी काहीच घेणंदेणं उरलेलं नाही का? असा प्रश्न पुन:पुन्हा विचार करणाऱ्या माणसाला भेडसावत नाही का? तर या सर्वांपासून स्वत:ला, कुटुंबाला आणि पर्यायाने समाजाला स्वतंत्र करणं कमालीचं अवघड ठरू लागलं आहे. आणि आपण हे सत्य पचवण्याच्या तयारीतच नाही आहोत. हे असलं काही चाललं आहे या विचारापासूनही शेकडो लोक कमालीची दूर आहेत. सत्य पचवायचं आणि त्याबरहुकूम काही कृती करायची तर सत्याचं आकलन नको का करून घ्यायला? आणि ते आकलन करून घ्यायचा साधा-सोपा मार्ग म्हणजे अर्थातच वाचन नव्हे का? विद्येविण मती गेली… आणि किती अनर्थ आपल्या समाजाचे झाले; हे महात्मा फुले यांनी पोटतिडिकेने कधीचेच सांगून ठेवले आहे. कधी विचार होणार हा? जुने ते सारेच बिनकामाचे असते का?

वाचनाचा अर्थ केवळ शब्द वाचन, असा मर्यादित अर्थानेही घेता उपयोगाचं नाही. यासंदर्भात आपल्या संवेदनांना तीव्र टोकदार करणं महत्त्वाचं आहे. खूप सारी माध्यमं आणि इच्छा असो अथवा नसो; आपल्या कानांडोळ्यांवर त्या माध्यमांमधील बरं वाईट असं काही ना काही सतत आघात करत असतं. एखादी गोष्ट आपण पाहिली, ऐकली, अनुभवली; तर त्याचा काहीएक बरा वाईट परिणाम आपल्यावर होत असतो. काही एक संस्कार आपल्यावर होत असतो. ते संस्कार पचवून काहीएक विचार करणं, काहीएक निर्णय घेणं; असं सारं होत असतं. तेही आजकाल नीट असं होईनासं झालं आहे. समाजातली पर्यायाने व्यक्तीच्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट जुनी होणं, रद्दी होणं याचा वेग कमालीचा वाढला आहे. त्यामुळं कान, नाक, डोळे, जीभ, आणि त्वचा या पंचेंद्रियांची कामंही आपण विसरत चाललो आहोत. असेही अनुभव घ्यायचे असतात, हेही आपल्या गावी नसल्यागत आपले बोलणे होऊन बसले आहे. माणसांचं, निसर्गाचं, जंगलांचं, पशु-पक्षी-प्राणी यांचं निरिक्षण करणं पर्यायाने आपल्या भवतालाचं वाचन करणं हेही एक प्रकारचे जीवनोपयोगी असं वाचन असतं आणि अशा प्रकारचं वाचन आपल्या जीवनजाणिवा प्रगल्ग करीत असतं. पण या अशा वाचनाकडेही आपले कमीलीचे दुर्लक्ष होत चाललं आहे. आपल्या बहुतांश जणांच्या संवेदना दिसागणिक बोथट बनत चालल्या आहेत.

संवेदनांनी जग पाहून ते तनामनात रिचवून त्याचा आविष्कार करणारे अनेक लोक आपल्या इतिहासात होऊन गेलेले आहेत. अगदी अलिकडची नावं सांगायची तर बहिणाबाई चौधरी, अण्णाभाऊ साठे, नारायण सुर्वे अशी शाळेशी अत्यल्प किंवा तसा संबंधच प्रस्तापित न झालेल्यांची खूप नावे देता येतील. हे सारे जगाच्या उघड्या विश्वात-जगाच्या शाळेत शिकलेले लोक होते. त्यांचे स्वत:चेच असे विशिष्ट असे विद्यापीठ होते. त्यामुळे त्यांची स्वत:विषयी आणि समष्टीविषयीची करूणा कमालीची तीव्र होती. बहुश्रृतेशी अशा माणसांचा जवळचा संबंध होता. ‘केल्याने देशाटन पंडित सभेत मैत्री मनुजा चातुर्य येतसे फार…’ असे आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवले आहेच की. चीन या देशातील मधील लाओत्से तुंग, आपले नामदेवादी संत, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर आदी समाजसुधारक यांनी देश विदेशात खूप भ्रमंती केली होती. त्यामुळे त्यांच्या विचाराला अनुभूतीची जोड होती. शब्दाला वजन प्राप्त झाले होते त्यांच्या.

वाचनातून आलेली अनुभूती आणि केल्याने देशाटन यामुळे आलेली अनुभूती अशाप्रकारचं आपलं दोनही प्रकारचं वाचन आक्रसत चालल्यामुळे मुळातच अत्यंत कमी असलेलं आपलं अनुभवविश्वही अत्यंत तोकडं होऊ लागलं आहे. आणि ते आपल्या लिखाणात, चालण्या-बोलण्यात, कृतीतूनही दिसू लागलं आहे. माध्यमांची प्रचंड भाऊगर्दी असून, सारे जग एका क्लिकवर आले असूनही आपले व्यक्तिगत आणि सामाजिक जगणे अधिकाधिक संकुचित होत चालले आहे.

अर्नेस्ट हेमिंग्वे याचे उदाहरण यासंदर्भात देता येईल. समुद्र सफारीवर जाणं, प्रचंड प्रवास करणं, मुष्टीयुद्धात भाग घेणं इत्यादी अनेक प्रकारच्या गोष्टी हा लेखक करीत असे. हे सारं अनुभवविश्व त्याच्या लेखनातही सच्चेपणानं उतरलं आहे. ‘द ओल्ड मॅन अ‍ॅन्ड द सी’ ही त्याची समुद्रावरील एक अत्यंत उत्कृष्ट कादंबरी आहे. हे असे काही समरसून जगणारे कवी-लेखक इत्यादी आपल्या समाजात आढळत नाही.

अनुभव विश्वासोबतच विज्ञानवादी होतो आपण वाचनामुळे. स्वातंत्र्योत्तरकाळात विविध क्षेत्रात आपण नेत्रदीपक प्रगती केली हे सत्य आहे. 1990 नंतर तर या प्रगतीची झेप आणि विस्तार कमालीचा वाढला हेही खरेच आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे हे सारे श्नय हाेते आहे हे मान्य केले तरी वैज्ञानिकदृष्टी आपल्या दैनंदिन व्यवहारात कितपत आली हा देखील विचार करण्याजोगा प्रश्न आहे. बुवा, बाबा, महाराज इत्यादींच्या भजनी आपला समाज मोठ्या प्रमाणात लागला आहे हे सत्यही नाकारता येणार नाही. त्यामुळे खरा धर्म, देव, अध्यात्म यापासूनही आपण कमालीचे दूर चाललो आहोत.

प्राचीन अध्यात्मिक, तत्त्वज्ञानात्मक ग्रंथांचे आपले वाचन किती? हा प्रश्नदेखील गंभीर बनत चालला आहे. आणि याचा गैरफायदा घेऊन अध्यात्म कशाशी खातात याचा मागमूस नसलेले शेकडो लोक अमाप माया जोडून बसले आहेत. तेव्हा सत्य, वस्तुनिष्ठता तर्क यांची बूज राखली जाते वाचनामुळे. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा, प्रसंगांचा समग्रतेने कसा विचार करावा, याचीही जाणीव वाचनामुळे होत असते. हे नाकारणे म्हणजे आपणच आपल्या पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे.

या सर्वांसोबत आणखी एका गोष्टीचा विचार निश्चितच करायलाच पाहिजे, आणि तो म्हणजे सर्वच प्रादेशिक भाषांमध्ये इंग्रजीचा अनाठायी वापर वाढू लागला आहे. प्रादेशिक भाषेतून अथवा मातृभाषेतून घेतलेले शिक्षण माणसाच्या आकलनासंदर्भात आणि एकूणच त्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात अत्यंत महत्त्वाचे असते; हे जगभरच्या महत्त्वाच्या लेखक कवींनी, विचारवंतांनी मान्य केले आहे. मातृभाषेचा अत्यंत हिहीरीने पुरस्कार या लोकांनी केला आहे.

आजही मातृभाषेच्या महत्त्वाविषयी बोलले-लिहिले जाते. आपण ते ऐकतही असतो. पण त्याबरहुकूम कृती मात्र करत नाही आपण. इतरांच्या अंधअनुकरणामुळे आणि आपल्या भाषेच्या दुराभिमानामुळे इंग्रजीचे बळी ठरतो आहोत आपण. भरमसाठ खर्चिक असलेल्या शाळांमध्ये प्रसंगी कर्ज काढून आपल्या मुलांना भरती करून आपले साहित्य आणि संस्कृतीपासून त्यांना तोडतो आहोत आपण. मुलांचे भावविश्व यंत्रवत करतो आहोत आपण.

‘‘भावीकाळात जर संपूर्ण महाराष्ट्रात बालवर्गापासूनच इंग्रजी माध्यम राहिले आणि शालेय अभ्यासक्रमातून मराठी विषय आजिबातच काढून टाकला तर मराठी वाङमय आणि त्याचा वाचकवर्ग या गोष्टी भूतकाळात जमा होतील.’’ असा इशारा सुधीर रसाळ यांच्यासारख्या ज्येष्ठ विचारवंतांनी दिला आहे. त्याकडं लक्ष दिलं पाहिजे आपण. इंग्रजी भाषेचा दुस्वास करण्याचे काहीच कारण नाही, त्या भाषेचे महत्त्व टाळताही येणार नाही आपल्याला. ती जगाकडे पाहण्याची तेसमजून घेण्याची एक खिडकी आहे हे मान्यच केले पाहिजे, तथापि केवळ खिडकी म्हणजे घर नसते; हेही समजून घेतले पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांनंतर मातृभाषेतील शिक्षण ही चौथी मूलभूत गरज सुसंस्कृत माणसाची असायला हवी-अन्यथा आपण इतरांच्या हातातील एक यंत्र म्हणून राहणार आहोत का? याचाही विचार गांभिर्याने करण्याची वेळ आपल्यावर येऊन ठेपली आहे. शिवाय ‘‘आपली भाषा आणि संस्कृती याबद्दलची अभिमानाची भावना आणि भाषेच्या अस्तित्वावर आपली सांस्कृतिक ओळख अवलंबून असल्याची जाणीव जोपर्यंत मराठी समाजात जागृत होणार नाही तोपर्यंत या परिस्थितीत बदल होणार नाही.’’ असेही एक महत्त्वाचे मत सुधीर रसाळ यांनी नोंदवून ठेवले आहे.

आपल्या भाषेबद्दलच्या अभिमानासाठी केवळ भाषादिन, भाषा सप्ताह अथवा भाषा पंधरवडा साजरा करून नंतर विसरून जाणे इतकेच भाषिक कर्तव्य करीत राहणे हे उपकारक नाही, तर भाषा ही आपल्या एकूणच जगण्याची जीवनरीत नको का व्हायला? आपले वाचन दुदैवाने केवळ वर्तमानपत्रापुरते मर्यादित राहिले आहे. ते तरी आपल्या समाजात कितपत गांभिर्याने केले जाते याबाबत शंकाच आहे. ‘‘केवळ वर्तमानपत्रांच्या वाचनामुळे शुष्क पांडित्य चोहोकडे माजून खऱ्या विद्वत्तेचा लोप होतो.’’ असे एक महत्त्वाचे निरिक्षण विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी पूर्वीच नोंदवून ठेवले आहे. आपल्या घरात किती वर्तमानपत्रं येतात? कोणती वर्ततमानपत्र आपल्या घरात घेतो आपण? त्यातले काय आणि कितपत वाचले जाते? चांगली मासिकं, साप्ताहिकं यांचे किती वर्गणीदार आहोत आपण? अशाप्रकारच्या वाचनाकरिता दिवसभरातला कितीसा वेळ देतो आपण? यासंदर्भातलाही कमालीचा निरूत्साह आपल्या आसपास दिसू प्रखरपणानं दिसू लागला आहे. उत्साहानं सुरू केलेली कितीतरी चांगली मासिकं- साप्ताहिकं संपादक-प्रकाशकांना बंद करावी लागली आहेत. हे असले अक्षर शत्रूत्व आपल्याला परवडणारे नाही. अशांची गणना रामदासांनी ‘अक्षरे गाळून वाची। कां ते घाली पदरीची। निगा न करी ग्रंथांची । तो एक मूर्ख।।’ अशा शब्दांत केली आहे.

वाचनाचे संस्कार घडविण्याच्या, नवे वाचक तयार करण्याच्या सुंदर जागा म्हणून शाळा महाविद्यालयांकडे पाहिले जाते. इथेही अपवाद वगळता चांगल्या साहित्यकृती, संदर्भग्रंथ न वाचणारे, नवी पुस्तके विकत न घेणारे, घरातल्या वर्तमानपत्रांना सोयीस्कर काट मारून कंजूसपणाने शाळा महाविद्यालयातल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या उभ्याउभ्याच वाचणारे लोक खूप वाढू लागले आहेत. आपल्याच वाचनाची ही दशा तर मग मुलांच्या वाचनाची तर बातच सोडा. याचे किती वाईट परिणाम आपल्यावर आणि पर्यायाने भावी पिढ्यांवर होणार आहेत, याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ अजूनही येऊन ठेपलेली नाही का? तर ‘शाळा महाविद्यालयातही वाचनाच्या संदर्भातील परिस्थिती आशादायक नाही. ‘शाळा महाविद्यालयातही ज्ञानविन्मुखता, अव्यवहार व असंस्कृतता’ हे गुण वाढू लागल्याचे निरिक्षण ग्रंथ प्रकाशक अरूण जाखडे यांनी नोंदविलेले आहेत. संदर्भ ग्रंथांकडे तर आपले अक्षम्य दुर्लक्ष होत आहे; हे मान्यच करावे लागेल. बाजारात तयार मिळणारी गाईड्स अथवा तत्सम नोट्सवर गुजराण करणाऱ्या शिक्षकांची पिढी वाढू लागली आहे. हे जर असेच सुरू राहिले तर, ती आपल्या पूर्वापार चालत आलेल्या ज्ञान व्यवहाराकरिता धोक्याची घंटा ठरणार यात शंकाच नाही.

आपल्या वाचन संस्कृतीचा विचार करता प्रकाशक, वितरक, जाहिरातदार यांचाही विचार करणे आवश्यक आहे. पुस्तकांची खरेदी विक्री हा एक उद्योग-व्यवसाय आहे. आणि ते मान्यच करावं लागेल. तथापि इतर अनेक उद्योगांपेक्षा या उद्योग-व्यवहाराचे स्वरूप निराळे आहे; हे आपण घ्यानात घेतले पाहिजे. इथे केवळ आर्थिक लाभालाभाचा विचार नसावा. आर्थिक ते सोबतच सामाजिक जाणिवांची अभिव्यक्ती, इतिहास-साहित्य-समाज आणि संस्कृतीच्या मूल्यांची रूजवणूक चांगल्या साहित्याच्या आदानप्रदानाने समाजात होत असते. ग्रंथ व्यवहारासोबत नितिमत्ता, पुस्तकांविषयीची आत्मियता, लेखकाचा उचित सन्मान या बाबीही महत्त्वाच्या आहेत. जागतिकीकरणात सगळ्याच गोष्टींना आर्थिकबाजूचा स्पर्श झाला आहे. केवळ स्पर्शच नव्हे तर पैशासाठी कोणतीही गोष्ट माणसाकडून कोणत्याही थराला जाऊन खेचून घ्या, नाही दिले तर हिसकावून, ओरबाडून, दमदाटी करून प्रसंगी ग्राहकाचा जीव घेऊन मिळवा; ही वृत्ती चांगलीच तग धरू लागली आहे.

वाचन संस्कृतीवर या अशा जागतिकीकरणाचा खूपच अनिष्ठ परिणाम होऊ लागला आहे. जागतिकीकरण हे मुळात आर्थिक असेल तर त्याचं आक्रमण सांस्कृतिक स्वरूपाचं आहे. ते आपल्या भाषा, साहित्य, इतिहास या साऱ्यांनाच सुरूंग लावू लागले आहे. परात्मता, मनोविकृती, संवादहीनता, व्यसनीपणा, आभासी वास्तवात जगणे, नातेसंबंधांमधील दुरावा, प्रबोधनाच्या चळवळींचा ऱ्हास, पर्यावरणाचे प्रश्न… प्रत्येकजण बळी ठरतो आहे जागतिकीकरणाचा. आणि हे सगळे नेमके काय चालले आहे, असा प्रश्नही आपणास आजकाल पडेनासा झाला आहे. हे सारे नीट समजून घ्यायचे असेल तर वाचनाला पर्याय नाही. हे पुन्हा एकदा अधोरेखित केले पाहिजे. सुदैवाने आजही मोजक्याच वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये, दररोज प्रकाशित होत असलेल्या अनेकविध पुस्तकांमध्ये खूप सारं आजच्या तथाकथित भवतालाबद्दल लिहिलं जातं आहे. ते समजून घेतलं पाहिजे. हे सारं वाचून समजून घेतलं तर जागतिकीकरण म्हणजे काय? आणि ते आपली काय दशा करून ठेवतं आहे; हे समजण्यास मदत होऊ शकेल. प्रत्येकजण जागतिकीकरणाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष बळी ठरू लागला आहे. आपलं जगणं इतकच काय आपलं मरणंही आपल्या हातात राहिलेलं नाही. कोणतीतरी अदृश्य शक्ती आपल्या इच्छेविरूद्ध आपल्याला नियंत्रित करते आहे. हे समजून घेतलं पाहिजे.

वेळच नाही मिळत वाचायला, स्वत:कडे पहायला; असं म्हणत राहणं हे अर्धसत्य आहे. पळवाट आहे ही स्वच्छ. ठरवून निश्चयपूर्वक काढला तर ग्रंथ वाचनाला वेळ मिळतोच मिळतो. त्यामुळं आपल्या अल्याड पल्याडचं प्रकाशित झालेलं चांगलं साहित्य वाचलं पाहिजे. इतरांना वाचण्यास प्रवृत्त केलं पाहिजे. लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतीचित्रं, वाचू आनंदे यासारखी माधुरी पुरंदरे यांनी प्रकाशित केलेली पुस्तकं, शिवाय शामची आई अशी पुस्तक अप्रतिमच आहेत. पण समाज, भाषा, भवतालातलं वास्तव सतत बदलत असतं, त्याचं प्रतिबिंबही इतर अनेक पुस्तकांमध्ये पडलं आहे, तेही वाचलं पाहिजे.

उत्तम वाचकांची शेकडो उदाहरणं अगदी सहजपणानं देता येतात. यशवंतराव चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शरद पवार, गोविंदराव तळवळकर यांचंवाचन सर्वश्रृत आहे. यशवंतराव चव्हाण यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला ग्रंथ एका पत्र्याच्या खोलीत मित्रांसमवेत बसूनसलग तीन दिवस वाचून करून पूर्ण केला होता. सतीश काळसेकर चौदा-चौदा तास वाचन करीत असत, असेही अनेक जाणकारांकडून सांगितले जाते. अशा कितीतरी चांगल्या वाचकांचा आदर्श आपण नाही का घेऊ शकत?

कारण ‘आपल्या मर्यादित वर्तुळाच्या बाहेर जाण्यात मित्रांचा आणि वाचनाचा फार मोठा वाटा असतो’ असे प्रख्यात लेखक-दिग्दर्शक अरूण खोपकर म्हणतात, ते खरंच खूप खरं आहे. वाचनमूल्यांची थोरवी सांगणारा ‘ग्रंथाला दिली ओसरी’ हा एक सुंदर लेख आहे गो. पु. देशपांडे यांचा. त्यात त्यांनी म्हणून ठेवले आहे, ‘‘पुस्तके वाढावीत आणि त्यांच्यापुढे आपण लहान व्हावे; हे मला मनापासून आवडते.’’ शिवाय त्यांनीच असेही लिहून ठेवले आहे, ‘‘सूरकाम्प म्हणून जर्मनमधील एक अग्रेसर प्रकाशन संस्था. त्यांची पुस्तकं चांगली असतात.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading