November 27, 2022
grace-of-devotion-gets rits in spirtituality article by rajendra ghorpade
Home » भक्तीच्या कृपेने मिळतो गुरुपुत्रास वारसाहक्क
विश्वाचे आर्त

भक्तीच्या कृपेने मिळतो गुरुपुत्रास वारसाहक्क

रक्ताच्या नात्याने वारसा हक्क मागणाऱ्यांना प्रेमाचा वारसा कधीच कळत नाही. कारण प्रेमाच्या, भक्तीच्या वाटेवर गेल्याशिवाय हे नाते समजत नाही. त्या भक्तीचा अनुभव घ्यावा लागतो. प्रेमाची भिक मागून प्रेम मिळत नाही. भक्तीचा वारसा हक्क रक्ताच्या नात्याने मिळत नाही. त्याला पूर्व जन्माची पुण्याई लागते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

जें तान्हेनि मिया अपत्ये । आणि माझे गुरू एकलौते ।
म्हणौनि कृपेसि एकहातें । जाले तिये ।। 19 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 19 वा

ओवीचा अर्थ – कारण की, मी श्रीगुरुंचे तान्हें मुल आहे आणि माझें गुरू एकपुत्री आहेत म्हणजे माझ्या गुरुंना मी एकटेच मूल आहे. म्हणून त्यांच्या त्या कृपेला मी एकटा ठिकाण झालो.

रक्ताचे नाते अन् प्रेमाचे, स्नेहाचे नाते यामध्ये मोठा फरक आहे. खरं नात कोणते ? अध्यात्मात खरं नात भक्तीचं, प्रेमाचं, स्नेहाचं आणि त्यातून येणाऱ्या कृपेचे असते. कारण येथे वारसाहक्क रक्ताच्या नात्याने मिळत नाही तर तो भक्तीच्या कृपेने मिळतो. भक्तीच्या प्रेमातून, स्नेहातून तो प्राप्त होतो. जातीच्या वा रक्ताच्या नात्याने येथे परंपरा पुढे जात नाही. गुरु-शिष्य परंपरा ही ज्ञानदानाची परंपरा केवळ भक्तीच्या नात्याने वाढते. म्हणूनच माझ्या गुरुंचा मी भक्तीच्या नात्याने पुत्र आहे. त्यांचा वारसा पुढे चालवण्याचा हक्कदार मी आहे. भक्तीच्या कृपेतून हे ज्ञानाचे दान माझ्या झोळीत गुरुंनी टाकले आहे. ही परंपरा या भक्तीने वाढते.

भक्तीच्या नात्याने ही ज्ञान परंपरा पुढे जाते. येथे जातीचा, रक्ताच्या नात्याचा संबंध येत नाही. म्हणूनच कोणत्याही जाती-धर्मातील व्यक्ती या ज्ञानाचा हक्कदार होतो. स्थावर मालमत्ता ही रक्ताच्या नात्याने, वारसा हक्काने मिळते. ती प्राप्त करण्यासाठी सध्याच्या पिढीमध्ये मोठे मोठे संघर्ष होताना पाहायला मिळत आहे. कोणीही उठतो अन् वारसा हक्क सांगतो, अशी आजची परिस्थिती आहे. पैशाच्या मोहाने रक्ताची नाती गुरफटली गेली आहेत. यात गुन्ह्याच्या कोणत्याही सीमा राहील्या नाहीत. भिकाऱ्यासारखी भिक मागून, भांडून वारसा हक्क मिळवण्याचा प्रयत्न करणारे सर्वत्र पाहायला मिळतात. या अशा संघर्षाने एकमेकाचे तुकडे पाडण्याची भाषा होत आहे. या अशा संघर्षाने रक्ताच्या वंशावळी नष्ट झाल्या आहेत. जमिनीच्या एका तुकड्यासाठी वंश नष्ट करण्याची भाषा होते आहे.

रक्ताच्या नात्याने वारसा हक्क मागणाऱ्यांना प्रेमाचा वारसा कधीच कळत नाही. कारण प्रेमाच्या, भक्तीच्या वाटेवर गेल्याशिवाय हे नाते समजत नाही. त्या भक्तीचा अनुभव घ्यावा लागतो. प्रेमाची भिक मागून प्रेम मिळत नाही. भक्तीचा वारसा हक्क रक्ताच्या नात्याने मिळत नाही. त्याला भक्ताची पूर्व जन्माची पुण्याई लागते. रक्ताच्या नात्याने हक्क मागणारे वारसदार कधी आपला हक्क हिरावून बसतात हे त्यांचे त्यांनाच समजत नाही. यासाठी त्यांनी अनेक खटाटोप केलेले असतात. इतकेच काय तर ते इतिहासही बदलायला मागे पुढे पाहात नाहीत. ऐतिहासिक कागदपत्रांची जंत्री मिळवून हक्क सांगणाऱ्यांना मिळालेले ते धनही निट सांभाळता येत नाही. कारण जे आपले नसते, ते कधीच आपले होत नाही. प्रेमाने, भक्तीने, स्नेहाने मिळवलेले धन हे श्रेष्ठ असते. ते तितक्याच आपुलकीने सांभाळले जाते. तितक्याच आपुलकेने ते वाढवले जाते.

गुरुपुत्राला मिळालेला वारसा हा भक्तीचा, स्नेहाचा असतो. त्यामुळे तो ज्ञानाचा वारसा तितक्याच भक्तीभावाने तो पुढे चालवतो. गुरु-शिष्य परंपरा रक्ताच्या नात्याने नाही तर भक्तीच्या नात्याने पुढे जाते. गुरुकृपेतून, गुरुभक्तीतून तो ज्ञानाचा वारसा हक्क न मागताही त्याला आपोआप मिळतो. हा हक्क मागून, भांडून मिळत नाही. तो केवळ प्रेमाने आणि भक्तीने जिंकता येतो. वारसा हक्क मिळवण्यासाठी युद्ध करून त्यात विजय मिळवून कोणी राजा होत नाही किंवा भिक मागून कधीही राजा होत नाही असे हे यासाठीच म्हटले जात असावे. युद्ध करून दुसऱ्याचे राज्य जिंकणारा राजा कसला ? अन् वारसा हक्क सांगून भिक मागून राज्य मिळवणारा तरी राजा कसाला ? भिकारी शेवटी भिकेचाच वारसा चालवणार हे ही तितकेच खरे आहे. प्रेमाने, भक्तीने गुरु-शिष्य परंपरा वाढवली जाते. गुरुपुत्राला हा हक्क गुरुकृपेतून मिळतो. म्हणूनच तो पुढे कायम राहातो. तो वारसा अमर असतो.

Related posts

समुद्र सर्वांत पवित्र तीर्थ…

सोऽहम भावे उपासित । ज्ञानिये जे ।।

मनशुद्धी कशाने होते ?

Leave a Comment