May 28, 2023
Makrand Karandikar article on Garba Dandiya
Home » गरबा नव्हे, गर्भ दीप आणि गंमतीदार दांडिया !
मुक्त संवाद

गरबा नव्हे, गर्भ दीप आणि गंमतीदार दांडिया !

दांडिया आणि गरबा ही नृत्ये त्यांच्या प्रचंड प्रसिद्धीमुळे जगभर अधिक पसरली. त्याचे फार मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक आणि व्यावसायिक आयोजन केले जाते. त्यामुळे कपडे, दागिने, ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, खाद्य पदार्थ, संगीत, व्यवस्थापन अशा कित्येक व्यवसायांना मोठी चालना आणि बाजारपेठ मिळते.

मकरंद करंदीकर

आपल्या देशात शेती संदर्भातील मुख्य कामे आटोपली की नंतरच्या काळामध्ये, विविध सण साजरे केले जातात. मेहनत आणि हवामानामुळे खर्च झालेली शारीरिक ताकत पुन्हा प्राप्त करण्यासाठी शक्तीची आराधना केली जाते. सरत्या पावसाळ्यात, घटस्थापना करून सलग ९ रात्री साजरा होणारा नवरात्रीचा सण हा त्याचा एक महत्वाचा भाग आहे. दिवसभर उपवास, पूजा, होमहवन, सप्तशती सारख्या ग्रंथांचे पठण इत्यादी उपासनेद्वारे देवीसान्निध्यावर भर दिला जातो. नंतर रात्री देवीच्या भोवती फेर धरून नृत्य केले जाते. या देवी आराधनेमध्ये दिवसभर जरी अस्सल धार्मिक विधी होत असले तरी रात्री मात्र फारशी धार्मिक बंधने नसतात. लोककलाकार, स्त्रिया, मुले, सामान्यमाणसे यांचा तो सामूहिक अविष्कार असतो.

अनेक राज्यांमध्ये फेर धरून ही धार्मिक नृत्य-आराधना केली जाते. फेर धरणे, भोंडला, गोफ विणणे, करागम, कुम्मी, कोलाट्टम, पिन्नल कोलाट्टम अशी अनेक प्रकारची समूहनृत्ये केली जातात. समाज एकत्र आल्याने भक्ती आणि संस्कृती यांचा मेळ साधतो. पण आता सर्वात प्रसिद्धी पावलेले आणि लोकप्रिय झालेले नृत्य हे मात्र गुजरातचे असून गरबा आणि दांडिया हे त्याचे दोन प्रकार !

आता जरी याला गरबा असे म्हटले जात असले तरी मूळ संस्कृत शब्द ‘ गर्भ दीप ‘ असा आहे. छिद्रे असलेल्या एका मातीच्या घटामध्ये दिवा तेवत ठेवला जातो. हा घट उत्तमप्रकारे सजवून देवीच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर ठेवला जातो. यातील दिवा हा जीवनाचे प्रतीक असून घट हे ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. हा दिवा सुरक्षित राहावा म्हणून घटाच्या गर्भामध्ये ठेवला जातो आणि तो घट, अंबेच्या पायाशी ठेवला जातो. गर्भदीप या संस्कृत शब्दावरून गरबा शब्द रूढ झाला. या घटाला असलेल्या अनेक छिद्रांमुळे आतील दिव्याला प्राणवायूचा पुरवठा तर होतोच पण त्याचे वाऱ्यापासून रक्षणही होते. पूर्वी विद्युत दिव्यांचा अति झगमगाट नव्हता. त्यावेळी अनेक घरांमधून अनेक घट आणून ते जमिनीवर एकत्र ठेवले जात असत. अशा अनेक घटांच्या छिद्रांमधून बाहेर येणाऱ्या प्रकाशाच्या कवडशांमध्ये हे नृत्य खूप मनोहारी दिसत असे. या नृत्याला परंपरागत गाणी, वाद्ये, आणि टाळ्या यांची जोड लाभत असे. आता नवीन युगाला साजेसे तांब्याचे, स्टीलचे, खूप सजावट केलेले गरबादीप बाजारात उपलब्ध आहेत.

परंपरागतच पण आता अत्यंत लोकप्रिय झालेले आणखी नृत्य म्हणजे दांडिया ! यातील नर्तकी ( आणि आता मोठ्या प्रमाणावर नर्तक सुद्धा ) आपापल्या दोन्ही हातात, परंपरागत बांबूच्या दोन काठ्या ( दांडिया ) घेऊन, पारंपारिक गीतावर फेर धरतात. विशिष्ट ठेक्यावर या काठ्या एकमेकांवर, दुसऱ्या नर्तकीच्या काठीवर आपटल्यावर येणारा आवाज व त्याला आजूबाजूच्या प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या अचूक ठेक्याची साथ हे सगळे वातावरणच भारून टाकते.

या नृत्यांमध्ये स्वतः भोवती फ़िरतांनाच मातृरूप देवीभोवती फिरणे हे जन्म, मृत्यू , पुनर्जन्म या चक्राशी संबंधित आहे. घटामधील दिवा म्हणजे जीवन, हे नश्वर आहे पण रिंगणाच्या मधोमध उभी असलेली जगन्माता अंबाबाई मात्र स्थिर आहे. म्हणजेच मातृत्व हे अजरामर आहे, सातत्य असलेले आणि स्थिर आहे. सप्तशतीमधील कथांच्यानुसार अत्यंत क्रूर असुरी शक्तींशी देवीने विविध रूपात लढून विजय प्राप्त केला. या देवीपासून शक्ती प्राप्त करण्यासाठी स्त्रिया हे नृत्य करतात. हा स्त्री शक्तीचा जागर असल्याने पूर्वी पुरुषांचा यात सहभाग नसे. पण बाकीच्या सर्व धार्मिक गोष्टीत पुरुषांचा सहभाग असायचाच !

दांडिया आणि गरबा ही नृत्ये त्यांच्या प्रचंड प्रसिद्धीमुळे जगभर अधिक पसरली. त्याचे फार मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक आणि व्यावसायिक आयोजन केले जाते. त्यामुळे कपडे, दागिने, ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, खाद्य पदार्थ, संगीत, व्यवस्थापन अशा कित्येक व्यवसायांना मोठी चालना आणि बाजारपेठ मिळते. आता कांही जण, उगाचच जातीय सलोखा / एकोपा वगैरे दाखविण्यासाठी, गरबा या नृत्याचा सूफी संस्कृतीशी संबंध जोडतात. फक्त गरबाच तेवढा सूफी कसा ? देशभर अशाच प्रकारे विविध प्रांतांमध्ये केल्या जाणाऱ्या अशा नृत्यांचे काय ? आणि मग सर्व “सूफी“ देशांमध्ये अशी नृत्ये का आयोजित केली जात नाहीत ? त्यामुळे हे नृत्य, त्याची गीते, त्याचा ताल, पद्धत पाहता गरबा हा अस्सल गुजरातचाच असला पाहिजे.

Related posts

जडत्व : दगडाचे अन् माणसाचे !

आपलसं वाटणारं पुस्तकः ठिगळ

वाचकाला अंतर्मुख अन् आनंदी करणाऱ्या कविता

Leave a Comment