September 16, 2024
Self-satisfaction makes our life happy and prosperous
Home » आत्मसुखानेच आपले जगणं होते सुखी अन् समृद्ध
विश्वाचे आर्त

आत्मसुखानेच आपले जगणं होते सुखी अन् समृद्ध

भौतिक विकास झाला म्हणजे आपण सुखी होतोच असे नाही. सुख हे मनातून यावं लागतं. त्यासाठी बाह्य गोष्टींचे ऐश्वर्य उपयोगी नाही. बाह्य गोष्टीतून क्षणिक आनंद निश्चितच प्राप्त होतो. पण तो क्षणिक असतो. शाश्वत सुख त्यात नसते. शाश्वत सुख हे अंतःकरणातून यावे लागते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६

तूं गुणत्रयातें अव्हेरी । मी माझें हें न करी ।
एक आत्मसुख अंतरी । विसंब झणी ।। २५९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा

ओवीचा अर्थ – तूं तिन्ही गुण टाकूण दे, मी व माझेपण धरूं नकोस, ( पण ) अंतःकरणांत फक्त एका आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस.

सुखी जगणं कशाला म्हणायचे ? राजवैभव प्राप्त झालेल्या व्यक्तिलाही झोप न लागण्याची समस्या असते. मग राजवैभव असूनही तो सुखात आहे का ? कितीही श्रीमंती असली तरी त्याचे जीवन सुखी असतेच असे नाही. गरीबाला तर रोजच्या जगण्याची चिंता असते, तरीही त्याचे जीवन हे सुखी असते. कारण रोज मरे त्याला कोण रडे ? त्याचे जीवनच दुःखी-कष्टी आहे. त्याला यावर रडत बसून कसे चालेल. आहे त्या परिस्थितीचा स्विकार करून जीवनात तो वाटचाल करत असतो. म्हणूनच तो खऱ्या अर्थाने सुखी जीवन जगतो.

पैसा अमाप मिळाला अन् थोडेफार नुकसान झाले. तरी अमाप पैशाने श्रीमंताचे समाधान होत नाही. थोड्याफार नुकसानीचीच चिंता त्यांना अधिक असते. त्यामुळे ते अस्वस्थ असतात. इतकी हाव आपल्यामध्ये साठवलेली असते. याला सुखी-समाधानी जगणं कसं म्हणायचे ? म्हणजे सुख हे भौतिक समृद्धीतून कधीही येत नाही. भौतिक विकास झाला म्हणजे आपण सुखी होतोच असे नाही. सुख हे मनातून यावं लागतं. त्यासाठी बाह्य गोष्टींचे ऐश्वर्य उपयोगी नाही. बाह्य गोष्टीतून क्षणिक आनंद निश्चितच प्राप्त होतो. पण तो क्षणिक असतो. शाश्वत सुख त्यात नसते. शाश्वत सुख हे अंतःकरणातून यावे लागते. मनाच्या पटलावर ते उमटावे लागते. माणूस मनाने सुखी असेल तरच त्याचे जगणं हे सुखी-समाधानी-आनंदी असते.

शहरांसह खेड्यांचा विस्तार झपाट्याने होत आहे. शहरासह गावागावात हवेच्या, वातावरणाच्या प्रदुषणासह आवाजाचे प्रदुषणही वाढले आहे. वातावरणातील विविध लहरींचाही परिणाम आपल्या मनावर होऊ लागला आहे. आपले जीवन हे धकाधकीचे अन् कटकटीचे झाले आहे. या मोबाईलच्या युगात क्षणाचीही विश्रांती मिळणे कठीण झाले आहे. मनोरंजनाची अमाप साधने आज उपलब्ध आहेत. तरीही मन सुखी नाही. मनोरंजनाने क्षणिक सुख मिळते, पण ते शाश्वत सुख नसते. खऱ्या सुखाचा शोध हा यासाठीच घ्यायला हवा. खरे सुख देणाऱ्या गोष्टी उपलब्ध झाल्या, तरच आपलं जगणं हे सुखी होणार आहे.

थोडा विचार केला तर असे लक्षात येईल की आपण जे माझे, माझे म्हणतो आहोत ते आपले मुळी नाहीच. आपणास मिळालेले आयुष्य किती वर्षांचे आहे ? पूर्वी शंभर वर्षांपेक्षा जास्त आयुष्य मानवाला लाभत होते. पण आता शंभरी गाठणे अशक्य झाले आहे. पन्नाशीनंतरच आरोग्याच्या समस्या डोकेवर काढतात अन् पुढचं जगणंच महाकठीण होते. इतके छोटे आयुष्य असूनही आपण त्यावर विचार करत नाही. खरे सुख कशात आहे ? याचा शोध घ्यावा असे आपणास वाटत नाही. स्वतः आनंदी राहायचे अन् इतरांनाही आनंदी करायचे ही खऱ्या सुखी जीवनाची गुरूकिल्ली आहे. दुसऱ्याने कितीही दुःख देण्याचा प्रयत्न केला तरी मन शांत ठेवून त्याकडे दुर्लक्ष करायचे. स्वतःच्याच आनंदात राहाण्याचा, रमण्याचा प्रयत्न करायचा. हाच सुखी होण्याचा मंत्र आहे.

स्वतःच्या आनंदात रमायचे म्हणजे काय ? स्वतःच्या आत्मसुखाचा शोध घ्यायचा. आत्मा हेच आपले अस्तित्व आहे. हे जाणायचे. त्याचा अनुभव घ्यायचा अन् त्याच्याच विचारात रमायचे. अर्थात यासाठीच साधना आहे. साधनेमध्येच या सुखी जीवनाचा स्पर्श आपणास होतो. आत्मसुखावर कोणत्याही गुणांचा परिणाम होत नाही. निरपेक्ष मनच खऱ्या सुखाचे लाभार्थी असते. आत्मा हाच आपला प्राण आहे. तोच सर्वत्र भरलेला आहे. याची अनुभुती घेऊन जीवन व्यथित करणे म्हणजेच शाश्वत सुखात जगणे आहे.

स्वतः या शाश्वत सुखाचा आनंद घ्यायचा अन् इतरांनाही त्याची अनुभुती द्यायची. स्वतः आत्मज्ञानी व्हायचे अन् इतरांनाही त्या आत्मज्ञानाची अनुभुती देऊन आनंदी, सुखी करायचे. हीच भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. हाच भारतीय धर्म आहे. प्रत्येक मानवाला सुखी करणारा हा मानव धर्म आहे. हे आत्मसुख स्वतःमध्ये पाहून इतरांमधीलही आत्मसुखाने समाधानी व्हायचे. अनुभवातून, अनुभुतीतून हे सर्व साध्य होते. यासाठी या आत्मसुखाचा विसर कधी पडू द्यायचा नाही. हे आत्मसुखच आपले जगणं सुखी करते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

आदि गुरु शंकराचार्य यांचे तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यत पोहोचविण्यासाठी अनुराधा पौडवाल यांची विशेष मोहीम

रूपरेखा फुलपाखराची ओळख

बोलीविज्ञान : भाषाभ्यासाच्या कक्षा रुंदावणारा ग्रंथ

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading