शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस दहा, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना वीस आमदारांपर्यंत संकुचित झाली आहे. किमान संख्याबळ नसतानाही विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपद मिळावे यासाठी या तीनही पक्षांची धडपड चालू आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
‘निवडणुकीत यश मिळाल्यानंतर एक उत्साहाचे वातावरण असते, पण महाराष्ट्रात मला तसे वातावरण दिसत नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला किती मते मिळाली व त्यात किती जण निवडून आले याची आकडेवारी पाहिली, तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या पक्षाला आमच्यापेक्षा कमी मते मिळूनही त्यांचे अधिक आमदार कसे निवडून आले, याचे आश्चर्य वाटते….’ महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या या वक्तव्याने ते निकालानंतर किती अस्वस्थ आहेत हे समजून येते. या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला अभूतपूर्व यश मिळवून दिले. २८८ जागांपैकी २३० जागांवर महायुतीचे आमदार निवडून आले. लोकसभा निवडणुकीत महाआघाडीने ४८ पैकी ३१ जागांवर विजय मिळवला व महायुतीला केवळ १७ जागांवर यश मिळाले होते. मग पाच-सहा महिन्यांत असा काय चमत्कार घडला की, मतदारांनी भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या झोळीत भरभरून मतदान टाकले? निकालाने सर्वांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. आपला दारुण पराभव का झाला, याचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी महाआघाडीचे नेते ईव्हीएमवरच शंका घेऊ लागले आहेत. ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्या म्हणून महाआघाडीने मोहीम सुरू केली आहे. पण अशा मोहिमेमुळे निवडणुकीचा निकाल थोडाच बदलणार आहे काय?
शरद पवार हे महाआघाडीचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. काँग्रेस, उबाठा सेना आणि त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष केवळ त्यांच्या राजकीय मुत्सद्दीपणामुळे आजवर महाआघाडीच्या तंबूत एकत्र आहेत. पण सर्वच पक्षांना पराभवाचा जबर फटका बसल्यामुळे महाआघाडी नामक भाजप विरोधकांची फळी किती काळ तग धरू शकेल हे कोणीच सांगू शकत नाही. काँग्रेस पक्षाची केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशपातळीवर भाजपने केविलवाणी स्थिती करून टाकली आहे.
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस दहा, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना वीस आमदारांपर्यंत संकुचित झाली आहे. किमान संख्याबळ नसतानाही विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपद मिळावे यासाठी या तीनही पक्षांची धडपड चालू आहे. १२ डिसेंबरला शरद पवार वयाच्या ८४ वर्षांत पदार्पण करतील. पंचवीस वर्षांपूर्वी आपण स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कशी वाताहत झाली, हे त्यांना या वयात स्वत: अनुभवावे लागते आहे. आपला पुतण्या अजितदादा यांच्यापासून ज्यांना त्यांनी बोट धरून राजकारणात आणले, ज्यांना सत्तेच्या पदांवर बसून मोठे केले असे अहोरात्र साहेब साहेब म्हणणारे, साहेब हेच आपले दैवत आहेत असे जाहीरपणे सांगणारे, साहेबांच्या आशीर्वादाने दिग्गज नेते झालेले चाळीस-पन्नास जण बंडाचा झेंडा फडकवून त्यांना सोडून गेले, तेव्हापासून नव्याने पक्ष बांधणीचे शिवधनुष्य पुन्हा हाती घेण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे.
ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही प्रादेशिक पक्ष फोडण्यात भाजपचा पुढाकार होता हे काही लपून राहिलेले नाही. केंद्रातील महाशक्तीची साथ मिळाल्याशिवाय ठाकरे व पवारांना एकाकी पाडणे शक्यही नव्हते. एकनाथ शिंदे व अजितदादांना भाजपने संरक्षण दिले आणि त्यांना सत्तावाटपात बक्षिसीही दिली. एवढेच नव्हे तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला व अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाने मान्यताही दिली व त्यांना पक्षांचे अनुक्रमे धनुष्यबाण व घड्याळ हे अधिकृत चिन्हही बहाल केले. एवढे सारे अनुकून होऊनही यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी राज्यात महाआघाडीला कौल दिला व महायुतीला नाकारले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सावध झालेल्या भाजपने पाच महिन्यांत झालेल्या चुका दुरुस्त केल्या. कल्याणकारी योजना व मोफत रेवड्यांचा मतदारांवर वर्षाव केला. शेवटच्या महिन्यात एक हजारांवर शासकीय आदेश पारीत झाले. एक लाख कोटी निधीची तरतूद कल्याणकारी योजनांवर केली गेली. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राची सत्ता हातून निसटता कामा नये यासाठी भाजपने चंग बांधला होता. एकदा राज्याची सत्ता ताब्यात आली की भाजपा सत्ता सोडत नाही. सत्ता व प्रशासन कसे ताब्यात ठेवायचे हे इतरांपेक्षा भाजपला जास्त कळते. लोकसभेत मिळवलेला विजय महाआघाडीला विधानसभा निवडणुकीत पचवता आला नाही. महाआघाडीला फाजिल आत्मविश्वास नडलाच पण महायुतीने ज्या वेगाने प्रचारात मुसंडी मारली ती गती शेवटपर्यंत महाआघाडील गाठता आली नाही.
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवला त्याची झळ शरद पवारांनाही बसली. खरं तर शरद पवारांच्या पुढाकारातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते पण ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी पवारांशी सल्लामसलतही केली नाही. वर्षभरातच जुलै २०२३ मध्ये अजितदादांनी बंडाचा झेंडा उंचावला तेव्हापासून शरद पवारांना पक्ष बांधणीचा पुन्हा श्रीगणेशा सुरू करावा लागला. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाने १० जागा लढवल्या व ८ खासदार निवडून आले, या घटनेने पवारांच्या नेतृत्वाला व पक्षाला टॉनिक मिळाले. पण विधानसभा निकालाने पक्षाची वाटचाल अस्ताकडे होऊ लागली काय अशी अवस्था झाली.
शरद पवारांनी आपल्या साठ वर्षांच्या सार्वजिक जीवनात अनेक चढ-उतार पाहिले व पचवलेतही. पण आता वयाच्या ८४ व्या वर्षी ते पक्षाच्या पुनर्बांधणीची दगदग किती करू शकतील? शरद पवार म्हणतात, मतदानाच्या आकडेवारीवरून काही प्रश्न निर्माण होत आहेत. काँग्रेस पक्षाला ८० लाख मते पडली व त्यांचे फक्त १६ आमदार निवडून आले. शिवसेना शिंदे गटाला ७९ लाख मते मिळाली व त्यांचे ५७ आमदार निवडून आले. म्हणजे एक लाख कमी मते मिळूनही जवळपास ४१ आमदार जास्त निवडून आले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाची मते ७२ लाख आहेत. पण आमदार निवडून आले फक्त १० आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ५८ लाख मते मिळाली व पण त्यांचे ४१ आमदार निवडून आले. शरद पवारांच्या गणिताला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गणितानेच उत्तर दिले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मतं १,४९,१३,९१४ आणि जागा ९, पण काँग्रेसला मतं ९६,४१,८५६ आणि जागा १३. शिवसेनेला मतं ७३,७७,६७४ आणि ७ जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला ५८,५१,१६६ मतं आणि ८ जागा. २०१९च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला ८७,९२,२३७ मतं होती व १ जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला ८३,८७,३६३ मतं होती व जागा ४ आल्या.
विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार खचून गेले नाहीत, तर दुसऱ्याच दिवशी, त्यांचे गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील स्मृतिस्थळावर आदरांजली अर्पण करण्यासाठी गेले. ते म्हणाले, ‘मी शांत बसणारा नाही, लोकांना भेटत राहणार, त्यांचे प्रश्न सोडवत राहणार, माझ्या विचारधारेवर विश्वास ठेवणारी नवीन पिढी तयार करणे ही माझी रणनिती आहे…’. पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा गड समजला जातो. सहकारी साखर कारखाने, बँका, पतपेढ्या, सहकार क्षेत्र ही पवारांची शक्ती आहे. पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या ५८ जागा आहेत. पैकी ४४ जागा महायुतीने जिंकल्या आहेत. त्यातही २४ आमदार हे भाजपचे आहेत. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने बारामतीतून विजयी झाल्या. पण विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी त्यांचाच पुतण्या युगेंद्रचा पराभव केला.
विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांचा जेमतेम १२४३ मतांनी विजय होणे व बारामतीत युगेंद्र पवार यांचा लाखभर मतांनी पराभव होणे हे आकडे बरेच बोलके आहेत. विधानसभा निवडणुकीत घड्याळाने ३६ जागांवर तुतारीवर मात केली हा काकांना धोक्याचा कंदील आहे. विधानसभा निकालाने राष्ट्रवादी काँग्रेसच कोणाची याचे उत्तर दिले आहे. या निकालाने पुतण्याने काकांच्या वर्चस्वाला ब्रेक लावला आहे. ‘जिकडं म्हातारं फिरतयं, तिकडं चांगभलं होतयं’, हा म्हणीला शह बसला आहे.
बॅ. ए. आर. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शरद पवार विरोधी पक्षात होते, त्यांच्या पक्षाचे ४९ पैकी ४० आमदार अंतुले यांनी फोडले व काँग्रेस पक्षात नेले. नंतर फुटलेला एकही आमदार पुन्हा निवडून आला नाही, पण यावेळी चित्र बदलले, ज्यांनी साहेबांच्या विरोधात बंड केले, ते सर्व पुन्हा विधानसभेत निवडून आले. फेब्रुवारी-मार्चमध्ये महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अपेक्षित आहेत, त्यामध्ये पवारसाहेबांची पुन्हा कसोटी आहे. स्वत:च्या पक्षाचे आमदार-खासदार यांची एकजूट टिकवणे यासाठी डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. इतके दिवस त्यांच्या डाव्या, उजव्या बाजूला अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे असायचे, ते सर्व भाजपाच्या शेजारी जाऊन बसले आहेत. आता सुप्रिया, रोहित पवार यांना बरोबर आपली नवीन टीम उभी करावी लागणार आहे. पक्ष उभारणीसाठी या वयात साहेबांना पुन्हा वणवण करावी लागते आहे!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.