April 6, 2025
Sun Power of Universe article by rajendra ghorpade
Home » सर्व शक्तीमान सूर्य 
विश्वाचे आर्त

सर्व शक्तीमान सूर्य 

सर्व शक्तीमान सूर्य

आजचा सूर्य ताजा, कालचा सूर्य शिळा असे कधीही होत नाही. जीवनचक्र हे अखंड सुरू आहे. या सूर्यापासूनच सृष्टीची उत्पत्ती झाली आहे. सर्व शक्ती त्याच्यातच एकवटली आहे. या सर्व शक्ती सूर्याच्याच वंशज आहेत. आत्मा हीसुद्धा एक शक्ती आहे. त्याचीही उत्पत्ती या सूर्यापासूनच झाली आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

हां गा सूर्य काय शिळा । अग्नि म्हणों येत आहे वोविंळा ।
कां नित्य वाहातया गंगाजळा । पारसेपण असे ।। २०२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १० वा

ओवीचा अर्थ – अहो रोज उगवणाऱ्या सुर्याला शिळा म्हणता येईल काय ? अग्नीला ओवळा म्हणता येईल काय ? अथवा नेहमी वाहणाऱ्या गंगेच्या पाण्याला पारोसेपणा येतो काय ?

ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली अनेक उदाहरणे ही विज्ञानावर आधारित आहेत. गेल्या दोन शतकात लागलेले शोध हे बाराव्या शतकात लिहिलेल्या ज्ञानेश्वरीतील उदाहरणात आहेत. असे अनेकदा स्पष्ट होते. पृथ्वी गोल आहे आणि सूर्याभोवती ती फिरत आहे. हा शोध विज्ञानाने गेल्या दोन-तीन शतकात लागला असला, तरी ज्ञानेश्वरीतील अनेक उदाहरणावरून हा शोध त्याकाळातही ज्ञात होता असे दिसते. विज्ञानाने ते आता स्पष्ट झाले आहे एवढेच.

सूर्याचा उदयही होत नाही आणि अस्तही होत नाही. तो अखंड तेजाने तळपत आहे. पृथ्वीच्या फिरण्याने त्याचा उदय, अस्त आपणास झाला असे वाटते. प्रत्यक्षात तो अखंड आहे. यामुळे कालचा सूर्य वेगळा, आजचा सूर्य वेगळा असे होत नाही. दररोज उगवणारा, दररोज दिसणारा सूर्य हा सारखाच आहे. आजचा सूर्य ताजा, कालचा सूर्य शिळा असे कधीही होत नाही. जीवनचक्र हे अखंड सुरू आहे. या सूर्यापासूनच सृष्टीची उत्पत्ती झाली आहे. सर्व शक्ती त्याच्यातच एकवटली आहे. या सर्व शक्ती सूर्याच्याच वंशज आहेत. आत्मा हीसुद्धा एक शक्ती आहे. त्याचीही उत्पत्ती या सूर्यापासूनच झाली आहे.

सर्वांच्या ठायी असणारा आत्मा हा एकच आहे. ही एकच शक्ती आहे. या शक्तीचा उदय होत नाही किंवा अस्तही होत नाही. तो जन्मतही नाही आणि त्याला मरणही नाही. तो अमर आहे. देहात आल्यामुळे तो जन्म-मरणाच्या फेऱ्यात अडकला आहे. याचेच ज्ञान प्रत्येकाला होण्याची गरज आहे. याची जाणीव सातत्याने होणे गरजेचे आहे. ज्याच्याजवळ हे ज्ञान नित्य आहे, तो आत्मज्ञानी आहे. त्याला सर्व शक्तींचे ज्ञान होते. तो अंतर्ज्ञानी असतो. भूत, वर्तमान, भविष्य या तिन्हींचेही त्याला ज्ञान असते. हे ज्ञान तो इतरांनाही देऊ इच्छित असतो.

गंगा नदी बारमाही वाहते. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे नदीला पूर येतो, तर उन्हाळ्यात हिमालयात वितळणाऱ्या बर्फामुळे पाणी असते. ही नदी कोरडी कधीच पडत नाही. आत्मज्ञानसुद्धा असेच आत्मज्ञानी व्यक्तीतून अखंड वाहत आहे. या ज्ञानाचा आस्वाद घ्यायला प्रत्येकाने शिकले पाहिजे. त्यात डुंबायला शिकले पाहिजे. सूर्यापासून जशी अखंड किरणे निघत असतात तसे आत्मज्ञानी व्यक्तीमधून या ज्ञानाचा अखंड झरा सुरू असतो. सूर्याच्या प्रकाशात अनेक विषाणूंचा नाश होतो. पेरणीच्या आधी जमीन यासाठीच शेकून घेतली जाते. जमिनीतील विषाणू सूर्याच्या दाहकतेने नष्ट होतात. तसे आत्मज्ञानी व्यक्तींच्या कोपाने दुष्ट-दुर्जनांचा नाश होतो.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading