September 9, 2024
Rare Marathi words viral article
Home » मराठीतील अडगळीच्या खोलीत गेलेले शब्द
व्हायरल

मराठीतील अडगळीच्या खोलीत गेलेले शब्द

कामावरून घरी आलो तर मुलगी क्राफ्टचा पसारा मांडून अस्ताव्यस्त मांडी घालून काहीतरी करत होती.
म्हंटलं ” काय गं अशी फतकल मारून बसलीस मधेच!”
तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह?
फतकल???
मध्ये बहिणीकडे गेलो असताना भाचीला म्हंटलं, ” माझी बॅग जरा खुंटीला लटकवून ठेव.” तर फिदीफिदी हसली,
म्हणते ” शी खुंटी???
What’s that?”
आता काय सांगू तिला. माझा जन्म आमच्या वाड्यात झाला, त्यामुळे खुंटी, कोनाडा, फडताळ, ओगराळ, रोळी, घंगाळं, ओटी, परसदार, माडी, पोटमाळा
हे रोजच्या वापरातील शब्द होते.
किती उशीर झाला रे शिऱ्या, दिवा “मालव” आता. असं आज्जी हमखास म्हणायची.
कोकणात दिवा दवड म्हणतात.
जेवताना आजी नेहमी “गोविंद” ( एक घास) काढून ठेवायची.
हल्ली…..
वाती “वळायच्या” नसतात तर विकत मिळतात.
जेवणाचं “पान” वाढायचे नसते तर serve करायचे असते.
भात वाढ म्हणायचे नसते तर भात दे म्हणायचे असते.
देवघरातील वात “शांत” करायची नसते तर विझवायची असते.
चंदनाचे खोड आणि सहाणे ची जागा रेडिमेड गंधाच्या खडूने घेतलीय.
पिंजरीची जागा टिकली न घेतलीय.
बुश शर्ट ची जागा टी शर्ट ने घेतलीय.
नऊवारी लुगड्याची जागा शिवलेल्या “saree” न घेतलीय.
यथेच्छ खाण्यानंतर हल्ली “तडस” लागत नाही.
तर over eating मुळे stomach tight होतं.
पित्त न होता ऍसिडिटी होते.

थोबाड रंगावायचं नसतं तर एक tight slap द्यायची असते.
खाण्याची “बशी” नसते तर प्लेट / डिश असते.
चहाची बशी हा प्रकार तर इतिहास जमा झालाय.
थालीपीठ थापायला पळसाचे/ केळीच पान नसतं तर प्लास्टिक शीट असते.
ते भाजायला बिडाची काहिल जाऊन नॉनस्टिक तवा आलाय.
कात्री ची सीझर झालीय, तर शिवण यंत्र sewing machine झालंय.
डाव, पळी, भात्या, कालथा / उलथनं, ओग्राळं आता, serving spoon, spatula, झालंय.
बाक जाऊन बेंच आलाय, वजन काटा जाऊन weing machine आलंय.

चालायचंच नाही का? कारण आता हे शब्द अडगळीच्या खोलीत न जाता store room मध्ये गेलेत.
आपणही आता जमान्याशी “जुळवून” न घेता, “easily adjust” होतोच की!!!
त्यामुळे फार विचार न करता, एका “डुलकी” ऐवजी “power nap” घेऊया, सकाळ झाली की …morning walk ला जाऊ या 🤗🥰😊

मूळात शीर्षक दिसताच लक्षात येते की ‘अडगळ’ हा शब्दच अडगळीत गेला आहे. पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची. सगळ्या नको असलेल्या, परंतु कधीतरी कामास येणार्‍या वस्तू तेथे जाऊन पडायच्या. पण 1 BHK अथवा 2 BHK¨च्या जमान्यात अडगळ सरळ भंगारवाल्याकडे जाते.

जुनी घरे आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात. ओटी, ओसरी, पडवी, परसू, माजघर, बळद, कोठीघर हे शब्द विसरायला झाले आहेत. माळा (आताच्या मराठीत अॅटिक, पाण्याची अवैध सिंटेक्स टाकी लपवण्याचं ठिकाण) ही पूर्वी अभ्यासाची जागा पण असायची.
तसंच आता व्हेंटिलेटर फक्त हॉस्पिटल किंवा थिएटर मधेच दिसतो. दरवाज्यावर एक झरोकावजा खिडकी असायची हवा खेळती रहाण्यासाठी, तिला व्हेंटिलेटर म्हणायचे हे थोड्यांनाच माहीत असेल.

‘वळचण’ हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा.
घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं.

पागोळं म्हणजे काय? वळचणीवर पाऊस पडल्यानंतर बहुतेक पाणी ‘पन्हळी’ तून जमिनीत जातं. पण तरीही बरेच चुकार थेंब पन्हळीतून न येता इकडून तिकड़ून खाली येतात – ती पागोळी.
‘फडताळ’ ….. फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट. खुंटी, कोनाडे, देवड्या हे असेच अडगळीत गेलेले शब्द.

जुन्या घरातील न्हाणीघर (बाथरूम) असंच. ऐसपैस चुलाण्यावर पंचवीस-तीस लिटरचा हंडा तापत असायचा. दगडी चौरंग, अंग घासायला ‘वज्री’, ‘घंगाळ’ असायचे. तेही असेच कालबाह्य झाले.
गृहिणीची कुंकवाची पेटी, त्यातील आरसा, फणी, करंडा, मेणाच्या डाबल्या सहित गडप झाली. सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं. आता व्हॅनिटी बॉक्सेस आल्या. प्रसाधनं त्याच्यात, डोळ्यात व दुकानात मावेनाशी झाली.

लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या, त्याला ‘आगवळ’ म्हणायचे. हाही शब्द अडगळीतच गेलेला.
स्वयंपाकघरातील चूल गेली त्याचबरोबर चूल, वैल, निखारे हे शब्दही गेले.
स्वयंपाकघरातील सतेली, तपेली, कथली, रोवळ्या, गंज हे शब्द आठवेनासे झाले.
ओगराळं हा शब्दही असाच अडगळीत गेलेला.
पंचपाळे, चौफुले, कावळे हे सगळे हरवले.
देवघराबरोबर सहाण, गंधाची थाटी गायब.
‘काथवट’ हा शब्द तर इतिहासजमा झालेला. काथवट म्हणजे लाकडी परात, हिंदीतली ‘मन चंगा तो कथोटी में गंगा’ ही म्हण त्यावरूनच आलेली.
कपड्यांचा विचार करताना तठव, जाजम, बसकर, सुताडे सगळे हरवून गेलेले. सोवळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो,
पण उत्तरवस्त्र ‘पाभरी’ हरवून गेली.
सोवळ्यात नेसण्याची ‘धाबळी’ सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली.
सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरले गेले.
कोठीघरातील कोठय़ा आहेत; पण कणग्या, ढोल्या – ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे – त्या गडप झाल्या.
सूप खुंटीवरून बाउल मधे आलं.
एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठेमोठे ‘पेव’ खणून त्यात ते धान्य साठविले जाई. एकेका पेवात कमीत कमी दहा-दहा पोते साठविले जाई.
जेवण्याची पितळी, वाटकावन, बसकर, मडक्यांची उतरंड, फुंकणी, उखळ, मुसळ, खल आणि बत्ता, जातं, खुंटा, पावशेरा, शेर, मण, गुंज, आतपाव, छटाक वगैरे गायब झाले.
बदलत्या काळाबरोबर पिकदानी सोडून सगळीकडे बिनधास्त आणि बिनदीक्त पान, पानपराग आणि माव्याच्या पिचकाऱ्या टाकणे हा जणू आता हक्क झाला आहे.
‘अ’ अडकित्त्याचा हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे.


उंचीवर घर असेल तर घरात प्रवेश करण्यासाठी उताराचा रस्ता असायचा, त्याला चोप म्हणत असत.. घरात प्रवेश केल्यावर लगेचच दोन्ही बाजूला बैठक असायची, तिला ढाळज किंवा ढेळज म्हणत.. ही पण अडगळीतील नावे आहेत ….
लाइट आले आणि अनेक तर्‍हेचे दिवे गडप झाले.
काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तसेच खूप नवेनवे शब्दही वापरात येत असतात. भाषा ही सतत समृद्धच होत असते. विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे, फक्त गेल्या अर्धशतकात पूर्वी प्रचलित असलेल्या पण विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच, इतकेच….
काय ?…..
जुन्या आठवणी जाग्या झाल्या ना….😇

आता अडगळीच्या खोलीला स्टोअर रूम म्हणतात, ओसरी, जान, जाते, मुसळ, चरवी, कासंडी, शिंकाळे, सरपण, बंब, चुलवान, आधन, असे रोजच्या वापरातील शब्द गुडूप झाले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

ब्रह्माशी ऐक्य साधन्यासाठी…

जीवनातील सावधानतेसाठीच धार्मिक बंधने

चांगली निर्यात क्षमता असलेल्या 50 कृषी उत्पादनांची सारणीः अपेडा

1 comment

Sandhya Darp June 27, 2024 at 7:47 PM

घरामध्ये सोपा असायचा. सोपा म्हणजे काय

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading