“जिच्या हाती पाळण्याची दोरी ! ती जगाची उध्दारी !!असे पूर्वापार बोलले जाते.अलीकडे विभक्त कुटुंब पद्धतीत स्त्रिया नोकरी, उद्योगासाठी घराबाहेर पडू लागल्या. पाळणाघरांची निर्मिती झाली असली तरी स्त्री जगाचा उद्धार करते हे खरे आहे. पुरुषाचे शहाणपण त्याच्या स्वतःपुरते असते पण स्त्री चे शहाणपण कुटुंबास व्यापुन राहाते.
✍🏻भक्ती मंगल मधुकर जाधव
स्त्री अबला नाही तर अतुल शौर्य गाजवणाऱ्या पराक्रमी पुरुषावर संस्कार करणारी वीर माता सबला आहे. छत्रपती शिवराय, भगतसिंग यांना घडवण्यात आईचा वाटा किती महत्वाचा आहे हे सांगण्याची गरज नाही. ज्याकाळी स्त्रियांना घरचा उंबरठा पुढे फारसे स्थान नव्हते अशा काळातही घरच्या चार भिंतीत राहून अनेक स्त्रियांनी विकासास प्रचंड हातभार लावल्याची अनेक उदाहरणे देता येतील. महाराष्ट्राच्या सुधारकांनी स्त्री सुधारणेला खूप महत्वाचे स्थान दिले आहे. कारण सुधारणेची वाटचाल कुटुंब, समाज, देश, विश्व या स्वरूपात होते. विश्वव्यापी सर्वांगीण विकासाची गंगोत्री असेही स्त्रीला मानले जाते.
सावित्रीमाईला सोबत घेऊन महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा मार्ग खुला केला. त्याला आज दीडशे वर्षेहुन अधिक काळ गेला परंतु आजही अनेक ठिकाणी लाखो महिलांना लिहिता वाचता येत नाही ही शोकांतिका आहे. स्त्रियासह सर्वाना शिक्षण मिळावे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था उभारली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वतंत्र महिला विद्यापीठ स्थापित केले. यात स्त्री शिक्षणामागचा उदात्त हेतू महत्वाचा आहे.
लोकसंख्या वाढ आणि कुटुंबनियोजन यासारख्या महत्वाच्या प्रश्नात शिक्षित स्त्रिया महत्वाची अभ्यासू भूमिका बजावतात हा अनुभव आहे. केरळ, तामिळनाडू हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. स्त्री शिक्षणामुळे पूर्ण कुटुंबाच्या जाणीव कक्षा रुंदावतात. साक्षरता आणि विकास यांचा घनिष्ठ संबंध आहे. संस्कारी शिक्षण सर्वाना मिळाले पाहिजे. साक्षरता जिथे कमी तिथे अज्ञान, गरिबी, कुपोषण, बालमृत्यू याचे प्रमाण अधिक दिसते. या सर्वात स्त्रीयांची भूमिका खूप महत्वाची ठरते.
सती कायदा, हुंडा बंदी कायदा, पोटगीचा कायदा, हिंदू वारसा हक्क, महिला विषयक स्वतंत्र धोरण अशा अनेक बाबतीत स्त्रीची भूमिका महत्वाची ठरते. गावातील 50 टक्के मतदार- महिलांनी दारू दुकान बंद करण्याची मागणी केल्यास शासन दारू विक्री परवाना रद्द करू शकतो. आता तर अनेक स्त्रिया धाडसाने पुढे येऊन दारू अड्डे उध्वस्त करू लागल्या आहेत. अनिष्ट गोष्टी विरोधात बंड पुकारू लागल्या आहेत.
स्त्रीविषयक दृष्टिकोन सुधारण्यासाठी, प्रभावी प्रसार माध्यमातून स्त्रियांनीच पुढे आले पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रात स्त्रिया पुढे येत आहेत. काही ठिकाणी तर 50 टक्के आरक्षण उपलब्ध झाले आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया मनाने जास्त खंबीर असतात. एकावेळी अनेक गोष्टी त्या सांभाळत असतात. नव्या काळातील नवी आव्हाने पेलण्यासाठी स्त्रियांनी सशक्तपणे तयार रहायला हवे. स्त्रियांचे संघटन खूप मोठी क्रांती घडवून आणण्याचे सामर्थ्य दाखवते यात शंका नाही.