महाराष्ट्राची एक स्वतःची वेगळी संस्कृती आहे. मराठी संस्कृती ही मराठी संतांची संस्कृती आहे. ग्यानबा – तुकारामाची ही संस्कृती आहे. मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी एक श्रीमंत संत परंपरा महाराष्ट्राला मिळाली. आपल्या मराठी संतांनी इतर प्रांतातील संतांना प्रेरणा दिली. सगळे संत आमचे आहेत, पण मराठी संत हे अधिक जवळचे आहेत.
✍🏻जलकन्या भक्ती मंगल मधुकर जाधव
सन्मार्गाचा प्रवास अवघड असतो, तरी पण माणुस त्या मार्गाने निघाला की आपला उद्धार निश्चित होतो. संतांची शिकवण आपल्याला सन्मार्गाची वाट दाखविते. संत कुणाला म्हणतात ? ज्यांना सत्याची अनुभूती आली, अशी देवमाणसे म्हणजे संत. सर्वसामान्यांचा उद्धार करण्यासाठी निर्धारपूर्वक झटणाऱ्या थोर माणसांना संत म्हटले गेले. माणसाचेच रूपांतर संतात झाले.
महाराष्ट्राची एक स्वतःची वेगळी संस्कृती आहे. मराठी संस्कृती ही मराठी संतांची संस्कृती आहे. ग्यानबा – तुकारामाची ही संस्कृती आहे. मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी एक श्रीमंत संत परंपरा महाराष्ट्राला मिळाली. आपल्या मराठी संतांनी इतर प्रांतातील संतांना प्रेरणा दिली. सगळे संत आमचे आहेत, पण मराठी संत हे अधिक जवळचे आहेत. सगळ्यांना ते माझे वाटतात- कविवर्य वसंत बापट म्हणतात – कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच.
जय देवाचा जय बोला परि माझ्या नाम्याचा नाच ||
खऱ्या अर्थाने मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा पाया तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरानी घातला आणि सतराव्या शतकात त्यावर कळस चढविण्याचे काम संत तुकारामानी केले. संत कवयित्री बहीणाबाईनी – ज्ञानदेवे रचिला पाया | तुका झालासे कळस || या शब्दात त्याचे वर्णन केले आहे. ज्याला आपण ब्रम्हविद्या मानतो ती सर्वाना अवगत नव्हती. ती विद्या सामान्य माणसाला साध्य नव्हती. याचे कारण ती संस्कृत मध्ये होती. संतांनी बंडख़ोरी केली. नवी परंपरा निर्माण केली. धर्माचे ज्ञान सर्वाना अवगत व्हावे यासाठी ज्ञानेश्वर माऊलीनी श्रीकृष्णाची वाणी – भगवतगीता – आपल्या मायबोलीत सांगितली.
गीतेचा भावार्थ याअर्थाने ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका आहे. भक्तीच्या क्षेत्रात जात, धर्म, पंथ असा भेदभाव नको, असे सांगुन ज्ञानदेवानी पारमार्थिक लोकशाहिचा पाया घातला. त्यामुळे त्यांच्या काळात अनेक समाजातील संत पुढे आले. त्यांनी नामस्मरणातुन अनेकांचा उद्धार केला. सावता माळी, नरहरी सोनार, गोरा कुंभार, सेना महाराज, संत रोहिदास, चोखामेंळा यांच्या बरोबर मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा अश्या संत कवयित्री पुढे आल्या. त्या सर्वांनी प्रपंच करीत असताना परमार्थ साध्य केला. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी रानात जाण्याची गरज नाही. आपला प्रपंच विठ्ठलमय केला की तो स्वतःच आपल्याकडे येतो – “न लगे सायास जावे वनांतरा | सुखे येतो घरा नारायण ||” अशी ग्वाही संतानी दिली.
नाचूं कीर्तनाचे रंगी | ज्ञानदीप लावू जगी || असे म्हणणाऱ्या संत नामदेवांनी भारतातल्या सर्व प्रांतात फिरुन अनेक भाषेतुन ब्रम्हज्ञान सोपे करुन सांगितले. शिखांच्या गुरु ग्रंथसाहेबमध्ये नामदेवांचे अनेक अभंग आहेत. संत एकनाथांनी कथेच्या आणि भारुडाच्या माध्यमातून परमार्थ सोपा करुन सांगितला आहे. भारुडे आणि गौळणी यांना नाथांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. तीर्थक्षेत्रामधल्या मूर्तिपेक्षा सज्जन माणुस महत्वाचा – “तिर्थी धोंडा पाणी | देव रोकड़ा सज्जनी ||” असे तुकोबा म्हणतात. मराठी संतांनी देवाची संकल्पनाच बदलून टाकली. “जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले | तोचि साधु ओळखावा | देव तेथेचि जाणावा ||” अशी रोखठोक भूमिका त्यांची होती.
समर्थ रामदास स्वामींनी प्रपंचाची तरफदारी केली. “आधी प्रपंच करावा नेटका | मग परमार्थ घ्यावे विवेका ||” असे त्यांनी म्हटले. ‘आधी केले मग सांगितले ||’ असे सांगुन त्यांनी कृतीवर भर दिला. शक्तिची देवता हनुमान आणि दृष्टांचा संहार करणारे प्रभु रामचन्द्र ही त्यांची दैवते होती. दासबोध हा व्यवहारधर्म सांगणारा एक महान ग्रंथ आहे. पुढच्या काळातील अनेक संतांनी नवे विषय अंगिकारले. राष्ट्रसंत तुकडोजींनी प्रौढ शिक्षण, व्यसनमुक्ति, राष्ट्रीय एकात्मता, ग्रामविकास याला प्राधान्य दिले. संत गाडगेबाबांनी स्वच्छ ग्राम अभियानाचा पायाच घातला. आपल्या किर्तनातुन त्यांनी शिक्षणाचे महत्व, काटकसर, व्यसनमुक्ति, प्राणीहत्या विरोध यावर भर दिला. जागतिकीकरण हा शब्द आज प्रचारात आहे पण “अवघाचि संसार | सुखाचा करीन ||” ही संतांची प्रतिज्ञा होती. आपल्या संतांनी समाज प्रबोधनावर भर दिला. समता, ममता आणि मानवता यावर त्यांनी भर दिला. संत हे जागविणारे आहेत. त्यामुळेच “काय वाणू आता संतांचे उपकार | मज निरंतर जागविती ||” असेच म्हणावे लागेल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.