March 23, 2023
Agriculture advise for Summer season by Krushisamarpan Group
Home » उन्हाळी हंगामासाठी कृषी सल्ला
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उन्हाळी हंगामासाठी कृषी सल्ला

👨🏻‍🌾 कृषी सल्ला 👨🏻‍🌾

🥜 भुईमुग 🥜

भुईमुग झाडाच्या तळाचा पृष्ठभाग सतत वाफसा स्थितीप्रमाणे ओलसर ठेवणे आवश्यक असते. यामुळे झाडाची वाढ सतत चांगली होते, फुलांचे प्रमाण वाढते. फुल कळीतून सुटलेल्या आऱ्या जमिनीमध्ये सुलभ व जलद घुसतात. शेंगांचे पोषण चांगले होऊन दर्जेदार उत्पन्न मिळते. उन्हाळी भुईमुगासाठी ७० ते ८० सें.मी. पाणी लागते. उन्हाळी हंगामात जमिनीच्या मगदुरानुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने १२ ते १४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. फांद्या फुटण्याची अवस्था, आऱ्या सुटण्याची अवस्था, शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. प्लॅस्टिक आच्छादन तंत्रामुळे ४०-५० टक्के पाण्याची बचत होते. तुषार सिंचन पद्धत ही प्लॅस्टिक आच्छादन तंत्राने घेतलेल्या भुईमुगासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होऊन पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होते. जी पिकाच्या जोमदार वाढीसाठी उपयुक्त ठरते. तसेच तुषार सिंचनाने समान पद्धतीने पाणी देता येते. भुईमुगाची लागवड रुंद वाफा सरी पद्धतीने (इक्रीसॅट) केली असल्यास पिकाला पाण्याचा ताण बसत नाही. अतिरिक्त पाण्याचा सरीतून निचरा करता येतो. तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे सोयीस्कर होते. या पद्धतीत पाटानेदेखील पाणी देता येते. वेगळी रानबांधणी करावी लागत नाही.

🌻 सुर्यफुल 🌻

सुर्यफुल हे पाण्यासाठी अतिसंवेदनशील पिक असून ३० ते ३५ सें.मी. पाण्याची आवश्यकता असते. सुर्यफुल पिकाला कळी धरणे (३० ते ४० दिवस), फुल उमलणे (५५ ते ६५ दिवस) आणि दाणे भरणे (६५ ते ७५ दिवस) या पीक वाढीच्या संवेदनशील काळात पाण्याचा ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. जमिनीच्या मगदुरानुसार काळ्या व भारी जमिनीमध्ये २० ते २५ दिवसांच्या अंतराने तर मध्यम व हलक्‍या जमिनीमध्ये ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. जर पाणी उपलब्ध नसेल व केवळ एका पाळीकरीता पाणी उपलब्ध असेल तर, पीक फुलोरा या प्रमुख संवेदनशील अवस्थेमध्ये पाणी द्यावे. दोन पाण्याच्या पाळ्या उपलब्ध असल्यास, फुलकळी अवस्था व पीक फुलोरा या संवेदनशील अवस्थेमध्ये पाणी द्यावे. चार पाण्याच्या पाळ्या उपलब्ध असल्यास, रोपावस्था, फुलकळी अवस्था, पीक फुलोऱ्यावर असताना, दाणे भरण्याची अवस्था या चार संवेदनशील अवस्थेमध्ये पाणी द्यावे.

🌾 उन्हाळी बाजरी 🌾

बाजरी पिकाला जमिनीच्या मगदुराप्रमाणे, पिकवाढीच्या संवेदनशील अवस्थ्येमध्ये १० ते १२ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास, पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी), दुसरे पाणी पिक पोटरीत असताना (पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी), तिसरे पाणी पिक फुलोऱ्यात असताना (पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी) आणि चौथे पाणी कणसात दाणे भरतेवेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.

🥓 हळद 🥓

हळदीला चांगले दर मिळविण्यासाठी हळदीची प्रतवारी करणे महत्त्वाचे ठरते. निर्यातीसाठी आणि देशातील व्यापारासाठी ॲगमार्कने निकष ठरविले आहेत.
निर्यातीसाठी :
विशेष – ३ टक्के तुकडे, १ टक्का कचरा, २ टक्के चुरा, २ टक्के गोल गड्डे, २ टक्के इतर जातींची भेसळ.
उत्तम – ५ टक्के तुकडे, १.५ टक्के कचरा, ५ टक्के चुरा, ३ टक्के गोल गड्डे, ५ टक्के इतर जातींची भेसळ.
चांगला – ७ टक्के तुकडे, २ टक्के कचरा, ७ टक्के चुरा, ५ टक्के गोल गड्डे, १० टक्के इतर जातींची भेसळ.
सामान्य – प्रतवारी न केलेली हळद.
देशांतर्गत बाजारपेठेसाठी :
लांब हळकुंडे (५ सें.मी. पेक्षा जास्त लांब),
मध्यम हळकुंडे (३-५ सें.मी. लांब),
लहान हळकुंडे किंवा चुरा (३ सें.मी. पेक्षा लहान हळकुंडे)

🥓 आले 🥓

आल्यापासून सोडा खार मिश्रण पद्धतीने सुंठ तयार करण्यासाठी, सर्वप्रथम स्वच्छ आले निवडून ८ ते १० तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याची साल काढावी. त्यानंतर हाताने उचलेल इतक्‍या क्षमतेच्या १.५ × २ फूट आकाराचा गॅल्व्हनाईज जाळीच्या पिंजऱ्यामध्ये आले भरून घ्यावे. तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये सोडियम हायड्रॉक्‍साइड याची २० टक्के, २५ टक्के आणि ५० टक्के तीव्रतेची द्रावणे तयार करून उकळून घ्यावीत. या द्रावणामध्ये कंदाने भरलेला पिंजरा २० टक्के द्रावणामध्ये पाच मिनिटे, २५ टक्के द्रावणामध्ये एक मिनिट आणि ५० टक्के द्रावणामध्ये अर्धा मिनिट धरावा. त्यानंतर पिंजऱ्यातील आले चार टक्के सायट्रिक ॲसिडच्या द्रावणात दोन तास बुडवून ठेवावे. त्यानंतर आले चांगले निथळून स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळवावे. चांगले वाळविल्यानंतर थोडीफार राहिलेली साल चोळून काढावी. अशा पद्धतीने चांगली सुंठ तयार होते. पद्धतीने तयार केलेल्या सुंठेला परदेशात चांगली मागणी आहे.

🎋 पूर्वहंगामी ऊस 🎋

पूर्वहंगामी ऊस लागवडीनंतर ४.५ ते ५ महिन्यांनी पहारीच्या औजाराने वरंबे फोडून व नंतर सायन कुळव चालवून आंतरमशागत करावी. खतांची मात्रा देऊन रिजरच्या सहायाने मोठी बांधणी करावी. सिंचनासाठी सऱ्या, वरंबे सावरून घ्यावेत. ऊस पिकाला मोठ्या बांधणीच्या वेळी प्रति एकरी ५४ किलो नत्र (११८ किलो निम कोटेड युरिया), ३४ किलो स्फुरद (२१३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व ३४ किलो पालाश (५७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. को-८६०३२ जातीसाठी प्रति एकरी ६८ किलो नत्र (१४८ किलो निम कोटेड युरिया), ४२.५ किलो स्फुरद (२६६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व ४२.५ किलो पालाश (७१ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे.

🎋 सुरु ऊस 🎋

सुरु ऊस लागवडीपासून मोठ्या बांधणीपर्यंत सर्वसाधारणपणे पाण्याच्या पाळ्या ८ सें.मी. खोलीच्या द्याव्यात. त्यानंतर १० सें.मी. खोलीच्या पाणी पाळ्या द्याव्यात. हंगामानुसार उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी, पावसाळ्यात १४ ते १५ दिवसांनी व हिवाळ्यात १८ ते २० दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. यापेक्षा अधिक पाण्याचा वापर करू नये. पाण्याच्या अधिक वापरामुळे जमिनी क्षारयुक्त बनतात व अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन पाण्याबरोबर अन्नद्रव्यांचाही निचरा होतो. त्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी होते. पाणी देताना दारे धरून पाणी द्यावे. जमिनीच्या प्रकारानुसार व आवश्यकतेनुसार वाफ्यांचा आकार ठेवावा. पाण्याची बचत, उत्पादन वाढ व जमिनीच्या सुपीकतेसाठी सूक्ष्म जलसिंचन पद्धतीचा अवलंब करावा, यासाठी पट्टा पद्धत किंवा रुंद सरी पद्धतीचा अवलंब करणे उपयुक्त ठरते.

🎋 आडसाली ऊस 🎋

ऊस पिकाला प्रवाही पद्धतीने पाणी देताना संपूर्ण सरी भरू जाईल, असे पाणी देऊ नये. सरीच्या तळाचा २५ ते ३० टक्के भाग ओला होईल (मोठ्या बांधणीनंतर प्रति पाळी १० सें.मी.) इतकेच पाणी द्यावे. पिकातील खालील पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून ती अच्छादन म्हणून सरीत पसरावीत.

Related posts

जाणून घ्या डाऊनी नियत्रणाचा उपाय…(भाग – २)

कृषि सल्लाः उन्हाळ्यात पिकांची आणि पशूंची अशी घ्या काळजी..

अडुळसा (ओळख औषधी वनस्पतींची)

Leave a Comment