प्राचार्य राजेंद्र कुंभार यांचे प्रतिपादन
कातरबोणं, जगभरातील भूकंपचे शानदार प्रकाशन
कोल्हापूर – मानवाच्या आदिम काळापासून अनेक संस्कृती उदयास आल्या आणि लयासही गेल्या. मात्र एखादी संस्कृतीच मरण तिच्या इतिहासातल्या नोंदी विना होते, तेव्हा ते अधिक क्लेषदायक असते. आजच्या मेंढपाळ – धनगर समाजातल्या अनेक कला, परंपरा इतिहासात कोणतीही नोंद न होताच कालबाह्य होत आहेत. अशा काळात रावसाहेब पुजारी यांची कातरबोणं ही कादंबरी येते. ती मेंढपाळ समूहाचे वास्तव जगणं नोंदविते, ते मराठी साहित्याच्यादृष्टीने अधिक महत्त्वपुर्ण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डा. राजेंद्र कुंभार यांनी केले.
१९६५ साली बनगरवाडी आली, तेव्हा ते मराठी साहित्याला सगळं नवीन जग होते, त्याचे मोठे स्वागत झाले. कातरबोणं त्याच्या पलीकडंचं धनगरांचे वास्तव जग सादर करते. म्हणून तिचं मराठी साहित्यात महत्त्वाचे योगदान आहे.
प्राचार्य डा. राजेंद्र कुंभार, ज्येष्ठ विचारवंत
ते तेजस प्रकाशनच्या कातरबोणं आणि जगभरातील भूकंप – स्वरूप, भ्रम आणि वास्तव या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्राचार्य कुंभार म्हणाले, धनगर ही आदिम जमात आहे. शेळ्या-मेंढ्या राखता राखता त्यांनी ओव्या, ढोलवादन, गजीनृत्य अशा अनेक कला जोपासल्या, त्यांचे जगणे, खाणे, गाणे आणि वाजविणे ही वेगळीच संस्कृती आहे. एकेकाळी धनगरी रामायण गावोगावी सादर केले जात होते. हे आज नव्या पिढीला सांगावे लागते. त्याची इतिहास नोंद घेत नाही. अभिजनाला त्याच्याशी फारसे देणे-घेणे नाही.
कातरबोणं या कादंबरीमध्ये मेंढपाळ समाजाच्या जगण्याचे द्रव्य भरलेले आहे. कोणत्याही आकृतीबंधाशिवाय माणसाच्या जगण्याचे चित्रण तिच्यात आलेले आहे. निसर्ग, झाडंझुडपं, गवत, डोंगरदऱ्याविषयीचे मेंढपाळाचं संघर्षमय जगणं ही व्यक्त होते. म्हणून अधिक भावते.
कृष्णात खोत, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते
कातरबोणं सहज, सोप्या शब्दात आकाराला आलेली ही साहित्यकृती पारंपरिक कादंबरीच्या आकृतीबंधात कुठेच बसत नसली तरी मेंढपाळ समूहाचे चित्रण खूप बोलकं आहे. वेगळा विषय, उत्तम निर्मिती, बोलकं मुखपृष्ठ आणि लक्षवेधी रेखाचित्रे या साहित्यकृतीची महत्त्वाची मर्मस्थळं आहेत.
प्रा. रघुनाथ कडाकणे
धनगर समाजाची अवस्था आज कुणीही हाकावे, अशी झालेली आहे. समाजाला एकमुखी नेतृत्त्व नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात त्याला प्रतिनिधीत्व नाही. या समाजाला विकास म्हणजे काय हेच कळलेले नाही.अन्य समाजातील माणसे पुढे गेली, तशी माणसे धनगर समाजातून पुढे जाण्यासाठी धनगर समाजासाठी समाज आणि सरकारकडे कोणतीच योजना नाही, हे आमचे दुर्दैव आहे. पुजारींची कातरबोणं ही कादंबरी या सगळ्यांची नोंद घेते, याचे मला समाधान वाटते.
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे
प्रारंभी डॉ. अहिल्यादेवी संजय हुलवान-पुजारी यांनी स्वागत केले. कातरबोणंचे लेखक रावसाहेब पुजारी यांनी कादंबरी लेखनाची प्रेरणा आणि लेखन प्रक्रियेविषयी सांगितले. यावेळी जगभरातील भूकंपचे लेखक महादेव शितोळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, यशवंत सेनेचे प्रमुख बबनराव हजारे, नारायण मोटे-देसाई, माजी शिक्षण संचालक नेमचंद शितोळे, उद्योजक अतुल कुलकर्णी, सुनिल पाटील, प्रदिप घोडके, नागेश पुजारी, प्रा. टी. के. सरगर, विकास घागरे, प्रा. लक्ष्मण करपे, शिवाजीराव कचरे, पदमाकर पाटील, रावसाहेब पाटील-पाटपन्हाळाकर, दयानंद लिपारे, प्रा. अनिलकुमार पाटील, प्रा. शांताराम कांबळे, अजयकुमार पुजारी उपस्थित होते
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.