बुद्धीबळ खेळताना आपण जितके स्थिर राहून विचार करू, मन लावून विचार करू तितक्या चांगल्या चाली आपण खेळू शकतो. यातूनच विजयाचा मार्ग सुकर होतो. हे झाले खेळाच्या बाबतीत.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तें दक्षत्व गा चोख । जेथ चौथा गुण देख ।
आणि झुंज अलौकिक । तो पाचवा गुण ।। ८६४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थः ते चांगले दक्षत्व अर्जुना, क्षत्रियकर्मातील चौथा गुण आहे. असे समज आणि लोकोत्तर युद्ध तो पाचवा गुण होय.
राजा समोर अनेक प्रश्न सातत्याने उभे राहात असतात. वेगवेगळ्या विचित्र परिस्थिती उत्पन्न होत असतात. अशा परिस्थितीत दक्ष राहून त्यावर विजय मिळवणे हे त्याचे कर्तव्य असते. तो त्याचा धर्म असतो. याचा परिणाम मनावर होता कामा नये. स्थिर बुद्धीने, मनाचा समतोल ढळू न देता ही सर्व परिस्थिती हाताळायची असते. ही क्षत्रिय कर्माची लक्षणे आहेत. ज्ञानेश्वर माऊलीने येथे क्षत्रिय कर्म म्हटले आहे. जात म्हटलेले नाही हे लक्षात घ्यायला हवे. कर्मानुसार तुम्ही ब्राह्मण की क्षत्रिय हे ठरता. गुणावर हे सर्व ठरते. सांगण्याचा उद्देश इतकाच चांगले कर्म करत राहाणे हे महत्त्वाचे आहे. स्वतःचे व्यक्तिमत्त्व हे त्यावर घडत असते. चांगल्या कर्मांनी, गुणांनी मोठे व्हावे, हाच उद्देश यामागे आहे. आपल्या जीवनात असे अनेक कठीण प्रसंग येत असतात, अनेक चांगल्या – वाईट घटना घडत असतात त्यावर क्षत्रिय गुणांच्या आधारे मात करता येऊ शकते. हेच यातून शिकायचे आहे.
बुद्धीबळ खेळताना आपण जितके स्थिर राहून विचार करून, मन लावून विचार करू तितक्या चांगल्या चाली आपण खेळू शकतो. यातूनच विजयाचा मार्ग सुकर होतो. हे झाले खेळाच्या बाबतीत. राज्य कारभार करताना राजालाही असेच दक्ष राहून शत्रूच्या चालीवर, प्रतिस्पर्ध्यांच्या चालीवर, हालचालीवर लक्ष ठेवावे लागते. न्याय दानाचे कार्यही करताना असेच दक्ष राहून न्याय द्यावा लागतो. अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. एखाद्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम दिर्घकाळ सोसावे लागतात. अर्थात याचा परिणाम प्रजेवरही होत असतो. प्रजाही या निर्णयाने भरडली जाऊ शकते, हे लक्षात घ्यायला हवे. म्हणजेच दक्षतेने सर्व कृती ह्या कराव्या लागतात.
क्रिकेटमध्ये आपण पाहातो. बॅट्समनला प्रतिस्पर्धी खेळाडू सतत टोमणे मारून डिवचत असतात. विशेषता विकेट किपर हे कृत निश्चितच करत असतो. त्यांच्या चांगल्या खेळावर कसा परिणाम होईल अन् त्याची मानसिकता कशी ढळेल हाच उद्देश यामागे असतो. यातून तो स्वतःची विकेट गमावून बसतो. असे जीवनाच्या खेळातही व्यत्यत आणणारे अनेक जण असतात. या अशा मानसिकतेवर दक्ष राहूनच मात करायची असते. जीवनाच्या खेळात विकेट जाणार नाही याची काळजी आपणच घ्यायची असते.
अपराध्याला शिक्षा देऊन राजाला प्रजेला न्याय द्यायचा असतो. अशावेळी अपराधी कधी कधी बोलत नाही. आपली चुक मान्य करत नाही. आपला गुन्हा तो कधीही कबूल करत नाही. अशाने प्रजेवर अन्याय होण्याची शक्यता अधिक असते. प्रजेला न्याय देण्यासाठी त्याला बोलते करणे हे आवश्यक असते. त्याने गुन्हा कबूल केला, तरच न्याय देता येऊ शकतो. त्याला बोलते करण्यासाठी अनेक युक्त्या राजाला वापराव्या लागतात. विनंत्या करून कधी कोणताही अपराधी आपली चुक मान्य करत नाही. किंवा तो कधीही खरं सांगत नाही. त्याने खरे बोलावे, त्याला बोलते करावे, त्याच्या तोंडातून खरे बाहेर पडावे, सत्य बाहेर यावे यासाठी काही युक्त्या राजाला कराव्या लागतात. दक्ष राहून हे सर्व राजाला करावे लागते. तरच तो जनतेला न्याय देऊ शकतो. काही कठोर निर्णयही यावेळी राजाला घ्यावे लागतात. यात त्याची मानसिकता ढळू शकते. काही अपराधी लाच देऊन, आमिश दाखवून स्वतःचा कार्यभाग साधू इच्छित असतात. या सर्वावर राजाने स्थिर बुद्धीने मात करावी लागते. यासाठीच दक्षता हा गुण राजाजवळ असावा लागतो.
साधना करतानाही साधकाने दक्ष राहून साधना करावी. सत्य समजून घेण्यासाठी, आत्मज्ञानाचा साक्षात्कार व्हावा यासाठी दक्षतेने साधना करावी. तरच सत्याचा साक्षात्कार होईल. साधनेच्या कामात अनेक व्यत्यय येत असतात. या सर्व व्यत्ययायवर, विकारावर, आमिषावर मात करून सत्य बाहेर यावे यासाठी दक्ष राहूनच साधना करावी. तरच आपण आध्यात्मिक प्रगती साधू शकू.