आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
प्रश्न – चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील तापमानावर काय परिणाम होईल ?
माणिकराव खुळे – बंगालच्या उपसागरात, केवळ, थोड्याच कालावधीसाठी, नांव धारण करण्यापूरते, अगदीच प्राथमिक अवस्थेत, रूपांतरित झालेले व फारच धिम्या गतीने मार्गक्रमण करत असलेले, ‘फिंजल’ चक्रीवादळ, शनिवारी ३० नोव्हेंबर ला रात्री ११ वाजता उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोंडिचेरी जवळ आदळले.
‘फिंजल’ चक्रीवादळ, आदळताच लगेचच विकसनाच्या उलट पायरीने झुकत, वादळ कमकुवत होत त्याचे आज हवेच्या अतितीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्याच्या प्रेरित परिणामातून, महाराष्ट्रात २ ते ४ डिसेंबर( सोमवार ते बुधवार) असे तीन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून, झालाच तर, भाग बदलत, अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
विशेषतः हा परिणाम, उद्या सोमवारी (२ डिसेंबर ला) दक्षिण महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली ह्या महाराष्ट्राच्या अकरा जिल्ह्यात अधिक जाणवेल, तर मंगळवार-बुधवारी (३ व ४ ला) नांदेड परभणी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली ह्या चार जिल्ह्यात अधिक जाणवेल असे वाटते.
प्रश्न – थंडी कशी राहील ?
माणिकराव खुळे – उत्तर भारतातून संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी घेऊन येणारे थंड व कोरड्या उत्तरी वाऱ्यांना, बंगालच्या उपसागरातून ‘फिंजल’ चक्रीवादळाच्या बाह्यपरिघ फेरीतून, एकदम काटकोनातून म्हणजे पूर्वे दिशेकडून लोटलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे अटकाव केला जात आहे, व दमटपणा काहीसा वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कार्तिक अमावस्या ते चंपाषष्टी (रविवार दि.१ ते शनिवार दि.७ डिसेंबर) पर्यन्तच्या आठवड्यात पहाटेच्या किमान व दुपारच्या कमाल अश्या दोन्हीही तापमानात किंचितशी वाढ होवून संपूर्ण महाराष्ट्रात आठवडाभर काहींशी थंडी कमी होतांना जाणवणार आहे.
प्रश्न – महाराष्ट्रातील सध्याच्या तापमानात कोणते बदल होतील ?
माणिकराव खुळे – सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान २८ तर पहाटेचे किमान तापमान १२ ते १४ डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान असुन ही दोन्हीही तापमाने हे जवळपास सरासरी इतकी अजूनही जाणवतात. उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात भाग बदलत ही तापमाने अजुन खालवलेली असुन ती सरासरीच्या २ ते ४ डिग्रीने घसरलेली आहेत.
प्रश्न – उत्तर महाराष्ट्रात थंडी कशी राहील ?
माणिकराव खुळे – अर्थात उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर अश्या ५ जिल्ह्यात मात्र ह्या वातावरणाचा थंडीवर विशेष परिणाम जाणवणार नसून तेथील थंडी टिकून राहील, असे वाटते.
प्रश्न – पुढील आठवड्यात थंडी कशी असेल ?
माणिकराव खुळे – आठवड्याभराच्या कालावधीनंतर, म्हणजे रविवार दि. ८ डिसेंबर नंतर थंडीत पुन्हा वाढ व्हावी, अशी अपेक्षा आहे. परंतु सध्या विषववृत्तीय आग्नेय बं. उपसागारात जाणवणारी चक्रीय वाऱ्याची स्थिती आणि त्याचबरोबर फिंजल’ वादळाचे अरबी समुद्रात प्रवेशणाऱ्या शिल्लक अवशेषाचे विकसन, त्यानंतर घेणारी दिशा, ह्यावरच महाराष्ट्रातील त्यापुढील आठवड्यातील थंडीची स्थिती अवलंबून असेल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.