February 1, 2023
balshastri Jambhekar Darpan
Home » मराठी पत्रकारितेतील विद्वतेच्या परंपरेची मुहुर्तमेढ रोवणारे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर
मुक्त संवाद

मराठी पत्रकारितेतील विद्वतेच्या परंपरेची मुहुर्तमेढ रोवणारे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

समाजसुधारक जांभेकरानी विधवा पुनर्विवाहाचा आग्रह धरला .१८४५ मध्ये ज्ञानेश्वरीची पाहिली मुद्रीत आवृती प्रसिध्द करणारे तसेच मराठी वृत्तपत्राची मुहुर्तमेढ करून बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारितेत स्वतःची नाममुद्रा उमटविली . मराठी पत्रकारितेत चौफेर विद्वत्तेची परंपरा निर्माण करणारे बाळशास्त्री जभेकर यांच्या स्मृतीला अभिवादन .

विलास पाटणे

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील “दर्पण” हे वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित केले होते. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील पारंपरिक विचारांच्या पलीकडे जाऊन नव्याने विचार करणार्‍या पहिल्या पिढीचे प्रतिनिधी होते. बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म देवगड जवळील पोंभुर्ले या गावी १८१२ साली झाला. वडिल भिक्षुकी करीत असत .वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी आधुनिक शिक्षणासाठी मुंबईत गाठली. अक्कलकोटच्या युवराजांना शिकविण्यासाठी त्यांना १८३२ मध्ये दर महा १२० रु मिळत असत. बाळशास्त्रींना संस्कृत , मराठी, इंग्रजी, हिंदी याचबरोबर ग्रीक, लॅटीन, फ्रेंच, बंगाली, गुजराती तेलगू आदी भाषा अवगत होत्या. बाळशास्त्रींची शाळा पुस्तक मंडळाचे भारतीय सचिव म्हणून नेमणूक झाली. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी म्हणजेच १८३१ साली त्यांनी ग्रंथ लेखनास आरंभ केला.

एलफीस्टन महाविद्यालयात ते हिंदीचे पहिले मराठी प्राध्यापक होते बाळशास्त्रीनी वयाच्या २० व्या वर्षीच काळबादेवी ( मुंबई) येथून मराठी वृत्तपत्र सृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे “दर्पण” वृत्तपत्र सुरू केले. दर्पण मराठी व इंग्रजी भाषामधील जोड वृत्तपत्र होते. दर्पणमध्ये एक स्तंभ मराठीत तर दुसरा इंग्रजीत असे. त्यांच्यावर बंगालमधील सामाजिक चळवळींचा प्रभाव होता. सुरुवातीस पाक्षिक स्वरूपात प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र वाचकांच्या आग्रहामुळे चारच महिन्यांत साप्ताहिक झाले.

सामाजिक सुधारणांसंबंधी आग्रही असलेले दर्पण वाचकांचे स्वातंत्र्यही तेवढेच महत्त्वाचे मानत असे. त्यामुळे संपादकीय धोरण आणि विचार या विरोधातील मतांनाही त्यात योग्य स्थान मिळत होते. संपादकीय चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचे मोठेपणही दर्पणकारांनी वेळोवेळी दाखविले होते,. परकीय सत्तेला उलथवून टाकण्यासाठी समाजजागृती करणेसाठी लेखणीशिवाय पर्याय नाही यावर दर्पणकारांचा ठाम विश्‍वास होता. दर्पणचा खप त्याकाळात ३०० प्रतींच्या जवळपास होता.

बाळशास्त्रीनी मराठी समाजमन घडविले. वैचारिक प्रबोधनाची पेरणी केली. भविष्यकाळातील माध्यमांची ताकद त्यांनी ओळखली होती. संपादकाला भाषेची जाणं आणि सामाजिकतेचे भान हवे हे त्यांनी ओळखले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पूर्वपरंपरा नसताना वृत्तपत्राची मांडणी, अग्रलेख, विषय, भाषा, स्फुटे याचे निकष त्यांनी ठरवून मराठी वृत्तपत्रांना दिशा दिली.

ग्रंथालयाचे महत्व ओळखून बॉम्बे नेटीव्ह लायब्ररी प्रथम स्थापन केली. रॉयल एशियाटिक मासिकांमध्ये शोध निबंध प्रसिध्द करणारे ते पाहिले भारतीय होते .कुलाबा वेधशाळेचे ते संचालक होते. प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यावर शोधनिबंध लिहिला . त्यांनी विविध विषयावर मराठी पाठ्यपुस्तके लिहिली. राष्ट्वादाचे पितामह आणि काँग्रेसचे संस्थापक दादाभाई नवरोजी त्यांचे विद्यार्थी होतें.

१८४० मध्ये मराठी वाचकामध्ये लोकप्रिय झालेले दर्पण अकस्मात बंद करण्यात येऊन युनायटेड सर्व्हिस गॅझेट मध्ये विलीन करण्यात आले. उण्यापुर्‍या ८ वर्षांत वृत्तपत्रसृष्टीवर आपली मोहर उठवून दर्पण बंद पडले. इतिहासचा शोध घेताना भटकंतीत कनकेश्वर येथे प्राचीन शिलालेखाचा शोध घेताना भर दुपारी गेले . अखेर प्रखर उन्हामुळे उष्माघात होवून १७ मे १८४६ रोजी दर्पणकारांचे निधन झाले.

ज्ञानाच्या अनेक क्षेत्रांत अधिकारवाणीने त्यांनी केलेला संचार पाहून आश्चर्याने थक्क व्हायला होते .केवळ ३४ वर्षाच्या आयुष्यात “जस्टीस ऑफ पिस ” बाळशास्त्रीनी लोकशिक्षणाच्या माध्यमातून समाजाला विवेकनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ बनविले . त्यांची नितिकथा , इंग्लंड देशाची बखर ,इंग्रजी व्याकरण ,हिंदुस्तानचा इतिहास ,शुन्यलब्धी गणित आदी साहित्य संपदा प्रसिध्द होती.

समाजसुधारक जांभेकरानी विधवा पुनर्विवाहाचा आग्रह धरला. १८४५ मध्ये ज्ञानेश्वरीची पाहिली मुद्रीत आवृती प्रसिध्द करणारे तसेच मराठी वृत्तपत्राची मुहुर्तमेढ करून बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारितेत स्वतःची नाममुद्रा उमटविली. मराठी पत्रकारितेत चौफेर विद्वत्तेची परंपरा निर्माण करणारे बाळशास्त्री जभेकर यांच्या स्मृतीला अभिवादन.

Related posts

पडिले दूर देशी…

Saloni Art : टाकावू प्लॅस्टिकपासून सुंदर मुखवटे…

Neettu Talks : टुथपेस्ट निवडताना `ही` काळजी जरूर घ्या…

Leave a Comment