August 21, 2025
भारताचे उपराष्ट्रपती : सर्वपल्ली राधाकृष्णन ते जगदीप धनखड, ऐतिहासिक निवडणुका व २०२५ मधील नव्या निवडणुकीत भाजपचे सी. पी. राधाकृष्णन उमेदवार.
Home » उपराष्ट्रपती : सर्वपल्ली राधाकृष्णन ते जगदीप धनखड
विशेष संपादकीय सत्ता संघर्ष

उपराष्ट्रपती : सर्वपल्ली राधाकृष्णन ते जगदीप धनखड

इंडिया कॉलिंग

स्वातंत्र्यानंतर भारताच्या घटनात्मक प्रवासात उपराष्ट्रपतीपद हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद मानले जाते. संसदेत लोकसभा व राज्यसभेतील खासदारांच्या मतदानातून निवडले जाणारे हे पद आजवर देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी भूषवले आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यापासून झाकीर हुसेन, व्ही. व्ही. गिरी, शंकर दयाळ शर्मा, भैरवसिंह शेखावत, हामिद अन्सारी, वेंकय्या नायडू ते जगदीप धनखड अशा नेत्यांनी या पदावर काम केले. अनेक निवडणुका एकतर्फी झाल्या तर काहींनी देशाचे लक्ष वेधले. आता धनखड यांच्या राजीनाम्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये होणारी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पुन्हा केंद्रस्थानी आली आहे.

डॉ. सुकृत खांडेकर

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखादा दुसरा अपवाद वगळता दर पाच वर्षांनी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. उपराष्ट्रपदीपदाची मुदत संपल्यानंतर किंवा काही कारणांमुळे जागा रिक्त झाल्यानंतर संसद सदस्यांच्या मतदानातून नव्या उपराष्ट्रपतींची निवड होते. उपराष्ट्रपती हे दुसऱ्या क्रमांकाचा घटनात्मक दर्जा असलेले हे पद आहे. उपराष्ट्रपती हा संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचा म्हणजेच राज्यसभेचा सभापती असतो. उपराष्ट्रपतीपदासाठी लोकसभा व राज्यसभेतील खासदार मतदान करतात.

संसदेतील सत्ताधारी व विरोधी पक्षाचे संख्याबळ हेच उपराष्ट्रपतीपदासाठी हेच महत्वाचे असते. काही प्रमुख उदाहरणे द्यायची झाली तर १९६७ मधे व्ही. व्ही. गिरी विरूध्द मोहंमद हबीब यांच्यात झालेल्या निवडणुकीत गिरींना ४८३ तर हबीब यांना १९३ मते मिळाली होती. ही निवडणूक एका अर्थांने एकतर्फी झाली होती. तर सन २००२ मधे भाजपचे भैरवसिंग शेखावत व काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीने साऱ्या देशाचे लक्ष वेधले होते. त्या निवडणुकीत शेखावत यांना ४५४ तर सुशीलकुमार शिंदे यांना ३०५ मते मिळाली होती. सन २०१७ व सन २०२२ मधे झालेली उपराष्ट्रपतीपदाची निवडणूकही गाजली होती. सन २०१७ मधे भाजप प्रणित एनडीएचे उमेदवार वेंकय्या नायडू होते तर सन २०२२ मधे एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड होते.

नायडू व धनखड यांनी मोठ्या मताधिक्यांनी ही निवडणूक जिंकली व ते उपराष्ट्रपती झाले. नायडू यांना ६८ टक्के मते मिळाली तर धनखड यांना ७४ टक्के मते मिळून ते विजयी झाले. नायडू व धनखड हे दोन्ही उमेदवार भाजपचे होते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ते उपराष्ट्पती झाले. एनडीएची सर्व ताकद नरेंद्र मोदी व अमित शहांनी त्यांच्या पाठिशी उभी केली होती. आता सप्टेंबर २०२५ मधे होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राचे राज्यपाल व तामिळनाडूमधील भाजपचे नेते सीपी राधाकृष्णन यांना एनडीएने उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.

स्वतंत्र भारतात उपराष्ट्रपतीपदाची पहिली निवडणूक १२ मे १९५२ रोजी झाली. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे पहिले उपराष्ट्रपती झाले. त्या निवडणुकीत जनाब शेख खादिर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदावर बिनविरोध निवड झाली. ते अपक्ष होते व थोर विचारवंत त्यांची ख्याती होती.

११ मे १९५७ रोजी निवडणूक झाली तेव्हा राधाकृष्णन यांचा एकमेव उमेदवारी अर्ज होता. उपराष्ट्रपतीपदावर त्यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली. १३ मे १९६२ रोजी तत्कालीन बिहारचे राज्यपाल झकीर हुसेन यांची काँग्रेसने उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर केली. ते शिक्षणतज्ञ म्हणून देशाला परिचीत होते. त्यांच्या विरोधात एन. सी. सामंतसिनहर ( अपक्ष ) यांनी उमेदवारी अर्ज भरला . झकीर हुसेन यांना ५६८ मते मिळाली तर सामंत सिनहर यांना अवघी १४ मते पडली.

१९ मे १९६७ रोजी झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे व्ही. व्ही. गिरी विरूध्द प्रा. के. एम. हबीब अशी निवडणूक झाली. गिरी हे माजी कामगारमंत्री व कामगार नेते . गिरी यांना ४८३ मते तर हबीब यांना १९३ मते मिळाली. २७ जुलै १९६९ रोजी झालेल्या निवडणुकीत गोपाळ स्वरूप पाठक हे पाच प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करून उपराष्ट्रपती झाले. पाठक हे देशाचे सरन्यायाधीश होते. काँग्रेस पक्षाने त्यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधातील उमेदवार हे अपक्ष किंवा छोट्या पक्षांचे होते.

२८ ऑगस्ट १९७४ रोजी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे बी. डी. जत्ती हे उपराष्ट्रपती म्हणून विजयी झाले. त्यांच्या विरोधात झारखंड जनकाँग्रेसचे एन. इ वोरो उभे होते. जत्ती हे म्हैसूर प्रांताचे ( कर्नाटक ) माजी मुख्यमंत्री होते. जत्ती यांना ५२१ मते मिळाली तर होरो यांना १४१ पडली.

२७ ऑगस्ट १९७९ रोजी झालेल्या निवडणुकीत भारताचे माजी सरन्यायाधीश एम. हिदायतुल्ला हे उपराष्ट्रपती झाले. ते एकमेव उमेदवार होते. १९७७ मधे ते काही काळ त्यांनी हंगामी राष्ट्रपती म्हणून काम केले. त्यांचा उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाल १९७९ ते १९८४ राहिला.

२२ ऑगस्ट १९८४ रोजी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आर. वेंकटरामण उपपराष्ट्रपती झाले. ते माजी अर्थमंत्री होते. त्यांच्या विरोधात रिपब्ल्किन पार्टी ऑफ इंडियाचे बी. सी. उर्फ बापूसाहेब कांबळे यांनी निवडणूक लढवली. वेंकटरामण यांना ५०८ मते तर कांबळे यांना २०७ मते मिळाली. वेंकटरामण नंतर राष्ट्रपती झाले.

२१ ऑगस्ट १९८७ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल व माजी केंद्रीयमंत्री शंकर दयाळ शर्मा हे बिनविरोध उपराष्ट्रपती झाले. त्यांच्या विरोधात डाव्या आघाडीचे व्ही. आर. कृष्णा यांनी उमेदवारी अर्ज भरला होता पण तो अवैध ठरला. शर्मा नंतर राष्ट्रपती झाले.

१९ ऑगस्ट १९९२ रोजी झालेल्या निवडणुकीत माजी राज्यपाल व माजी राजदूत तसेच काँग्रसचे उमेदवार के. आर. नारायणन हे उपराष्ट्रपतीपदावर निवडून आले. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून काका जोगिंदर सिंग यांनी निवडणूक लढवली. नारायणन यांना ७०० मते मिळाली. नंतर त्यांना देशाचे पहिले दलित राष्ट्रपती होण्याचा सन्मान मिळाला.

१६ ऑगस्ट १९९७ रोजी झालेल्या निवडणुकीत जनता दलाचे कृष्णकांत उपराष्ट्रपती झाले. ते एनडीएचे उमेदवार होते. त्यांना ४४१ मते मिळाली व त्यांच्या विरोधात अकाली दलाचे सुरजितसिंग बर्नाला यांना २७३ मते पडली.

१२ ऑगस्ट २००२ रोजी झालेल्या निवडणुकीत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे उमेदवार भैरवसिंह शेखावत उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला. त्या निवडणुकीत क्रॉस व्हिटींग झाल्याची चर्चा झाली.

१० ऑगस्ट २००७ रोजी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित युपीएचे उमेदवार हमीद अन्सारी ४५५ मते मिळवून उपराष्ट्रपती झाले. त्यांच्या विरोधात भाजप- एनडीएच्या उमेदवार नजमा हेफतुल्ला यांना २२२ आणि राजद तिसरी आघाडीचे रशीद मसुद यांना ७५ मते मिळाली.

७ ऑगस्ट २०१२ रोजी झालेल्या निवडणुकीत हमीद अन्सारी दुसऱ्यांदा उपराष्ट्रपती झाले. त्यांना ४९० मते मिळाली व त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप –एनडीएचे उमेदवार जसवंत सिंह यांना २३८ मते मिळाली.

५ ऑगस्ट २०१७ रोजी भाजप – एनडीएचे उमेदवार व माजी केंद्रीयमंत्री वेंकय्या नायड व विरोधी पक्षांचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी अशी लढत झाली. नायडू यांना ५१६ तर गांधींना २४४ मते मिळाली.

६ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप एनडीएचे जगदीप धनखड यांनी काँग्रेसच्या मार्गारेट अल्वांचा पराभव केला. धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते तर अल्वा या माजी केंद्रीयमंत्री. धनखड यांना ५२८ तर अल्वांना १८२ मते मिळाली. १४ वे उपराष्ट्रपती म्हणून काम केलेल्या धनखड यांनी प्रकृतीच्या कारणावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पदाचा अचानक राजीनामा दिला, म्हणून रिक्त झालेल्या पदावर आता पुन्हा निवडणूक होत आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading