महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा धक्कादायक पराभव झाला. कॉंग्रेसची अशी अवस्था का झाली ? यावर चिंतन करण्याची खरोखरच गरज आहे. काही तज्ज्ञ आता यावर व्यक्त होत आहेत. कॉंग्रेसने काय करायला हवे यावर सुद्धा अनेकजण व्यक्त होत आहेत. याच संदर्भात विश्वंभर चौधरी यांनी कॉंग्रेसनं दखल घ्यावी अशा काही अस्वस्थ नोंदी मांडल्या आहेत. या संदर्भातील हा विश्वंभर चौधरी यांचा लेख…
काँग्रेसमध्ये आता छोटे मोठे बदल नकोत, सर्जिकल स्ट्राईक हवा आहे. विचारधारा आणि संघटना दोन्ही पातळ्यांवर अविरत मेहनत घेऊन पुन्हा उभं रहावं लागेल.
डॉ. विश्वंभर चौधरी
- एका विमान प्रवासात दिल्लीहून आलेल्या काँग्रेसच्या पक्ष निरीक्षक योगायोगानं शेजारच्या सीटवर बसल्या. त्यांच्या हातात काँग्रेसशी संबंधित कागद दिसले म्हणून ओळख दिली आणि करून घेतली. महाराष्ट्रात कुठं फिरलात विचारल्यावर नागपूर वगैरे सांगितलं. सेवाग्रामला कधी गेलात का असं विचारल्यावर ‘कधीच नाही, तिथं काय आहे’? असा प्रतिप्रश्न आला. पवनारला काय ते अर्थात माहीत असणंच अपेक्षित नव्हतं.
- विदर्भातल्या नेत्यांचा अपवाद वगळता राजीव सातव हे एकमेव उर्वरित महाराष्ट्रातले कार्यकर्ते होते जे सेवाग्रामला सतत जात. त्यानंतर आता फक्त सचिन राव जातात, विदर्भातले नेते वगळले तर देशभरातून कोणीही मोठे नेते (पर्यटन वगळता) ना कधी साबरमतीला येतात ना वर्ध्याला.
- खेदानं सांगतोय, खूप खेदानं. निर्भय बनोच्या लोगोत गांधीजी नसते तर लोकसभा आणि विधानसभेत गांधी महाराष्ट्रातून कदाचित गायबच झाले असते. गांधींच्या मागे कोणत्याही जातीची एकगठ्ठा मतं नाहीत. गांधी हा मनुष्य सध्याच्या पुरोगामी राजकारणात अडगळीची जागा आहे. अजून एक दोन पिढ्या संपल्या की पुरोगामी राजकारणातून गांधींचं पूर्णतः उच्चाटन होईल की काय अशी स्थिती आहे. काँग्रेसवाल्यांना स्वतःची मूळंच तोडायची वाईट खोड आहे. गांधी शेवटची मुळी आहे हे लक्षात ठेवलंत तर ते तुमच्या हिताचं आहे.
- महाविकासआघाडीच्या एका उमेदवाराला अगदी आयत्यावेळी प्राधान्यानं सभा दिली. आम्ही सभेला निघत असतांना फोन आला की सभा रद्द झाली. कारण असं कळलं की त्या मतदारसंघात भाजपवाले आतून मदत करणार आहेत, तुम्ही आलात तर त्यांच्यावर बोलता, ते नाराज होतील.
- ठरल्या आणि रद्द झाल्या अशा निर्भय बनोच्या लोकसभा आणि विधानसभा मिळून बारा सभा आहेत. त्यातल्या नऊ काँग्रेसजनांच्या आहेत. अत्यंत महत्वाच्या वेळेला सभा रद्द झाल्या आहेत.
- 2017 साली म्हणजे आजपासून सात वर्षांपूर्वी संदेश सिंगलकर आम्हाला अशोकराव चव्हाण यांच्या भेटीला घेऊन गेले मुंबईत. मी आणि असीमनं त्यांना सांगितलं की आम्ही स्वखर्चानं सगळ्या जिल्ह्यांमध्ये जातो शनिवार रविवार वापरून. तुम्ही फक्त त्या त्या जिल्हाध्यक्षाला सांगून सगळे तरूण कार्यकर्ते एकत्र आणा जिल्ह्याच्या ठिकाणी. त्यांना आम्ही गांधी, नेहरू, पटेल समजावून सांगू. आम्ही स्वतःच्या पैशांनी तिकडे पोचू, स्वतःच्या खर्चानं राहू-जेवू. काँग्रेसकडून आम्ही एक रूपयाही घेणार नाही. ते हो म्हणाले पण पुढे काहीच झालं नाही. नंतर तेच भाजपवासी झाले.
- काँग्रेसचं सेवादल – त्याचा वापर फक्त ध्वजवंदनासाठी होतो, ते ही परंपरा आहे म्हणून. मूळ उद्देश हरवला आहे.
- एवढं सगळं असूनही काँग्रेस संपवता येत नाही मोदी शहांना. कारण आजही निष्ठावान कार्यकर्ते आहेत काँग्रेसमध्ये. सर्वत्र असलेलं अस्तित्व हेच काँग्रेसचं सगळ्यात मोठं बळ आहे. कार्यकर्ता ही शक्ती आहे.
- काँग्रेसमध्ये आता छोटे मोठे बदल नकोत, सर्जिकल स्ट्राईक हवा आहे. विचारधारा आणि संघटना दोन्ही पातळ्यांवर अविरत मेहनत घेऊन पुन्हा उभं रहावं लागेल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.