March 30, 2023
Everyone rights to become Bramhasampanna
Home » ब्रह्मसंपन्नतेवर प्रत्येकाचाच अधिकार
विश्वाचे आर्त

ब्रह्मसंपन्नतेवर प्रत्येकाचाच अधिकार

प्रत्येक जण ब्रह्मसंपन्न होऊ शकतो. येथे ना जातीची अट आहे, ना गरिबी-श्रीमंतीचे बंधन आहे. प्रत्येक जीव ब्रह्मसंपन्न होऊ शकतो. फक्त त्याने प्रयत्न करायला हवेत. प्रत्येकाला सारखाच हक्क आहे. कोणताही भेदभाव नाही. यासाठी आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करायला हवा.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

एऱ्हवी तैचि अर्जुना । होईजे ब्रह्मसंपन्ना ।
जैं या भूताकृती भिन्ना । दिसती एकी ।।1083।। ज्ञानेश्वरी अध्याय १३

ओवीचा अर्थ – सहज विचार करून पाहीले तर अर्जुना, ज्यावेळी या भिन्न आकारांची भूतें एक आहेत, असा बोध होईल त्याचवेळी ब्रह्मसंपन्न होता होईल.

अग्नीतून निघणारी प्रत्येक ठिणगी जरी वेगळी दिसत असली तरी त्या सर्व ठिणग्या एकच असतात. सूर्यापासून निघणारी किरणे कधी सोनेरी, कवडशातून कधी लख्ख पांढरी अशी वेगवेगळी वाटत असली तरी ती सर्व किरणे ही एकच असतात. ही किरणे प्रिझममधून गेली तर ती सप्तरंगी होऊन बाहेर पडतात, पण ही सप्तरंगी किरणे ही एकाच किरणापासून तयार होतात. या सातही रंगांत एकच किरण सामावलेला आहे. प्रत्येक देहात असणारा आत्मा हा वेगवेगळा वाटत असला तरी तो एकच आहे. हे जो जाणतो तोच खरा ज्ञानी.

हे जाणणे हेच खरे ज्ञान. आत्म्याला जाणणे म्हणजेच आत्मज्ञानी होणे. हे जो जाणतो तोच ब्रह्मज्ञानी होतो. ब्रह्मसंपन्न होतो. सद्गुरू ब्रह्मत्वास स्वरूपाच्या ठायी स्थिर करून, धारण करून, स्वात्मबोधी व ब्रह्मबोधी होतात. ते ब्रह्मबोधाचे सुख, सद्गुरू स्वतः आपल्या शिष्याच्या ठायी ओतत असतात. या क्रियेने स्वाभाविकच शिष्य हा गुरूरूप होतो. गुरूचे गुरुत्व हे त्यांच्या आकाराने विसर्जित होऊन शिष्याच्या आकाराने मंडित होते. ब्रह्मसंपन्नता आल्यावर गुरू-शिष्य हा भेद राहात नाही. त्या शिष्यातून ती ब्रह्मसंपन्नता, ते ज्ञान ओसंडून वाहू लागते. यासाठी गुरूंकडून मिळत असलेल्या ज्ञानात, आनंदात डुंबायला शिकले पाहिजे. ते सतत ओतत असलेल्या ज्ञानाचा आस्वाद घ्यायला शिकले पाहिजे.

प्रत्येक जण ब्रह्मसंपन्न होऊ शकतो. येथे ना जातीची अट आहे, ना गरिबी-श्रीमंतीचे बंधन आहे. प्रत्येक जीव ब्रह्मसंपन्न होऊ शकतो. फक्त त्याने प्रयत्न करायला हवेत. प्रत्येकाला सारखाच हक्क आहे. कोणताही भेदभाव नाही. यासाठी आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करायला हवा. ते ज्ञान आत्मसात करायला शिकले पाहिजे. मी एक आत्मा आहे याचा बोध यायला हवा. ज्याने यावर विजय मिळवला तोच आत्मज्ञानी. मनाचा तसा निग्रह करायला हवा. मन यावर स्थिर करायला हवे. जो हे करतो तोच खरा गुरूंचा शिष्य असतो. गुरूकृपेनेच तो ब्रह्मसंपन्न होतो.

Related posts

तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाची वाद आपल्यासी ।।

वड-पिंपळाच्या वृक्षासारखाच हा संसारवृक्ष

वाटाड्या अन् रक्षक सदगुरु…

Leave a Comment