ही आत्मज्ञानाची लढाई आहे. मी कोण आहे याची ओळख करून घेण्यासाठी हा लढा आहे. स्वः च्या ओळखीचा हा लढा ज्ञान प्राप्तीनंतरही सुरुच राहाणारआहे. आत्मज्ञानप्राप्ती ही या लढ्याचा विजय आहे. यासाठी मनावर विजय मिळवायचा आहे. इंद्रियांवर विजय संपादन करायचा आहे. मन स्वः वर केंद्रित करून सोहमची अनुभुती करून घ्यायची आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
जे धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे ।
गेले असती व्याजें । झुंजाचेनि ।। 86 ।। ज्ञानेश्वरी अध्याय पहिला
ओवीचा अर्थ – ज्या कुरुक्षेत्राला धर्मांचे घर म्हणतात, तेथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्तानें गेले आहेत.
माझ्या आयुष्यात मी सर्व प्रथम ज्ञानेश्वरीतील ज्या ओव्या वाचलो, शिकलो अन् अनुभवल्याही त्यातील ही एक ओवी आहे. शालेय अभ्यासक्रमात मामकाः पाण्डवाश्चैव किमकुवैत संजय या गीतेतील पहिला श्लोकावरील ज्ञानेश्वरीतील ओव्या अभ्यासाला होत्या. या श्लोकाचा अर्थ असा आहे धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, धर्माचें स्थान अशा कुरुक्षेत्रामध्ये जमलेले आणि युद्धाची इच्छा करणारे माझे पुत्र (कौरव) आणि पांडव यांनी काय केले ? धृतराष्ट्र आणि संजय यांच्यातील हा संवाद.
शालेय अभ्यासक्रमात मराठीच्या पुस्तकात या गीतेतील श्लोकावरील ओव्या अभ्यासाला होत्या. गारगोटी येथील मौनी विद्यापीठाच्या शाहू कुमार भवनमध्ये मी शाळेला होतो. तेव्हा निलिमा राजाज्ञा या शिक्षिका आम्हाला मराठी शिकवण्यासाठी होत्या. त्यांनीच या ओव्या इतक्या सुंदरपणे शिकवल्या त्या आजही माझ्या स्मरणात आहेत. राजाज्ञा मॅडम शिकवताना तसा प्रसंगही घडला. शाहू कुमार भवन शाळेच्या परिसरातच महात्मा फुले सदन आहे. त्यामध्ये एक विशेष सभा आयोजित केलेली होती. सभा वादग्रस्त ठरणार असल्याने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तत्कालिन डीवायएसपी मीरा बोरवणकर यांनी गोंधळ झाल्यास कडक कारवाई करण्याचेही आदेश दिले होते. शाळा आणि फुले सदन यामध्ये विस्तृत पटांगण आहे. या पटांगणावर व फुले सदन परिसरात खूपच गर्दी पाहायला मिळत होती. सभा सुरु होती त्याचवेळी वर्गात राजाज्ञा मॅडम ज्ञानेश्वरीतील या श्लोकावरील ओव्या शिकवत होत्या. वर्गात सर्वजण एकाग्रतेने ऐकत होते. अचानक फटाका फुटावा तसा मोठा आवाज झाला. अन् मी वर्गात घाबरून उभा राहीलो. तसे सर्वजन मोठ्याने हसू लागले. मला काही काळ काहीच समजले नाही. पण या प्रसंगाने सर्वप्रथम ज्ञानेश्वरीची ओळख देणाऱ्या या ओव्या आणि गीतेचा पहिला श्लोक आजही स्मरणात राहीला आहे.
हा प्रसंग मला खूप काही शिकवून गेला. कदाचित हा प्रसंग माझ्यासाठी शंखनाद होता. कुरुक्षेत्रावर सुरु झालेले युद्ध आता तुला लढायचे आहे. उठ जागा हो, युद्धाला तयार हो. असे सांगून गेला. यातून मिळालेली अनुभुतीच आज माझ्यासाठी एक उर्जा आहे. यातूनच पुढे माझ्याकडून ज्ञानेश्वरीवर तीन पुस्तके लिहीली गेली. तसे रोजच ज्ञानेश्वरीतील अनुभुवांचे लिखाण घडत असते. पण पहिली अनुभुती मनात कायमची घर करून राहीली आहे. जणू काही आपले हे जीवन युद्ध धृतराष्ट्र पाहात आहेत. यासाठी आपणाला जिंकायचे आहे. असे बरेच काही हा धडा शिकवून गेला.
हे सर्व आज सांगण्याचे कारणही तसे घडले आहे. कित्येक वर्षानंतर आज राजाज्ञा मॅडम यांना भेटण्याचा योग आला. कोल्हापूर शहरात करविर निवासिनी श्री अंबाबाई मंदीराच्या शेजारीच राजाज्ञा यांचा वाडा आहे. सध्या मॅडम पुण्यात असतात पण दिपावलीच्या निमित्ताने त्या कोल्हापूरला आल्या होत्या. त्यांना भेटून ज्ञानेश्वरीवरील पुस्तके देण्याची इच्छा मी यापूर्वीच त्याच्याकडे व्यक्त केली होती. त्यानुसार हा भेटीचा योग आला. ज्ञानेश्वरीची पहिली ओळख राजाज्ञा मॅडम यांच्यामुळे झाली. माझ्यासाठी ही राज आज्ञाच होती. लढायला तयार हो अशी आज्ञाच जणू मला त्यांच्याकडून मिळाली. रात्रदिन आम्हा युद्धाचा प्रसंग याप्रमाणे आजही ही लढाई सुरु आहे. या लढाईला निश्चितच गुरुकृपेने यश येईल. पण ज्या गुरुंनी प्रथम युद्धाची आज्ञा देऊन लढायला तयार केले त्यांचा मी सदैव ऋणी आहे.
ही आत्मज्ञानाची लढाई आहे. मी कोण आहे याची ओळख करून घेण्यासाठी हा लढा आहे. स्वः च्या ओळखीचा हा लढा ज्ञान प्राप्तीनंतरही सुरुच राहाणारआहे. आत्मज्ञानप्राप्ती हा या लढ्याचा विजय आहे. यासाठी मनावर विजय मिळवायचा आहे. इंद्रियांवर विजय संपादन करायचा आहे. मन स्वः वर केंद्रित करून सोहमची अनुभुती करून घ्यायची आहे. सोहमचा स्वर स्वतःच्या कानांनी ऐकायचा आहे. या स्वरावर नियत्रण मिळवून विजय मिळवायचा आहे. कुरुक्षेत्र म्हणजे हे आपले शरीर आहे. हे शरीर आणि आपण म्हणजे आत्मा हे वेगळे आहे हे जाणून घ्यायचे आहे. हे जाणणे, हे अनुभवने हा प्रत्येक मानवाचा धर्म आहे. शंभर कौरव साधनेला अडथळा करणारे हे शंभर विषय आपण मारायचे आहेत. यासाठी हा पंचमहाभूताच्या पांडव या देहाचा लढा आहे. पंचेंद्रियावर विजय मिळवून त्यांना नियत्रणात ठेवून मनाची स्थिरता साधत स्वःची ओळख करून घेऊन आत्मज्ञानी व्हायचे आहे. मी कोण आहे ? हे समजल्याशिवाय विकास अशक्य आहे. यासाठी मी कोण आहे ? हे ओळखूनच या युद्धात विजय संपादन करायचा आहे. संजयाच्या वाणीतून (सोहमच्या स्वरातून) धृतराष्ट्राला जेव्हा आपली ओळख पटेल तेव्हा तो आपोआपच आपले देहरुपी राष्ट्र सोडून देईल. तेव्हाच आत्मज्ञानाचे राज्य तुम्हाला उभे करता येईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
खूप सुंदर लिखाण आणि विचार 👍👍👌👌