खजुराहो मंदिराचे अवशेष आपल्याला काय सांगतात ?
खजुराहो मंदिर संकुलातील 25 मंदिरांचे अवशेष हजारो वर्षांपूर्वीचे आहेत. त्या काळातील इतर कोणत्याही अवशेषांपेक्षा ही मंदिरे आपल्याला प्राचीन भारताबद्दल अधिक खोलवरची माहिती देतात. परंतु, शतकानुशतकांपूर्वी बनवण्यात आलेल्या उत्तर भारतातील या अप्रतीम शिल्प कलेमधील एवढेच मागे उरले आहे. हे अवशेष त्या काळातील व्यापार, संस्कृती आणि सामाजिक जीवनाबद्दल आपल्याशी संवाद साधतात. हे संपूर्ण काव्य, कलेच्या रुपात मंदिरांच्या भिंतींवरील शिल्पांमध्ये गुंफले होते. ही भव्य शिल्पे आपल्याला आपल्या प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाबद्दल सांगतात आणि हे शिकण्यासाठी ते एक खुले पुस्तक आहे.
डॉ. दीपिका कोठारी आणि रामजी ओम या दिग्दर्शक जोडीचा, खजुराव आनंद और मुक्ती हा 60 मिनिटांचा हिंदी माहितीपट म्हणजे हजारो वर्षांपूर्वीच्या 25 खजुराहो मंदिरांच्या अवशेषांचे दस्तऐवजीकरण आहे. 53 व्या इफ्फी अर्थात, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज पीआयबी द्वारे आयोजित इफ्फी टेबल टॉक्स सत्राला त्यांनी संबोधित केले.
चित्रपट निर्मात्यांना मंदिरात काय सापडले?
खजुराहोच्या मंदिरांमध्ये काय आहे हे प्रेक्षकांना दाखवण्याचा त्यांचा उद्देश होता. रामजी ओम म्हणाले की त्यांना मंदिरांमध्ये वैदिक देवांची रूपे दिसून आली- मंदिरांच्या भिंतींवर कोरलेल्या शिल्पांमध्ये सर्व 33 कोटी हिंदू देव आहेत. “हा भारतीय कलेचा विश्वकोश आहे,” ते म्हणाले.
या माहितीपटात खजुराहो मंदिर संकुलातील वैकुंठ विष्णू मंदिराचा शोध घेण्यात आला आहे. काश्मीर आणि आसपासच्या भागात वैकुंठ परंपरा अधिक प्रचलित असल्याची माहिती रामजी ओम यांनी दिली. वैकुंठ सिद्धांताशी संबंधित विविध तात्विक कल्पना मंदिराच्या भिंतींवर कोरल्याचं आढळून आलं आहे.
ही शिल्पे कृष्ण मिश्रा यांच्या ‘प्रबोधचंद्रोदय’ या संस्कृत नाटकामधून प्रेरित आहेत. इतकेच नव्हे तर मंदिराच्या भिंतींवर सांख्य तत्त्वज्ञान प्रकट झाल्याचे दिसून आले आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले होते की, ‘खजुराहोच्या मंदिरांवर तांत्रिक ध्वज नव्हे, तर सांख्य ध्वज उंच फडकतो’, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते रामजी ओम यांनी दिली. वैकुंठ विष्णूचे निवासस्थान मानले जाणारे खजुराहो लक्ष्मण मंदिर या चित्रपटातील उत्कृष्ट कलाप्रकारांमध्ये या पैलूंचा उलगडा करते.
“खजुराहोची मंदिरे कामुक शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. पण कामुक समाधाना मागे तात्विक रहस्ये दडलेली आहेत”, डॉ. दीपिका कोठारी म्हणाल्या. “कोरण्यात आलेल्या शिल्पांमधून हे केवळ 10 टक्के दिसते, तर त्यापेक्षा अधिक गहन तत्वज्ञान त्यामधून प्रकट होते”, त्या म्हणाल्या.
खजुराहोच्या लक्ष्मण मंदिरातील योग आणि सांख्य यांचे रहस्य या माहितीपटात उलगडले आहे. डॉ देवांगना देसाई यांनी माहितीपटात स्पष्ट केले आहे की सर्व कामुक आणि बिगर-कामुक प्रतिमा वैदिक आणि पुराण हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.
भारतीय संस्कृतीच्या 24 भागांच्या मालिकेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्या प्राचीन मंदिरांबाबत सध्याच्या पिढीला फारच कमी ज्ञान आहे, असेही डॉ. कोठारी यांनी नमूद केले. म्हणूनच, मंदिराच्या अवशेषांमधून प्रकट झालेल्या आपल्या देशाच्या समृद्ध प्राचीन तत्त्वज्ञानाबद्दल तरुण पिढीचे प्रबोधन करण्यासाठी त्यांनी हा चित्रपट खास बनवला आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.