कविता आली सामोरी….किरण डोंगरदिवे ह्यांनी शोधलेल्या कवितेच्या जन्मकथा
किरण डोंगरदिवे यांच्या स्वतःच्या अतिशय गाजलेल्या शबरी या कवितेच्या जन्मा मागील कथा काही प्रासंगिक कारणामुळे लिहून प्रसिद्ध झाली आणि कविता आली सामोरी या ग्रंथ निर्मितीचा पाया रचला गेला.
आशा अशोक डांगे, औरंगाबाद
मोबा 9764455597
समकालातील महत्त्वाचे कवी, लेखक व मर्मज्ञ समीक्षक म्हणून महाराष्ट्राला परिचित असणारे बुलढाणा मेहकर येथील किरण शिवहर डोंगरदिवे यांच्या कविता आली सामोरी हा कवितेच्या जन्मा मागची गोष्ट सांगणारा लेखसंग्रह वाचण्यात आला. एखादी घटना, गोष्ट ,एखादी वेदना, समाज व्यवहार, व्यक्ती व्यक्ती मधील मनोव्यापार याचा परिणाम कवीच्या मनावर होतो आणि कवितेची बीज हळुवार कवीच्या मनोभूमीत पेरले जाऊन कवितेचा जन्म होतो. याच सृजन प्रकीयेचा उलगडा करण्याचा यशस्वी प्रयत्न किरण डोंगरदिवे यांनी या ग्रंथातून केला आहे. किरण डोंगरदिवे यांच्या स्वतःच्या अतिशय गाजलेल्या शबरी या कवितेच्या जन्मा मागील कथा काही प्रासंगिक कारणामुळे लिहून प्रसिद्ध झाली आणि कविता आली सामोरी या ग्रंथ निर्मितीचा पाया रचला गेला. शबरीच्या निर्मिती मागच्या कथा अनेकांना आवडल्यानंतर इतरही काही प्रसिद्ध कविता मागील कथा वाचकांपर्यंत पोहोचाव्यात हे वाटणे सहाजिकच आहे.
‘कविता आली सामोरी’ या लेखसंग्रहामध्ये कुंजविहारी यांची ‘भेटेन नऊ महिन्यांनी’, कवी विनायक यांची ‘हिरकणी’, लोककवी विठ्ठल वाघ यांची ‘तिफन’, नारायण मुरलीधर गुप्ते यांची ‘माझी कन्या’ राजकवी यशवंत दिनकर पेंढारकर यांची ‘आई’, वा. भा. पाठक यांची ‘खबरदार जर टाच मारून जाल पुढे’, कवी इंद्रजीत भालेराव यांची ‘बाप’, श्री. दि. ईनामदार यांची ‘ॠण’ प्रदीप निफाडकर यांची ‘माझी मुलगी’ आणि कवी किरण डोंगरदिवे ‘शबरी’ या निवडक दहा कवींची एक प्रसिद्ध कविता घेऊन तिच्या निर्मिती मागची प्रेरणा शोधण्याचा यशस्वी प्रयत्न किरण डोंगरदिवे यांनी केला आहे.
अतिशय गाजलेल्या या दहा कविता, त्यांच्या निर्मितीमागील कारणमीमांसा, कवींचे अनुभव , संबंधित कविता जन्मा वेळेस असणारी कवीची मनोवस्था याची सुंदर गुंफण वाचतांना ती कविता नव्याने उलगडतात. कविता आणि तिची निर्मिती प्रक्रिया वाचताना वाचकाला आगळीवेगळी अनुभुती मिळते आणि वाचक त्या काव्यनिर्मिती काळात आपसूकच विहार करुन येतो. इथे किरण डोंगरदिवे यांचा हा आगळावेगळा प्रयत्न यशस्वी होतो.
खरं तर किरण डोंगरदिवे हे स्वतः कवी आणि साहित्य, अभ्यासक आणि चिंतनशील समीक्षक आहेत. परंतु ते या लेखसंग्रहात समीक्षक म्हणून पुर्णतः अलिप्त राहतात आणि कवीच्या अनुभवाची जंत्री आपल्या समोर मांडतात. त्यामुळे या कविता आणि त्यांच्या निर्मितीमागील कथा, प्रेरणा कुठलाही अवजड, ओढून ताणून लावलेला अन्वयार्थ न लावता जशाच्या तशा वाचायला मिळतात.
किरण डोंगरदिवे यांची बात निकलेंगी ही लेख मालिका सध्या सर्वत्र गाजत आहे. किरण डोंगरदिवे यांची साहित्य सेवा कुठल्याही राजकारणाचा भाग न होता, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, न थकता नियमित सुरू आहे.
पुस्तकाचे नाव – कविता आली सामोरी
लेखक – किरण शिवहर डोंगरदिवे मोबा 7588565576
प्रकाशक – अक्षर प्रकाशन आजरा
पृष्ठ – 96 किंमत – 100 रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.