December 5, 2022
Research Needed on Rastrasant Tukdoji Maharaj Literature
Home » राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समग्र साहित्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे
काय चाललयं अवतीभवती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समग्र साहित्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे

घाटकुळ येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे थाटात उद्घाटन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समग्र साहित्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे – संमेलनाध्यक्ष डॉ. नामदेव कोकोडे

गीताचार्य श्रीतुकारामदादा साहित्य नगरी, घाटकुळ – मानवतेचे महान पुजारी, थोर तत्त्वचिंतक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समग्र साहित्यात राष्ट्रधर्म, मानवधर्म आणि विश्वधर्म पानोपानी दिसून येते. त्याच बरोबर ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि विशेषतः शोषितांच्या उत्थानासाठी त्यांचे विचार साहित्य असून यावर अधिक संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत संमेलनाध्यक्ष डॉ. नामदेव कोकोडे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रसंत साहित्य विचार परिषदेचे १८ वे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन आदर्श गाव घाटकुळ (ता. पोंभुर्णा जि. चंद्रपूर ) येथे श्रीगुरुदेव सेवा मंडळ आणि संपुर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. सदर दोन दिवसीय संमेलन चे अध्यक्ष म्हणून डॉ. कोकोडे बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सांस्कृतिक मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले . तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, स्वागताध्यक्ष विनोद देशमुख , माजी सभापती अलकाताई आत्राम, माजी जि.प.सदस्य राहुल संतोषवार, पोंभुर्णा नगराध्यक्ष सौ. सुलभाताई पिपरे, अजित मंगळगिरीवार, सभापती दीपक सातपुते , सरपंच सुप्रीम गद्येकार,भाऊ बराटे, एड.किरण पाल , प्रफुल्ल निमसरकार ,आरके गुरुजी , पोलिस पाटील अशोक पाल, उपसरपंच शितल पाल आदींची उपस्थिती होती.

राष्ट्रसंतांच्या विचारांचे अनुसरण व्हावे, गावोगावी व्यसनमुक्तीचा संकल्प व्हावा – ना. सुधीर मुनगंटीवार

राष्ट्रसंतांनी आपल्या खंजिरी भजनातून समाजाला जागृत केले. मनुष्य घडविणारा ग्रंथ ग्रामगीता असून त्यानुसार प्रत्येकाने कृती करावी हे, राष्ट्रसंतांना अपेक्षित आहे. राष्ट्रसंतांच्या सांगितलेली जीवनमूल्ये आत्मसात केली पाहिजे. त्या नुसार आचार आणि कृती ही महत्त्वाची असून गावागावात व्यसनमुक्तीचा संकल्प झाला पाहिजे. प्रत्येकाने प्रयत्नवादी झाले पाहिजे. उत्तम कर्माचा मार्ग प्रत्येकाने निवडला पाहिजे आणि राष्ट्रसंतांच्या विचार नुसार समाज घडला पाहिजे असे विचार त्यांनी मांडले .

डॉ. कोकोडे पुढे म्हणाले की, कर्मयोगी संत श्रीतुकारामदादा गीताचार्य यांनी अड्याळ टेकडी येथे ग्रामगीता प्रणित प्रयोगशाळा उभारली.त्यातून अनेक गावे घडली आहे,असे ते म्हणाले. माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी संमेलन समितीचे कौतुक करून या सातत्यपूर्ण उपक्रमास शुभेच्छा दिल्यात.

बंडोपंत बोढेकर म्हणाले, ग्रामगीतेच्या विचारानुरूप लोकसहभागातून तयार झालेली राजगड व घाटकुळ सारखी स्वच्छ-सुंदर गावे इतर गावांसाठी प्रेरक ठरली आहे. जनमनात परिवर्तन करण्याची क्षमता राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेत आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रसंत साहित्य दिंडीने ग्रामस्थ भारावले…

साहित्य दिंडीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून झाली. पालखीत राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेसमवेत गोवंश सुधार ग्रंथ, भगवद्गीता, श्री तुकारामगाथा, बुध्द आणि त्यांचा धम्म, ज्ञानेश्वरी, भारतीय संविधान आदी ग्रंथ ठेवण्यात आले होते. साहित्य दिंडीत शालेय विद्यार्थी, महिला, पुरूष तथा गाव परिसरातील अनेक भजन मंडळी सहभागी झाली होती.

उद्घाटन समारंभानंतर’ ‘गाव हा विश्वाचा नकाशा गावावरूनी देशाची परीक्षा ‘ या महत्त्वाच्या परिसंवादात डॉ. श्रावण बाणासुरे (बल्लारपूर), डॉ.मोहन कापगते (ब्रम्हपुरी), अरुण झगडकर ,पंढरीनाथ चंदनखेडे (पुणे) एड. सारिका जेणेकर (राजुरा) , श्रीकांत धोटे (गडचिरोली) यांनी समयोचित विचार मांडले. अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत अध्यासनाचे माजी अध्यक्ष डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे होते. सायंकाळच्या सत्रात सामुदायिक प्रार्थनेवर जहीर खान विचार व्यक्त केले. तर पहिल्या प्रबोधनपर संध्या भागात सुधाकर गेडेकर पाचगाव ,अनुराग मुळे, मुरलीधर चुनारकर, चेतन ठाकरे यांनी जनप्रबोधनपर एकपात्री प्रयोग सादर करून मनोरंजनातून प्रबोधन केले. त्यानंतर सुप्रसिद्ध युवा सप्तखंजेरीवादक उदयपाल महाराज वणीकर यांचा खंजेरी वादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. संमेलनाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष सुप्रसिध्द विनोदभाऊ देशमुख यांनी केले. संमेलनाचे एकंदरीत आयोजनासाठी परिषदेचे सरचिटणीस ऍड. राजेंद्र जेनेकर, रामकृष्ण चनकापुरे, रत्नाकर चौधरी, नामदेव पिजदूरकर, राम चौधरी ,मुकुंद हासे, अरुण मेदाडे ,काजल राळेगावकर, किशोर ठाकरे, ज्ञानेश्वर चौधरी, स्वप्निल बुटले जनहित युवा संघटना आणि मराठा युवक मंडळानी सहकार्य केले.

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे वार्षिक पुरस्कार वितरण

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्यावतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय विशेष पुरस्कार ना. मुनगंटीवार आणि संमेलनाध्यक्ष डॉ . कोकोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती पुरस्कार -आदर्श गाव घाटकुळ समिती यांना, कर्मयोगी संत श्रीतुकारामदादा गीताचार्य साहित्य पुरस्कार – डॉ. मोहन कापगते(ब्रम्हपुरी) यांना,
जगन्नाथ गावंडे स्मृती प्रबोधन पुरस्कार सप्तखंजेरी वादक उदयपाल महाराज वणीकर यांना, गंगाधरराव घोडमारे स्मृती सेवा पुरस्कार -सौ. सुषमा उगे यांना ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रचार पुरस्कार – माणिक सुखदेव मुन , टाकळी( जि. वर्धा) यांना, लटारी उगे स्मृती उत्कृष्ट झाडीपट्टी नाट्य कलावंत पुरस्कार – महेंद्र भिमटे विहीरगाव यांना, साने गुरुजी शिक्षक पुरस्कार अरुण झगडकर (गोंडपिपरी) यांना , प्रमोद केशव दशमुखे स्मृति तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार – रामकृष्ण चनकापुरे वढोली यांना , श्रीगुरुदेव गोरक्षक पुरस्कार सौ. ललिताबाई सेवादासजी खुणे आंधळी यांना , श्रीगुरुदेव श्रमश्री पुरस्कार अनिल चौधरी रामपूर यांना, श्रीगुरुदेव कृषी सेवा पुरस्कार – मधुकर नानाजी भेदोडकर सांगडी (तेलंगणा स्टेट) यांना, श्रीगुरुदेव भजन गायन पुरस्कार राजेंद्र पोईनकर यांना, पुरुषोत्तम पाटील हिरादेवे स्मृती श्रीगुरुदेव सद्भावना पुरस्कार श्री.चंदू पा. मारकवार (राजगड )यांना, प्रो. बबनराव डोहे स्मृती गुणवंत विद्यार्थी सन्मान -करण मेदाडे, आदित्य संजय झाडे यांना , सावित्रीबाई फुले आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार कु. साक्षी देशमुख यांना, श्रीगुरुदेव दाम्पत्य पुरस्कार सौ. श्यामलता विलास चौधरी पेंढरी यांना प्रदान करण्यात आले .

या कार्यक्रमात प्रा. रघुनाथ कडवे यांच्या राष्ट्रसंताची अभंगगाथा (इंग्रजी भाषांतर), सौ. प्रिती जगझाप यांच्या बालगीतांचा खजिना काव्यसंग्रह, विलास दशमुखे संपादित राष्ट्रसंत साहित्य पुरवणी, डोमाजी कापगते यांच्या विभूती काव्यसंग्रह आदी ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

Related posts

व्हिडिओः शोध काटेमुंढरीचा…

गेल्या अर्ध शतकात २२० भारतीय भाषा लुप्त…!

चांदोलीत निसर्ग पर्यटनास प्रारंभ या निमित्ताने अभयारण्याबाबत…

Leave a Comment