बिहारचे राज्यपाल या पदापेक्षा त्यांची वैचारिक उंची आणि ओळख कितीतरी मोठी आहे हे म्हणताना माझा उर भरून येत होता. त्यांनी मला दाद दिल्यावर त्यांना खाली वाकून नमस्कार करताना मला त्यांच्यामागे उभी असलेली ही सुधारणेची परंपरा दिसत होती….हा नमस्कार त्या धैर्याला आणि परंपरेला होता…
वसुंधरा काशीकर
वर्ष १९८५. घटस्फोटित मुस्लिम महिलांना पोटगी किंवा खावटी मिळावी म्हणून शाहबानो नावाची मुस्लिम स्त्री न्यायासाठी थेट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावते. सुप्रीम कोर्ट शाहबानोच्या बाजूनं निकाल देतं. पण मतपेटीच्या राजकारणात हा ऐतिहासिक निकाल फिरवला जातो. संसदेत असलेल्या आपल्या तीन-चतुर्थांशपेक्षा जास्त बहुमताने (पंतप्रधान राजीव गांधी तेव्हा ४०५ जागा घेऊन निवडून आले होते.) थेट सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलवला जातो.
हा निर्णय भारतीय समाजाचे, राजकारणाचे भवितव्य बदलवणारा असतोच पण त्यापेक्षाही जास्त देशातल्या अल्पसंख्याक स्त्रियांवर अन्याय करणारा, त्यांचे हक्क नाकारणारा असतो. या निर्णयाच्या विरोधात थेट कॉंग्रेसचे सदस्यत्व सोडण्याचं धैर्य एक माणूस दाखवतो…तो माणूस असतो ‘आदरणीय आरिफ मोहम्मद खान’…
माझ्या आयुष्यात मी हाताची बोटं जास्त होतील एवढ्याच मोजक्या व्यक्तींसाठी आदरणीय शब्द वापरला आहे. त्यात एक आदरणीय आरिफ मोहम्मद खानआहेत.
पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आयोजित केलेल्या पुणे लिटरेचर फेस्टिवलचं उद्घाटन बिहारचे राज्यपाल माननीय आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते होतं. कार्यक्रमाचं निवेदन माझ्याकडे होतं. माननीय राज्यपालांना भाषणाला आमंत्रित करण्यापूर्वी मला त्यांचा अगदी थोडक्यात परिचय करुन द्यायचा होता. दुर्दैवाने मी जे लिहिलं होतं त्यातलं फक्त मला अर्धचं बोलता आलं…आणि ते अर्धच राज्यपालांना इतकं आवडलं, इतकं आवडलं की, त्यांनी पोडियमपाशी बोलायला आल्यावर मला हात जोडून “आपने बहुत अच्छा परिचय दिया’’ अशी दाद दिली. मी त्यांना तिथेच ‘मैंने जो लिखा था वो पुरा नहीं पढ़ पायी’ असं म्हटलं तर ताबडतोब ओएसडीला माझं व्हिजिटिंग कार्ड घ्यायला लावून मला ओएसडीच्या नंबरवर पूर्ण परिचय व्हॉट्सअप करायला सांगितला. तुम्ही काय करता, कुठे राहता अशी पूर्ण चौकशी केली…एका निवेदकाला याहून काय हवं असतं…खरं सांगू आरिफ मोहम्मद खान यांच्याइतका कसून सज्जन माणूस मी बघितला नाही.
धर्म चिकित्सा आणि धर्मसुधारणा हे सर्वच समाजांसमोर आव्हान राहिले आहे. हजारो वर्षापूर्वी लिहिलेल्या धर्म ग्रंथांची नैतिक चौकट बदललेल्या वर्तमानात कशी लागू करायची? साहिर लुधियानवी म्हणतो,
ये पाप है क्या, ये पुण्य है क्या ? रितोंपर धर्म की मोहरें हैं,
हर युग में बदलते धर्मों को कैसे आदर्श बनाओगे…?
धर्मसुधारणांची हिंदूची पद्धत ही प्रक्षेप करत जायची आहे . वाल्मिकी रामायण पाचशेहून अधिक लेखकांनी काळानुसार, परिस्थिती नुसार बदलले. स्वामी दयानंद सरस्वतीनी वेदातूनच कालसुसंगत अर्थ काढण्यासाठी सत्यार्थ प्रकाश लिहिला. फुले आंबेडकरांनी जुन्या परंपरेचा विद्रोही अर्थ काढून सुधारणावादी विचार मांडला.
ख्रिश्चन समाजाने सुधारणेसाठी सेक्युलरिझमचा विचार मांडला. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्या अधिकाराचे वाटप केले . परमार्थ हा चर्चचा अधिकार – तर सर्वच ऐहिक बाबतीत कायदे करायचा अधिकार राजसत्तेकडे आला. यातून ख्रिश्चन धर्मात सुधारणा घडल्या.
इस्लाम मात्र या सर्वांपेक्षा वेगळा आहे. मुहम्मद पैगंबर हे शेवटचे प्रेषित, कुराण हा परमेश्वराचा अंतिम शब्द, ब्रह्म वाक्य अशी इस्लामची चिरेबंद घटना आहे. त्यामुळे सुधारणा करणे कठिण होते. मुस्लिम संस्कृतीत अतिशय लहान बीजरूपाने सुधारणेचा विचार ओटोमन साम्राज्यात दिसतो. तत्कालीन मदरश्यात अरिस्टॉटल (अरस्तू) आणि प्लेटो (अफलातून) हे विचारवंत शिकवले जाऊ लागले होते. पण आधुनिक काळात मात्र अहले हदिस , देवबंद, वहाबी अशा मूलतत्व वादी धार्मिक विचाराचे प्रस्थ इस्लाम मध्ये स्थापित झाले. कुराणचा अर्थ ठराविक चौकटीबाहेर काढणे हा भयंकर गुन्हा मानला जाऊ लागला.
इस्लाम मधील सुधारणेसाठी हमीद दलवाई यांनी आधुनिक सेक्युलरिझमचा मार्ग निवडला होता. कुराणात काहीही लिहिले असो, तलाक पोटगी विवाह इत्यादी वर्तमानातले विषय आजच्या आधुनिक संविधानाने सोडवले पाहिजेत असे हमीद दलवाई यांचे मत होते…असगर अली इंजिनिअर यांनी कुराणातूनच नवा आधुनिक अर्थ काढण्याचा प्रयत्न केला होता. मौलाना आझाद यांनी याच मार्गाचा अधिक सनातनी पाया घातला होता. इस्लामच्या चिरेबंदी रचनेमुळे या सर्व प्रयत्नाला मर्यादा आल्या.
आरिफ मोहम्मद खान यांनी या तिन्ही मार्गातील योग्य आणि काल सुसंगत असे निवडून, धर्म सुधारणेचा आणि चिकित्सेचा एक नवा अध्याय लिहिला. पुणे लिटरेचर फेस्टिवलमध्ये जेव्हा मी एक ‘धर्मचिकित्सक राजनेता’ असे विशेषण वापरले तेव्हा त्यांचे डोळे चमकले….एखाद्या माणसाच्या कामाचे अचूक नेमके विश्लेषण करता येणे हे महत्वाचे असते…
बिहारचे राज्यपाल या पदापेक्षा त्यांची वैचारिक उंची आणि ओळख कितीतरी मोठी आहे हे म्हणताना माझा उर भरून येत होता. त्यांनी मला दाद दिल्यावर त्यांना खाली वाकून नमस्कार करताना मला त्यांच्यामागे उभी असलेली ही सुधारणेची परंपरा दिसत होती….हा नमस्कार त्या धैर्याला आणि परंपरेला होता…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
