December 4, 2024
Why study Gita philosophy
Home » गीता तत्त्वज्ञान का अभ्यासायचे ? 
विश्वाचे आर्त

गीता तत्त्वज्ञान का अभ्यासायचे ? 

सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला ।
तेथ बेंबळ हातु गेला । गांडिवाचा ।। ९७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – सर्वांगावर काटा उभा राहिला आहे. माझ्या मनात अतिशय यातना होत आहेत आणि गांडीव धनुष्य धरावयाचा हात लुळा होऊन गेला आहे.

अनेकदा पांरगत नसणारा खेळाडूही मोठ्या फरकाने जिंकतो. तर पारंगत असणाऱ्या अष्टपैलू खेळाडूला लाजीरवाना पराभव पत्करावा लागतो. खेळामध्ये असे बऱ्याचदा घडते. अशक्य वाटणारी घटनाही येथे शक्य होते. हे असे कसे ? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. विजयी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मनाची स्थिती भक्कम असावी लागते. तुम्ही मनाने एखादी गोष्ट जिंकता तेंव्हाच ती तुम्ही प्रत्यक्ष विजयात साकारू शकता. सकारात्मक विचार ही विजयाची पहीली पायरी आहे. खेळ सुरू होण्यापूर्वीच तुम्ही मनाने तो जर खेळ जिंकला असाल तर तुमचा विजयाचा मार्ग सुकर होतो. दडपण आल्याने खेळाचा सर्व खेळखंडोबा होतो. विजयात अनेक अडथळे उभे राहातात. यासाठी कोणतीही कसोटी प्रथम मनाने जिंकायला हवी.

युद्धभूमीवर युद्ध न करण्याची मनस्थिती अर्जुनाची झाली आहे. आपल्या जीवनाच्या युद्धात असे प्रसंग बऱ्याचदा उभे राहात असतात. भेडसावणाऱ्या अडचणींनी मन अस्वस्थ झालेले असते. मनात भरलेले नैराश्य आपल्या जीवनात दुःखच दुःख भरत असते. अशा या कठीण प्रसंगांनी आपल्या अंगावर काटा उभा राहावा इतकी वाईट स्थिती झालेली असते. मनाला होणाऱ्या यातनांनी जगण्याची उमेदच गमावलेली असते. जीवनाचे हे युद्ध आपणाला नकोसे झालेले असते. अशा या प्रसंगात आपण आपणास सावरायला हवे. यातून बाहेर पडण्यासाठीच आपण गीता तत्त्वज्ञानाचा अभ्यास हा करायला हवा. जीवनात चढउतार हे येत असतात. म्हणून निराश होऊन टोकाची भूमिका घ्यायची नसते. जीवनाशी लढा देण्यासाठी उचललेला धनुष्य खाली ठेवायचा नसतो. त्याची तार ओढत राहून त्याला अधिक कार्यक्षम आणि लवचिक करायचे असते. तेंव्हाच त्या तारेवर लावलेल्या बाणाने अचुक ध्येय टिपता येते.

जीवनात येणाऱ्या कठीण प्रसंगावर मात कशी करायची हे गीता तत्त्वज्ञान शिकवते. जीवनाचे युद्ध का व कशासाठी व कसे लढायचे हे सुद्धा गीता तत्त्वज्ञान शिकवते. जीवनात शाश्वत आनंद कसा मिळवायचा अन् कसे अमर व्हायचे हे सुद्धा हेच तत्त्वज्ञान शिकवते. पण हे तत्त्वज्ञान शिकण्यासाठी मनाची योग्य स्थिती असावी लागते. कठीण प्रसंगात हे तत्त्वज्ञान निश्चितच अधिक प्रभावीपणे शिकले जाऊ शकते. ऐश्वर्यात जीवन जगणाऱ्याला हे तत्त्वज्ञान थोंताड वाटते कारण तो त्या मनस्थितीत नसतो. त्याचे ऐकूण हे तत्त्वज्ञान त्यागने योग्य नाही. या तत्त्वज्ञानाचा अनुभव घेऊन पटलं तर व्हयं म्हणायचे नाहीतर सोडून द्यायचे ही भूमिका घ्यायला हवी. मनाची योग्य स्थिती असेल तरच हे तत्त्वज्ञान समजते.

अर्जुनाच्या मनात युद्ध करण्याची इच्छा नाही. खेळायची इच्छाच नसेल तर चांगला खेळ कधीच होणार नाही. मनाची तयारी असेल तरच खेळ चांगला होऊ शकतो. अंगावर काटा उभा राहीला आहे इतकी भयान अवस्था त्याची झाली आहे. मनातील दुःख त्याला लढायला उभे होण्यापासून रोखते आहे. सर्व काही नको नकोसे वाटू लागले आहे. जीवनात गोडी वाटत नसेल तर जीवन कधीच आनंदी होणार नाही. जीवनाचा आनंद उपभोगायला हवा तरच ते जीवन सुख देते अन्यथा यातनाच यातना सहन कराव्या लागतात. अशाने शरीरावर मोठा परिणाम होतो. शरीर लुळ-पांगळ होते. संधीवातेसारख्या आजारात अशीच अवस्था होत असते. पण हा आजार मनातून आहे हे लक्षात घेऊन त्यावर उपचार करायला हवेत. मनाच्या आजारावर मनाचेचे औषध द्यायला हवे. गीतेचे तत्त्वज्ञान हे मानसिक आजारावरील महत्त्वाचे औषध आहे. यासाठीच हे तत्त्वज्ञान समजून घ्यायला हवे. यासाठीच याचा अभ्यास करायला हवा. धकाधकीच्या जीवनात उभ्या राहाणाऱ्या कठीण प्रसंगात गीता तत्त्वज्ञानच आपणाला तारू शकते. मनाच्या आजारावर मनाची प्रसन्नताच मात करू शकते यासाठी मनाची तयारी हवी. मनानेच हे युद्ध प्रथम जिंकायला हवे तेंव्हाच ते प्रत्यक्षात जिंकता येईल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading