July 27, 2024
plan for herbal cultivation under Employment Guarantee scheme
Home » रोहयो फळबागप्रमाणे वनौषधी लागवडीची हवी योजना
विश्वाचे आर्त

रोहयो फळबागप्रमाणे वनौषधी लागवडीची हवी योजना

वड, पिंपळापासून देशी वृक्षांच्या जातींचे संवर्धन हे व्हायला हवे. बोटॅनिकल सर्व्हे झाला. पण आता त्या सर्व्हेमध्ये नोंद असलेल्या वनस्पती, वृक्ष आता आढळतच नाहीत. अशी स्थिती आहे. ते दुर्मिळ झालेले सर्व वृक्ष या जागेमध्ये संवर्धित करायला हवेत. असे एखादे मॉडेल विकसित झाले तर निश्चितच जैवविविधता जोपासली जाऊ शकते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

निंब जिभे कडवटु । हिरडा पहिले तुरटु ।
तैसा कर्मा ऐल शेवटु । खणुवाळा होय ।।186 ।। ज्ञानेश्वरी अध्याय18 वा

ओवीचा अर्थ – प्रथम (कडू) निंब जिभेला (जसा) कडू लागतो व हिरडा पहिल्यांदा (जसा) तुरट लागतो. त्याप्रमाणें कर्माची आरंभाची बाजू त्रासदायक असते.

चांगल्या कर्मामध्ये अनेक अडचणी येतात. अनेक प्रश्न, समस्या उभ्या राहतात. म्हणून ते कर्म सोडायचे नसते. जिद्दीने ते कर्म स्वीकारायचे असते. कारण त्या कर्माचा शेवट हा गोड असतो. त्यातून होणारे उत्पन्न हे मनाला समाधान देणारे असते. निंब, हिरडा अशा अनेक वनौषधी आज दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. हे एक आव्हान आज नव्या पिढीसमोर आहे. झपाट्याने विकास व्हावा यासाठी औद्योगिकरणाला चालना दिली जात आहे. पण त्यासाठी वनांची तोड मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा या वनांमध्ये अनेक वनौषधींची जोपासना होत होती. नैसर्गिकरीत्या त्यांची वाढ होत होती. पण आता वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वनौषधींचे उपयोग माहीत नसल्याने आता त्यांची बेसुमार तोड होत आहे. जैवविविधता धोक्यात आली आहे.

प्रत्येकाला वाटते आपणच जैवविविधता का पाळायची? आम्हालाही विकास हवा आहे. आम्हालाही भरघोस पैसा हवा आहे. जैवविविधतेचा ठेका आम्हीच का घ्यायचा? असे म्हणून विकासासाठी जैवविविधतेवर कुऱ्हाड चालवली जात आहे. प्रत्येकाला विकासाची गती पकडायची आहे. गतीची मानसिकता भावीकाळात मोठे संकट उभे करणार आहे. याची जाणीवही त्यांना राहिलेली नाही. जैवविविधता जोपासण्यासाठी सरकार ठोस उपाययोजना करण्यात कमी पडत आहे. ग्रामीण जनतेची बदललेली मानसिकता विचारात घेऊन त्यांना विकासाचे मॉडेल देण्याचे गरजेचे आहे. केवळ जैवविविधता जोपासण्याचे डोस पाजून आता जैवविविधता जोपासता येणार नाही. तर ते जोपासण्यासाठी त्यांच्याही विकासाचे मॉडेल सरकारला द्यावे लागेल. कायदे करूनही जैवविविधता जोपासता येणार नाही. कायदा हा अडचणीचा ठरतो. गावांना वनराई, देवराई विकासासाठी वेगळे मॉडेल सरकारला करावे लागेल.

रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीची उत्तम योजना आखली गेली. तशी वनराई, देवराईच्या संवर्धनासाठी योजना आखायला हवी. प्रत्येक गावाला, शहरालाही वनराई, देवराईची सक्ती करायला हवी. रोजगार हमी योजनेतून याचे आदर्श मॉडेल तयार करायला हवे. दुर्मिळ होत चाललेल्या वनौषधी, दुर्मिळ होऊ लागलेल्या देशी वृक्षांच्या जाती यांचे संवर्धन करायला हवे. शहरातील बागांमध्ये यासाठी स्वतंत्र जागा हवी. तसेच प्रत्येक गावाला वनराई, देवराईची सक्ती हवी. प्रत्येक गावात पन्नास एकर जागा त्यासाठी राखीव असायला हवी. लोकसंख्येच्या प्रमाणात ही सक्ती केली जाऊ शकते. दहा हजार लोकसंख्येमागे पन्नास एकरांच्या वनराईची, देवराईची सक्ती झाल्यास हे सहज शक्य आहे. शहरासाठीही हाच नियम लागू करायला हवा. शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तितकी मोठी देवराईची सक्ती असायला हवी.

तेथे वड, पिंपळापासून देशी वृक्षांच्या जातींचे संवर्धन हे व्हायला हवे. बोटॅनिकल सर्व्हे झाला. पण आता त्या सर्व्हेमध्ये नोंद असलेल्या वनस्पती, वृक्ष आता आढळतच नाहीत. अशी स्थिती आहे. ते दुर्मिळ झालेले सर्व वृक्ष या जागेमध्ये संवर्धित करायला हवेत. असे एखादे मॉडेल विकसित झाले तर निश्चितच जैवविविधता जोपासली जाऊ शकते. नष्ट होत चाललेले वृक्ष तसेच पक्षीही येथे राहू शकतील. नैसर्गिकरीत्या यांचे संवर्धन कसे होईल यावर भर द्यायला हवा. विकासाच्या मॉडेलमध्येच याचा समावेश हवा. औषध कडू असते पण ते योग्य प्रकारे काम करते व आरोग्य सुधारते. तशी ही योजना राबवायला कडवट, अवघड वाटत असली तरी ती योग्यप्रकारे काम करेल ज्यामुळे जैवविविधतेचे संवर्धनास प्रोत्साहन मिळेल.

हिरडा चवीला तुरट असतो. पण त्याचा गुण गोड असतो. भूक वाढविणारे, पचनक्रिया सुधारणारे असे उत्तम गुण त्यात आहेत. हिरडा हा कोरड्या रुक्ष स्वभावाचा व उष्ण गुणाचा आहे. हिरड्याचे बी काढलेल्या टरफलास हिरडा फोल म्हणतात. हे हिरडा फोल, बेहडे दळ व आवळकाडीपासून त्रिफळाचूर्ण तयार केले जाते. शरीराची जाडी कमी करू इच्छिणाऱ्यांना हे चूर्ण उपयुक्त आहे. सध्या शहरामध्ये अति खाणे व कमी व्यायाम यामुळे जाडी वाढलेले अनेक गृहस्थ पाहायला मिळतात. त्यांना तर हे उपयुक्त आहे. असे फायदे सांगून या वनौषधींच्या संवर्धनासाठी त्यांना प्रोत्साहित करायला हवे. हिरडा त्वचाविकारावरही उपयुक्त आहे. हिरडा उकळून काढ्याचे तयार केलेलेअभयारिष्ट आव मूळव्याध, मळाचे खडे होणे इत्यादीवर उपयुक्त आहे.

अभयारिष्टमुळे भविष्यात होणारे अनेक गंभीर विकार टाळता येतात. विचारांमध्ये अडथळा आणणारी तंद्रा, जाड्य, मानसिक मूढ अवस्था याने दूर होते. अन्य कफाच्या विकारातही तो उपयुक्त आहे. पंडुरोग, यकृतरोग, प्लिहा उदररोग इत्यादीमध्ये निरोगी, देशी गाईच्या ताज्या मूत्राबरोबर हिरडा देतात. चुकीच्या आहारादीमुळे होणाऱ्या सर्व त्रासांवर त्वरित मुक्ततेसाठी भोजनोत्तर हिरडा घेतला जातो. रोज त्याचे सेवन केल्याने निरोगीपणा टिकून राहतो. डोळ्याची शक्ती वाढते. आयुष्याची वृद्धी होते. इतकेच नव्हे तर या वृक्षाच्या सावलीत विश्रांती घेणाऱ्या पशुपक्ष्यांनाही मलशुद्धीची प्रवृत्ती होते असे वर्णन अनेक ग्रंथात दिले आहे. अशा या गुणवंत वनौषधींचे संवर्धन व्हायला नको का?

निंब जिभेला कडू वाटतो पण त्याचेही गुण गोड आहेत. कडुनिंबावर कावळा, मैना, टिटवी, कोकिळा, शिंपीण, आयोरा, मॅगपाय, रॉबिन (दयाए), लालबुड्या, बुलबुल, मिनिव्हेट, शिंगचोच्या, हळद्या आदी पक्षी राहतात. कडुनिंबाचा वापर आता कीडनाशकात होऊ लागला आहे. सुमारे दोनशे जातींच्या कीटकांवर कडुनिंब परिणाम करतो. बटाटा, तंबाखू, कापूस, कोबी, तांदूळ, कॉफी, सोयाबीन अशा अनेक पिकांवर कडुनिंबाची फवारणी उपयुक्त ठरत आहे. या फवारणीमुळे कीड झटपट मरते. कीड्यांचे सुरवंट पतंगात रूपांतरित होत नाहीत. यामुळे त्यांची पुढची पिढीच जन्मत नाही. पुनरावृत्तीच थांबते. काही किडे कोषावस्थेत जातात व अपंग होऊन बाहेर पडतात. त्याचा पिकांना त्रास होत नाही. कडुनिंबात कीटकांना मारक ठरणारी ट्रायटर्पिनस, लिमोनॉइड्स, अ‍ॅझाडिरॅक्टिन, सॅलमिन, लिमोनॉइड ही द्रव्ये आहेत. नऊ प्रकारच्या ज्ञात लिमोनॉइडपैकी अ‍ॅझाडिरॅक्टिन, सॅलमिन, मेलिअ‍ॅन्टिऑलव निबिन ही सर्वात जास्त प्रभावी असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. याचा विचार करून तरी अशा वृक्षांची लागवड करायला हवी. शेतकऱ्यांनीच आता यासाठी पाऊल उचलायला हवीत.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

प्रगत शेतकरी

Saloni Art : असे रेखाटा बेडकाचे थ्रीडी चित्र…

महापुर नियंत्रणासाठी पारंपारिक अभ्यास अन् शास्रीय उपाय

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading