January 26, 2025
Sukrut Khandekar article on West Bengal Politics
Home » पश्चिम बंगालमध्ये अब्रूचे धिंडवडे…
सत्ता संघर्ष

पश्चिम बंगालमध्ये अब्रूचे धिंडवडे…

दहशतवाद, गुंडगिरी, महिलांवर अत्याचार, सामूहिक बलात्कार, गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा, तृणमूल काँग्रेसच्या विरोधात काम करणाऱ्यांवर हल्ले नि हत्या अशा असंख्य घटनांची मालिका चव्हाट्यावर आल्यामुळे मुख्यमंत्री ममतादीदींच्या पश्चिम बंगालमध्ये कायद्याचे राज्य आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या गुंडांच्या टोळ्यांनी सर्वत्र हैदोस घातला असून महिला मुख्यमंत्री असलेल्या राज्यात महिलाच सुरक्षित नाहीत, असे चित्र दिसू लागले आहे. घराघरांत रात्री-अपरात्री घुसून तृणमूल काँग्रेसच्या टोळ्या महिलांना खेचून बाहेर काढतात व त्यांचा उपभोग घेऊन सकाळी त्यांना परत पाठवतात असे सांगणाऱ्या पीडित महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत. जवळपास शंभर-सव्वाशे पीडित महिलांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडल्याने पश्चिम बंगालच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत.

नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यांतील बशीरहट उपविभागात शेख शहाजहाँ या तृणमूल काँग्रेसच्या दादाने व त्याच्या माफिया टोळीने दहशतवादाच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. शेख शहाजहाँ हा संदेशखालीचा डॉन म्हणून ओळखला जातो. उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर त्याला अटक करायला पोलिसांना ५५ दिवस लागले. त्याच्या पाठीशी पोलीस व प्रशासन कसे उभे आहे व त्याला अटकेपासून कसे वाचवले जात होते, हे त्याचे एक उदाहरण आहे. नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यातील मिनाखा भागात एका गेस्ट हाऊसवर त्याला पोलिसांनी अटक केल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात तोच वरून दबाव आल्यामुळे स्वत: पोलिसांच्या स्वाधिन झाला अशी दुसरी बाजू आहे.

पोलिसांच्या ताब्यात आल्यावर पोलीस त्याला हात लावू शकत नाहीत उलट तोच पोलिसांना सूचना देत असतानाचे व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. माफिया डॉन शेख शहाजहाँ हा कोर्टात हजर होताना पुढे चालत आहे व पोलीस त्याच्या मागून चालत आहेत, ते त्याला बकोटीला धरून का नेत नाहीत? किंवा त्याच्या मुसक्या बांधण्याची हिम्मत पोलीस का दाखवू शकले नाहीत. जणू काही पोलीस हे त्याचे बॉडी गार्ड आहेत अशा मस्तीत व मग्रुरीत तो चालताना व्हीडिओत दिसतो आहे.

ममता बॅनर्जींच्या सरकारचे त्याला संरक्षण आहे व त्याच्या ताब्यात असलेली व्होट बँक तृणमूल काँग्रेसला गरजेची आहे. म्हणूनच शेख शहाजहाँसारखे डॉन तृणमूल काँग्रेसमध्ये पोसले जात आहेत.
आपल्याला अटक होऊ नये म्हणून शेख शहाजहाँने कोर्टात याचिका केली होती, पण कोर्टाने ती फेटाळून लावली. त्याच्या विरोधात ४२ गुन्हे नोंदवलेले आहेत, आम्हाला त्याच्याविषयी सहानुभूती नाही, असे कोर्टाने म्हटले.

पश्चिम बंगालमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधून गहू व तांदळाचे वाटप होते. हे धान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही, तर तेच धान्य जास्त भावाने खुल्या बाजारात विकले जाते. दहा हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. त्यात तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांची नावे गुंतली आहेत, त्यात शेख शहाजहाँ याचे नाव आहे. ईडीने चौकशीचे काम सुरू केले आहे. ईडीने नॉर्थ २४ परगणामधील त्याच्या घरावर छापा मारला, तेव्हा शेख शहाजहाँ फरार झाला. ईडीच्या पथकावर त्याच्या टोळीतील लोकांनी हल्ला चढवला. त्यात ईडीचे अनेक अधिकारी जखमी झाले, त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले.

ईडीच्या पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर संदेशखालीमधील काही महिलांनी शेख शहाजहाँ व त्याच्या टोळीतील शिबू हाजरा व उत्तम सरकार यांच्यावर लैंगिक शोषण करीत असल्याचा आरोप केला. खरे तर या महिलांनी डॉन व त्याच्या टोळीवर असे आरोप करताना मोठे धाडस दाखवले. संदेशखालीमधील महिलांना विशेषत: सुंदर तरुणींना शेख शहाजहाँ व त्याच्या टोळीचे लोक रात्री-अपरात्री घरात घुसून हाताला धरून ओढून घेऊन जातात. त्यांना रात्रभर मनोरंजनासाठी ठेवतात व सकाळी परत पाठवतात, असे या महिला उघडपणे बोलत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात काही काम आहे असे सांगून त्यांना जबरदस्तीने खेचून नेले जाते. गेले कित्येक महिने-वर्ष अशी जबरदस्ती चालू आहे. कलकत्ता हायकोर्टाने तर शेख शहाजहाँला पोलीस, ईडी किंवा सीबीआय कोणीही अटक करू शकते, असे म्हटले. त्यानंतर पोलिसांनी डॉनला रात्री एका गेस्ट हाऊसवर अटक केल्याचे दाखवले.

डॉनच्या पुढे पोलीस एवढे लाचार झाले आहेत की, त्याच्यावर अकरा गुन्हे दाखल केले. पण त्यात बलात्काराचा एकही गुन्हा नोंदवलेला नाही. त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवला आहे. जवळ धारदार शस्त्र बाळगणे, हत्येचा प्रयत्न करणे, जाणूनबुजून बेकायदा सभा घेणे, लोकांची अडवणूक करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, जबरदस्तीने खेचून आणलेल्या व्यक्तीला बंधक म्हणून ठेवणे, दुसऱ्याचे आर्थिक नुकसान करणे, अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास जबरदस्तीने भाग पाडणे, दुसऱ्याला धमकावणे अशा आरोपांखाली पोलिसांनी शेख शहाजहाँवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याच्यावर गुन्हे दाखल करताना पोलिसांनाच त्याची भीती वाटते का, अशी पोलिसांची मिळमिळीत कारवाई आहे. शेखच्या विरोधात पोलिसांकडे कोणी तक्रार करायला जात नाही, कुणी गेले तर पोलीस त्याची तक्रार नोंदवूनच घेत नाहीत. त्यामुळे पश्चिम बंगाल पोलिसांना या डॉन टोळीच्या विरोधात स्वत: फिर्यादी बनावे लागेल, पण तसे झाले तरी तृणमूल काँग्रेसच्या दडपणाखाली वावरणाऱ्या पोलीस यंत्रणेवर विश्वास तरी कसा ठेवणार?

ममता बॅनर्जीं राज्याच्या मुख्यमंत्री झाल्यापासून शेख शहाजहाँची दादागिरी वाढली. आपल्याला कोणी अडवू शकत नाही, संदेशखालीमध्ये आपण म्हणू तेच व तसेच घडणार अशा अहंकारात तो वागत राहिला. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना यातले काहीच ठाऊक नाही असे कसे म्हणता येईल? सरकारचे संरक्षक कवच असल्यामुळेच पोलीस त्याच्याविरोधात कारवाई करायला धजावत नाहीत. शेख शहाजहाँ हा पूर्वी एका वीटभट्टीवर काम करीत होता. त्यावेळीही त्याची गुंडगिरी चालू होतीच. पण मोठी गुंडागर्दी करण्यासाठीच तो राजकारणात आला. सन २००४ मध्ये त्यावेळच्या सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात तो सामील झाला. सीपीआयएममध्ये प्रवेश करताना त्याला त्याच्या मामाची मदत झाली होती. त्याचा मामा हा सीपीआयएममध्ये होताच. पण त्यावेळी एका पंचायतीचा प्रमुख होता.

पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडीचे सरकार पाडून ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या, तेव्हा शेख शाहजहाँ तृणमूल काँग्रेसमध्ये आला व पक्षाचे महासचिव मुकुल रॉय व नॉर्थ २४ परगणा जिल्ह्याचे तृणमूलचे अध्यक्ष ज्योतिप्रीय मलिक यांच्या संपर्कात आला. तेव्हापासून त्याची माफियागिरी वाढत राहिली. राजकीय संरक्षण मिळाल्याने त्याने गोरगरिबांच्या जमिनी हडप करण्याचा उद्योग सुरू केला. सुरुवातीला छोट्या शेतकऱ्यांकडून भाड्याने जमीन घेत असे, काही महिने तो जे ठरवेल ते भाडे नियमित देत असे, नंतर भाडे देणे बंद करीत असे. शेतकऱ्याने भाडे मागितले की त्याची पिटाई होत असे. जमिनीवर मस्य शेती करण्यासाठी जमीन भाड्याने मागायची. दिली नाही, तर त्या जमिनीवर खुदाई करून त्यावर खारे पाणी तो ओतून टाकायचा. खाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्याला ती जमीन त्याला देणे भाग पडत असे. अशी लूट त्याने शेकडो शेतकऱ्यांची केली असावी.

शेख शहाजहाँ हा पश्चिम बंगाल सीआयडी पोलिसांच्या ताब्यात होता. कोर्टाच्या आदेशानुसार त्याला सीबीआयच्या ताब्यात देणे नंतर भाग पडले. संदेशखालीपासून ८५ कि. मी. अंतरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेला डोक्यावर पदर न घेता शंभर-सव्वाशे पीडित महिला पोहोचल्या होत्या, त्यांनी बेडरपणे आपल्यावर झालेल्या अत्याचाराच्या कहाण्या सांगितल्या. नंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या, पंतप्रधानांच्या सभेला गेलेल्या महिला या पश्चिम बंगालमधील नव्हत्या. भाजपाने त्यांना दुसरीकडून आणून उभे केले होते.

ममतादीदींनी मुख्यमंत्रीपदाची हॅटट्रिक केली ती महिला व मुस्लीम मतदारांच्या व्होट बँकेवर. राज्यातील महिला व मुस्लीम यांचा ममता यांच्यावर मोठा विश्वास आहे. पण संदेशखालीतील घटनांनी महिला व्होट बँकेला छेद गेला आहे. संदेशखालीतील महिला रस्त्यावर उतरल्या नसत्या व ईडीचे पथक डॉनच्या घरी पोहोचले नसते, तर महिलांवरील अत्याचाराच्या मालिका अशाच चालू राहिल्या असत्या. तृणमूलचे कार्यकर्तेच आपल्यावर लैंगिक अत्याचार करतात, असे महिला सांगू लागल्या, तिथेच पश्चिम बंगालच्या अब्रूचे धिंडवडे निघाले. दर्द का जबाब व्होट से देना, असे पंतप्रधान
नरेंद्र मोदींनी बंगालमधील महिलांना आवाहन केले आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading