शब्दाचे सामर्थ्य केवळ त्याच्या स्वरूपातून, शब्दत्वामधून व्यक्त होत नाही. त्याचे सामर्थ्य अर्थाच्या सहकार्यातून निर्माण होते. शब्द सकस बनतो तो आशयघन, कसदार गाभ्यामुळे होय. म्हणून शब्दांची पोकळ बडबड ही अर्थहीन ठरते, अस्सल अनुभव व सच्चे ज्ञान यास तुकारामांनी महत्त्व दिले.
डॉ. लीला पाटील
वांझेने दाविले गऱ्हवार लक्षण। चिर गुटे घालून वाचयाला ।। १ ।।
तेची शब्दज्ञानी करिती चावटी। ज्ञानपोटासाठी विकुनिया ।।२।।
बोलाचीच कडी बोलाचाच भात। जेवुनिया तृप्त कोण जाला ।।३।।
कागदी लिहता नामाची साकर। चाटिता मधुर गोड नेदी ।।४ ।।
तुका म्हणे जळो जळो ते महंती। नाही लाज चित्ती निसुगाला ।।५।।
वांझ स्नीने पोटावर चिरगुटे बांधून गरोदरपणाचे सोंग घेतले. समाजात ती तशा स्थितीत मिरवते. खोटे डोहाळे लागल्याचे सोंग घेते. हा खोटेपणा झाकून राहणार कसा ? ती समाजात हास्यास्पद ठरते. कारण गरोदरपण, डोहाळे याचे खोटेपण झाकून कसे राहणार ? गर्भाचा आवडी मातेचा डोहाळा । तेथीचा जिव्हाळा तिथे बिबे ।।’ या विचाराचा विसर पडलेल्या स्त्रीस गर्भाच्या आवडीने मातेला खरे डोहाळे लागणं, नऊ महिने गर्भात जीव ओतून सांभाळ करणं आणि गर्भारपणातील निखळ मातृत्व भावना जोपासणं हा अनुभव कसा घेता येणार ?
व्यवहारातल्या या उदाहरणाच्या आधारे तुकाराम महाराज यांनी शब्द ज्ञानी मनुष्य आपण ज्ञानी असल्याचा आव आणतो. पण त्यामुळे तो समाजात हास्यास्पद होतो, याकडे लक्ष वेधले. फक्त शब्दांचा खेळ आणि त्याचा पोकळपणा हा सुजाण श्रोत्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार कसा? ज्ञानाची खोली आणि तत्त्वज्ञानाच्या आधारे यातूनच शब्दांना वजन येते. नुसते शब्द म्हणजे पाण्यावरचे बुडबुडे, शब्दातून ज्ञान, आशय, विषय व्यक्त होणे जरूरीचे आहे. तरच ते मार्गदर्शक, प्रबोधनात्मक आणि परिवर्तनवादी ठरतात. शब्दामधून व्यक्त केलेल्या भाव-भावना ऐकणाऱ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचणं, मनावर बिंबवणं आणि मेंदूमध्ये रुजणं घडायचं असेल तर खरोखर ज्ञानी होणे गरजेचे आहे.
नुसती वाचाळता ही हास्यास्पद ठरते. ज्ञानीपणाचा खोटा आव आणि दिखावा, त्या माणसाचे पितळ उघडे करण्यास फारसा वेळ लागत नाही. शब्द अत्यंत सामर्थ्यशाली असतो हे मान्य आहे. पण शब्दाचे सामर्थ्य केवळ त्याच्या स्वरूपातून, शब्दत्वामधून व्यक्त होत नाही. त्याचे सामर्थ्य अर्थाच्या सहकार्यातून निर्माण होते. शब्द सकस बनतो तो आशयघन, कसदार गाभ्यामुळे होय. म्हणून शब्दांची पोकळ बडबड ही अर्थहीन ठरते, अस्सल अनुभव व सच्चे ज्ञान यास तुकारामांनी महत्त्व दिले.
खोटे कीर्तनकार, भोदू प्रवचनकार आणि वाचाळ पोथी पुराण सांगणारे हे पोकळ शब्द अर्थहीन बडबड करतात ज्ञान या नावाखाली शब्द विकून पैसे मिळवितात. स्वतःला ज्ञानी म्हणवून घेताना त्यांना मोठे सुख वाटत असेल? पण खोटेपणाचा मुखवटा किती काळ टिकणार? वांझ स्त्रीने केवळ गरोदर असल्याचे नव्हे तर बाळंत झाल्याचे सोंग करावे तशी स्थिती अनुभव नसलेल्या शब्द ज्ञान्याची असते वंध्यत्व स्त्रीचे खरे रूप झाकता येत नाही. अखेरीस वांझपण हेच तिचे वास्तव असते. कारण पोटात बीजांकूर नसतो, डोहाळे लागत नाहीत प्रत्यक्षात तिच्या स्तनात दूध नसते.
त्याचप्रमाणे शब्दज्ञानी लोक आपले ज्ञान पोटासाठी विकून चावटपणा करतात. शाब्दिक कोट्या करून लोकांना फसवतात शब्दाचीच कढी आणि शब्दाचाच भात असे जेवण पोट भरणारे ठरेल? असे अन्न खाऊन कोण तुप्त होईल? कागदावर साखर असा शब्द लिहून चाटला असता तो शब्द काही मधूर चव देत नाही. या शब्दज्ञानी माणसांची महती जळो मोठेपण तर जळोच जळो या मुर्दाडाच्या मनात लाजलज्जा नाही. पण त्यांच्यापासून सावध राहण्याचा जणू इशारा या अभंगामध्ये दिला आहे.
आपल्या समाजात आजही शब्दांचे बुडबुडे आणि शाब्दिक फुगवटे यांचा आधार घेऊन काहींचा साहित्यिक म्हणून गाजावाजा होत आहे. प्रसिद्धी व पैसा या आधारे प्रतिष्ठा मिळविण्याचा खटाटोप होत आहे. ज्येष्ठ विचारवंत, प्रसिद्ध साहित्यिक, प्रथितयश लेखक अशासारखा उपाध्या आपल्या नावापुढे कशा लागतील याचे तंत्र त्यांना साधले आहे. कारण पैसा टाकून अवती भवती ते तंत्र जाणणारी मंडळी पाळता येतात. हे ओळखून त्यांचा हा गाजावाजा ढोलताशाने होत आहे. ‘मॅनेज करणं’ हा एक प्रकारही रूळला आहे, ज्यामुळे ते साहित्यिक पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. साखरेची गोडी नुसती अनुभवता येत नाही, हे तुकारामांचे तत्त्वज्ञान या मंडळींना निखल साखर मिळवता येत नाही. पण शुगर फ्री गोळ्याच गोड मानून घ्याव्या लागतात. मग जेवण न करता उगाच कुंथून ढेकर दिल्यामुळे शरीराचे पोषण होत नाही. उलट शरीराच्या कष्टी व मलीन रूपाचे प्रदर्शन घडते हे वाचाळांनी, ऐका अनुभव न घेता उगाचच बडबडू नका. अनुभवाविना शब्द उतरवू नका. तुकारामांच्या लेखी अस्सल अनुभवाला खरे महत्त्व होते. सच्च्या शब्दाला किंमत असते. ज्ञानाशिवाय शब्द पोकळ असतात ही तुकारामांची नीती लक्षात घेणेही काळाची गरज आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.