वर्ल्ड फॉर नेचर संस्थेच्यावतीने सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील वाड्यावस्त्या धनगरवाडे, शाळा, महाविद्यालयामध्ये वन्य प्राण्यांच्याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. निसर्गाचे संवर्धन आणि त्याची गरज याचे महत्त्व स्थानिकांनाच पटवून दिल्यास वनांचे संवर्धन होण्यास मदत होऊ शकते. तसेच तेथील जैवविविधता जोपासण्यासाठी मदत होऊ शकते. त्यांच्या या कार्याविषयी…
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
अस्वल, गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, बिबट्याचा दुचाकी स्वारावर हल्ला, कोल्ह्याच्या चाव्याने शाळकरी मुलाला रेबिज, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू या घटना आता नेहमीच घडताना दिसत आहेत. कोकण अन् कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर हत्तीचा प्रवास तर नित्याचाच झाला आहे. वानर, माकडांपासून नुकसान हे सुद्धा ठरलेले आहे. अशा परिस्थितीत पश्चिम घाटमाथ्यावरील वाड्यावस्त्यात वन्य प्राण्यांबाबत जनजागृती होणे हे गरजेचे आहे. काही पर्यावरण प्रेमी याबाबत कार्य करत आहेत. वाड्या वस्त्यांवर जाऊन जनतेला जैवविविधतेचे महत्त्व अन् वन्य प्राण्याचे महत्त्व पटवून देत आहेत. जंगलांचे संवर्धन अन् वन्य प्राण्यांपासून संरक्षण कसे करायचे याबाबत जागृतीचा वसाच वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेने घेतला आहे.
वर्ल्ड फॉर नेचर संस्थेच्यावतीने सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील वाड्यावस्त्या धनगरवाडे, शाळा, महाविद्यालयामध्ये वन्य प्राण्यांच्याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. निसर्गाचे संवर्धन आणि त्याची गरज याचे महत्त्व स्थानिकांनाच पटवून दिल्यास वनांचे संवर्धन होण्यास मदत होऊ शकते. तसेच तेथील जैवविविधता जोपासण्यासाठी मदत होऊ शकते. या उद्देशाने प्रेरित होऊन पश्चिम घाटातील वाड्यावस्त्या, दुर्गम भागात जाऊन वर्ड फॉर नेचर ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुभम पांडे, राज्य अध्यक्ष अभिजीत वाघमोडे, श्रेयस पट्टणशेट्टी, अनुप शेलार, जोतिबा जोशीलकर, उत्तम कोकितकर, साताप्पा गुरव, आंनद देसाई, वैशाली लोहार हे यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
खरेतर निसर्गाचे संवर्धन व वन्यजीवांचे जतन ही आज काळाची गरज बनलेली आहे. आपण निसर्गाला व वन्यजीवांना जपले तर निसर्ग अबाधित राहून आपल्याला जपेल. याच मुख्य उद्देशाने “वर्ल्ड फॉर नेचर” ही संस्था प्रामुख्याने वन्यजीव संरक्षण व समाजात निसर्ग संवर्धनासाठी, वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत आहे. शालेय विद्यार्थ्यांना निसर्ग, वन्यजीव व जैवविविधतेची ओळख व्हावी व त्यांच्या मनात निसर्गाविषयी आपुलकी निर्माण व्हावी यासाठी संस्थेने कार्यशाळा घेतल्या आहेत.
पश्चिम घाटातील दुर्गम भागात अद्यापही वन्य प्राण्यांबाबत अंधश्रद्धा जोपासली जाते. साप चावला किंवा अन्य वन्य प्राण्यांने चाव घेतल्यास काय करायला हवे याबाबत बरेचसे अज्ञान असलेले पाहायला मिळते. यासाठी या भागातील जनतेचे प्रबोधन होणे हे गरजेचे आहे. अंधश्रद्धेमुळे व वेळेवर उपचार न झाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. स्थानिक गावठी उपचार करण्यात वेळ घालवल्यानेही प्राण जाण्याचा धोका असतो. यासाठी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करणे गरजेचे आहे. त्यावर वेळीच उपचार होणे आवश्यक आहेत. याबाबत जागृती व्हावी या उद्देशाने ही संस्था कार्य करत आहे. साप, कोल्हा, गवा, अस्वल, बिबट्या, माकड, वानर हे नियमित आढळणारे वन्य प्राणी नागरी वस्तीकडे का येतात. ते कसे वागतात. त्यांचा स्वभाव कसा असतो. ते हल्ला करू नयेत म्हणून कोणती काळजी घ्यायला हवी. याबाबत या कार्यशाळेत प्रबोधन केले जाते. जनता सजग झाली तर हल्ले टळतील अन् वन्य प्राणीही मारले जाणार नाहीत हा मुख्य उद्देश यामागे आहे.
वन्य प्राणी मोठ्या आवाजाला घाबरतात व नागरी वस्तीतून दूर जातात. यासाठी आवाज होईल व वन्यप्राणी पळून जातील अशी कृती करायला हवी. गव्यासारखे काही वन्य प्राणी इतर प्राण्यांच्या आवाजालाही घाबरतात. यासाठी विविध प्राण्यांचे आवाज ध्वनीमुद्रित करून ठेवून त्याचा वापर या वन्य प्राण्यांना नागरी वस्तीपासून दूर लोटण्यासाठी करायला हवा. कुत्र्याच्या आवाजालाही बरेच प्राणी घाबरतात. यासाठी कुत्र्याचा ध्वनीमुद्रित केलेला आवाज मोठ्याने लावल्यास हे वन्य प्राणी दुर जाऊ शकतात. अशा विविध उपाययोजना करायला हव्यात. वन्य प्राण्यांना इजा करून किंवा मारून वन्य प्राणी दुर जात नाहीत. उलट यात वन्य प्राण्यांचा मृत्यू होण्याचा धोका असतो. किंवा हे प्राणी पिसाळण्याचाही वा हल्ला करण्याचा धोका अधिक असतो.
हे वन्य प्राणी का आवश्यक आहेत ? त्यांचे महत्त्व काय आहे ?. याबाबतही संस्थेतर्फे प्रबोधन करण्यात येते. सामाजिक बांधिलकीतून निसर्गाप्रती व वन्यजीवांप्रती सेवाभाव म्हणून या आपल्या जीवाभावाच्या माणसांना जपणे हेच वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे आद्यकर्तव्य आहे. यासाठी या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यंदाच्या वर्षी वन्य सप्ताह अंतर्गत या संस्थेने चंदगड तालुक्यातील बांद्राई धनगरवाड्यावर व भुदरगड तालुक्यातील मेघोली पैकी धनगरवाड्यावर अबालवृद्धांसह १०० गावकऱ्यांना सर्पजागृती व वन्यजीवांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना या महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले. सह्याद्री विद्यालय हेरे व श्रीराम विद्यालय कोवाड, याठिकाणी २०० विद्यार्थ्यांसाठी सर्प जनजागृती कार्यशाळा घेतली. जयप्रकाश विद्यालय किणी येथे २०० विद्यार्थी व गावातील लोकांसाठी “जैवसाखळी व वन्यजीवांची भूमिका” या विषयावर, श्री व्ही. के. सी. पी. विद्यालय कागणी, मराठी विद्या मंदिर कागणी, मराठी विद्यामंदीर राजगोळी बुद्रुक, श्री दत्त हायस्कूल राजगोळी बुद्रुक या चार शाळांमधील ४०० विद्यार्थ्यांसाठी सर्प जनजागृती कार्यशाळा व वन्यजीव संरक्षण प्रबोधन कार्यक्रम घेतले आहेत.
भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव, शंकर चक्रू पाटील हायस्कूल, दिंडेवाडी, रांगणा पब्लिक स्कूल कडगाव या तीन शाळांमधील ३०० विद्यार्थ्यांसाठी व आजरा तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा गवसे, विद्यामंदिर देवर्डे व पंडित दिनदयाळ हायस्कूल आजरा या तीन शाळांमधील ४०० विद्यार्थ्यांसाठी सर्पजनजागृती कार्यशाळा व वन्यजीव संरक्षण प्रबोधन कार्यक्रम घेतला आहे.
विद्यार्थ्यात याबाबत जागृती झाल्यास गावात साप मारले जाणार नाहीत. विषारी व बिनविषारी साप कोणते ते कसे ओळखायचे याबाबतची माहिती देऊन विद्यार्थ्यांना याबाबत सजग केले जाते. कोल्हापूरच्या पश्चिम घाटमाथ्यावर मुख्यतः किंग कोब्रा, नाग, घोणस, फुणसे, मण्यार हे विषारी साप आढळतात तर धामीण, तस्कर आदी बिनविषारी साप आढळतात. पण साप चावल्यास तातडीने आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यायला हवेत यासाठी आवश्यक असणारी औषधे याचीही माहिती या कार्यशाळेतून देण्यात येते. यातून विद्यार्थ्यात जागृती होऊन वन्य प्राण्यांसह माणसांचेही प्राण वाचू शकणार आहेत. साप वाचले तर आपले अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांची संख्या नियंत्रणात राहील. साहजिकच आपले नुकसान टाळले जाईल. या अन्नसाखळीचे महत्त्व ग्रामीण जनतेला पटवून देऊन त्यांच्यात या प्राण्यांच्या बाबत विश्वास निर्माण करण्याचे काम ही संस्था करते आहे. त्यांचे हे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे.
वानरे, माकडे ही सध्या नागरीवस्तीत येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. बागायती चेही मोठे नुकसान होऊ लागले आहे. यासाठी हे वन्यप्राणी नागरीवस्तीत येऊ नयेत म्हणून जंगलात या प्राण्यांसाठी खाद्य निर्मिती, पाणवठ्यांच्या सुविधा होण्याची गरज आहे. यादृष्टीनेही प्रयत्न होणे गरजेचे आहे. या कामातही आता पुढाकार घ्यायला हवा. वनांचे संवर्धन म्हणजेच वन्य प्राण्यांचे संवर्धन आहे. यासाठी वनांची काळजी घ्यायला हवी. येथे वाड्या वस्त्यात राहणाऱ्यांना याबाबत जागरूक करून त्यांना यावरच आधारित रोजगारांची निर्मिती केल्यास दोन्हीही गोष्टी साध्य होतील. यादृष्टीने आता प्रयत्न होणे गरजेचे आहे. मध निर्मिती असो, वा औषधी वनस्पती असो., तेंदुपत्ता असो, असे वनावर आधारित रोजगार उभे राहाणे गरजेचे आहे. सरकारने याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात सध्यस्थितीत पक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. कीडनाशकांचा वापर अन् कमी होत चालेलेली वृक्षसंपदा अन् मोठ्या प्रमाणात होत असलेली परदेशी वृक्षांची लागवड ही यास कारणीभूत आहे. परदेशी वृक्षावर देशी पक्षी क्वचितच त्यांची घरटी बांधतात. यासाठी देशी वृक्षसंपदा वाढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी आता वर्ल्ड फॉर नेचर सारख्या संस्थांचे जाळे आता देशभर उभे राहणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धनासाठी खऱ्या अर्थाने कार्य होण्यासाठी जनजागृती अन् प्रत्यक्ष संवर्धनाची कृती अशा दोन्ही पातळ्यावर काम करण्याची गरज आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.