December 7, 2023
Book Review on Sanjay Choudhari Poetry by Kiran Dongardive
Home » सर्वसामान्यांच्या जगण्याची धग प्रतिबिंबित करणाऱ्या आतल्या विस्तवाच्या कविता
मुक्त संवाद

सर्वसामान्यांच्या जगण्याची धग प्रतिबिंबित करणाऱ्या आतल्या विस्तवाच्या कविता

खरे तर “आतल्या विस्तवाच्या कविता” या संग्रहातील प्रत्येक कवितेवर भाष्य करण्याचा मोह टाळता येत नाही. इतक्या सुंदर आणि आशयघन अशा या कविता आहेत. कवितेची पारंपरिक धाटणी आणि मांडणी संजय चौधरी यांनी कधीच नाकारली आहे. त्यांची स्वतःची एक वेगळी शैली त्यांनी अंगीकारली असून नेमक्या शब्दात आपली संवेदना मांडून मनाचा ठाव घ्यायचा हा त्यांचा विशेष गुण आहेत जो संजय चौधरींच्या ‘ माझं इवलं हस्ताक्षर’, ‘कविताच माझी कबर’, आणि आता ‘आतल्या विस्तवाच्या कविता’ या संग्रहामध्ये दिसून येतो.

– किरण शिवहर डोंगरदिवे,
मेहकर, बुलढाणा. मोबाईल – 7588565576

संजय चौधरी यांचा “आतल्या विस्तवाच्या कविता” हा कवितासंग्रह समकालीन जीवनातील वेगवेगळ्या परिघाला अकरा आयामातून स्पर्श करतो. संजय चौधरी हे वर्तमानावर आपली नाममुद्रा उमटवणाऱ्या कवीपैकी एक आहेत. अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेत आणि कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय देऊन जाणारी कविता म्हणजे संजय चौधरी यांची कविता होय. “बाजाराच्या कविता” या आयामातून जगामध्ये प्रत्येक गोष्टीचे बोली लावली जाते, प्रत्येक गोष्टीचा सौदा करण्याचा प्रयत्न होतो अशा आशयातून दहा कविता त्यांनी दिल्या आहेत. त्यातही, तुकारामान वाण्यानं
आता दुकान तरी कुठे लावायचं
की पुन्हा सदैव वैकुंठाला जायचं…?

अशा प्रश्नातून जगाच्या या बाजारात तुकारामासारख्या भोळ्या माणसाचा निभाव लागणार नाही हे अतिशय स्पष्टपणे संजय चौधरी यांनी सांगितले आहे. मालापेक्षा गिऱ्हाईक महत्त्वाचं, बाई आहे एवढं पुरेसं नाही का?, बाजार कुणाला उपाशी मरू देत नाही, बाजार फक्त तुमचा खिसा बघतो, अशा विविध कवितांमधून जगाच्या बाजाराचा म्हणजेच व्यवहाराचा दृश्य अदृश्य, भयाण विद्रूप असं वास्तव घेऊन आलेला चेहरा संजय चौधरी यांनी दाखवला आहे.

“आता आई नाही” या आयामात फक्त तीन कविता आहेत मात्र या तीनही कविता मातृगौरव सांगणाऱ्या आहेत. त्यातही आई नसल्यावर होणाऱ्या दुःखाचा परिचय त्यात वेगळ्या अंगाने करून देण्याचे काम कवीने केले आहे. आईप्रमाणेच तिसऱ्या आयामात वडिलांची गौरवगाथा आणि स्मरणगाथा सांगण्याचे काम कवी करतात . त्यातही वृद्धापकाळचे दुःख आणि तरुण पिढीची जुन्या पिढीसोबत तुटत चाललेली नाळ, या शबनमला तरी दिला असता जन्म, वडील जाण्याची पहिली जातेय वाट, वडिलांचा मुक्काम असतो खुल्या आभाळाखाली अशा कवितेमधून कवींनी सजीव केले आहे. आजकालची मुलं आपल्या वडिलांसोबत कसे तुसडपणे वागतात हे अतिशय परखडपणे कवींनी सांगितले आहे. ‘यह नंबर मौजूद नही है’ या शीर्षकाने सुरू होणारी कविता ‘जेव्हा यह आदमी मौजूद नही है’ अशा वाक्यात संपते तेव्हा जगातील प्रत्येक बापलेकाचा नातं क्षणभरासाठी थरथरून उठल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते.

संजय चौधरी यांच्या कवितेतील नात्याची किनार नेहमीच हळवी असते ती या कवितासंग्रहामध्ये जास्त गडद झाली आहे असे दिसते. जगण्याचं पोस्टमार्टम या आयामातील
अरे आपल्या पायातला काटा तर कुणीही काढेल
आपल्या पायात काटा असताना
दुसऱ्याच्या पायातील काटा काढण्याची मजा काही औरच असते
या ओळीतून दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा कवी करतात. खरे म्हणजे या चौथ्या आयामात माणसाच्या दुभंगलेपणा व्यक्त करणाऱ्या अकरा कविता आहे मात्र हे दुभंगलेपण साधून त्यातून स्वतः उभे राहून इतरांना उभे करण्याची आपली वृत्ती असली पाहिजे असे कवीला वाटते आणि खरे तर माणुसकीसाठी तेच महत्त्वाचे आहे. याच आयामाचा धागा धरून ‘माझी झाली माझ्याशी चुकामूक’ हा आयाम आपल्याला भेटतो. या आयामातही माणसांनी आपल्याशी स्वभाव बदलून कसेही वागले तरी आपण मात्र त्यांच्याशी कोणतेही नाते तोडले नाही. आपण कुणाच्या खिजगणतीत नसतो असे जेव्हा कवी एखाद्या कवितेत म्हणतात किंवा स्वतःच्या अस्तित्वाला हलके हलके थोपटत राहणे अशा भन्नाट संकल्पना आपल्याला संजय चौधरी यांच्या कवितात भेटतात.

मध्यमवर्गीय जगण्याचे प्रतिनिधित्व करणारे कवी ‘मला बोलू दिलं गेलं नाही’ असं सांगून जनसामान्यांचा आवाज सर्वत्र दाबला जातो हे तर सांगतातच त्याशिवाय वर्तमान दिवस कसे आहेत याबाबत भाष्य करताना
आजच्या काळात अंधार पाहून फणे काढले जातात हे सत्य सांगतात. आज सर्वच दिशाहीन झाले आहेत हे सांगताना कवी म्हणतात –
घर घरीच सोडून आलेत लोक
लाईट हाऊस हरवलेल्या जहाजासारखे
तरंगताहेत शहरातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये
या ठिकाणी लाईट हाऊसची प्रतिमा, हरवलेले जहाज आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वतःचे सुख शोधत स्वतःच्या घरातील सुखाचे अस्तित्व संपलेले लोक या सर्व संकल्पना वर्तमान काळातील भौतिक सुविधा यांना प्राधान्य देत संवेदनाहीन होत जाणाऱ्या जगण्याचे प्रतिनिधित्व करतात. याच वर्तमानातील एक कविता म्हणजे ‘आयांचे मोबाईल हाताळू नयेत मुलींनी’, ही व्यक्तीस्वातंत्र्याचा एक आगळावेगळा नियम घालून देणारी ही कविता आहे. भौतिक सुविधांना सुख समजणाऱ्या समाजाला खरे सुख काय आहे हे सांगणारा ‘सगळ्या सुखावर नसते गव्हर्नरची सही’ हा आयाम म्हणजे या कवितासंग्रहाचा आत्मा आहे.
सगळ्या सुखावर नसते गव्हर्नरची सही
काही आनंद लपलेले असतात आसवातही
दुःखामध्ये सुख किंवा आनंद शोधणे, जगाच्या पाठीवरील सगळ्या सुखाला पैशांमध्ये तोलता येत नाही. असा मतितार्थ सांगणाऱ्या कविता मनाचा वेध घेणाऱ्या आहेत. “काय फरक पडतो लोक काहीही म्हणाले तर”, ‘एकच आकाश तरंगते सगळ्यांच्या डोक्यावर’ अशा शीर्षकासह भेटणाऱ्या कवितावर वेगळे काही बोलण्याची काही गरज नाही कारण त्यांच्या शीर्षकातूनच त्यातील आशय प्रतिबिंबित होतो.

संजय चौधरी कवितेबाबत खूप गंभीर आहेत त्यांच्या जीवनात कवितेला विशेष महत्त्व आहे. ‘उगाचच येत नाही भाषेला बाळसं बिळसं’ या कवितेतून कवितेचा निरस पवित्र दूध येण्यासाठी किती खस्ता खाव्या लागतात, किती अनुभूतीतून जावे लागते याचा आलेख कवी मांडतात. कविता कितीही गांभीर्याने घेतली तरी ‘कांदा आणि कविता’ यांचा एक एक पापुद्रा सोलत गेला तरी जसे हाती काही लागत नाही मात्र डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही ही विलक्षण जाणीव कवी आपल्या कवितेतून करून देतात.

खरे तर “आतल्या विस्तवाच्या कविता” या संग्रहातील प्रत्येक कवितेवर भाष्य करण्याचा मोह टाळता येत नाही. इतक्या सुंदर आणि आशयघन अशा या कविता आहेत. कवितेची पारंपरिक धाटणी आणि मांडणी संजय चौधरी यांनी कधीच नाकारली आहे. त्यांची स्वतःची एक वेगळी शैली त्यांनी अंगीकारली असून नेमक्या शब्दात आपली संवेदना मांडून मनाचा ठाव घ्यायचा हा त्यांचा विशेष गुण आहेत जो संजय चौधरींच्या ‘ माझं इवलं हस्ताक्षर’, ‘कविताच माझी कबर’, आणि आता ‘आतल्या विस्तवाच्या कविता’ या संग्रहामध्ये दिसून येतो. ग्रंथाली प्रकाशन कडून आलेल्या या संग्रहात असलेल्या सर्व कविता सर्वसामान्य माणसाच्या असून सामान्य जगण्याचे प्रतिनिधित्व करतात. या संग्रहाचे मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांचे असून त्यातून संजय चौधरी यांच्या कविता प्रतिबिंबित झाल्याचे समाधान मिळते.
डॉ. भालचंद्र नेमाडे यांचे पत्र आणि प्रभा गणोरकर यांचा मलपृष्ठ अभिप्राय नेमकेपणाने संजय चौधरी यांच्या काव्याची दिशा आणि भूमिका कोणती आहे ते सुचवतात.
“गुंगे की मा समझती है, गुंगा क्या कहना चाहता है”
या सूचक ओळीतून मुक्या माणसाची भाषा जशी त्याच्या आईला सहज समजते कारण तिचा जीव तिच्या लेकरात असतो त्याचप्रमाणे माय मराठी आणि मराठी वाचक यांना आपली भाषा नेमकी पणाने कळेल, याची खात्री कवीला आहे.

पुस्तकाचे नाव – “आतल्या विस्तवाच्या कविता”
कवी – संजय चौधरी
प्रकाशक – ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
पृष्ठे –१२४ किंमत १५०

Related posts

Navratri Theme : जैवविविधतेची लाल छटा…

आई…

पूर्ण मिश्रित आहारामुळे होते पोषण, दुग्धवाढ

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More