स्त्रियांवरील विनाेद आणि सामाजिक मानसिकता
इतकी वर्षे/काही पिढ्या आपण प्रतिवाद केला नाही म्हणून किंवा हे असं असं नाही हे निदर्शनास आणून देण्याची हिंमत केली नाही, म्हणून स्त्री चेष्टेचा, मनाेरंजनाचा विषय ठरत आली आहे. असे न करण्याचे संस्कार आपण आपल्या मुलामुलींना आपल्या कृतीतून द्यायला हवेत.
यशवंती शिंदे, काेल्हापूर
माे. 8830179157
काही वर्षांपूर्वी ‘ती सध्या काय करते?’ हा एक सिनेमा आला हाेता. तरुणपणातील प्रेमाची भावना, लग्नानंतर जुने मित्रमैत्रीण भेटल्यावर पूर्वीच्या जुन्या आठवणी जाग्या हाेणे अशी काहीशी त्या सिनेमाची थीम हाेती. मग काय, आमच्याकडे सुरू झालं ‘ती सध्या काय करते?’ या टायटलवरून विनाेदांचं पेव फुटायला! ‘ती सध्या म्हशी राखते’, ‘ती सध्या शेण काढते’, ‘धुणीभांडी करते’, ‘मुलांचा शेंबूड काढते’ वगैरे काहीही जाेडून ‘ती’ सध्या काय करते, यावर विनाेद केले गेले. खरे तर या विनाेदात खूप सारे तथ्य आहे.
शाळा काॅलेजमध्ये मुली असतात, तेव्हा त्यांची काही स्वप्ने असतात. ती गाठतानाचा पल्ला मात्र फार माेठा असताे. तेवढं थांबायला घरचे तयार नसतात. त्याच वेळी मुलीचे लग्न हाेते, जे तिचे आयुष्य बदलवून टाकते. लग्नानंतर ती कुणाची तरी पत्नी हाेते, सून, आई, वहिनी, मामी, काकी हाेते. घरात पडतील ती कामे करायला लागते. या काळात तिला आठवतही नाही की आपली काहीतरी स्वप्ने हाेती, ती पूर्ण करण्यासाठी काॅलेज जीवनात आपण प्रचंड जिद्दीने झगडलाे. लग्न झाले नसते तर आपण खरंच आपल्याला ‘कुणीतरी’ बनायचे हाेते, आयुष्यात काही करून दाखवायचे हाेते ते झालाे असताे इत्यादी.
लग्नानंतर काहीजणींना सासरी खूप सपाेर्ट मिळताे पण कित्येकींना आपल्या स्वप्नांसाठी सासरच्यांशी झगडावे लागते, त्यात त्या अपयशी ठरतात. मग अशा परिस्थितीत शालेय/काॅलेज जीवनातील कुणीतरी तिला भेटताे आणि तिच्या या परिस्थितीवर त्याला विनाेद सुचताे, ‘ती सध्या काय करते ?’ मुलांचा शेंबूड काढते, म्हशीचे शेण काढते इत्यादी यादी वाढत जाईल. कित्ती क्रूर चेष्टा आहे ना! समाजाचे नियमन करणारे पुरुष कधी बाप-भाऊ, कधी नवरा, सासरा बनून तिच्या प्रगतीच्या, भविष्यातील स्वप्नांच्या पूर्ततेच्या सर्व वाटा बंद करतात आणि तिच्या सद्यःस्थितीवर विनाेद करतात की, ‘ती सध्या काय करते?’ जणू काही तिच्या काॅलेज जीवनातील करारी, आत्मविश्वासाने स्वत्व मिरविणाèया स्वाभिमानाला परिस्थितीने कसे नामाेहरम केले आणि ती जे काही माेठं स्वप्न पाहत हाेती ते कसं या सध्याच्या दुर्दशेत उतरलं !
थाेडीशी तरी सहिष्णुता आहे का या विनाेदामध्ये? तिची परिस्थिती लाचार बनवायची. तिच्या लाचारीवर विनोद करत तिच्या या परिस्थितीचा असुरी आनंद घ्यायचा, अशीच भावना यामधून दिसून येते. खरेच तिला तसा वाव मिळेल तर प्रत्येक ‘ती’ काहीतरी उल्लेखनीय कार्य करू शकते; पण आपली पुरुषप्रधान व्यवस्था स्त्रीला बंधनात जखडवून तिच्या स्वाभिमानाने मिरविणाऱ्या स्वत्वाला ठेचून टाकते. तिला लाचार बनवते.
अगदी खेड्यापाड्यांमध्येही आता बऱ्याच अंशी स्त्रिया टू-व्हीलर/फाेर व्हीलर अशी वाहने चालवताना आढळतात. पण यावरदेखील एक विनाेद वाचला, ‘रस्त्यावरून चालताना रस्त्यावरील गायी-म्हशी, कुत्री आणि गाडी चालविणाऱ्या महिलांपासून सावध राहा.’ याचा अर्थ काय हाेताे? एक तर गायी-म्हशी, कुत्र्यांच्या पंगतीत तुम्ही स्त्रीला बसवताच; पण याबराेबरच स्त्रीच्या गाडी चालविण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करता. मला वाटतं, याविषयी थाेडासा अभ्यास किंवा सर्वेक्षण करावं सर्वांनी. रत्यावरील जे अपघात हाेतात, त्यामध्ये किती अपघातांमध्ये गाडीची चालक स्त्री असते? किती स्त्रिया वाहतुकीचे नियम माेडतात? किती स्त्रिया रस्त्यावरून बेफिकीरपणे गाडी चालवितात आणि त्यामुळे रस्त्यावरील कुणाचे तरी प्राण जातात? मग खुश्शाल विनाेद करा स्त्रियांच्या वाहन चालविण्यावर. स्त्री गाडी चालवायला लागल्यामुळे बाहेरच्या निम्म्यापेक्षा जास्त जबाबदाऱ्या ती पार पाडत असते. मुले शाळेत साेडणे-आणणे, घरातला किराणा, भाजीपाला याबराेबरच घरातले कुणी आजारी पडले तर त्यांना ती उपचारासाठी घेऊन जाते. पण हे कसे दिसणार तुम्हाला? असे विनाेद करणाऱ्याना तर तिच्या अक्षम (?) असण्यालाच अधाेरेखित करायचे असते.
आणखी एक विनाेद मी खूप वर्षांपूर्वी वाचला हाेता आणि त्यानंतरही बऱ्याचदा ताे वाचण्यात येताे, जाे वाचून माझ्या मेंदूत तिडीक उठली हाेती. ताे म्हणजे ‘एखाद्या बाईने टिकली/कुंकू/सिंदूर लावलेला आहे, याचा अर्थ या प्राॅपर्टीचं बुकिंग झालेलं आहे. त्यामुळे त्या प्राॅपर्टीचा विचार करू नका.’ याचा अर्थ काय? बाई म्हणजे प्राॅपर्टी! ती कुणाच्या तरी मालकीची आहे. तुम्ही या प्राॅपर्टीवर आता डाेळा ठेवू शकत नाही. आणि दडलेला अर्थ असा की, लग्न झालेल्या बाईने टिकली/कुंकू/सिंदूर लावलाच पाहिजे. ज्याच्याशी लग्न झालंय, त्या माणसाची पत्नी त्याची प्राॅपर्टी. अशा विनाेदांमधून सरळसरळ स्त्रीची गुलामी किंवा तिच्यावरील दुसऱ्या कुणाचीतरी मालकी व्यक्त हाेते आणि असे विनाेद ती स्त्रियांवरील पुरुषी मालकी मान्य करायला लावणारे असतात. दुसऱ्या एका अर्थी तिच्या टिकली/कुंकावरून ती विवाहित की अविवाहित हे तिचं स्टेटस ओळखण्याचं हे साेपं तंत्र आहे, हेही यातून सूचित करायचे असते.
पती-पत्नीचे भांडण झाले की, पती म्हणताे, ‘जा जा, तुझ्यासारख्या छप्पन मिळतील.’ यावर पत्नीने काय म्हणायला हवं? ‘मलापण तुझ्यासारखे छप्पन मिळतील.’ पण ती विनाेदातही तसं म्हणत नाही. ती म्हणते, ‘तुला पुन्हा माझ्यासारखीच हवी का?’ हे विनाेद काय सुचवितात? एक पत्नी गेली तरी तिच्यासारख्या खूपजणी त्याला सहज मिळतील, इतकी ती सहजप्राप्य आहे. पण तिने विनाेदात देखील तुझ्यासारखे छप्पन मिळतील असे म्हणायचे नसते.
लक्षात घ्या, स्त्रियांचे विनाेदांमधले अवमूल्यन हे तिच्या सामाजिक स्थितीचे निदर्शक आहे ते यामुळेच. विनाेद म्हणूनसुद्धा आपली पुरुषप्रधान व्यवस्था पुरुषांवरील हलके, हीन दर्जाचे, कसनुसे, फालतू विनाेद तयार करीत नाही; पण तेच स्त्रीचे गाैणत्वनिदर्शक विनाेद ढिगाने वाचायला, ऐकायला, पाहायला मिळतील. स्त्रियांच्यावरील अश्लील लैंगिक टिप्पण्या तर स्त्रीच्या माणूस असण्यावरच बाेट ठेवतात इत्नया खालच्या पातळीवरील असतात, त्याच्यावर सेपरेट एक माेठा निबंध हाेऊ शकताे.
स्त्रीच्या शिक्षित असूनही अडाणी असण्यावरचा विनाेद तर फार प्रचलित आहेत.
एक इंजिनीअर मुलगी भाजीला जाते. आधी टाेमॅटाे विकत घेते आणि त्यानंतर त्याच्यावर एक कलिंगड विकत घेऊन ठेवते. मग भाजीवाला तिला म्हणताे, ”ताई, तुम्ही लय शिकलेल्या आहात वाटतं?” ती बिचारी सुखावते. म्हणते, ”तुम्ही कसं ओळखलंत?” ताे भाजीवाला म्हणताे, ”तुम्ही टाेमॅटाेवर कलिंगड ठेवलं ना म्हणून!” असे प्रसंग पुरुषांच्या बाबतीत घडत नाहीत का? मग त्यांच्यावर विनाेद का हाेत नाहीत ? स्त्रिया कितीही उच्चशिक्षित झाल्या तरी त्यांना ‘अक्कल’ नसते, हे तुम्ही ठरवायचे. असले विनाेदी प्रसंग तयार करायचे, त्यात स्त्रीला घुसडायचे आणि तिच्या शिक्षणाची टर उडवायची.
हंगामी विनाेद तर प्रत्येक वेळी सुरू हाेतात. सध्या नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. मग झाले स्त्रियांवरती विनाेद सुरू, ”वर्षभर माझी गुडघादुखी, कंबरदुखी असं सांगणाऱ्या महिला आता नवरात्रीत बघा, जमिनीला खड्डे पडेस्ताेर खेळतील आणि स्पीकर बंद की म्हणतील, शी बाबा ! आता तर आले हाेते.” म्हणजे अख्खी दसऱ्याची साफसफाई करताना त्या दिसत नाहीत. भांडी घासून घासून हाताच्या नखांची टाेकं झिजून गेली ते दिसत नाही. घरातलं फडकं, बाेळा, चिटाेरी-चपाटी काढून स्वच्छ करतात, ते दिसत नाहीत. पण जरा का या स्वतःसाठी खेळत आनंद व्यक्त करायला लागल्या की सुरू झाले फालतू विनाेद.
सासूसुनांवरचे, जावाजावांचे, नणंद-भावजयांचे विनाेद तर पराकाेटीचे असतात. कधी त्या एकमेकींच्या साड्या पाहून जळतात, कधी एकमेकींचे हेवेदावे करतात, कधी चहाड्या करतात तर कधी भांडताना एकमेकींच्या छातीवर बसतात. त्यामुळे हे नाते आणखीच कलुषित बनत जाते.
सध्या यू-ट्युब, फेसबुक, इन्स्टाग्रामवरती रील्समधून स्त्रीला एक करमणुकीचे साधन म्हणूनच पुढे आणले जात आहे. काही सेकंद ते मिनिटांपर्यंत चालणाऱ्या या रील्समधून खूपच हीन प्रकारचे विनाेद स्त्रियांवरती केलेले असतात.
अशाच एका रीलमध्ये नवरा पत्नीला म्हणताे, ‘कल्याणी, लप लप.’ ती लपते. नवरा थाेड्या वेळाने तिला ‘आता बाहेर ये’ म्हणताे. यावर ती विचारते, ‘काय झालं? तुम्ही मला लपायला का सांगितलं?’ त्यावर ताे म्हणताे, ‘अगं, कुत्री पकडायची गाडी आली हाेती गं.’ असे असंख्य विनाेद आमच्या कानांवर आदळत असतात, डाेळ्यांपुढे फिरत असतात. आम्ही हसताे, लाईक करताे, फाॅरवर्ड करताे; पण विराेध दर्शवीत नाही.
मला एक प्रश्न पडताे, ज्या रील्समध्ये स्त्रीवर असा थेट विनाेद चित्रीत हाेताे, ती स्त्री याला विराेध का करत नसावी ? स्त्रियांनी स्वतः असल्या हीन दर्जाच्या विनाेदाच्या चित्रीकरणासाठी तयारच का व्हावं ? काही स्वत्वाचं भान नाहीच का तुम्हाला ? जाहीरपणे एखाद्या व्हिडिओमध्ये कुत्री, हडळ असले अपशब्द नवरा तुमच्याविषयी वापरत असताे, ते सगळीकडे व्हायरल हाेत असतात, त्याचं काहीच वाटत नाही का? अशा व्हिडिओंमधून चार पैसे मिळत असतील, पण म्हणून पैशांसाठी स्वतःचा जाहीर अपमान करून घ्यायला तयार व्हायचं का? याबराेबरच या माध्यमातून काय मेसेज लाेकांपर्यंत पाेहाेचताे, याचे सामाजिक भान काही आहे की नाही?
आजकाल साेशल मीडियामुळे सर्वच खऱ्या-खाेट्या गाेष्टी लवकर प्रसारित हाेतात. त्यातल्या त्यात लाेक वैचारिक काही वाचत नाहीत, पण विनाेद मात्र नक्कीच वाचतात. विनाेद वाचणे वाईट नाही, परंतु ते काेणत्या दर्जाचे असतात, त्यामधून नक्की काय संदेश पाेचवायचा आहे, हे आपण बघत नाही. वाचले की फाॅरवर्ड करायचे (कधी कधी न वाचताच), ही या साेशल मीडियाची पद्धती असते. असे स्त्रियांवर केले जाणारे विनाेद, ज्याच्यातून स्त्रीच्या सामाजिक स्थानावर, क्षमतांवर, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहते, ते पसरविण्याचं टाळायला हवं. स्त्री ही शारीरिक ताकद साेडली तर कुठल्याही बाबीत पुरुषांपेक्षा कमी नसते, हे शास्त्रीयरीत्या सिद्ध झालेलं आहे. सिमाॅन दि बाेव्हुआर, मेरी वाॅल्स्टाेनक्राफ्ट यांच्यासारख्या स्त्रियांनी त्यासाठी आयुष्यभर अभ्यास केला आणि लेखन करीत राहिल्या. तरीही तिच्या क्षमतांवर संशय घेतले जातात. हे विनाेद जेव्हा स्त्रियाच फाॅरवर्ड करतात, तेव्हा खूप खेद हाेताे. तुम्ही हे फाॅरवर्ड करता म्हणजे तुम्ही मान्य करत आहात की, विनाेदात जे वैगुण्य सांगितलेलं आहे, ते तुम्हा समस्त स्त्रियांमध्ये आहे. आणि ते पसरवून तुम्ही त्या समजाला बळकटी देत आहात. आपल्या दिसण्यावर, असण्यावर, बुद्धिमत्तेवर, क्षमतांवर, गुणवत्तेवर जे प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं, ते तुम्हाला मान्य आहे.
आपण सर्वजण (स्त्री, पुरुष आणि इतरही) पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये राहताे, जिथे पुरुष म्हणेल ती पूर्व दिशा असते. मग आपल्यावरती विनाेदांच्या माध्यमातून असे चुकीचे, अन्यायकारक आणि माणूस असण्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारे विनाेद प्रसृत केले जात असतील तर आपण गप्प बसायचे का? कुठपर्यंत हे असेच चालणार? आपल्या सर्वांना हे थांबण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. म्हणून आपल्यासमाेर जेव्हा जेव्हा अशा स्वरूपाच्या घटना/प्रसंग घडतील, त्या निदर्शनास येतील, तेव्हा आपण याबद्दलचा निषेध व्यक्त करू या. प्रतिवाद करू या, विराेध करू या. असे करत असताना कुणी ‘अगाऊ’ म्हणतील, ‘फटकळ’ म्हणतील, ‘भांडखाेर’ म्हणतील; पण याला पर्याय नाही असे मला वाटते.
इतकी वर्षे/काही पिढ्या आपण प्रतिवाद केला नाही म्हणून किंवा हे असं असं नाही हे निदर्शनास आणून देण्याची हिंमत केली नाही, म्हणून स्त्री चेष्टेचा, मनाेरंजनाचा विषय ठरत आली आहे. असे न करण्याचे संस्कार आपण आपल्या मुलामुलींना आपल्या कृतीतून द्यायला हवेत. हे जर हाेऊ नये असं वाटत असेल तर जिथे जिथे स्त्रियांवर असे फालतू विनाेद केले जात असतील, त्याचा प्रतिवाद आपण केला पाहिजे. किमान आपल्यापुढे असे विनाेद आले तर ते आपण पुढे तरी पाठवू नयेत. स्त्रियांवरती विनाेद करून त्यांचे समाजातले गांभीर्य कमी करून गाैणत्व प्रदान करणं थांबवू या. स्त्रियांवरील हीनकस विनाेद बंद नक्कीच हाेणार नाहीत, परंतु हे करणे चुकीचे आहे, असा दृष्टिकाेन निर्माण करण्याच्या दिशेने हे आपले पाऊल तरी ठरावे आणि अशी जागृती करू इच्छिणाऱ्यांना दिशादर्शक ठरावे, ही अपेक्षा आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
खूप छान लेख आहे.स्त्रियांकङे बघण्याची पुरुषी मानसिकता बदलली पाहीजे.👍👌