January 26, 2025
Mother Name with Sons full name article by Yashavanti Shinde
Home » नाव ? छे, अस्तित्वच !
मुक्त संवाद

नाव ? छे, अस्तित्वच !

मुलांच्या फक्त कागदोपत्री नको, तर त्यांच्या प्रत्येक संपूर्ण नावाबरोबर आईचं नाव असलंच पाहिजे, असं त्याला शिकवत राहा. आपण खरोखरीच आपल्या मुलासाठी खस्ता खाल्लेल्या असतात. मग त्याचं नावातलं, त्याच्या अस्तित्वाबरोबरचं श्रेय घ्यायला काय हरकत आहे?

यशवंती शिंदे, कोल्हापूर
मो. 8830179157

काही महिन्यांपूर्वी माझ्या छोट्या मुलाने, आदर्शने एका पुस्तकाचे परीक्षण लिहिले होते. ते आम्ही वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि फेसबुकवरही प्रसिद्ध केले. ते परीक्षण वाचून डॉक्टर असणार्‍या एका आमच्या मैत्रिणीचा फोन आला. त्या म्हणाल्या, “एवढ्या लहान वयात तुमचा मुलगा मोठी मोठी पुस्तके वाचतो, त्यावर विचार करून परीक्षणही लिहितो. खूपच चांगली गोष्ट आहे. त्याची समज खूपच चांगली आहे. याबरोबरच त्याची आणखी एक गोष्ट मला आवडली की, त्याने परीक्षणाच्या शेवटी आपलं नाव लिहिताना ‘आदर्श यशवंती अरुण शिंदे’ असं पूर्ण नाव लिहिलं आहे, हे वाचून खूप छान वाटलं. हे नाव वाचून खरंच हे पूर्ण नाव आहे असं मला वाटलं. असं प्रत्येक मुला/मुलीच्या नावासोबत वडिलांबरोबर आईचं नावही असेल तर किती छान होईल.”

आमचा आदर्श कोल्हापुरातील ‘फुलोरा’ नावाच्या बालवाडीत शिकला. पुढे पहिलीपासून अजिंक्य आणि आदर्श दोघेही ‘आंतरभारती’च्या सृजन आनंद विद्यालय या शाळेत शिकली. या शाळेने मुलांना समतेची शिकवण दिली. प्रत्येक काम मुलाने आणि मुलीने करायचे. हे काम मुलांचे, ते काम मुलींचे असा भेदभाव नसायचा. त्याबरोबरच आपलं स्वतःचं नाव सांगताना बाबाबरोबर आईचं नावही आपल्या नावाबरोबर सांगायचे, असे या शाळेचे संस्कार होते. जेव्हा पहिल्यांदा शाळेत मुलांना असे शिकवत असताना पाहिले तेव्हा मलासुद्धा ही कल्पना खूप भारी वाटली होती. आणि आपणही ‘उल्लेखनीय’ आहोत याचा अभिमान वाटला होता. या शाळेत जशी समानतेची शिकवण दिली जाते, तशी इतर शाळांमध्ये दिली गेली पाहिजे.

मुलांच्या आयुष्यात बाबाचे स्थान महत्त्वाचे असतेच, पण आई ही प्रत्येक मुलाची पहिली गुरू असते, असं आपण मानतो. इतकंच नाही तर, आपल्याकडे प्रत्येक गुरूपौर्णिमेला, शिक्षक दिनाला आई हा आपला गुरू मानून ‘आई माझा गुरू। आई कल्पतरू। सौख्याचा सागरू। आई माझी॥’ असा तिचा महिमा सांगितला जातो. आईवर भाषणे द्यायची, तिच्या प्रेमाचे, मोठेपणाचे गोडवे गायचे. तिच्या त्यागाचे, कष्टाचे उदात्तीकरण करायचे. मोठमोठ्या कवींनी तर आईवर कविताही केलेल्या आहेत. ‘श्यामची आई’ हे साने गुरुजींचे पुस्तकदेखील प्रसिद्ध आहे. ज्यातून आईचे मोठेपण आपल्यासमोर मांडले जाते. पण हे सगळे भाषणांपुरते, कवितेपुरते, पुस्तकांपुरते मर्यादित ठेवायचे. तिला प्रत्यक्ष जीवनात, व्यवहारात, मुलामुलींच्या नावाबरोबर महत्त्वाचे स्थान द्यायचे नाही. ही मानसिकता रुजायला सुरुवात कशी झाली असेल? आई एवढी महत्त्वाची आहे, पहिला गुरू आहे तर या गुरूचे स्थान जन्माबरोबर मुलाच्या नावासोबतच का येत नाही?

बाळाचं शी-शू काढणं, त्याचं खाणं-पिणं, आजारपण, कपडालत्ता, आंघोळपाणी हे सगळं आई करते, अगदी न दमता, थकता. प्रत्येक घरातली ही कहाणी आहे. म्हणजे तिनं ते ‘करायचंच’ असतं. आई आहे ती! आईचं कामच आहे ते! परमेश्वराला प्रत्येक घरी जाऊन आपल्या लेकरांची काळजी घेता येत नाही म्हणून त्यानं ‘आई’ला निर्माण केलं आहे, असंही म्हटलं जातं. मग अशा या परमेश्वराचं रूप असणार्‍या आईला मुलांच्या नावासोबत स्थान का नसेल बरं? असा प्रश्न पुरुषांना राहू दे, स्त्रियांना तरी कधी पडलाय का?

एक सुजाण नागरिक म्हणून घडवत असताना मुलाला चांगले संस्कार द्यायचे असतात, बाबाबरोबर आईही हे काम करत असते; किंबहुना मुलाच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत आईचाच वाटा अधिक असतो, हे कुठलाही बाबा नाकारू शकणार नाही. तरीदेखील मुलाने कर्तृत्व गाजवले की, ‘पोरानं बापाचं नाव काढलं!’ किंवा गावाकडे म्हणतात तसं ‘पठ्ठ्या हुशारच आहे. पोरगा कुणाचा आहे मग!’ असा बाबाचा गौरवही केला जातो. बाबाचा गौरव करा हो, पण यात आईचं काही योगदान नसतंच का?

कित्येकदा आयांना कर्तृत्व गाजवायला संधीच मिळत नाही. आईचं अर्धं आयुष्य स्वयंपाक, घरादाराची कामं, नातीगोती, मुलंबाळं, कौटुंबिक जबाबदार्‍या यातच निघून जातं. मग आपलं कर्तृत्व दाखवायचं कुठे? आई कितीही छान स्वयंपाक करत असली, कितीही तल्लख असली तरी मुलामुलीचा नावलौकिक झाला तर बाबाचंच नाव पुढे येतं. मग साहजिकच लोक म्हणतात, ‘काहीही म्हणा, पोरगं बापावर गेलंय. बापाच्या पावलावर पाऊल ठेवणार. बाबाचं नाव काढणार.’ तसं आईचं नाव कधी निघायचं?

आजकाल मुलेमुली लग्नानंतर आपल्या जोडीदाराला नावानेच बोलावतात. पण ग्रामीण भागात (काही अंशी शहरी भागातही) अजूनही पुरुष पत्नीला नावाने हाक मारीत नाहीत. ‘ए’, ‘व्हय गं’, ‘घरची’, ‘मंडळी’, ‘बायामाणसं’, ‘मालकीण’, ‘बाया’ ‘ आमची सौ ‘, ‘ अमक्याची आई / मम्मी ‘ वगैरेंनी तिला संबोधले जाते. शहरी मध्यमवर्गीय लोकांमध्ये ‘विथ’ म्हणण्याची फॅशन आली आहे. ‘विथ’ म्हणजे पत्नी. इतकी ती नाव न घेण्यासारखी कॉमन, दुय्यम झाली आहे. माझ्या शाळेतले मित्र गावी गेले की भेटतात. आपल्या पत्नीचा उल्लेख करताना ‘ती’ एवढंच म्हणतात. मी मग गमतीने डिवचते, “का रे बाबा, तुझ्या बायकोला नाव नाही का?” “आहे की.” “मग ‘ती’ असं का म्हणतो? तिचं नाव सांग की.” “सगळ्या गावाला माहीत आहे की. मी नाव घ्यायची काय गरज आहे?” असं म्हणून बायकोचं नाव घ्यायचं टाळतात. यामध्ये संकोच असतो की, बायकोचं नाव घ्यायला शरम (!) वाटते हेच मला कळत नाही. तिचं नाव घेणं म्हणजे तिचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करणं. ते मान्यच नसते, म्हणूनच ती ‘घरचे’, ‘मंडळी’, ‘बायामाणसं’ यांमध्ये मोडते. तिचं स्वतंत्र अस्तित्वच राहात नाही. याच्यातूनच तिचं नाव घ्यायचं नाही, तिला पुढे आणायचं नाही, असा प्रघात पडला असावा आणि ‘आई’चं नाव मुलांच्या नावाबरोबर जोडायची गरजच नाही किंवा काय गरज आहे? असं वाटलं असावं.

गेल्या काही वर्षांपासून आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमध्ये काम करत आहोत. आमच्याबरोबर असणारी चळवळीतील मुलंमुली आपल्या नावाबरोबर अभिमानाने आईचंही नाव लावतात, हे सररासपणे पाहायला मिळतं. समतावादी विचारांची ही मुले प्रत्येक कामाकडे समानतेच्या दृष्टिकोनातून पाहात असतात. ही समता त्यांच्या वागण्याबोलण्या आणि कृतीतून जाणवत राहते.

आपल्याकडे कुठल्याही कार्यालयीन कागद ( ऑफिशिअल डॉक्युमेंट्स) असू दे, त्यात पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव (फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम) असे रकाने असतात. त्या ठिकाणी फर्स्ट नेम स्वतःचं नाव, मिडल नेम आईचं नाव आणि लास्ट नेम बाबाचं नाव असं असायला हवं असं मला वाटतं. तसंही लास्ट नेम- आडनाव- याचा उपयोग बहुधा लोक जात शोधायलाच करतात. म्हणून आडनावाची तशी गरजच नाही.

सरकारने शैक्षणिक संस्था व इतर सरकारी कामकाजामध्ये आईचे नावही समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे व त्याप्रमाणे कार्यवाहीही सुरू आहे. त्यामध्ये आईच्या नावासाठी एक स्वतंत्र रकाना असतो. परंतु तो एका उपचारापुरता मर्यादित झालेला दिसतो. म्हणून मुलाचे/मुलीचे नाव, आईचे नाव व बाबांचे नाव अशा क्रमाने लिहिले, बोलले जाणे आणि ते प्रत्यक्ष व्यवहारात येणेे गरजेचे आहे, त्यासाठी कायदा केला पाहिजे.

शेवटी ज्यांना ज्यांना वाटतं की, आपल्या मुला/मुलींच्या नावाबरोबर त्यांच्या आईचंही नाव असावं, त्यांनी लगेच सुरुवात करावी. समतेची सुरुवात यापेक्षा चांगली आणखी कशाने होऊ शकते? अर्थात नुसती नावात समता देऊन समता प्रत्यक्षात येणार नाही हा भाग वेगळा. पण आपलं नाव घेतलं जाणं, जोडलं जाणं आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव होणं; ती होत नसेल तर ती करून देणं महत्त्वाचं आहे. याला सुरुवात तरी व्हायला हवीच.

आणि बायांनो, तुम्हीही आपले गोडवे ऐकून भाळत जाऊ नका. ‘तू खूप चांगली आहेस, तुझ्यामुळे घर चालतंय, तू नसती तर घराचं काय झालं असतं’ वगैरे कौतुकांना भुलत जाऊ नका. जाहीरपणे आपल्या मुलाची पहिली गुरू आपण आहोत. जी मुलं मोठी झाली आहेत, त्यांनाही आपलं नाव बाबांच्या नावाबरोबर घ्यायला शिकवा. आणि ज्यांची अजून लहान आहेत, त्यांनी पोरगं/पोरगी बोलायला शिकली रे शिकलं की, त्यांना त्यांच्या नावाबरोबर जोडून आपलं नाव शिकवा. मुलांच्या फक्त कागदोपत्री नको, तर त्यांच्या प्रत्येक संपूर्ण नावाबरोबर आईचं नाव असलंच पाहिजे, असं त्याला शिकवत राहा. आपण खरोखरीच आपल्या मुलासाठी खस्ता खाल्लेल्या असतात. मग त्याचं नावातलं, त्याच्या अस्तित्वाबरोबरचं श्रेय घ्यायला काय हरकत आहे?

तुम्ही म्हणाल, नावात काय आहे ?

नावात आमचं अस्तित्व आहे. तर मग करा सुरुवात…!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading