31 रोजी कणकवली मराठा मंडळ नाट्यगृहात संमेलनाचे आयोजन
स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण, निमंत्रक सुभाष भंडारे यांची माहिती
कणकवली – गेल्या वर्षापासून साहित्य संगीत मित्र मंडळ सिंधुदुर्गतर्फे साहित्य संगीत संमेलन आयोजित करण्यात येते. यावर्षीचे दुसरे साहित्य संगीत संमेलन शनिवार 31 जानेवारी रोजी दुपारी साडे तीन वाजता कणकवली शहरातील मराठा नाट्यगृह मध्ये आयोजित करण्यात आले असून संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य कला अभ्यासक डॉ. निर्मोही फडके यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण आणि निमंत्रक सुभाष भंडारे यांनी दिली.
एक कला दुसऱ्या कलेला पूरक असते. अनेक कलांच्या संगमातून समाजाची निकोप वाढ होत असते. मात्र असे असले तरी कला संगम संमेलने आपल्याकडे फारशी होत नाहीत. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य कला संगीत या क्षेत्रातील मंडळी एकत्र येत साहित्य संगीत संमेलन आयोजित केले जात आहे. या संमेलनाची रूपरेषा पुढील काही दिवसात जाहीर करण्यात येईल अशी माहितीही श्री चव्हाण आणि श्री भंडारे यांनी दिली असून पुढील चार दिवसात संमेलनाच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या साहित्य, संगीत आणि चित्रकला या क्षेत्रातील व्यक्तींच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षीच्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी तथा चित्रपट गीतकार अजय कांडर यांची निवड केली होती. यावर्षी दुसऱ्या साहित्य संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य आणि कला संस्कृतीच्या अभ्यासक असणाऱ्या डॉ. निर्मोही फडके यांची निवड केली असून डॉ. निर्मोही या ठाणे येथील लेखिका आणि मराठी भाषा-साहित्य क्षेत्रातील संशोधक आहेत. ‘डॉ. भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कादंबऱ्यांचा चिकित्सक अभ्यास’ या विषयात संशोधन करून पीएच. डी. पदवी प्राप्त केलेल्या डॉ. निर्मोही ह्यांनी अडीच दशके शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. बालशिक्षण आणि शालेय मराठी भाषा चळवळीत त्या सक्रीय आहेत. तसेच साहित्य क्षेत्रात लेखन, पुस्तकांचे संपादन, शब्दांकन, मुलाखती, अनुवाद इ. विविध प्रकारे त्या सातत्याने आपले योगदान देत आहेत.
आतापर्यंत त्यांचे दहा ग्रंथ प्रकाशित झाले असून, त्यांच्या पुस्तकांना अनेक महत्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही अनेक संस्थांकडून, तसेच साहित्य अकादमीकडूनही मराठी साहित्य विषयासंदर्भात व्याख्यानांसाठी, चर्चा-सत्रांसाठी त्यांना निमंत्रित केले आहे. तसेच अमेरिका, इंडोनेशिया इथेही त्यांनी व्याख्याने दिली आहेत. साहित्य ही एक कला आहे आणि इतर सर्व कलांपासून साहित्य वेगळे राहू शकत नाही, असे त्या मानतात. त्यामुळे, एक साहित्यिक ह्या नात्याने संगीत, नृत्य, चित्र, नाट्य, सिनेमा इ. अनेक कलांशी त्यांनी स्वतःला एक अभ्यासक आणि आस्वादक म्हणून जोडलेले आहे. त्याबद्दलही त्या लेखन करत असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉ. निर्मोही यांची दुसऱ्या साहित्य संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे श्री चव्हाण आणि श्री भंडारे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी संपर्क – मो. 99605 03171
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
