बंडोपंतानी तब्बल १९२ चारोळ्या या संग्रहात अंतर्भूत केलेल्या आहेत. या काव्यविधेतून त्यांनी त्यांच्या अनुभवातून तसेच चिंतनपर प्रवृत्तीतून संतांचे मार्गदर्शन, सुसंस्कार, पर्यावरण, अंधश्रध्दा, विज्ञानवाद, आध्यात्मिकता, सेवाभाव, बळीराजाची दशा, व्यसन, राजकारण, थोर पुरूष, घरसंसार, शिक्षण, आजची ताजी परिस्थिती अशा विविध विषयावर चारोळ्या निर्माण केल्या.
डॉ.चंद्रकांत लेनगुरे
गडचिरोली
“अंतर मंतर” चारोळीसंग्रहाचे जनक बंडोपंत बोढेकर यांची ही प्रकाशित झालेली सहावी साहित्यकृती. प्राचीन संस्कृत कवी हे ग्रंथ रचना करतांनी कमीतकमी शब्दात मोठा आशय व्यक्त होईल आणि त्या शब्दांचा योग्य प्रभाव संबधीतावर होईल अशा प्रकारची पद्य रचना करायचे. यालाच समाजमन मंत्र म्हणायचे.
‘चारोळी’ म्हणजे चार ओळीत मोठा आशय सांगणे. असा मंत्रासारखाच असणारा काव्यविधेचा कठीण प्रकार. बंडोपंतानी समाजाला जागृत करण्यासाठी या काव्यविधीच्या प्रकाराची (मंत्रप्रकार) योग्य निवड केलेली आहे आणि बिघडलेल्या समाजमनावर मंत्र मारण्यासाठी “अंतर मंतर” हे यथायोग्य शोभेसे नाव त्यांनी चारोळीसंग्रहास दिलेले आहे.
बंडोपंत बोढेकर यांचे जीवन म्हणजे “ग्रामगीता माझे हृदय, त्यात बसले सद्गुरूराय”. असे राष्ट्रसंतांच्या विचाराने भारलेले त्यांचे हृदय. त्यामुळे समाजाचे कान टोचल्याशिवाय ते गप्प कसे बसणार? यासाठी त्यांनी “अंतर मंतर” या काव्यसंग्रहातून “चांगले घ्या वांगल्यास तिलांजली द्या”. हा मंत्र समाजावर फेकून समाजमन जागृत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ‘अंतर’ म्हणजे आतले अंत:करणं, मन. हे त्यांना अभिप्रेत असावे असे मला वाटते. मानवी मन मोठे चंचल आहे. याद्वारे चांगले वाईट कामे होत असतात. आजच्या कलीयुगात तर वाईटाच्या बजबजपुरीचा बाजार फोफावला आहे. यावर वेसन लावणे , आजच्या घडीला कठीण काम आहे. मात्र बंडोपंतानी बिघडलेले समाजमन जागृत होण्यासाठी “अंतर मंतर” या चारोळीसंग्रहातून प्रभावी मंत्र फेकून हे शिवधनुष्य उचललेले दिसतात.
बंडोपंताना वाईट गोष्टी आवडत नाही.लोकांच्या मनात चांगले संस्कार रुजावे ही उदात्त भावना या संग्रहातून सर्वत्र प्रगट होताना दिसते.या चारोळी संग्रहातून समाजजीवनाचे जसे वाभाडे काढलेले आहेत तसेच त्यांनी समाजाला दिशादर्शक चारोळ्याही बहाल केलेल्या आहेत.या “अंतर मंतर” मध्ये एकूण १९२ चारोळ्या आहेत.या विविधांगी आहेत.
बंडोपंत राष्ट्रसंतांच्या विचाराने भारलेले व्यक्तीमत्व आहे.राष्ट्रसंताची महती आकाशाला गवसणी घालणारी आहे. याविषयी सांगतानी ते म्हणतात.
‘राष्ट्रसंताच्या विचारांची ताकद
काळावर ही मात करते
भल्याभल्यांना त्यांच्या जीवनात
आनंद देऊन जाते.’
राष्ट्रसंतांच्या विचारांची ताकद फार मोठी आहे.ती काळावरही मात करू शकते. आणि भल्याभल्यांना त्यांच्या जीवनात नंदनवन फुलवते. ते गुरूदेव भक्तात नेहमी वावरत असल्याने त्यांना ही प्रचिती आलेली असावी.
आजच्या युगात विज्ञान व अध्यात्म या दोघांचीही समाजाला आवश्यकता आहे. विज्ञानाने भौतिक प्रगती होते. तर आध्यात्मिकतेने मनावर चांगले संस्कार घडतात.यातूनच समाजात चांगली माणसे निर्माण होतात. म्हणून बंडोपंत म्हणतात…
‘विज्ञानाने आपणास
अंतरिक्षाचे ज्ञान होते
अध्यात्म ज्ञानाने तर
अंतरंगातील अनुभूती येते’
या देशामध्ये समता बंधुभाव नांदण्याबाबत बंडोपंताना तळमळ आहे.यासाठी एकमेकांशी स्नेहपूर्ण संवाद ठेवावा.हा मंत्र ते खालील चारोळीत सहजतेने सांगून जातात.
‘आपण सारे भारतवासी
सर्वांचा राहो एकच मंतर
स्नेहपूर्ण संवाद साधत
मिटवू मनामनातले अंतर
ते असा मंत्र देत असतांनीच समाजात पूर्वापार पासून भक्तांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन पैशासाठी लुटणारे समाजात खूप आहेत.याला दशा म्हणावे कि दुर्दशा? बंडोपंताना समाजाचे असे चित्र थेट विठ्ठलाच्या मंदिरात राजरोस दिसले. हा अनुभव टिपताना ते म्हणतात…..
‘पंढरपुरी विठ्ठलाच्या दारी
जागोजागी दिसते बडवे
अन् भक्ताला पैशासाठी
ते आडवे होऊन अडवे’
आज भोंदू साधूंचा सुळसुळाट झालेला आहे.अशांचा भांडाफोड होऊन त्यातील अनेक साधूजन आज जेलात खितपत पडलेले आहेत.अशा साधूपासून सावधान राहा हे सांगताना च सच्च्या साधूंची ओळख ते खालील चारोळीतून करून देतात.
‘लोक विकासासाठी जो झटतो
तो असतो सच्चा साधू
विकारपूर्तीचा जो करतो विचार
त्यासी म्हणावा संधीसाधू’
आजपर्यंत देव कुणी पाहिला नाही.तरीही भजन,पूजन,प्रवचन,किर्तनाने देव प्रसन्न होतो अशी भाबडी समजूत साधारण जनाची आहे. समाजात तेच रूजविल्या जात आहे.ते चूक असून जीवनपरिवर्तनासाठी या गोष्टी असल्याचे ते खालील चारोळीतून सांगतात…
देव भेटण्यासाठी मुळी
भजन कीर्तन नसते
जीवन परिवर्तन साठीच
त्यांचे प्रयोजन असते
आज नेत्यांची उर्जा ही लोकांसाठी खर्ची होत नसून स्वतःचे पोट मोठे करण्यासाठी खर्च होत आहे.हे थोडे अपवाद वगळले तर सत्य आहे.तसेच या राजकारण्यांमुळे गावातील शांतता भंगते ती वेगळीच. यासाठी नेत्यांना ते खालील मंतर देतात….
‘नेत्यांची उर्जा जेव्हा,गावांसाठी खर्ची पडते
तेव्हाच गावात बऱ्यापैकी,
परिवर्तन दिसून येते’
मानवी मन पाऱ्यासारखे चंचल आहे.ते कुणाकडे वळेल सांगता येत नाही.गटार व गंगा पाण्यानेच तयार होते.मात्र आपण कोणते पाणी वापरावे हे ज्याचे त्यांनीच ठरवायचे असते.यासाठी मार्गदर्शन करणारे खूप असतील.पण आपला मार्ग मात्र स्वतःलाच निवडून चालायचे असते. याच आशयाशी उद्बोधक अशी चारोळी..
गावात सांडपाण्याच्या नाल्या
तसेच सुंदर मंदिर असते
आपण कुठे बसायचे
हे प्रत्येकाने ठरवायचे असते.
बंडोपंत हे झाडीच्या मैदानात कसलेले व्यक्तीमत्व.इथल्या बायकांची खडानखड परिस्थिती त्यांना माहीत आहे. डॉ. अभय बंग यांनी सुध्दा या भागातील आदिवासी स्त्रिया या ९० ट्क्के कुपोषित असल्याचे रिसर्च द्वारे सिध्द केलेले आहे. म्हणून इथल्या स्त्रियांचे कष्ट वर्णन करतांना ते खडा सवाल खालील चारोळीतून उपस्थित करतात.
“भात रोवणी साठी चिखल दंडात
एकसारख्या वाकतात बाया !
खरच वांगा भात खाल्यानेच
झाडीलोकांच्या उजळतील काया? !!”
आजकाल नविन संस्कृतीचे खूप फॅड आहे. सिनेमातील हिरोईन जशी कपडे घालते तसले जिन्स पॅन्ट घालण्याची प्रथा रूढ झालेली आहे. पण याचे दुष्परिणाम आपल्या मुलांवर काय होतील याचा ती मुळीसुद्धा विचार करीत नाही. या पेहरावामुळे ती स्वत:च कसे अडचणीत आली. यावर भाष्य करणारी ही विनोदी चारोळी…
“लुकडेवाली माय
पोरांचा शेंबूड पदराने पुसते !
जीन पॅन्ट वाली मॅम
फडक्यासाठी घर ढुंढत असते “
नविन संस्कृतीवर असा आघात अनेक चारोळ्यांतून करीत असतानाच साधी राहणीमानाचा ते पुरस्कार करतात.आणि अती धनसंपत्ती ने दु:खे जन्मास येतात हे खालील चारोळीत आवर्जून सांगून जातात…
“साध्या भोळ्या संसारात
वैश्विक सुख मिळते
धनाढ्याच्या बंगल्यात
क्लेषाची लयलुटच दिसते.”
मराठी प्रमाणभाषा ही बोलीभाषा मिळून निर्माण झाली.हे सत्य नाकारता येत नाही. मात्र प्रमाणभाषा शिकलेले लोकच आज बोलीभाषेची हेटाळणी करतांना दिसतात.तिला गावंढळ म्हणतात. हे मुलानेच आईची हेंडसाळ केल्यासारखे होय. अशांना ‘कृतघ्न’ हीच संज्ञा द्यायला पाहिजे.बंडोपंत झाडी बोलीचे कट्टर पुरस्कर्ते असल्याने यावर ते नेमके बोट ठेवतात.हे खालील चारोळीतून…
“बोलीभाषा प्रमाणभाषेला
नवसंजीवनी देत सशक्त करते
प्रमाणभाषा सशक्त झाली कि
मग बोलीचीच टवाळी करते”
बंडोपंतानी तब्बल १९२ चारोळ्या या संग्रहात अंतर्भूत केलेल्या आहेत. या काव्यविधेतून त्यांनी त्यांच्या अनुभवातून तसेच चिंतनपर प्रवृत्तीतून संतांचे मार्गदर्शन, सुसंस्कार, पर्यावरण, अंधश्रध्दा, विज्ञानवाद, आध्यात्मिकता, सेवाभाव, बळीराजाची दशा, व्यसन, राजकारण, थोर पुरूष, घरसंसार, शिक्षण, आजची ताजी परिस्थिती अशा विविध विषयावर चारोळ्या निर्माण केल्या. त्याच्या प्रत्येक चारोळीला सामाजिक अनुभव चिकटलेला आहे. एवढेच नव्हे तर कित्येक चारोळ्या समाजाचे चिंतन करायला लावणाऱ्या आहेत.ते समाजाचे आजचे चित्रणच प्रदर्शित करीत नाही तर बऱ्याच ठिकाणी त्यावर उपचार सुध्दा सांगतात. त्यांच्या चारोळ्या मनोहर,उपमा,उत्प्रेक्षा इ. अलंकाराने नटलेल्या नसल्यामुळे त्या अस्सल,प्रामाणिक वाटतात.बंडोपंत हे नेहमीच समाजात वावरतात,जगतात त्यांना जे खरे दिसले तेच त्यांच्या चारोळ्यात उतरले आहे. यादृष्टीने ते श्रेष्ठ ठरतात.त्यांची चारोळी समाजाची दुटप्पी वृत्ती वारंवार प्रगट करते. पण ती कठोर शब्दांत नाही. त्यामुळे ती वादापासून अलिप्त राहिल.त्यावरचा उपचारही त्यांनी सौम्य शब्दात सांगितलेला आहे. त्यांच्या चारोळीने मन हे दुखावत नाही. तर मन चिंतन करायला लागते. हे या चारोळी संग्रहाचे वैशिष्ट्ये होय.थोर पुरूषाचा आदर्श ते आपल्या चारोळीतून मांडतात. या संग्रहातून मानवी मुल्ये कसे असले पाहिजे याची जाण वाचतांना पदोपदी जाणवते.मुल्यापासून भरकटलेल्या आजच्या समाजाला याची नितांत गरज आहे.”अंतर मंतर” चारोळीसंग्रह हा बंडोपंताच्या डोळसप्रवृत्तीचा प्रत्यय देणारा आहे.ते बेगडी साहित्यात रमत नाही तर अस्सल विश्वात रमतात. म्हणून साहित्य इतिहासात हा संग्रह मोलाचा ठरेल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.