December 9, 2024
Book review of Ashok Bendkhale book Aathawanitala Gaon
Home » गावाकडच्या हृद्य आठवणी
मुक्त संवाद

गावाकडच्या हृद्य आठवणी

गावाशी संबधित अशा अनेक अज्ञात संकल्पना, बरेच रोमहर्षक अनुभव, निसर्गातील विविधता व सौंदर्य, गावात बागडलेले बालपण व त्यावेळचे खेळ, घराघरातील आर्थिक दुरवस्था व त्यातूनही  मिळणाऱ्या अल्पशा आनंदाचे क्षण इत्यादी अनेक पैलूंचे सम्यक दर्शन बेंडखळे यांनी आपल्या रसदार लेखणीतून या पुस्तकातल्या सर्व लेखांतून यशस्वीरीत्या घडविले आहे.
रमेश नागेश सावंत

बी -२४,
केंद्र सरकारी कर्मचारी वसाहत,
वडाळा (पश्चिम), मुंबई – ४०००३१

प्रत्येक व्यक्तीस आपले गाव आणि तेथे बागडलेले आपले बालपण जीवनभर आठवत असते याचे कारण बहुतेक लोकांची नाळ आपल्या जन्मगावास जोडलेली असते.पोटापाण्याच्या उद्योगासाठी गावातून शहरात माणसे स्थलांतरामुळे देहाने जरी शहरात असली तरी त्यांचे मन गावाकडच्या आठवणींत सदैव रमलेले असते. असाच हृद्य अनुभव ज्येष्ठ साहित्यिक अशोक बेंडखळे यांचे ‘ग्रंथाली तर्फे प्रकाशित झालेले ‘आठवणीतला गाव’हे नवे ललितलेखसंग्रहाचे पुस्तक वाचताना येतो.

हे पुस्तक म्हणजे त्यांच्या गावाबद्दलच्या सुमधुर आठवणींचे जणू एक मधाचे पोळेच आहे. या पुस्तकातील मनाला मोहून टाकणाऱ्या ११ लेखांत साठ वर्षांपूर्वीच्या कोकणातील आताच्या रायगड जिल्ह्यातले ‘पन्हळघर’ गाव आणि त्याच्याशी निगडीत  वेगवेगळ्या आठवणी लेखकाने अतिशय भावूक पण विवेचक पद्धतीने आपल्यासमोर मांडल्या आहेत. या पुस्तकाचे वाचन करताना कोणताही वाचक आपल्या गावच्या आठवणीत खचितच रमून जाईल. बेंडखळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्याप्रमाणे या ललितलेखसंग्रहात कोकणातील त्यांच्या निसर्गरम्य गावाच्या सदाहरित आठवणी आहेत.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ. दत्ता पवार यांनी देखील आपले मत व्यक्त करताना असे नमुद केले  आहे  की ‘आठवणीतला गाव ’ या ललितलेख संग्रहातील वर्णने वाचताना वाचकालाही आपल्या गावाची आठवण आवर्जून होईल. गावाच्या आठवणी लिहितालिहिता लेखक बेंडखळे यांनी गावाच्या लोकांबद्दल तसेच तेथील निसर्ग, ग्रामसंस्कृती, गावातील चाली – रिती, तिथले रिवाज, उत्सव, सण आणि जत्रा या विषयांशी संबंधित असलेल्या आणि मनात खोलवर जपून व साठवून ठेवलेल्या आठवणी मनमोकळ्या पण आकर्षक पद्धतीने वाचकांसमोर मांडल्या आहेत. यामुळे हे पुस्तक त्यांच्या गावाकडच्या आठवणींचे केवळ एक स्मरण-रंजनात्मक गाठोडे न राहता तो अविस्मरणीय अनुभूतींचा एक मनोहारी चित्रपटच झाला आहे असे वाटते.

या आठवणीवजा ललित लेखांपैकी ‘गौरी गणपतीचे भारले दिवस’,’ गावचा दसरा –दिवाळी’,’ हरवत चाललेला गुढीपाडवा’,’‘ या तीन लेखांत बेंडखळे यांनी गावातील सण आणि उत्सव कशा प्रकारे साजरे होत व त्या वातावरणामुळे आपल्या लहानपणी लेखकाचे मन कसे भारावून जात असे, हे सोदाहरण दाखवून दिले आहे. विशेषतः कोकणात गौरी आणि गणपतीचा उत्सव मुंबईतील दिवाळीपेक्षाही कसा थाटामाटात साजरा केला जातो याचे तपशीलवार वर्णन वाचताना वाचकाच्या डोळ्यासमोर आपल्या गावातील गौर व गणपती डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहणार नाही. या लेखांत नुसते उत्सवी वातावरणच नव्हे तर त्या वेळचा हिरवागार निसर्ग व चैतन्यमय वातावरण याचे चित्रणही वाचकांना भुरळ पडेल इतके नितांतसुंदर रेखाटले आहे.

अशाच तऱ्हेने दसऱ्यातला नवरात्र व देवीपूजा आणि तो सण साजरा करण्याची  गावाकडची पद्धत मुंबईकडच्या भडक व उत्सवी स्वरूपाच्या नवरात्रीपेक्षा किती आगळी व वेगळी आहे, हे त्यांनी या लेखात सविस्तर लिहिले आहे.याच लेखात पुढे दिवाळीबद्दल लिहिताना गावातील लेखकाच्या घरातील कुटुंबिय आणि इतर नात्यागोत्यातील माणसे ज्या तऱ्हेने एकमेकास अगदी प्रेमाने व आपुलकीने  भेटत असत त्याचेही वर्णन केले आहे.

दिवाळीत फराळ बनविण्यापासून ते कंदील, उटणे , फटाके, कपडे इत्यादी खरेदी करण्याचा ज्या प्रकारचा उत्साह मुंबईत असतो त्यापेक्षा किंबहुना अधिकच उत्साह गावाकडल्या लोकांना त्या वस्तू स्वतः बनविण्यासाठी असायचा. हे लेखकाच्या बालपणी त्यांनी स्वतः पाहून अनुभवलं होतं. या लेखात नमूद केलेले उघड्यावरचे अभ्यंगस्नान, त्यासाठी पातेल्यात पाणी गरम करणे, सुगंधी उटणे घरीच बनविणे इत्यादी गोष्टी वाचून आताच्या रेडीमेड खरेदीच्या युगात वावरणाऱ्या वर्तमान पिढीतल्या मुलाना निश्चितच जुन्या जमान्यातल्या अशा गोष्टींचा एक अनोखा परिचय व विस्मित करणारा आनंद मिळेल.

अशाच तऱ्हेने नव्या वर्षाचे स्वागत करताना आपल्या गावी गुढीपाडवा कसा साजरा केला जात असे याचेही वर्णन आज मुंबईत राहणाऱ्या वाचकांना अनोखे वाटेल. याचे कारण बांबूच्या उंच काठीला रेशमी वस्त्र गुंडाळून, त्यावर फुलांची माळ आणि गोड बत्ताशाची माळ लटकावून वर तांब्याचे भांडे पालथे ठेवून जी गुढी दारात उभी करतात ते दृश्य मुंबईत फार थोड्या अपवादानेच आढळते.

आपल्या गावाच्या आसपास असणाऱ्या निसर्गाचे अद्भुत आणि मनोहारी दर्शन लेखकाने केवळ मोजक्या शब्दांत केलेलं असूनही  ते अतिशय तपशीलवार असल्याचे दिसून येते. जसे, ‘हवीहवीशी कातरवेळ’ या पहिल्याच लेखात संध्याकाळच्या समयी नटूनथटून येणाऱ्या कातरवेळेचे लोभस वर्णन करताना लेखक बेंडखळे लिहितात-

नकळत अंत: करणात अशी काव्याची मोरपिसे फुलवणारी हळवी कातरवेळ तिन्हीसांजेचे पाऊल जेव्हा रात्रीच्या उंबरठ्यावर थबकते तेव्हा सजून येते.’

लेखकाच्या या संवेदनशील हळवेपणाचे दर्शन त्यांनी काव्यात्मक शैलीत लिहिलेल्या निसर्गवर्णनात वाचकाला अगदी आपसूकच होते. हीच किमया त्यांनी आपल्या गावाचा निसर्ग कसा वैभवसंपन्न आहे आणि मनाचे सगळे बंद कप्पे खोलून टाकणारा आहे हे सांगताना’ बालपणीचा श्रावण ‘,‘पावसाच्या तीन तऱ्हा ’,‘ थंडी-धुके आठवताना’,‘ गावचा रानमेवा आणि मुंबई’, तसेच ‘आठवणीतला गाव ’ या अन्य लेखांतही केली आहे.

या संग्रहाचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू म्हणजे कोकणात आजही उपयोगात आणले जाणारे रोजच्या बोलण्यातले बरेच जुने शब्द या संग्रहातील लेखांतून बेंडखळे यांनी लीलया वापरले आहेत, याची काही उदाहरणे म्हणजे ‘वाकळ’,‘ पाटपाणी’, ‘ पागोळ्या’, ‘गोफ ’, ‘पानथळे’, ‘झिम्मा’, ‘दशम्या’, ‘कुणबी’‘दहीकाला’, ‘कडबोळी’, ‘पडवी’, ‘माजघर’, ‘झिम्माफुगडी’, ‘जत्तरकाठ्या’, ‘छबिना’, ‘भोकर’ व ‘उंबर’ ही रानफळे  इत्यादी  बोली भाषेतील शब्दांतून कोकणच्या लोकसंस्कृतीची एक झलक मिळते आणि त्यामुळे आजच्या पिढीला त्या शब्दांबद्दलचे संदर्भ कळू शकतात.

कोकणातील लोक संस्कृतीचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे गावागावात होणाऱ्या जत्रा. बेंडखळे  यांनी ‘गावची जत्रा’ या लेखात म्हटल्याप्रमाणे त्यावेळी खेडेगावात कष्ट करणाऱ्या खेडूतांसाठी मनोरंजनाची काही साधने नव्हती. लेखकाच्या गावात तर तंबू थियेटर देखील नव्हते. त्यावेळी रेडियो आणि टीव्ही यांचे तर नामोनिशाण नव्हते.अशा परिस्थितीत गावोगावचे लोक जत्रा  भरवून त्यातून काही आनंदाचे व विरंगुळ्याचे क्षण मिळवायचे. गावच्या जत्रेबद्दल लिहिताना बेंडखळे यांनी ‘मोडजत्रा’हा प्रकार काय आहे ते देखील अगदी सहजतेने वर्णन करून सांगितले आहे. गावाशी संबधित अशा अनेक अज्ञात संकल्पना, बरेच रोमहर्षक अनुभव, निसर्गातील विविधता व सौंदर्य, गावात बागडलेले बालपण व त्यावेळचे खेळ, घराघरातील आर्थिक दुरवस्था व त्यातूनही  मिळणाऱ्या अल्पशा आनंदाचे क्षण इत्यादी अनेक पैलूंचे सम्यक दर्शन बेंडखळे यांनी आपल्या रसदार लेखणीतून या पुस्तकातल्या सर्व लेखांतून यशस्वीरीत्या घडविले आहे.

कोकण म्हटलं की मुंबईहून गावी जाणारे चाकरमानी लोक आणि मुंबईचे संदर्भ आल्याशिवाय राहत नाहीत कारण मुंबईत पोटापाण्यासाठी नोकरी करणाऱ्या असंख्य लोकांची नाळ मात्र कोकणातल्या आपल्या मूळ गावाशी घट्ट जुळलेली असते. नेमका हाच धागा पकडून लेखक बेंडखळे आपल्या काही लेखांत मुंबईचे संदर्भ देताना दिसतात पण पुस्तक वाचताना आपणास हे जाणवते की हे संदर्भ जाणून बुजून आलेले नाहीत तर आपल्या ओघवत्या निवेदनाच्या ओघात लेखकाला कोकण व मुंबईच्या जीवनाची तुलना केल्याशिवाय राहवत नाही म्हणून आले आहेत. शिवाय काळाची पाने उलटताना व पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असताना कोकणी माणसांच्या जीवनात व संस्कृतीत झालेले प्रचंड बदल आता सहज पचनी पडत नाहीत याची खंतही लेखकाला असल्याचे या लेखसंग्रहात प्रतिबिंबित झाले आहे.

 ग्रंथाली प्रकाशनाने या पुस्तकाचे मुद्रण अतिशय सुबक पद्धतीने केलेले आहे. ग्रंथालीने आजवर जी अनेक संग्राह्य व वाचनीय पुस्तके मराठी वाचकांस दिली आहेत त्यांत या पुस्तकाने एक मोलाची भर टाकली आहे. चित्रकार पुंडलिक वझे यांचे मुखपृष्ठ पुस्तकाच्या विषयास अनुरूप आणि आकर्षक बनले आहे. लेखक बेंडखळे यांचे हे उत्कृष्ट ललित लेख  म्हणजे ग्रामीण संस्कृती व गावगाडा याबद्दल आस्था असणाऱ्या वाचनीय प्रत्येक मराठी वाचकाने आवर्जून वाचले पाहिजेत असे  व अशा स्मरणीय ललितलेखांचे संग्राह्य  पुस्तक ठरले आहे. याच कारणाने हे पुस्तक केवळ एक ललित लेखसंग्रह न राहता कोकणातील ग्रामीण संस्कृती आणि तेथले साठएक वर्षांपूर्वीचे जीवन याविषयीचे संदर्भमूल्य असलेला एक मोलाचा दस्तावेज ठरेल.

पुस्तकाचे नाव – आठवणीतला गाव (ललित लेखसंग्रह)
लेखक – अशोक बेंडखळे.
प्रकाशक – ग्रंथाली प्रकाशन, मुंबई    मोबाईल – 9869398934       
मूल्य – १०० रुपये, पृष्ठे – १००                                         


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading