December 12, 2024
Nature is true Master article by Rajendra Ghorpade
Home » होय, निसर्गच आपला खरा गुरु, यासाठी करा त्याची सेवा  
विश्वाचे आर्त

होय, निसर्गच आपला खरा गुरु, यासाठी करा त्याची सेवा  

मान्सूनचा पाऊस कधी गर्जना करत येत नाही. त्याचा प्रवेश हळूवार अन् शांततेत असतो. त्याच्या प्रवेशाने वातावरणात शीतलता येते. तो धावत असतो पण त्याच्या धावण्याचा त्रास वाटत नाही. धावता धावता वातावरणही तो प्रसन्न करत असतो. व्यायाम करताना आपले धावणेही असेच असावे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

आणि आदरे करी बहुवसें । परी कर्ता मी हें नुमसे ।
वर्षाकाळींचें जैसें । मेघवृंद ।। ६३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – आणि नित्यादिक कर्मे फार आदरानें करतो परंतु ज्याप्रमाणें वर्षाऋतूतील ढग गडबड अथवा गर्जना करीत नाहीत. त्याप्रमाणे नित्यादिक कर्मे केली असें कर्माचा अभिमान घेऊन बोलत नाही.

निसर्ग आपणास कसे वागायचे हे शिकवतो. पण आपण निसर्गाचे हे नियमच पाळत नाही. निसर्गाच्या प्रत्येक कृतीत कसे आचरण असायला हवे हे सांगितलेले जाते. पण आपण ही कृतीच विचारात घेत नाही. यासाठी सर्व प्रथम निसर्गाच्या नियमांचा आपण अभ्यास करायला हवा. त्यानुसार आपण आपली कृती करायला हवी. निसर्गातील अनेक गोष्टीच असे चमत्कार दडलेले आहेत. अनेक रोगांवरील औषधे शोधताना पूर्वीच्याकाळी वैद्य त्या अवयवांचा आकार कसा आहे हे पाहून वनस्पतीची फुले शोधत. ही फुलेच त्या रोगावरील औषधे असत. निसर्गाचे हे अद्भुत रहस्य अभ्यासायला हवे. कारण निसर्गच आपणास सुख अन् समाधान देतो. यासाठी निसर्गाचे संरक्षण, या निसर्गातील जैवविविधतेचे संवर्धन हे करायलाच हवे. असे केल्यास आपले जीवनही आनंदाने भरून जाईल.

निसर्गाचे संवर्धन करण्यात आपण कमी पडत आहोत. आपल्या हव्यासा पोटी आपण निसर्गाचे मोठे नुकसान करत आहोत. अशाने आपणच आपला घात करत आहोत हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. पर्यावरणाचा विचार न करता आपण विकासाच्या गप्पा मारत आहोत. अशाने विकास नव्हे तर विध्वंसच अधिक करत आहोत. हवा, पाणी, वायू, गगन याचे प्रदुषणच होत आहे. पंचमहाभूतांचे प्रदुषण होत आहे. म्हणजेच पंचमहाभूतापासून तयार झालेला देह सुद्धा प्रदुषित होत आहे. आरोग्याच्या मोठ्या समस्या उत्पन्न होत आहेत. अनेक असाध्य रोग या प्रदुषणामुळे होऊ लागले आहेत.

पावसाचे पाणी शुद्ध असते. ते जमिनीत मुरते अन् तेच आपणाला वर्षभर पुरते. पण सध्या जमिनीचे प्रदुषण झाले आहे. विविध रसायनांच्या वापराने जमिनच प्रदुषित झाली आहे. अशाने विहीरी, जलसाठेही प्रदुषित होत आहेत. या दुषित पाण्यामुळेच आरोग्याच्या मोठ्या समस्या उभ्या राहात आहेत. भावीकाळात पाण्याची शुद्धता आपण ठेऊ शकलो नाही, तर आपण जगुही शकणार नाही. यासाठी प्रथम जलप्रदुषण रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे. जलसाठे प्रदुषित होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. यावर उपाययोजना करायला हवी. निसर्ग आपणास शुद्ध राहायला शिकवतो. पाणी शुद्ध ठेवाल तर आरोग्यही सुदृढ, निरोगी राहील. मनात शुद्ध विचार ठेवाल, तर तेच विचार आचरणात येतील. शुद्ध मनाची कृतीही शुद्धच असेल. यासाठी मनाला चांगल्या विचारांची सवय लावायला हवी. मनाची शुद्धता हीच सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे.

मान्सूनचा पाऊस कधी गर्जना करत येत नाही. त्याचा प्रवेश हळूवार अन् शांततेत असतो. त्याच्या प्रवेशाने वातावरणात शीतलता येते. तो धावत असतो, पण त्याच्या धावण्याचा त्रास वाटत नाही. धावता धावता वातावरणही तो प्रसन्न करत असतो. व्यायाम करताना आपले धावणेही असेच असावे. यातून मनाची प्रसन्नता वाढते. धावताना त्रास होता कामा नये. दम भरता कामा नये. थकवा जाणवता कामा नये. असा धावण्याचा वेग हवा. वळवाचा पाऊस असा नसतो. तो इतक्या वेगात येतो अन् होत्याचे नव्हते करून सोडतो. इतक्या जोरात बरसतो की सगळीकडे पाणीच पाणी अन् नुकसानच नुकसान करून टाकतो. असे धावणे आपले नसावे. ते आरोग्यासही उपायकारक असते.

अशा अनेक कृतीतून निसर्ग आपणास कसे वागायचे हे शिकवतो. जीवनातील कामे ही शांत चित्ताने करावीत. घाई गडबड न करता योग्य विचाराने करावीत. त्याचा वेग हा मर्यादीत असावा. कर्माचा गाजावाजा करून. गर्जना करून कामे केल्यास काम कमी नुकसानच अधिक होते. बघ मी किती झपाट्यात काम करतो, हा गर्वच आपणाला संपवतो. निसर्गातील पावसाचा हा नियम लक्षात घेऊन यातून शिकायला हवे. गाजावाजा करून बरसण्यापेक्षा शांत अन् संततधारेप्रमाणे कामे करत राहील्यास लाभ अधिक होईल. निसर्गाचे हे नियम लक्षात घेऊन निसर्गाचे संवर्धन हे करायला हवे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

1 comment

Gangadhar Patil September 21, 2023 at 8:31 AM

Excellent information sirij

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading