स्वतःवर विजय संपादन करणे हा प्रत्येक मानवाचा धर्म आहे. देह हे राज्य आहे असे समजून त्यावर विजय संपादन करायला हवा. स्वच्या ओळखीतून हे सर्व शक्य होते. यासाठी मी कोण आहे ? याचा शोध घेणे हा प्रत्येक मानवाचा स्वधर्म आहे. यासाठीच हा मानव जन्म आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
ऐसेनि ब्रह्मैक्यासारिखें । स्वराज्य येतां जवळिकें ।
झळंबित आहे हरिखें । तिन्ही ोलक ।। १०७२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – याप्रमाणें ब्रह्मैक्यासारखे स्वराज्यजवळ येत असताना तो साधक तिन्ही लोक आनंदाने भरून टाकीत आहे.
स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा दृढ संकल्प लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केला होता. भारताच्या स्वातंत्र्यासाठीच नव्हे तर व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी, संस्कृती संवर्धनासाठी हा संकल्प त्यांनी केला होता. संशोधक आणि अभ्यासकांच्या मते टिळकांनी शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पनेपासून राजकीय प्रेरणा घेतली होती. अध्यात्मिक राष्ट्रवादाचे टिळक या लेखामध्ये अभ्यासक व्ही. पी. वर्मा यांनी स्वराज्य या शब्दाचा उगम सांगितला आहे. सवर्त किंवा स्वराज्य हा वैदिक शब्द असून वैदिक वाङ्मयात हा आढळतो. या शब्दाला राजकीय अर्थ असून त्याचा अर्थ स्वातंत्र्य किंवा शासन करणे होय. उपनिषदामध्ये ही संकल्पना अध्यात्माच्या दृष्टिकोनातून मांडलेली आढळते. महात्मा गांधी यांच्याप्रमाणे टिळकांनी देखील स्वराज्याला आत्मिक अर्थ दिला आहे. ते स्वराज्याला आत्मा मानत होते. विनोबा भावे यांनी स्वराज्यशास्त्र मध्ये स्वराज्याचा अर्थ सांगितला आहे. विनोबा म्हणतात, राज्य निराळे, स्वराज्य निराळे, राज्य हिंसेने मिळवता येते. स्वराज्य अहिंसेशिवाय अशक्य…स्वराज्य म्हणजे प्रत्येकाचे राज्य, म्हणजे प्रत्येकाला माझे वाटेल असे राज्य, म्हणजे सर्वांचे राज्य, म्हणजेच रामराज्य.
या सर्वांचा विचार करता या स्वराज्य संकल्पनेला आध्यात्मिक बैठक आहे. दृढसंकल्पाशिवाय हे अशक्य आहे. स्वतःवर विजय संपादन करणे हा प्रत्येक मानवाचा धर्म आहे. देह हे राज्य आहे असे समजून त्यावर विजय संपादन करायला हवा. स्वच्या ओळखीतून हे सर्व शक्य होते. यासाठी मी कोण आहे ? याचा शोध घेणे हा प्रत्येक मानवाचा स्वधर्म आहे. यासाठीच हा मानव जन्म आहे. त्यावर आपला हक्क आहे आणि मिळवण्यासाठीच दृढसंकल्प करायला हवा. मीपणाचा अहंकार जायला हवा. यातून ब्रह्मैक्य प्राप्त झाल्यावर मिळालेल्या स्वराज्याने हे जग आनंदी करण्याचा प्रयत्न करायला हवा. अर्थातच हे सुशासन अन् सुराज्य असणार आहे.
प्रत्येकाचा स्वभाव हा एकसारखा नाही. या जगात ना ना विचारांचे लोक आहेत. तऱ्हे तऱ्हेचे लोक येथे वास्तवास आहेत. प्रत्येकाला मोह सुटलेला आहे. अशा या मोहामुळेच सर्व जग भरडले जात आहे. मानवाच्या अपेक्षा अन् गरजांना आता मर्यादाच उरलेली नाही. दिवसेंनदिवस त्या वाढतच चालल्या आहेत. अशाने माणसाचे स्वास्थ मात्र बिघडत चालले आहे. पण याकडे पाहायला या मानवाला वेळ नाही. आता मात्र त्याला जागे करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अन्यथा मोठा विद्धंस होऊ शकतो. नुकसान झाल्यानंतरच तो भानावर येतो. पैसा हा कसाही कमावत येऊ शकतो. यात काही मोठेपणा नाही. हे समजूनही पैशाचा मोह मात्र त्याचा सुटत नाही. अशा या बदलत्या जीवनशैलीने त्याचे जीवनच बदलले आहे. हे नको ते हवे, ते नको हे हवे अशा अस्थिर मनस्थितीत आज हा मानव वावरत आहे.
अशा या बिकट मनस्थितीतून त्याला बाहेर काढण्याची गरज आहे. यासाठीच त्याला स्वराज्याचा अर्थ समजून सांगायला हवा. स्वधर्म सांगायला हवा. स्वराज्यातून मिळणारा शाश्वत अन् खरा आनंद अनुभवयास हवा. एकदा का हे स्वराज्य मिळाले तर तो निश्चितच सुराज्य करून टाकेल. यासाठी देहाचे राज्य सोडून आत्मराज्यांची अनुभुती घ्यायला हवी अन् आत्मज्ञानी होऊन सुराज्यासाठी सेवा द्यायला हवी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.