लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाचे (सन १९२२-२०२२) औचित्य साधत ‘राजर्षी शाहूंची : वाङ्मयीन स्मारके’ हा ग्रंथ आपणास सुपूर्द करताना कर्तव्यपूर्तीचा आनंद होत आहे. राजर्षी शाहूंच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात ‘कृतज्ञता पर्व’ साजरे करण्यात आले. काही ग्रंथ, पुस्तके, स्मृतिविशेषांक प्रकाशित करण्यात आले. मी हा एक आगळा वेगळा ग्रंथ तमाम मराठी वाचकांसाठी, शाहू प्रेमींसाठी सादर करीत आहे. स्मतिशताब्दी वर्षानिमित्ताने संस्मरणीय स्वरूपाचा एखादा प्रकल्प योजावा, राबवावा असा विचार माझ्या मनात तीन-चार वर्षांपूर्वीच आला; आणि त्यातूनच ‘वाङ्मयीन स्मारके’ ही संकल्पना निश्चित झाली.
डॉ. जे. के. पवार (तडसरकर)
स्मारकांचे स्वरूप आणि व्याप्ती
‘ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची, घटनेची किंवा प्रसंगाची आठवण राहण्यास मदत होते, त्या सर्वांना स्मारके असे म्हटले जाते. ‘ असा स्मारकांचा सर्वसाधारणपणे अर्थ सांगितला जातो. त्यामुळेच थडगी, स्तंभ, देवळे, मिनार, कमानी, स्तूप, स्तंभलेख, वीरगळ, सतीचे दगड, पुष्करिणी, हौद, इत्यादी विविध प्रकार स्मारकांमध्ये गणले जातात. व्यक्ती, प्रसंग किंवा घटना यांच्या स्मरणार्थ बांधलेली वास्तू, उभारलेल्या संस्था यांचाही समावेश स्मारकांमध्ये केला जातो. अर्थात् या प्रत्येक वास्तूला पार्श्वभूमी असून इतिहासही असतो. स्मारकांची सुरुवात कशी झाली, याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही; तथापि इ. स. पूर्व काळात प्राचीन संस्कृतीत ती प्रचलित असल्याचे अनेक पुरातत्त्वीय दाखले मिळतात. इजिप्तमधील विविध देवतांची देवळे, राजाराणींचे पुतळे किंवा पिरॅमिड ही प्राचीन स्मारके होत. ग्रीकमध्ये थोर पुरुषांचे पुतळे किंवा थडगी, विविध देवतांची देवळे हाही स्मारकांचाच प्रकार आहे. रोममधील देवळे, त्याचप्रमाणे रोमनांनी उभारलेल्या विजयद्योतक कमानी हाही स्मारकाचाच एक प्रकार आहे.
आपल्या देशात बौद्ध स्तूपाच्या रूपातील प्राचीन स्मारके आहेत. तसेच चितोडचा मध्ययुगीन स्तंभ, आग्रा येथील ताजमहाल, दिल्ली येथील कुतुबमिनार व इंडियागेट, जयपूर येथील हवामहल, कोलकत्ता मधील व्हिक्टोरिया मेमोरिअल, हैदराबाद येथील चारमिनार ही आपल्या देशातील काही उल्लेखनीय स्मारके आहेत. आपल्या देशातील छोट्या-मोठ्या गावांमध्ये, शहरांमध्ये अनेक थोर पुरुषांचे, महात्म्यांचे, विशेषत: क्रांतिकारक व राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. ही सर्व राष्ट्रीय स्मारकेच आहेत. काही ठिकाणी हुतात्मा स्मारकेही उभारलेली आहेत. ही सर्व स्मारके त्या त्या राष्ट्राचा सांस्कृतिक व प्रतिष्ठेचा ठेवा असतात. महात्म्यांचा जाज्ज्वल्य इतिहास अशा स्मारकांमधून जतन केला जातो. ही सर्व स्मारके आताच्या आणि भावी अनेक पिढ्यांना, स्फूर्ती, प्रेरणा देतात. ह्या सर्व स्मारकांप्रमाणे ग्रंथ, पुस्तके इत्यादीमधूनही महात्म्यांच्या जीवन- कार्याचा इतिहास जतन केला जातो; असे अक्षर साहित्यसुद्धा अनेक पिढ्यांना स्फूर्ती, प्रेरणा देतात. त्यामुळेच मी अशा वाङ्मयीन स्मारकांबद्दल विशेषतः लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या संदर्भातील वाङ्मयीन स्मारकांबद्दल ग्रंथ प्रकाशित करण्याचे निश्चित केले आणि ते कृतीत उतरवले आहे.
लोकराजा शाहू राजांचे श्रेष्ठत्व
इतिहास निर्माण केला आहे. अर्थात जनतेच्या कल्याणासाठी आपले राजेपद पणाला लावणारे, आपले जीवन आपल्या हिंदुस्थानच्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले आहेत. अनेक राजांनी आपापला जाज्ज्वल्य मध्ययुगीन भारताच्या इतिहासात बादशहा अकबर, तसेच हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारे छत्रपती खर्ची घालणारे राजे संख्येने फार कमी होते. अर्थात् प्राचीन भारताच्या इतिहासात सम्राट अशोक, त्यानंतर संस्थानचे राजे महाराजा सयाजीराव गायकवाड ही नांवे त्यामध्ये अग्रस्थानी आहेत. ह्या सर्व राजांनी शिवाजी महाराज, आधुनिक भारताच्या इतिहासात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि बडोदा लोककल्याणाचे जे कार्य केले आहे त्याची इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झालेली आहे.
हिंदुस्थानच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासाला ज्या थोर पुरुषांनी आपल्या कर्तृत्वाने नवी दिशा पैलूं संदर्भात अलौकिक, देदिप्यमान आणि क्रांतिकारक कार्य केलेले राजर्षी शाहू हे महापुरुष होते. महापुरुषाची दिली; त्या महान नेत्यांमध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे नाव अग्रस्थानी आहे. मानवी जीवनाच्या सर्वच पैलू संदर्भात अलौकिक, दैदिप्यमान आणि क्रांतिकारक कार्य केलेले राजर्षी शाहू हे महापुरूष होते, महापुरूषाची व्याख्या करताना प्लेकनॉव्ह म्हणतात, “महापुरुष हा महापुरुष ठरतो, कारण त्याच्या जागी असे काही गुण सर्वसाधारण व विशेष कारणातून उत्पन्न झालेल्या असतात. तो अगदी नवीन कार्याचा आरंभ करतो. कारण तो इतरांपेक्षा अधिक पुढचे पाहू शकतो व त्याची कळकळ इतरांपेक्षा अधिक तीव्र असते.” लोकराजा राजर्षी शाहू महाराज हे अगदी असेच होते. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार आणि आर्थिक क्षेत्रातील त्यांची कार्ये ही त्याची साक्ष देत आहेत.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे राजा म्हणून जेवढे श्रेष्ठ होते तेवढेच “माणूस” म्हणूनही ते श्रेष्ठ होते. म्हणूनच त्यांचे वर्णन करताना ‘राजातील माणूस आणि माणसातील राजा’ असे यथार्थपणे केले जाते. राजा कसा असावा याचे विवेचन प्राचीनकाळी क्षत्रीय वर्गापैकीच एक थोर गुरुवर्य भीष्माचार्य यांनी केलेले आहे. भीष्माचार्य म्हणतात, राजा हा धर्मनिष्ठ, प्रजेचे पुत्रवत् पालन करणारा, निर्व्यसनी, कर्तव्याविषयी तत्पर, सत्याची आवड धरणारा, न्याय देणारा, अति सौम्यही नाही, अति उग्रही नाही असा थोरमनाचा, सहृदय अंत:करणाचा, वृद्ध व विद्वान यांना मान देणारा असा असावा. जोपर्यंत आपण सरळ व न्यायाने चाललो आहोत, तोपर्यंत राजा अगर त्याचे अधिकारी आपल्या वाटेस जाणार नाहीत, अशी राज्यांतील प्रत्येक मनुष्यास धास्ती असावी व प्रसंग पडल्यास राजाच्या व राज्याच्या संरक्षार्थ आपण प्राण सुद्धा खर्ची घालू इतकी दृढ प्रजेच्या ठायी वसत असावी. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची कारकीर्द भीष्माचार्यांनी वर्णन केल्याप्रमाणे किंबहुना त्याहीपेक्षा अधिक सरस होती असे म्हटले तर संयुक्तीकच ठरेल असे माझे मत आहे. जगातील प्रत्येक देशात राष्ट्रपुरुष झालेत. परंतु जीवनमूल्याचा मूलगामी क्रांतिकारक विचार मांडणारा द्रष्टा राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजांचेच नाव आदराने आणि अभिमानाने घेतले जाते. राजर्षी शाहू महाराज लोकनेते होते. समाजाला मानवी समान संधीचे मूलभूत हक्क मिळवून देणारे ते थोर राष्ट्रपुरुष होते. राजर्षी शाहूंनी सत्तेला सेवेचे व ध्येयाचे साधन बनविले. जनतेचा सेवक, शिपाई किंवा शेतकरी म्हणवून घेण्यात त्यांना सार्थ अभिमान वाटत असे, ते खरे लोकसेवक होते. त्यामुळेच त्यांनी लोकहितासाठीच राज्यकारभार पाहिला.
छत्रपती शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. १७ मार्च १८८४ रोजी म्हणजे वयाच्या १०व्या वर्षी त्यांचा दत्तक विधान समारंभ संपन्न झाला. तर वयाच्या २०व्या वर्षी दिनांक २ एप्रिल १८९४ रोजी शाहूंनी करवीर संस्थानची राज्यसूत्रे स्वीकारली, म्हणजेच शाहूंचा राज्याभिषेक झाला. राजर्षी शाहू महाराजांना केवळ ४८ वर्षांचे आयुष्य लाभले. ६ मे १९२२ म्हणजे वयाच्या ४८व्या वर्षी त्यांचे अकाली निधन झाले. याचा अर्थ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा कर्तबगारीचा मे १९२२ रोजी कालावधी, दिनांक २ एप्रिल १८९४ ते दिनांक ६ मे १९२२ म्हणजे उणीपुरी २८ वर्षेच होता. अर्थात् या अल्पकालावधीचेही राजर्षी शाहूंनी सोनेच केले.
छत्रपती शाहू महाराजांनी वयाच्या २० व्या वर्षी २ एप्रिल १८९४ रोजी कोल्हापूर (करवीर) संस्थानच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली आणि आपली प्रत्यक्ष राजवट सुरू केली. विशेष म्हणजे ही घटना करवीर संस्थानच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची होती. कारण त्यामुळे सन १८४४ पासून चालू असलेले ब्रिटिश राजकीय प्रतिनिधींचे ‘रीजन्सी प्रशासन’ संपुष्टात येऊन त्या जागी छत्रपती शाहूंची प्रत्यक्ष राजवट अस्तित्वात आली आणि करवीरच्या प्रजेला प्रत्यक्ष राज्यकारभार करणारा एक समर्थ राजा कित्येक वर्षांनंतर मिळाला.
राज्यारोहण समारंभादिवशीच म्हणजे २ एप्रिल १८९४ रोजी छत्रपती शाहूंनी आपल्या प्रजाजनांस उद्देशून एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात छत्रपती शाहूंनी प्रजेच्या कल्याणाची व भरभराटीची ‘उत्कट इच्छा’ व्यक्त केली आहे. या जाहीरनाम्यात २० वर्षे वयाचे तरुण छत्रपती शाहू लिहितात, आमचे प्रजाजन सदा सुखी आणि संतुष्ट असावे, त्यांच्या हितसंबंधांची एकसारखी अभिवृद्धी होत जावी आणि आमच्या संस्थानचा सर्व बाजूंनी अभ्युदय व्हावा, अशी आमची उत्कट इच्छा आहे. हा उद्देश सफल होण्याच्या कामी आमचे जहागीरदार, आप्तजन, सरदार, मानकरी, इनामदार, कामदार, सर्व दर्जाचे शेठ, सावकार आणि इतर प्रजाजन यांच्या उज्ज्वल राजनिष्ठेची व सहकार्याची आम्हास आवश्यकता आहे. आज आमच्या अमदानीस सुरुवात होण्याच्या दिवशी आमचा राज्यकारभार दीर्घकालपर्यंत टिकून तो सुखद व्हावा म्हणून आम्ही त्या परात्पर जगत्चालकाच्या अनुग्रहासाठी प्रार्थना करतो.
अर्थात् यापूर्वी गुरुवारी ३ मे १८८८ रोजी कोल्हापूर स्टेट रेल्वे लाईन बांधणीचा प्रारंभ युवराज शाहूंच्या शुभहस्ते झाला. त्यावेळी युवराज शाहूंचे वय १४ वर्षांचे होते. या बालवयात युवराज शाहूंनी छोटेसे भाषण केले. या भाषणात ते म्हणतात, हे आगगाडीचे काम तडीस गेल्याने माझ्या राज्याची संपत्तीची साधने वाढण्याच्या कामी ह्याचा फायदेशीर परिणाम होईल आणि माझी अशी उमेद आहे की, साहजिकरितीने घडून येणाऱ्या क्रमाप्रमाणे आजपासून ३ वर्षांच्या आत हा आगगाडीचा रस्ता सुरु करण्याचे काम माझे हातून होईल ! आपण सर्व लोककल्याणास झटणारे इंग्रज सरकारच्या आश्रयाखाली आहोत आणि आपणांस माहीत आहे की, माझ्या अल्पवयात कोल्हापूरचे कल्याण करण्याकरिता हरएक कृत्य केले जाईल व हा आगगाडीचा रस्ता हे एक त्यापैकी ठळक उदाहरण होय, असे मी जाणतो.”
यावरून हेच स्पष्ट होते की, लोकांचे कल्याण चिंतणारा हा राजा होता. या राजाला सत्तेची धुंदी कधी आली नाही. आपली सारी सत्ता-ताकद-पैसा राजर्षींनी आपल्याच रयतेच्या भल्यासाठी खर्ची घातली. सत्ता कशी व कोणासाठी वापरली जाते त्यावरून त्या त्या सत्ताधिशांचे मोठेपण लक्षात येते. राजर्षी शाहू महाराजांनी चैनीसाठी नव्हे! राजा असूनही जनतेचे ते नम्र सेवक होते व धनिक असूनही संन्यासी होते. राजर्षी शाहू सर्व सत्ता व अधिकार वापरले ते समाजात समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठीच! स्वत:च्या ख्यालीखुशाली, महाराजांच्या सामाजिक कार्यामुळे व सर्वसामान्य माणसाच्या उन्नतीसाठी त्यांना लागलेल्या ध्यासामुळे मद्रासच्या ‘जस्टीस’ वृत्तपत्राने त्यांना – ‘ते मनुष्यामध्ये राजा होते आणि राजांमधील मनुष्य होते’ असे म्हटले आहे. खरोखरच अगदी यथार्थ शब्दांत राजर्षीचा ‘जस्टीस’ ने हा गौरव केला आहे. राजर्षी शाहू प्रथम ‘माणूस’ होते आणि नंतर ‘राजा’ होते. त्यामुळेच सामान्य माणसांची सुखदुःख त पाहू शकले, आणि ‘राजा’ म्हणून आपल्या अधिकारात त्यांच्या दुःखांचा भार कमी करण्याचा प्रयत्न केला.
‘प्रजेचे सुख ते राजाचे सुख. तिचे जीवन ते आपले जीवन. प्रजेव्यतिरिक्त राजाला अन्य जीवन नसते. राजाला फक्त कर्तव्ये असतात. हक्क नसतात. म्हणून प्रजेचा उत्तरदायी राजा असतो’, हे राजतत्त्वाचे बाळकडू राजर्षी शाहू महाराजांना बालपणापासूनच मिळत गेले. त्यामुळे राजर्षी शाहंनी स्वकर्तृत्वाने राजधर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करून दाखविले. एवढेच नव्हे तर, राजधर्माने मानवी जीवनातील सर्व धर्मांचा विकास करता येतो हेही त्यांनी आपल्या प्रचंड कार्याने दाखवून दिले. राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रिडाक्षेत्र अशा सर्वच क्षेत्रांबद्दल क्रांतिकारक विचार मांडले आणि त्या विचारांनुसार कार्यही केलेले आहे. त्यामुळेच आधुनिक महाराष्ट्राचा एक निष्ठावंत भाग्यविधाता अशी इतिहासात त्यांची नोंद झाली आहे.
शताब्दी महोत्सवांची श्रृंखला
कल्याणकारी राज्याचा विचार रुढ झालेल्या काळात व्यापक, समावेशक राज्य व्यवस्थेची उभारणी करणाऱ्या जगातील काही मोजक्या राजांमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा समावेश होतो. समाजातील दुर्बलांचा विचार करणारा, सर्व धर्म, जाती-जमाती यांना एकत्रित घेऊन जाणारा, सामाजिक विषमतेचा धिक्कार करणारा आगळा-वेगळा राजा म्हणून राजर्षी शाहू महाराज सर्वश्रेष्ठ ठरले आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक सुधारणा आजही मैलाचा दगड ठरत आहेत. शिक्षण, आरक्षण, जातिव्यवस्थेविरूद्ध लढा, स्त्री-पुरुष समानता इत्यादी क्षेत्रातील राजर्षी शाहूंचे कार्य अतुलनीय ठरले आहे. त्यामुळेच सन १९७४-७५ मध्ये राजर्षी शाहूंची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. तर एप्रिल १९९४ मध्ये राजर्षी शाहूंच्या राज्यारोहणाची शताब्दी, सन २००२ मध्ये राजर्षीच्या ऐतिहासिक अशा आरक्षण धोरणाची शताब्दी आमजनतेने भव्यदिव्य स्वरुपात साजरी केली. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणक्षेत्रात अनेक अभिनव, धाडसी व बहुजन समाजाच्या कल्याणाला उपयुक्त ठरतील असे उपक्रम राबविले. सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण ही राजर्षी शाह महाराजांची शिक्षणक्षेत्रातील सर्वात मोठी कामगिरी होय. ‘मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण’ या धोरणाची शताब्दी सन २०१७ मध्ये साजरी केली गेली. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये ‘वसतिगृहात्मक शिक्षणाची’ चळवळ सुरु केली. त्यातून सन १९०१ ते १९२१ या कालावधीत कोल्हापूर शहरात २२ वसतिगृहे सुरु केली. त्यामुळेच ‘कोल्हापूर शहर हे विद्यार्थी वसतिगृहांचे जननी’ ठरले गेले. राजर्षी शाहूंच्या भक्कम आधारावर उभा राहिलेल्या या वसतिगृहांतून सन १९०१ पासून ते २०२२ पर्यंतच्या कालखंडात मागास जातीचे आणि बहुजन समाजाचे हजारो विद्यार्थी शिकून बाहेर पडले आहेत. राजर्षी शाहूंच्या या वसतिगृहात्मक शिक्षण चळवळीची शताब्दीही सन २००१ मध्ये साजरी करण्यात आली. शिवाय सन २००१ ते २०२१ पर्यंत प्रत्येक वसतिगृहाने विविध उपक्रमांद्वारे आपापल्या वसतिगृहाचा शतक महोत्सव साजरा केला.
‘राजर्षी’ बिरूदावलीची शताब्दी
देशाच्या सामाजिक पटलावर समतेचा संदेश देत बहुजनांसाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून उत्तर प्रदेशातील कानपूर येथे अखिल भारतीय कुर्मी क्षत्रीय महासभेच्या १३व्या अधिवेशनात छत्रपती शाहू महाराजांना ‘राजर्षी’ हा मानाचा किताब समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. २१ एप्रिल १९१९ रोजी घडलेल्या या ऐतिहासिक घटनेची, सुवर्णक्षणाची शताब्दी सन २०१९मध्ये महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशात फार मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात आली होती.
क्रांतिकारी हुकुमाची शताब्दी
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कर्तृत्वाची समर्थ कारकीर्द म्हणजे तेजाची गाथा होती. राजर्षीचे संपूर्ण जीवन व कार्य चैतन्याचा एक अथांग महासागर होता. अनाथ बालकांच्या कल्याणासाठी, काळजी व संरक्षणासाठी राजर्षींनी ११ जानेवारी १९२० रोजी जो हुकूम काढला होता; त्या हुकूमाची शताब्दी शनिवार दिनांक ११ जानेवारी २०२० रोजी संपन्न झाली. करवीर संस्थानच्या वार्षिक बजेटमध्ये अनाथ बालकांसाठीच्या संस्थांच्या दरसालच्या खर्चाची तरतूद करण्याचा क्रांतिकारी हुकूम राजर्षी शाहूंनी ११ जानेवारी १९२० रोजी काढला होता. अनाथ मुलांचे जेवण, कपडे, पुस्तके वगैरे करिता दरसालच्या बजेटमध्ये त्याकाळात १०,८०० रुपयांची तरतूद केली होती. राजर्षीनी ‘कर्नल वुडहाऊस अनाथ विद्यार्थी बोर्डिंग हाऊस’ नावाने एक वसतिगृह सुरु केले होते.
स्मृतिशताब्दी वर्ष / कृतज्ञता पर्व
अखिल मानवजातीचे कल्याण हाच आपला ध्यास आणि श्वास मानून संपूर्ण आयुष्यभर लोककल्याणाचे कार्य करणाऱ्या रयतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृतिशताब्दी वर्ष (६ मे १९२२ ते ६ मे २०२२) होते. त्यानिमित्त ६ मे २०२२ रोजी शंभरावा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्यादिवशी सकाळी ठिक ११ वाजता शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून आम जनतेने आपल्या लोकराजाला भावपूर्ण आदरांजली वाहिली. पंधरादिवसाचे कृतज्ञता पर्व साजरे केले, यामध्ये अनेक उपक्रमांद्वारे रयतेच्या राजाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली गेली.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्य कर्तृत्वावर गेल्या १३७ वर्षात असंख्य पुस्तके, ग्रंथांची निर्मिती झाली आहे. त्यातून राजर्षी शाहूंच्या समर्पित जीवन, कार्यावर प्रकाश पडला. राजर्षी शाहूंच्या कार्याचे विविध पैलू शाहूप्रेमींपुढे, बहुजन समाजापुढे आले. आजही राजर्षी शाहूंच्या कार्यावर संशोधन, अभ्यास सुरु आहे. जुन्या पिढीतील संशोधकांनी केलेल्या संशोधनानंतर आता नव्या पिढीतील संशोधक, अभ्यासक राजर्षी शाहूंच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा शोध घेत आहेत, त्यातून ग्रंथनिर्मितीही केली जात आहे.
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांवर आजपर्यंत प्रकाशित पुस्तिका, पुस्तके, ग्रंथ, गौरव अंक इत्यादी आता दुर्मिळ झाले आहेत, त्याकडेही नव्यापिढीसह सर्वच शाहूप्रेमींचे लक्ष वेधावे यासाठीच ‘राजर्षी वाङ्मयीन स्मारके’ हा ग्रंथ साकारला आहे. शाहूंच्यावरील १८० पुस्तकांचा, ग्रंथांचा, विशेषांकांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न मी माझ्यापरिने केलेला आहे. राजर्षी शाहूंच्या प्रस्तुत ग्रंथामध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन-कार्यावर आधारित हयातीतच जी पुस्तके प्रकाशित झाली त्यापैकी तीन पुस्तकांचा परिचय मी करून दिलेला आहे. त्याचबरोबर आणि विद्यमान काळातील लेखकांनी राजर्षी शाहूंच्या जीवन-कार्यावर, कार्यातील विविध पैलूंवर पुस्तकरुपाने राजर्षी शाहूंच्या सान्निध्यातील काही लेखक, समकालीन लेखक, शाहू उत्तर काळातील संशोधक, लेखक जो प्रकाशझोत टाकला आहे. अशा उपलब्ध झालेल्या १८० पुस्तकांचा परिचय ‘राजर्षी शाहूंची वाङ्मयीन स्मारके’ मध्ये दिलेला आहे. त्यामध्ये राजर्षी शाहंचे जीवन-चरित्र, स्मारकग्रंथ, गौरव ग्रंथ, राजर्षी शाहूंच्या भाषणांचे संग्रह, त्यांच्या आठवणी, त्यांची पत्रे, राजर्षी शाहूंचे जाहिरनामे, आदेश, हुकूमनामे, त्याचबरोबर राजर्षी शाहूंच्या जीवनकार्यावरील कादंबरी, नाटक, कथासंग्रह, काव्यसंग्रह, पोवाडे असे जे जे पुस्तक, प्रांश रूपाने प्रकाशित झालेले आहे, अशा सर्व साहित्यकृतींचा समावेश आहे.
राजर्षी शाहूवरील पहिले पुस्तक
कागलच्या घाटगे घराण्यातील यशवंत जयसिंगराव घाटगे हा मुलगा वयाच्या १०व्या म्हणजे १८८४ साली करवीर संस्थानच्या छत्रपती घराण्यात दत्तक आला आणि पुढे ते छत्रपती शाहू महाराज झाले. छत्रपती शाहूंच्या दत्तक विधानाची सविस्तर पुस्तक स्वरूपात माहिती देणारे ‘श्रीमन्महाराज शाहू छत्रपती सरकार करवीर यांच्या दत्तकविधानाची हकिकत सन १८८५ इ.’ हे पुस्तक दिनांक २५ फेब्रुवारी १८८५ रोजी प्रकाशित झाले होते. कोल्हापुरातील सेंट्रल मराठी स्कूलचे हेडमास्तर आणि इतिहासाची जाण असणारे अभ्यासक सदाशिव महादजी देशपांडे यांनी ऐतिहासिक दत्तकविधान सोहळ्याची नोंद पुस्तकरुपाने १३७ वर्षांपूर्वीच करून ठेवली होती. या पुस्तकात श्री. देशपांडे यांनी शाहू छत्रपतींचा दत्तकविधी समारंभ कसा पार पडला. त्या काळातील मानकरी, दरबारातील मानपान, समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व लोक, त्यांनी शाहू महाराजांना दिलेले
आहेर, मानपत्र इत्यादी विषयी सखोल माहिती दिलेली आहे.
एकशे सदतीस वर्षांपूर्वीचे कोल्हापूरचे सामाजिक व राजकीय जीवन, तत्कालीन दरबारी-चालीरीती, रिवाज, समाजपद्धती यांची ओळख करून देण्यास सहाय्यभूत ठरणारा हा ऐतिहासिक ग्रंथ आता दुर्मिळ झाला होता. माजी प्राचार्य डॉ. विलास पोवार यांनी हा ग्रंथ संपादित करून १७ मार्च २०१९ रोजी ग्रंथाची द्वितीय आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. हेडमास्तर सदाशिव महादजी देशपांडे लिखित हे पुस्तक लोकराजा राजर्षी शाहू महाराजांवरील पहिलेच पुस्तक असावे असे माझे मत आहे
दत्तक विधानाची हकिकत नंतर मुक्त्यारीसमारंभाचे ‘अक्षर धन’
शाहू छत्रपतींच्या दत्तकविधानाची हकिकत पुस्तक रुपाने १८८५ साली प्रसिद्ध झाली. त्यानंतर छत्रपती शाहूंचा राज्यारोहण समारंभ छत्रपती शाहूंच्या वयाच्या २० व्या वर्षी दिनांक २ एप्रिल १८९४ रोजी झाला. हा समारंभ ‘मुक्त्यारीसमारंभ’ अथवा ‘राज्याधिकारस्वीकारोत्सव’ या नावाने ओळखला जातो. मोठ्या थाटात झालेल्या या भव्य-दिव्य समारंभाचे सविस्तर वर्णन करणारे ‘मुक्त्यारीसमारंभ’ अथवा ‘श्रीमन्महाराज शाहू छत्रपति सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव’ या नावाचे पुस्तक पट्टणकोडोली येथील हेडमास्तर बाळाजी महादेव करवडे यांनी प्रसिद्ध केले होते. सन १८९६ मध्ये प्रकाशित हे पुस्तक शाहू छत्रपती यांचे संबंधित दुसरे पुस्तक असावे, असेही माझे मत आहे.
दोन एप्रिल १८९४ रोजी छत्रपतींनी राज्याधिकाराचा स्वीकार समारंभपूर्वक केला. त्या काळात त्याला मुक्त्यारी समारंभ म्हणत असत. त्यामुळेच श्री. करवडे यांनी पुस्तकास ‘मुक्त्यारीसमारंभ….’ असे शीर्षक दिले आहे. राज्यारोहण समारंभासाठी सायंकाळचा शुभमुहर्त निश्चित केला होता, असे श्री. करवडे यांनी म्हटले आहे. पुढे ते लिहितात, ‘एक एप्रिलला मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड हॅरिस कोल्हापूरला आले. मुधोळकर घोरपडे, धुंडीराज पटवर्धन – सांगलीकर, जमखंडी, रामदुर्ग, मिरज या संस्थानांचे अधिपती, इचलकरंजीकर, पंत अमात्य, बावडेकर, पंतप्रतिनिधी, विशाळगडकर आदी आपल्या लवाजम्यासह आले होते. दोन एप्रिलला नियोजित वेळी दरबार भरुन शाहू छत्रपतींना मुक्त्यारीची वस्त्रे देण्याचा समारंभ लॉर्ड हॅरिसच्या अध्यक्षतेखाली झाला. कोल्हापूर संस्थानचा कारभार पाहण्याऱ्या प्रशासक मंडळाचे विसर्जन करण्यात आले आणि राज्याची अधिकारसूत्रे शाहू छत्रपतींनी घेतल्याची रीतसर घोषणा मराठीत करण्यात आली.’ तीन एप्रिलच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती पुस्तकात दिली आहे. तसेच चार एप्रिलला जहागीरदारांनी शाहू छत्रपतींना मानपत्र अर्पण केले. दुपारी तीन वाजता निमंत्रितांकरिता दरबार भरला तेव्हा पुणे सार्वजनिक सभा, डेक्कन असोसिएशन, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आदी संस्थाच्या प्रतिनिधींनी शाहू छत्रपतींना मानपत्रे अर्पण केली. अनेक मान्यवरांनी दरबारात येऊन छत्रपतींचे अभीष्टचिंतन केल्याचे नमूद केले आहे. इतिहासाची आवड असणाऱ्या आणि जुन्या कोल्हापूर संबंधी जे जे मिळेल ते संग्रहित करण्याचा छंद जोपासणाऱ्या श्री. यशोधन जोशी यांनी मूळ पुस्तकासह अधिक साहित्याची भर घालून संपादित केलेला ग्रंथ २०२२ मध्ये पुनःप्रकाशित केला आहे.
कृतिशील विचारवंत – राजा
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा एक अद्वितीय भाग असा की, ते जे बोलत ते आचरणात आणत. ते करण्यासाठी जे अतुलनीय धैर्य व मानवतावादी दृष्टिकोन लागतो, तो शाहू महाराजांच्याकडे होता. राजे म्हणून असणारी कोणतीही बंधने त्यांनी या मार्गामध्ये येऊ दिली नाहीत. राजर्षी शाहूंचे वेगळेपण म्हणजे ते कृतिशूर होते. विचार, उच्चार आणि आचार यात संगती ठेवणारे कर्तृत्ववान महापुरुष होते. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची वैचारिक आणि सामाजिक दृष्टी आजही आपणास ज्ञान-प्रकाश देईल. या ज्ञान-प्रकाशातून आजचे आणि उद्याचेही अनेक सामाजिक प्रश्न सुटण्यास मदत होईल.
अर्थात कृतिशीलतेवर भर देणाऱ्या लोकराजा शाहूंची भाषणे फारशी उपलब्ध नाहीत. राजर्षी शाहंची आहेत किंवा इंग्रजीमधील मराठीत आहेत. याचा अर्थ हा की, एकूण ५० भाषणातून १३ वजा जाता, मराठी/इंग्रजी मिळून एकूण पन्नास भाषणे उपलब्ध आहेत. त्यामध्ये १३ भाषणे समान आहेत; दोहोकडे सारखी ३८ भाषणे समोर येतात. संख्येच्या दृष्टीने राजर्षीची ही निखळ भाषणे आहेत.
राजर्षीनी पहिले भाषण ३ मे १८८८ रोजी म्हणजेच वयाच्या १४ व्या वर्षी, कोल्हापूर राज्य रेल्वे बांधणीच्या शुभारंभ प्रसंगी उद्घाटनाच्या निमित्ताने केलेले शेवटचे भाषण १६ फेब्रुवारी १९२२ रोजी वयाच्या ४८ व्या वर्षी अखिल भारतीय अस्पृश्यता परिषदेच्या दिल्ली येथील तिसऱ्या अधिवेशन प्रसंगी अध्यक्षपदावरून केलेले आहे.
आयुष्याच्या शेवटच्या भाषणात देखील राजर्षी शाहू महाराजांनी दलित, वंचित, बहुजन समाजाच्या हिताचाच विचार केला होता. तत्कालीन परिस्थितीचा विचार करून विकासाची दूरदृष्टी आणि संदेश दिला होता. आपल्या भाषणात राजर्षी शाहू म्हणतात, “आपण आपल्या नैसर्गिक मानवी हक्कांना जपले पाहिजे. त्यासाठी आग्रहपूर्वक दृढपणे उभे राहिले पाहिजे. आपली प्रगती साधण्याचा, विसाव्या शतकातील मार्ग दंगेधोपे व बंडाळीचा नसून शांततेने व व्यवस्थित रितीने आपला आपण विकास करून घेणे हा आहे ” .
तत्कालीन राजकीय, सामाजिक स्थिती आणि भविष्यातील आव्हानांचा विचार करून छत्रपती शाहू महाराजानी विसाव्या शतकात शिक्षण, व्यवसाय, नोकरीविषयी देखील या भाषणात राजर्षी शाहूंनी दिशा दिली होती. ते म्हणतात, “केवळ पारंपारिक एकाच व्यावसायावर अवलंबून न राहता शिक्षण घेऊन वेगवेगळ्या उद्योग व्यवसायात, उच्चपदस्य नोकऱ्यात उतरा, आपणच आपला विकास करून घ्यायला शिकले पाहिजे.
परदेशात असलेल्या डॉ. आंबेडकर यांची आठवण
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध अनेक घटना, प्रसंगातून अधोरेखित झाले आहेत. आपल्या आयुष्यातील शेवटच्या भाषणात छत्रपती शाहू महाराजांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण काढली होती. त्यावेळी आंबेडकर परदेशात शिक्षणासाठी गेले होते. त्यांच्या विषयी राजर्षी शाहू महाराज म्हणतात, मिस्टर आंबेडकर जरी या ठिकाणी उपस्थित नसले तरी परदेशातही ते आपल्या सर्वांच्या हिताचा विचार आपल्या हृदयात ठेवून असतील. त्यांच्यासारखे होण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा.
शाहू विचारांचा जागर – काळाची गरज
राजर्षीच्या उपलब्ध भाषणांवरून बऱ्याच गोष्टी अधोरेखित होतात तसेच अनेक पैलू आढळतात. परिपक्व विचारांबरोबर सखोल चिंतन, सामाजिक जीर्णशीर्णतेविरुद्ध प्रखर चीड, विकृती-विसंगतीच्या नष्टांशाच्या भावनेबरोबरच सामाजिक दैन्य-विषमता-दारिद्रय याविरुद्ध हिरीरीची बंडखोरी, आणि मानवाच्या संवर्धनाबरोबरच माणुसकीच्या गहिवराने प्रेरित झालेल्या अंत:करणाचे नितळ दर्शन असे अनेक गुणपैलू या भाषणांतून नजरेस पडतात. त्यातून विचारशीलता आणि सृजनात्म्याची ओढ लक्षात येते. सृजनात्म्याची ओढ प्रत्यक्ष कार्यात प्रतिबिंबित झाल्याचेही आढळते.
राजर्षी शाहू छत्रपतींच्या भाषणांमधून संस्थान, देश आणि परदेश यामधील विविध प्रश्नांची कल्पना येते. राजर्षीचा त्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ध्यानी येतो. अर्थात त्यात प्राधान्य संस्थांनी प्रश्नांना असणार हे उघडच आहे. प्रस्तुतच्या भाषणांमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी अनेक सामाजिक विषय व समस्या यांचा ऊहापोह करून आपले पुरोगामी विचार मांडले आहेत. यामध्ये अस्पृश्यता, जातिभेद, मागासलेल्या समाजाचा उद्धार, वर्णव्यवस्था, समानतेचे तत्त्व, बौद्धिक स्वातंत्र्य, सामाजिक नीतिमत्ता, इंग्रजी शिक्षण, विद्येचा महिमा, विधवाविवाह, पडदापद्धती, म. फुले, आर्य समाज, म. गांधी, व्यापारधंदे, कृषिकर्म, कारखानदारी, शेतकरी, मजूर, मजूरसंघ, सहकारी संस्था अशा अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय व आर्थिक विषयांचा समावेश आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाह महाराजांचे कार्य जेवढे महान, लोकोत्तर आहे; तेवढेच त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत. राजर्षी शाहूंचे स्मृतिशताब्दी वर्ष सुरु आहे. राजर्षीचे हे अनमोल विचार कालही महत्त्वाचे होते, आजही महत्त्वाचे आहेत आणि उद्याही महत्त्वाचेच असणार आहेत. तेव्हा राजर्षीच्या विचारांचा जागर सतत होणे ही काळाची गरज आहे. अखिल मानवजातीचे कल्याण, सर्वांगीण विकास हेच राजर्षीच्या कार्याचे व विचारांचे मुख्य अधिष्ठान, सूत्र आहे.
राजर्षी शाहूंनी आपल्या दूरदर्शी विचारांचा, कृतिशील पुरोगामित्वाचा जनमानसावर ठसा उमटविला. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा, कृतीचा, समाजसुधारणेचा, प्रशासकीय पद्धतीचा, लोकाभिमुखतेचा आजही पाठपुरावा करण्याची नितांत गरज आहे. त्यांचे लोकोत्तर कार्य व क्रांतिकारक विचार नव्या पिढीसमोर येण्याची आजच्या परिस्थितीत आवश्यक अशी बाब आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भाषणाची पाच पुस्तके उपलब्ध झाली असून त्या पुस्तकांचा परिचय ‘राजर्षी शाहूंची वाङ्मयीन स्मारके’ मध्ये दिलेला आहे. ‘श्रीमन्महाराज शाहू छत्रपती सरकार करवीर यांची भाषणे’ हे छत्रपती शाहूंच्या हयातीतच म्हणजे सन १९२० मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक आहे. जैनेन्द्र प्रिंटिंग प्रेस, कोल्हापूर तर्फे पुस्तक मुद्रित व प्रकाशित झालेले आहे. यामध्ये डिसेंबर १९१७ ते जुलै १९२० या काळातील भाषणे आहेत. खामगांव, मुंबई, नवसारी (गुजरात), कानपूर, भावनगर, माणगांव, नाशिक, नागपूर, हुबळी इत्यादी ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात, जाहीरसभेत राजर्षी शाहूंनी शिक्षण, समाज, धर्म आदी विषयांवर मांडलेले विचार या पुस्तकात आहेत. प्रा. श्याम येडेकर यांनी संकलन आणि संपादन केलेले आणि १९७१ साली प्रकाशित झालेले ‘राजर्षी शाहू छत्रपती यांची भाषणे’; १९७१ सालीच भगवानराव बापूसाहेब जाधव यांनी संपादन-संकलन केलेले ‘आधुनिक भारतीय पुरोगामी राष्ट्रवादाचे जनक राजर्षी श्रीशाहूमहाराजांची भाषणे’; डॉ. एस्. एस्. भोसले संपादित आणि सन १९७५ मध्ये प्रकाशित ‘क्रांतिसूक्ते : राजर्षी छत्रपती शाहू’; ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार संपादित ‘राजर्षी शाहू छत्रपती यांची भाषणे’ ह्या पुस्तकांचा परिचय ‘राजर्षी शाहंची वाङ्मयीन स्मारके’ मध्ये समाविष्ठ केलेला आहे. त्याचबरोबर ‘क्रांति के अग्रदूत राजर्षी शाहू महाराज’ हिन्दी अनुवादक प्रा. वेद कुमार वेदालंकार तसेच ; प्राचार्य डॉ. जे. के. पवार व सौ. पद्मजा जोतीराम पवार संकलित ‘राजर्षी शाहूंचे विचारधन’ ह्या पुस्तकांचाही परिचय दिलेला आहे. लोकराजा राजर्षी शाहूंचे क्रांतिकारक विचार जाणून घेण्यासाठी ही सर्व पुस्तके खूपच उपयुक्त आहेत.
‘पोवाडा’- एक महत्त्वाचा वाङ्मय प्रकार
शिवकालापासून आधुनिक काळापर्यंत चालत आलेला मराठी पोवाडा हा एक महत्त्वाचा वाङ्मयप्रकार आहे. मराठी पोवाडा आणि तो गाणारा व लिहिणारा मराठा शाहीर यांचा महाराष्ट्राला सदैव अभिमान वाटतो. मराठी पोवाड्याने मराठी जनमानसात कायमचे सन्मानाचे स्थान मिळविलेले आहे. पराक्रमशील महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील अस्मितेला जागृत ठेवण्याचे मौलिक कार्य पोवाडा करीत आहे. त्याचबरोबर बदलत्या जीवनात निर्माण होणाऱ्या नव्या सामाजिक व राजकीय जाणिवांचा आविष्कारही मराठी पोवाड्यात आढळतो. पोवाड्यासारखे शाहिरी वाङ्मय आणि ते गाणारे शाहीर कवी यांनाही महाराष्ट्रात, मराठी माणसांच्या हृदयात खूप आदराचे स्थान आहे. ऐतिहासिक, सामाजिक, राष्ट्रीय पोवाड्याबरोबर कोल्हापूर संस्थानात ज्या ज्या घटना घडतील त्यावर पोवाडे, गीते मोठ्या प्रमाणात लिहिली गेली आहेत.
‘राजर्षी शाहूंची वाङ्मयीन स्मारके’ मध्ये नोव्हेंबर – डिसेंबर १९२२ मध्ये प्रकाशित ‘कै. राजर्षि श्रीशाहू महाराजांचा पोवाडा’ या पुस्तकाचा परिचय करून दिलेला आहे. क्षत्रिय वैदिक विद्यालयातील विद्यार्थी कुमार शंकर बळवंत भोसले (कवी बालतनय) यांनी लिहिलेला हा पोवाडा आहे. चाळीस पानी पुस्तिका स्वरूपातील या पोवाड्यास श्रीमत्क्षात्रजगद्गुरू यांचा अभिप्राय लाभला आहे. असे म्हटले जाते की, ‘शूर मर्दाचा पोवाडा शुरू मर्दाने ऐकावा.’ श्रीमत्क्षात्रजगद्गुरू यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण असा अभिप्राय दिलेला आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर पोवाड्याच्या रूपाने लिहिलेले हे त्यांचे ‘पहिले’ चरित्र असावे.
शीघ्र कवी लहरी हैदर यांचा विस्तृत पोवाडा
शीघ्र कविवर्य लहरी हैदर साहेब यांनी लिहिलेल्या ‘कै. राजर्षी शाहू छत्रपति महाराज यांचा पोवाडा या ब्यान्नव पानी पुस्तकाचाही परिचय ‘राजर्षी शाहूंची वाङ्मयीन स्मारके’ मध्ये समाविष्ट केलेला आहे. जुलै १९२९ मध्ये दासराम बुक डेपो, कोल्हापूर मार्फत हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. शीघ्रकवी लहरी हैदर यांना लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा सहवास लाभला होता. कोल्हापूर शहराच्या रोजच्या फेरफटक्यात राजर्षी शाहू महाराजांबरोबर त्यांच्या खडखड्यातील सहचर म्हणून हैदर साहेबांना अनेक वेळा संधी मिळाली होती. ते कट्टर सत्यशोधक होते, त्यामुळेच आपल्या कवनांतून सत्यशोधकी मतांचा प्रचार-प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे.
कवी लहरी हैदर यांनी स्वयंस्फूर्तीने कै. राजर्षी शाह छत्रपति महाराज सरकार यांचा पोवाडा लिहिला होता. अगदी अल्पकाळात हा पोवाडा अत्यंत लोकप्रियही झाला होता. त्यामुळेच कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी हस्ते कविवर्य लहरी हैदर यांचा रौप्य पदके देऊन गौरव केला होता. त्याशिवाय सत्यशोधक समाजानेही रौप्य ब्राह्मणेत्तर संघ आणि व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगने श्रीमन् राजाराम महाराज छत्रपतीसाहेब सरकार करवीर यांचे पदके आणि सर्टिफिकेटस् देऊन गौरव केला होता. राजर्षी शाहंच्या अनुकरणीय आणि उज्ज्वल कामगिरीचे मनोवेधक चित्रण सदर पोवाड्यातून केलेले आहे.
जिल्हा परिषदेचे अभिनव, अनुकरणीय आणि अभिनंदनिय कार्य
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने (सन १९७४-७५) देशभरातील शाहूप्रेमी संस्था, व्यक्ती, संशोधक, लेखक, प्रकाशक यांनी राजर्षी शाहूंची वाङ्मयीन स्मारके फार मोठ्या प्रमाणावर निर्माण केली आहेत. अनेकांनी साहित्यकृतीद्वारे राजर्षी शाहूंना आदरांजली वाहिली. पुस्तके, ग्रंथ, विशेषांक यांच्या माध्यमातून चिरंतन, अक्षय नि अक्षर स्मारके निर्माण केली. असेच अभिनव, अनुकरणीय आणि अभिनंदनिय कार्य कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे विचार करता, रस्ते, शाळा, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा योजना अशा सुविधांचा पुरवठा करून समाजाच्या भौतिक गरजांची पूर्तता करणे हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य असते, आहे. परंतु छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी निमित्ताने कोल्हापूर जिल्हा परिषदेने समाजाच्या भौतिक गरजांबरोबरच वैचारिक व्यासपीठ निर्माण केले आणि त्यातूनच राजर्षी शाहू ग्रंथमालेची निर्मिती केली.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने यशस्वीपणे राबविल्या गेलेल्या ‘राजर्षी शाहू ग्रंथमाले’ अंतर्गत जे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. त्यापैकी ‘लोकराजा शाह’ – लेखक – भाई माधवराव बागल, ‘राजर्षी शाहू: काळ, विचार आणि कार्य ‘- संपादक- डॉ. एस्. एस्. भोसले, ‘चंदनार्थे’ (राजर्षी शाहू जन्मशताब्दी स्मरणिका १९७४-७५) – संपादक – डॉ. एस्. एस्. भोसले, ‘क्रांतिसूक्ते : राजर्षी छत्रपती शाहू’- संपादक – डॉ. एस. एस. भोसले; ह्या ग्रंथांचा परिचय ‘राजर्षी शाहूंची वाङ्मयीन स्मारके’ मध्ये समाविष्ठ केलेला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष श्री. बाळासाहेब माने यांच्या प्रोत्साहनाने प्रकाशित ‘श्री शाहू छत्रपतींचे अर्थकारण’ – लेखक – सौ. मीना कुलकर्णी, ब. शि. कुलकर्णी या ग्रंथाचाही परिचय समाविष्ट केलेला आहे.
राजर्षी शाहू ग्रंथमालेअंतर्गत ग्रंथांच्या निर्मिती आणि प्रकाशनाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष रा. शं. ऊर्फ बाळासाहेब माने यांनी केलेले भाष्य अत्यंत महत्त्वाचे आहे. श्री. माने साहेब लिहितात, सामान्यपणे थोर व्यक्तींचे पुण्यस्मरण करण्याचे मार्ग सभा, व्याख्याने, चर्चा, परिसंवाद यासारखे रुढ व पारंपारिक पद्धतीचे असतात. कोल्हापूर जिल्हा परिषदेने ही मळलेली वाट सोडून राजर्षीचे चिरंतन स्मारक व्हावे म्हणून ‘राजर्षी शाहू ग्रंथमालेचे’ योजनापूर्वक नियोजन केले आहे. समाज हा केवळ भावनेवर जगत नाही तर तो कणखर विचारांवर जगतो, हे विसरता कामा नये. म्हणून थोरामोठ्यांच्या संबंधी समाजाने नेहमी सक्रीय व कृतज्ञ असले पाहिजे. हे ग्रंथ, महाराष्ट्रातील शिक्षणसंस्थांनी भावी पिढीच्या निदर्शनास अवश्य आणावेत, अशी इच्छा मी जरूर प्रकट करू इच्छितो. या ग्रंथात ग्रंथित केलेले वैचारिक धन भावी पिढीची प्रेरणा, स्फूर्ती व शक्ती ठरो हीच अपेक्षा! जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षांनी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
आठवणींचा अनमोल / अमूल्य खजिना
चरित्र, गौरवग्रंथ, स्मारकग्रंथ इत्यादीच्या माध्यमातून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा मागोवा, आढावा घेतला गेला आहे. त्याचपद्धतीने राजर्षी शाहूंच्या संबंधित आठवणी मधूनही लोकराजा शाहूंच्या जीवनाच्या निरनिराळ्या पैलूंचे दर्शन होते. लोकराजा राजर्षी शाहू महाराजाच्या सहवासांत वावरलेल्या अनेकांच्या आठवणींचे संकलन करून त्या आठवणी पुस्तक रूपाने प्रसिद्ध केलेले अनेक ग्रंथ, पुस्तके उपलब्ध आहेत. त्यातून राजर्षी शाहूंच्या संदर्भातील आठवणींचा उद्बोधक व अनमोल खजिनाच आपणास सापडतो. लोकराजा राजर्षी शाहूंच्या संदर्भात दैनिक सत्यवादीने ‘राजर्षि शाहू छत्रपती खास अंक’ १९२८ साली प्रसिद्ध केला होता, तो अंक; त्याशिवाय भगवा झेंडाचे संपादक दत्ताजीराव यशवंतराव कुरणे यांनी प्रसिद्ध केलेले ‘कै. राजर्षि छत्रपति श्रीशाहू महाराज यांच्या आठवणी’ हे १९२८ साली प्रकाशित झालेले पुस्तक; त्याचबरोबर पुरोगामी विचारवंत भाई माधवराव बागल लिखित ‘श्रीशाहू महाराज यांच्या आठवणी’ हे १९५० साली प्रकाशित झालेले पुस्तक; हिंदुराव साळुंखे यांनी संकलित व संपादित केलेले ‘छत्रपती राजर्षी महाराज यांच्या आठवणी व कोल्हापूरचे ऐतिहासिक वैभव’ हे पुस्तक, तसेच प्रा. नानासाहेब साळुंखे यांचे ‘शाहूंच्या आठवणी’ हे पुस्तक; जी. बी. अष्टेकर व बी. एस्. मुडबिद्रीकर संपादित ‘शाहूरायाच्या रम्य कथा व ‘आठवणी’ अशा अनेक पुस्तकांतून लोकराजा राजर्षी शाहूंच्या प्रेरणादायी आठवणींचा खजिनाच उपलब्ध असून त्या सर्व पुस्तकांचा परिचय ‘राजर्षी शाहूंची वाङ्मयीन स्मारके’ मध्ये करून दिलेला आहे.
पुरोगामी विचारवंत भाई माधवराव बागल यांना लोकराजा राजर्षी शाहूंचा सहवास लाभला होता. पत्रकार, लेखक, संपादक, चित्रकार, कलासमीक्षक, कलावंत, शिल्पकार असलेल्या भाई बागल यांनी शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग, आठवणी, राजर्षी शाहूंच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या अनेक लोकांच्याकडून संग्रहित केल्या आणि त्या पुस्तकरुपाने ‘शाहू महाराजांच्या आठवणी’ या नावाने प्रकाशित केल्या. त्यामध्ये भास्करराव जाधव, दिवाण आर. व्ही. सबनीस, डी. आर. भोसले, रावबहादूर विचारे, श्रीपतराव शिंदे, डी. एस्. बन्ने, गंगाराम कांबळे, वा. द. तोफखाने, बाबुराव यादव, शीघ्रकवी लहरी हैदर, गोविंदराव टेंबे, प्रबोधनकार के. सी. ठाकरे, इत्यादींचा प्रामुख्याने समावेश आहे. ह्या आठवणींमधून राजर्षी शाहूंच्या जीवनात आलेले विविध प्रसंग व त्यावेळी छत्रपती शाहूंचा स्वभाव, समाजाकडे व प्रजेकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिसून येतो.
‘शाहू महाराजांच्या आठवणी’ हा १९५० साली प्रकाशित ग्रंथ दर्मिळ झाल्याने २००४ साली तो नव्या स्वरुपात पुनःप्रकाशित करण्यात आला आहे. या संदर्भात संपादक मंडळातील एक सदस्य ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात, “या आठवणीमधून मनुष्यगुणांची पारख असणारा, कलावंतांच्या कलेचे मोल जाणणारा, सामान्य प्रजेच्या सुख-दुःखाशी समरस होणारा, दलितपतितांचा उद्धार करणारा, विलक्षण बुद्धीमत्ता, धैर्य, साहस, सहनशीलता, सहृदयता, दयाबुद्धी, व्यावहारिक शहाणपण, दूरदृष्टी, विनोदबुद्धी, इत्यादी दुर्मिळ गुणांचे व्यक्तिमत्व लाभलेला राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजांचे विलोभनीय दर्शन घडते.”
हिंदराव साळुंखे यांनी तर राजर्षी शाहूंच्या अत्यंत निकट असणाऱ्या सेवकांकडून आठवणी मिळविलेल्या आहेत. एकूणच विचार केला तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या संदर्भातील ह्या सर्व आठवणी म्हणजे महाराष्ट्राच्या भावी इतिहासाची साधनेच आहेत, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या आठवणी राजर्षी शाहू महाराजांच्या चरित्राच्या अनेक पैलूंचे मनोहारी दर्शन घडविणाऱ्या आहेत.
‘कै. राजर्षि छत्रपती श्रीशाहू महाराज यांच्या आठवणी’ संपादक – दत्ताजीराव यशवंतराव कुरणे या पुस्तकाची प्रथम आवृत्ती १९२८ साली तर द्वितीय आवृत्ती तब्बल ४० वर्षानंतर १९६८ साली प्रकाशित झाली. दुसऱ्या आवृत्तीस शाहूशाहीर आमदार पी. बी. साळुंखे यांची विस्तृत प्रस्तावना लाभली आहे. आपल्या प्रस्तावनेमध्ये शाहूशाहीर पी. बी. साळुंखे लिहितात, या पुस्तकांत ग्रंथित केलेल्या आठवणी ज्या व्यक्तींनी लिहिल्या आहेत ती सर्व मंडळी महाराजांच्या सहवासात वावरलेली आहेत. महाराजांच्या जीवनांतील जे प्रसंग त्यांनी टिपले आहेत. त्यांवरून महाराजांच्या ठिकाणी वसत असलेल्या विविध आणि लोकोत्तर गुणांचे दर्शन वाचकाला झाल्याशिवाय रहात नाही.”
शाहूरायांचे श्रेष्ठत्व अधोरेखित करणाऱ्या सत्य व रम्य कथा
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा, त्यांच्या समाजक्रांतिकारक विचारांचा आढावा, मागोवा घेणारे अनेक ग्रंथ, पुस्तके लिहिली गेली आहेत. अर्थात् हे सर्व लेखन प्रौढांसाठीच उपयुक्त ठरणारे आहे. बालवयातील वाचकांना आकर्षित करणारे, रुचणारे आणि आवडणारे असे लेखन होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण बाल वयातील वाचकांना गोष्टीरुप लेखन खूप आवडते आणि भावते. काळाची गरज ओळखून काही लेखकांनी पाऊले टाकली आणि लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या लोकोत्तर कार्याचे, आणि विचारांचे संस्कार लहान वयातील मुलांवर, विद्यार्थ्यांवर व्हावेत यासाठी शाहूरायांच्या जीवनकार्यावर आधारित संस्कारकथा पुस्तकरुपात प्रसिद्ध करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अनेकांनी केले आहे.
खास बाल वाचकांसाठी प्रकाशित झालेल्या वाङ्मयामध्ये ज्येष्ठ बालसाहित्यिक श्याम कुरळे यांचे ‘शाहूरायांच्या गोष्टी, जी. बी. अष्टेकर, बी. एस्. मुडबिद्रीकर संपादित ‘राजर्षी छत्रपती शाह महाराजांच्या रम्य कथा व आठवणी’; उदयसिंह मा. यादव यांचे ‘कथा राजर्षी शाहू महाराजांच्या भाग पहिला. आणि ‘राजर्षि’ (राजर्षि शाहूंच्या काही अप्रकाशित रोमहर्षक कथा) हे दोन कथा संग्रह; राजेंद्र घाडगे लिखित ‘राजर्षि शाहूंच्या स्फूर्तिकथा’; डॉ. पद्मा पाटील लिखित ‘रयतेचा विश्वस्त राजा शाहू महाराज’ हा ललितकथा संग्रह: प्राचार्य डॉ. भि. ना. दहातोंडे लिखित ‘गोष्टीरुप राजर्षी श्रीशाहू महाराज’; ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आणि सहलेखक यांनी साकारलेले ‘मुलांच्यासाठी राजर्षी शाहू छत्रपती महाराज’ हे गोष्टीरूप चरित्र; अंजली ठाकूर लिखित ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज’ हे सुबोध गोष्टीरुप संक्षिप्त चरित्र; खगोल अभ्यासक, कवी आणि बालवाङ्मयाचे साहित्यिक रमाकांत देशपांडे लिखित ‘राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांच्या ५१ गोष्टी’ इत्यादींचा समावेश आहे. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचे उत्तुंग कार्य छोटया छोटया गोष्टींमधून मुलांच्यासमोर मांडण्याचा अभिनंदनिय आणि अनुकरणीय प्रयत्न ह्या सर्व लेखकांनी केलेला आहे
राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनात घडलेल्या सत्यघटनांना साध्या, सोप्या, सुबोध भाषेत कथारुप दिले आहे. त्यामुळे लहान मुलांबरोबरच प्रौढ वाचकांना सुद्धा उद्बोधक व प्रेरणादायी ठरणारी अशीच ही वाङ्मयीन स्मारके आहेत.
राजर्षी शाहूंच्या चरित्रपर लेखनाची विपुलता आणि कमतरता
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विषयी अलीकडच्या काळात बरेच चरित्रपर लेखन झाले आहे. अर्थात् केवळ ४८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या आणि त्यापैकी केवळ २८ वर्ष राज्यकारभार करण्याची संधी लाभलेल्या लोकराजा राजर्षी शाहूंनी मानवी जीवनातील सर्वच अंगांना, घटकांना स्पर्श करीत महान कार्य केले आहे. समाजक्रांतिकारक विचार मांडत कृतिशीलतेतून अलौकिक, देदिप्यमान कार्य केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सर्व समावेश असे चरित्र अद्यापही होऊ शकले नाही. ही उणीव, ही खंत सर्वच शाहप्रेमींच्या ठायी/मनी आहे.
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र लिहिण्याचा पहिला बहुमान प्रोफेसर अण्णासाहेब लठ्ठे यांचेकडे जातो. ६ मे १९२२ रोजी राजर्षी शाहू महाराजांचे दुःखद निधन झाले. त्यांचे नंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज गादीवर आले. छत्रपती राजाराम महाराजांच्या प्रेरणेने, प्रोत्साहनाने प्रोफे. लठ्ठे यांनी १९२४ साली इंग्रजीमध्ये आणि त्याचेच भाषांतर करून १९२५ साली मराठीमध्ये राजर्षी शाहूंचे चरित्र लिहिले. प्रो. ए. बी. लठ्ठे हे शाहू महाराजांचे आद्य इंग्रजी व मराठी चरित्रकार होत. प्रोफेसर ए. बी. लठ्ठे यांचे नंतर पुढील ६० ते ७० वर्ष समग्र व राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंचे दर्शन घडविणारे बृहद असे शाहूचरित्र कोणीच लिहिले नाही; त्यामुळे प्रोफे. लठ्ठेच्या शाहू चरित्राला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रो. लठ्ठे हे राजर्षी शाहूंच्या दरबारातील एक अधिकारी आणि राजाराम कॉलेजचे प्रोफेसर होते. राजर्षी शाहू महाराजांच्या सान्निध्यात वावरलेले असल्यामुळे अनेक घटनांचे ते साक्षीदार होते; त्यामुळेच विविध प्रसंगाचे वास्तव चित्रण त्यांनी परखडपणे केलेले आहे. त्यामुळेही लठ्ठेकृत शाहूचरित्र अधिक महत्त्वाचे ठरते.
अर्थात् प्रोफेसर ए. बी. लठ्ठे यांचे शिवाय अनेकांनी आपापलेपरिने शाहूचरित्र जनतेसमोर आणले आहे. चितळी ता. खटाव जि. सातारा गावचे सुपुत्र भाऊसाहेब बाळासाहेब पवार यांनी १९३० साली ‘राजर्षी शाह महाराज’ या शीर्षकाचे संक्षिप्त अन् उद्बोधक सुबोध शाहूचरित्र जनतेसमोर मांडले. तर १९३९ साली सत्यवादीकार बाळासाहेब पाटील यांनी ‘राजर्षि शाहू छत्रपती’ हे छोटेसे पण स्फूर्तिदायक शाहूचरित्र प्रकाशित केले. त्यानंतर १९३९ साली संस्कृतचे गाढे पंडित वासुदेव आत्माराम लाटकरशास्त्री यांनी संस्कृतमध्य ‘श्रीशाहुचरितम्’ शीर्षकाचे शाहूचरित्र लिहिले. विशेष म्हणजे लाटकरशास्त्री यांनीच ‘श्रीशाहुचरितम्’ ल शाहूंचे वाङ्मयस्मारक असे म्हटले होते. शिवाजी विद्यापीठातील शाह संशोधन केंद्रातर्फे सन २००९ मध्ये संस्कृत चरित्राचे ‘श्रीशाहंचे चरित्र’ असे मराठी भाषेत पुस्तक प्रकाशित केले आहे.
राजर्षी लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात ज्या सुधारणा घडवून आणल्या त्याबद्दलची संक्षिप्त माहिती देत एक छोटेसे शाहचरित्र अनंत गणेश जोशी यांनी ‘कै. राजर्षि शाहू छत्रपती यांचे चरित्र या शीर्षकाने १९४१ साली प्रसिद्ध केले आहे. १९७४ साली लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहात साजरी झाली. जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत तु. बा. नाईक लिखित ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज’ हे पुस्तक प्रकाशित झाले. तर धनंजय कीर यांनी संशोधनातून साकरलेला ‘राजर्षी शाहू छत्रपती’ हा चरित्र ग्रंथ १९७९ साली प्रकाशित करण्यात आला. सन १९५३ पासून लोकराजा शाहू महाराजांविषयी सखोल अभ्यास करुन फेब्रुवारी १९८४ मध्ये ‘राजर्षी शाहू राजा व माणूस’ हा बृहद् ग्रंथ सूर्यवंशी यांनी प्रकाशित केला आहे.
त्यानंतर शाहूचरित्रकार डॉ. रमेश जाधव यांचा ‘लोकराजा शाहू छत्रपती’ (सन १९९७); १९९८ साली ए. के. घोरपडे यांचा ‘कोल्हापूरचे राजर्षी शाहू छत्रपती’ (चरित्र व कार्य); दिलीप रा. मढीकर यांचा ‘राजर्षी शाहू महाराज जीवन आणि कार्य’ (सन २००५); ज्येष्ठ इतिहास संशोधक, शाहू चरित्रकार डॉ. जयसिंगराव पवार यांचा ‘राजर्षी शाहू छत्रपती जीवन आणि कार्य’ (सन २००९); राज्यशास्त्राचे नामवंत प्राध्यापक, संशोधक, विचारवंत डॉ. भा. ल. भोळे यांचा ‘छत्रपती शाहू महाराज’ (सन २०१०); आदींचे राजर्षी शाहूंच्या जीवन- कार्याचे संशोधनात्मक शाहू चरित्र ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. अलीकडील काळात इतिहासाचे अभ्यासक, वक्ते डॉ. टी. एस्. पाटील यांनी ‘राजर्षी शाहू छत्रपती’ (सन २०१२), इतिहास संशोधक इंद्रजित सावंत व देविकाराणी पाटील यांनी ‘राजर्षी शाहू छत्रपती’ (रयतेच्या राजाचे चित्रमय चरित्र) (सन २०१४); पुणे येथील शाहूप्रेमी प्रा. बी. ए. कांबळे यांनी ‘करवीर नरेश शाहू छत्रपती’ (सन २०१५); तरुण अभ्यासक, वक्ते संदीप मगदूम यांनी ‘लोकराजा छत्रपती शाहू महाराज’ (सन २०२२), आदींनी राजर्षी शाहूंच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकण्याचा अभिनंदनिय प्रयत्न केलेला आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व, निसर्गनिर्मित आणि मनुष्यनिर्मित संकटांशी राजर्षी शाहूंनी दिलेली झुंज, समाजक्रांतिकारक विचार मांडून त्यानुसार केलेले समाजपरिवर्तन कार्य अशा सर्व पैलूंना स्पर्श करणारे सर्वार्थाने परिपूर्ण असे शाहूचरित्र अद्यापही झालेले नाही. अशा परिपूर्ण शाहूचरित्राची प्रतिक्षा तमाम मराठी माणूस मोठ्या आतुरतेने करीत आहे.
इतिहासाचे गाढे अभ्यासक, माजी प्राचार्य डॉ. विलास पोवार यांनी ‘छत्रपती शाहू महाराजांच्या चरित्र साधनांचा अभ्यास’ या चिकित्सक व विश्लेषणात्मक, विस्तृत लेखामध्ये याच अनुषंगाने अपेक्षा व्यक्त केली आहे. डॉ. पोवार सर लिहितात, “छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील विविध माहितीचे संकलन त्यांचा समाजाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन, संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले उपाय, कायदेकानून व त्याची केलेली कठोर अंमलबजावणी, समाजातील अनिष्ट रूढी, चाली, रीतीरिवाज मोडून काढण्यासाठी त्यांनी आयुष्यभर केलेला संघर्ष, त्यामुळे त्यांना झालेले दुःख, मानसिक वेदना याचे दर्शन अनेक चरित्रग्रंथातून दिसून येते. पण शाहू महाराजांनी संपूर्ण समाजाच्या उद्धारासाठी केलेले प्रयत्न, कठोर उपाययोजना याचा समाज घडविण्यासाठी या शंभर वर्षात काय परिणाम झाला आहे? याचे मूलभूत संशोधन करणे हे आजच्या संशोधकांना करणे गरजेचे वाटले पाहिजे. शाहू महाराजांनी त्या काळात केलेल्या कायद्यांचा, सुधारणेचा समाजावर काय परिणाम झाला आहे की नाही हे संशोधकांनी शोधून शाहूंना अभिप्रेत असलेला समाज घडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत हे समाजाला सांगण्याची गरज आहे. युवकांना छत्रपती शाहू महाराजांचा मोठेपणा कोणत्या गोष्टीमध्ये आहे हे उलघडून दाखविण्याची गरज आहे.
डॉ. जयसिंगराव पवार आणि डॉ. रमेश जाधव यांचे महत्त्वपूर्ण योगदान
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या लोकोत्तर कार्याचा व विचारांचा जागर आपल्या वाणी आणि लेखणीद्वारे गेली तीन दशकाहून अधिक काळ करण्याचे बहुमोल कार्य इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आणि शाहूचरित्रकार डॉ. रमेश जाधव करीत आहेत. डॉ. जयसिंगराव पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे १९८५ साली राजर्षी शाहूंच्या जीवन-कार्याचा विश्लेषणात्मक, चिंतनशील असा आढावा घेणारी तीन व्याख्याने दिली. आणि त्या व्याख्यानाना अक्षररूप देत ‘राजर्षी शाहू- एक दृष्टिक्षेप’ हे पुस्तक १९८९ साली प्रकाशित केले. तेंव्हापासून आजपर्यंत शाहूमय झालेल्या डॉ. पवार सरांनी विपुल असे लेखन, संपादन केले आणि ग्रंथ, पुस्तके, बृहद स्वरूपातील ग्रंथराज ह्यांची निर्मिती जगभरातील काही देशातील भाषांमध्ये शाहू चरित्राचे भाषांतर करून राजर्षी शाहूंचे कार्य जगाच्या केली आहे. घरोघरी राजर्षी शाहू’ अभियान राबविणाऱ्या आणि भारतातील अन्य राज्यातील भाषांसह कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचे बहमोल कार्य डॉ. पवार यांनी केले आहे, अद्यापही करीत आहेत. लोकराजा राजर्षी शाहूंच्या संदर्भातील डॉ. पवार सरांनी साकारलेल्या सर्व वाङ्मयीन स्मारकांचा परिचय ग्रंथामध्ये करून दिलेला आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत डॉ. रमेश जाधव यांनी दैनिक पुढारीच्या ‘बहार’ या रविवार पुरवणीत दिनांक ३ जानेवारी १९९३ ते १० एप्रिल १९९४ पर्यंत राजर्षी शाहूंच्या जीवन-कार्यावर सलग ६४ लेख लिहिले. या लेखमालेमुळे लाखो लोकांपर्यंत शाहचरित्र पोहचविण्याचे अनमोल कार्य डॉ. जाधव यांनी केले. त्यातूनच ‘लोकराजा शाहू छत्रपती’ हा ग्रंथ प्रकाशित झाला; आणि या ग्रंथाच्या आधारेच राजर्षी शाहूंच्या जीवन-कार्यावर आधारित ‘लोकराजा शाहू’ या दूरदर्शन मालिकेची निर्मिती झाली. दैनिक पुढारी आणि दूरदर्शन ह्या दोन प्रभावी प्रसार माध्यमांच्याद्वारे लोकराजा शाहूंचे चरित्र महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील, भारतातील व भारताबाहेर असणाऱ्या कोट्यावधी मराठी माणसांपर्यंत पोहोचविण्यात डॉ. जाधव यशस्वी झाले आहेत. मूलभूत पुराव्यांचा आधार घेणे, राजर्षी शाहूंच्या विषयी असणाऱ्या वादांना अस्सल पुराव्यांच्या आधारे प्रत्युत्तर देणे, शाहू कार्याचे बुद्धिनिष्ठ व वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून विवेचन, विश्लेषण आणि मूल्यमापन करणे ही डॉ. जाधव यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये आहेत. राजर्षी शाहंची वाङ्मयीन स्मारके साकारण्यात त्यांनी सुद्धा मोठे योगदान दिलेले आहे. त्यांच्याही सर्व ग्रंथांचा परिचय या ग्रंथात दिलेला आहे.
राजर्षी शाहूंच्या अर्थनीतीवर अधिक लिहिण्याची गरज
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन-कार्य म्हणजे आदर्श राजाचे एक मूर्तिमत उदाहरण ठरले आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणांची पायाभरणी राजर्षी शाहू महाराजांच्या विचार आणि कार्यातून झालेली दिसून येते. काळाच्या पुढे १०० वर्षे पाहणारा एक प्रजाहितदक्ष, गुणग्राहक, कर्तव्यदक्ष राजा म्हणून सर्वसामान्य जनतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान असणारा रयतेचा राजा म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज होत. राजर्षी शाहू महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक, क्रीडा इत्यादी क्षेत्रात क्रांतिकारी स्वरूपाचे कार्य केले आहे. राजर्षी शाहंच्या सामाजिक कार्यावर फार मोठ्या प्रमाणावर लिहिले गेले; आजही लिहिले जात आहे. त्या मानाने लोकराजा राजर्षी शाहूंचे आर्थिक विचार, धोरण किंवा कार्याकडे संशोधक, लेखकांनी फारसे लक्ष दिल्याचे दिसत नाही. विशेषत्वाने उल्लेख करायचा तर – ‘श्री शाहू छत्रपतींचे अर्थकारण’- लेखक – सौ. मीना कुलकर्णी व ब. शि. कुलकर्णी; ‘छत्रपती शाहूंचे समाजवादी आर्थिक धोरण एक चिकित्सक अभ्यास’ – लेखक : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. वि. बा. घुगे; ‘राजर्षी शाहूंची अर्थनीती’-संपादक – प्राचार्य डॉ. जे. के. पवार या तीन ग्रंथांचा विचार करता येईल. या तिन्ही ग्रंथांचा परिचय ‘राजर्षी शाहूंची वाङ्मयीन स्मारके ‘ मध्ये दिलेला आहे.
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी शेती, उद्योग, व्यापार, सहकार, इत्यादी क्षेत्रात क्रांतिकारी व मूलभूत स्वरूपाचे कार्य केले आहे, विचार मांडले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हरितक्रांतीचे ते जनक ठरले आहेत. शेती-उद्योगात त्यांनी अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत. अर्थकारणातील त्यांच्या कार्यांबद्दल फारसे लेखन, संशोधन झालेले नाही. तेंव्हा राजर्षी शाहूंचे कृषीविषयक धोरण, उद्योगविषयक धोरण, तसेच त्यांची जलनीती, व्यापारनीती, सहकारनीती, दुष्काळ निवारण कार्य व नीती, प्रशासननीती, ग्रामविकासनीती, त्याचप्रमाणे कामगार विषयक धोरण व विचार, मानवी संसाधनाचे नियोजन, त्यांचे वाहतूक, दळण-वळण धोरण, त्यांचे काळातील सार्वजनिक आय-व्यय इत्यादीबद्दल सखोल अभ्यास होण्याची, ह्या सर्व कार्याबद्दल ग्रंथ, पुस्तके, पुस्तिका प्रसिद्ध होण्याची अत्यंत गरज आहे. कारण राजर्षी शाहूंचे आर्थिक क्षेत्रातील विचार व कार्य आजही मार्गदर्शक आहेत. राजर्षी शाहूंचे आर्थिक धोरणे आणि आर्थिक विचार समाजापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहचले नाहीत ही खंत आहे.
लोकराजा छत्रपती शाहू महाराज आणि जागतिकीकरण
सन १९९१ पासून आपण जागतिकीकरणाचा स्वीकार केला. गेली तीन दशकांहून अधिक काळ आपण जागतिकीकरणाच्या वातावरणामध्ये वावरत आहोत. खरं म्हणजे जागतिकीकरण ही संकल्पना आपण खूप उशिरा स्वीकारली आहे. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी जागतिकीकरणाशी स्वत:ला आणि कोल्हापूर संस्थानला शंभर वर्षांपूर्वीच जोडले होते. त्यामुळेच ब्रिटनमधील मँचेस्टरची मशिनरी शाहमिलमध्ये आलेली दिसते. राजर्षी शाहूंनी इंग्रजी शिक्षणाचा पाया घातलेला दिसतो. मेरी वेदर किंवा मेरी वॉलन्सेस यांना नवे काही उभारण्याचे बळ दिलेले दिसते. त्याकाळात विदेश दौरा करण्यास तीव्र विरोध होत असे. शिवाय विदेश दौरा केलाच तर पूजा-अर्चा करण्याची सक्तीच होती. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून छत्रपती शाहू महाराजांनी विदेश दौरा केला. केवळ सहल म्हणून दौरा केला नाही; तर सन १९०२च्या युरोपच्या दौऱ्यात छत्रपती शाहूंनी पाश्चात्त्यांच्या प्रगतीचे, आधुनिक ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाचे, आधुनिक प्रकल्पाचे बारकाईने निरीक्षण केले. युरोपातील लोकांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचा प्रत्येक स्त्रोत मोठ्या कल्पकतेने वापरून आपली भौतिक प्रगती केल्याचे छत्रपती शाहूंनी पाहिले. आपल्याकडेही असं का होऊ नये, असे विचार त्यांच्या मनात घोळू लागले. त्यातून वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीवर व पाणी टंचाईवर कायस्वरूपी मात करण्याचा निर्णय छत्रपती शाहूंनी घेतला.
छत्रपती शाहू महाराजांनी सन १९०२ मध्ये कोल्हापूर संस्थानचे ‘सार्वत्रिक पाटबंधारे धोरण’ जाहीर केले. १९०२ सालच्या या पाटबंधारे धोरणामध्ये असे म्हटले होते की, ‘संस्थानात इरिगेशन होण्याचे तलाव कोठे आहेत. त्यांस पाण्याचा पुरवठा कोठून होतो. वर्षभर तिमाही पाणी किती येते, किती पाण्याचा उपयोग करता येईल, तलाव बांधून पाणी आल्यास गाळ कोणत्या जातीचा येईल, त्यापासून शेतीचा फायदा अगर गैरफायदा होईल, वगैरे गोष्टींबद्दल माहिती खुलासेवार घेण्याची आहे.’ तसेच स्वतंत्र पाटबंधारे विभाग स करून त्यावर खास ‘इरिगेशन ऑफिसर’ची नेमणूक करण्यात आली. राजर्षी शाहूच्या हयातीत राधानगरी धरणाचे संपूर्ण काम होऊ शकले नाही. मात्र राधानगरी धरण हे छत्रपती शाहूचे जीवितकार्य बनले होते.
घृष्टं घृष्टं पुनरपि पुनश्चंदनं चारुगंधम्
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन-कार्याचा आणि त्यांच्या समाजक्रांतिकारक विचारांचा मागोवा घेणारे अनेक ग्रंथ, पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मात्र अद्यापही असे ग्रंथ प्रकाशित होण्याची गरज आहे. असे विचार पूर्वीही आणि आजही व्यक्त होत होते, आहेत. २९/१/१९४१ रोजी एका पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेमध्ये श्रीधरराव शंकरराव शिर्के यांनी व्यक्त केलेले विचार त्यास पुष्ठी देणारे आहेत. श्री. शिर्के लिहितात, कै. शाहूमहाराजांची आजपर्यंत इंग्रजी, मराठी, संस्कृत वगैरे भाषांतून चरित्रे लिहिली गेली आहेतच. परंतु ‘घृष्टं घृष्टं पुनरपि पुनश्चंदनं चारूगंधम’ या कव्युक्तिप्रमाणे अशा थोर विभूतींची जितकी जास्त चरित्र निरनिराळ्या लेखकांकडून निरनिराळ्या भाषांतून लिहिली जातील तितका त्यापासून बोधरूपी परिमल जास्तच दरवळणार आहे.’
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसंबंधी अजूनही ग्रंथ प्रकाशित झाले पाहिजेत असे विचार शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू बॅरि. पी. जी. पाटील यांनी एका ग्रंथाच्या प्रस्तावनेत व्यक्त केले आहेत. बॅरि. पाटील लिहितात, “राजर्षी शाहू महाराज हा एक सदैव अभ्यासाचा, चिंतनाचा आणि संशोधनाचा ताजा विषय होय. त्या थोर राजर्षीनी (१८७४-१९२२) आपल्या अल्पशा कारकीदीत महाराष्ट्र अभ्युदयाची जी भक्कम पायाभरणी केली तिचा शोध घेणे हे नित्य नवोन्मेष- शालिनी कविप्रतिभेप्रमाणे विचारांचे नवेनवे स्फुल्लिंग दर्शविणारे आहे; म्हणूनच मी राजर्षी संबंधीच्या नव्या नव्या ग्रंथाचे स्वागत करीत असतो. १९२४ मध्ये आण्णासाहेब लठ्ठे यांनी शाहू महाराजांचे चरित्र लिहिल्यानंतर अलिकडच्या काळात, जन्मशताब्दी वर्षात राजर्षीसंबंधी बरेच ग्रंथ प्रसिद्ध झाले तरी ते अपुरेच वाटावे इतके राजर्षीचे कार्य मोठे आहे. पाश्चात्य साहित्यात शेक्सपियर किंवा नेपोलियनसारख्या मोठ्या व्यक्तींच्या जीवन व कार्यावर शेकड्यांनी ग्रंथसंपदा निर्माण होते आणि तरीही नवनवीन ग्रंथ लेखक त्या विषयाला हात घालीतच असतात. आपल्याकडे राजर्षीसारखा विषय उपेक्षितच राहिला आहे असे म्हणावे लागते. याचा अर्थ लोकराजा राजर्षी शाहूंच्या संदर्भात अद्यापही विपुल लेखनाची गरज आहे.
राजर्षीचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व दर्शन घडविणारी वाङ्मयीन स्मारके
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे मानवमुक्तीच्या संग्रामातील समर्थ सेनानी होते. त्याकाळात अस्पृश्यांना शिवणे, स्पर्श करणे हे पाप समजत असत. लोकराजा राजर्षी शाहू महाराज मात्र येथून तेथून सारी माणसे एक मानणारे होते. नुसते मानणारे नव्हते, तर प्रत्यक्ष तसे करून दाखविणारे होते. एक प्रजाहितैषी दूरदर्शी समर्थ राजा, म्हणून त्यांना लौकिक प्राप्त झाला. संस्थानातील आणि संस्थानाबाहेरील प्रजाजनाशी सतत मिसळून राज्य चालविणारा व दैनंदिन जीवन जगणारा एक जाणता राजा म्हणून प्रजेच्या हृदयांत अलौकिक स्थान मिळविणारा एक आगळा-वेगळा माणूस म्हणून शाहूराजे समाजसुधारक होते.
‘माणसातील राजा आणि राजातील माणूस’ म्हणून जगाच्या इतिहासात छत्रपती शाहू महाराजांची सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली आहे. अशा या शाहूराजांच्या स्मृतिशताब्दी निमित्त प्रसिद्ध होत असलेल्या ‘राजर्षी शाहूंची वाङ्मयीन स्मारके’ या ग्रंथामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या व्यक्तित्व दर्शनाबरोबरच कर्तृत्व दर्शन घडविणाऱ्या साहित्यकृतींचा परिचय करून दिलेला आहे.
श्रीशाहूनृपाची सेवा, हाच अमुचा ठेवा
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काळाच्या पुढे जाऊन क्रांतिकारी विचार मांडले, नुसते विचार मांडले नाहीत तर त्या विचारानुसार समाजक्रांतिकारक असे कार्य केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांना जोपासावे, त्यांचे विचार अधिकाधिक अभ्यासले जावेत, रयतेच्या या राजा विषयीचा आदरभाव विविध माध्यमातून व्यक्त करावा यासाठी अनेक शब्दप्रभू सातत्याने कार्यरत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच राजर्षी शाहूंच्या संदर्भात शेकडो वाङ्मयीन स्मारकांची निर्मिती झाली आहे. राजेशाहीत अनेक राजे झाले, पण ‘लोकराजा’ ही लोकांच्या काळजाने दिलेली पदवी फार कमी राजांच्या वाट्याला आली. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या विषयी कृतज्ञता, आदरभाव व्यक्त करताना शाहू महाराजांचे प्रेम लाभलेले प्रतिभासंपन्न कवी आप्पाजी धुंडीराम मुरतुले ऊर्फ कवी सुमंत आपल्या ‘प्रेमाचा आहेर’ या कवितेत लिहितात, श्रीशाहूनृपाची सेवा, अमुचा ठेवा। शाहविन दुसऱ्या आम्ही न भजतो देवा।।”
अपार कृतज्ञतेची अखंड परंपरा
लोकराजा शाहू महाराजांविषयी कवी सुमंत यांनी अपार कृतज्ञता व्यक्त केली आहे. तशीच अपार कृतज्ञता अनेकांनी व्यक्त केली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या लोककल्याणाच्या कार्यामुळे जनसामान्यांना शाहू त्राते वाटतात, पूज्यनीय वाटतात. काहीजण तर त्यांची प्रतिमा देव्हाऱ्यात ठेवून पूजा करतात. तथापि काही मोजकी पांढरपेशी मंडळी शाहूंचा मनस्वी द्वेष करतात. काहींनी पूजा करावी, काहींनी व्देष करावा, हे असे का व्हावे? हा प्रश्न सतावत असल्याने शासकीय अधिकारी असलेले सखोल अभ्यास केला, आणि प्रदीर्घ काळाच्या अभ्यासातून १९८४ साली ‘राजषी शाहू राजा व माणूस’ हा प्रकाशित केला. पुणे येथील प्रा. बी. ए. कांबळे यांनी राजर्षी शाहूच्या अलौकिक व क्रांतिकारक कार्यास अक्षररूपी मानाचा मुजरा करणेसाठी २०१५ साली ‘करवीर नरेश शाहू छत्रपती’ हे २०० पृष्ठाच पुस्तक लिहिले आहे. राजर्षी शाहू महाराजांबद्दल आदर भाव व्यक्त करताना पुस्तकातील एका प्रकरणाचा समारोप करताना प्रा. कांबळे लिहितात, “एका दिशेला शाहू महाराज आणि दुसऱ्या दिशेला परमेश्वर उभा असेल, तर मी प्रथम शाहू महाराजांना नमस्कार करीन.
‘कामगार’ म्हणून कार्यरत असणारे आणि प्रचंड वाचन, चिंतन, मनन यामध्ये व्यस्त असणारे एक अवलिया म्हणून उमेश सूर्यवंशी यांची ओळख आहे. उमेश सूर्यवंशी यांनी अक्षर आणि चित्रांच्या माध्यमातून लोकराजा छत्रपती शाहूंचा गौरव करणाऱ्या ‘राजर्षी’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. पुस्तकाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करताना, ते लिहितात, “हे पुस्तक म्हणजे काही नवे संशोधन नव्हे. मी स्वत: काही इतिहासकार किंवा इतिहास संशोधक नाही. व्यवसायाने मी कामगार श्रेणीत मोडतो. शाहूराजांप्रती विधायक आणि चिकित्सक आदर मनात कायम ठेवून ‘एका कामगाराने’ त्याला जमेल तसा, त्याच्या दृष्टीला दिसला तसा ‘शाहराजा’ लिहिला आहे.”
प्रशासकीय क्षेत्रातील नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर १८ वर्षांनी म्हणजेच वयाच्या ७८व्या वर्षी पी. टी. पाटील यांनी ‘राजर्षी शाहू महाराज चरित्र काव्य’ नावाचे १७६ पृष्ठांचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाच्या मनोगतामध्ये श्री. पाटील लिहितात, एका महान व्यक्तीच्या आठवणी पद्याच्या रुपात अक्षरबद्ध करून काव्याच्या रुपात वाचकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न सोपा नव्हता, याची मला जाणीव होती. लिखाण करताना वापरलेल्या शाईमध्ये मी माझे प्राण ओतले असून माझ्या रक्ताची लाली त्यात दिसून येईल याची मला खात्री आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या क्रांतिकारक सामाजिक कार्यामुळे कुत्र्या- मांजरांपेक्षाही हीन दीन वागणुक मिळणाऱ्या माणसांना ‘माणूस’ म्हणून जगण्याची संधी मिळाली. असंख्य माणसांना माणुसकीचे दर्शन झाले. त्यामुळेच माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या शाहूराजांबद्दल अनेकांनी गद्य- पद्य स्वरुपात भरभरून लिहायला सुरुवात केली. ज्यांच्या हातात खराटे होते, त्यांच्या खराट्यांचे लेखणीत म्हणजे केवळ इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण असलेल्या आणि कोल्हापूर महानगरपालिकेत झाडू कामगार म्हणून रुपांतर झाले आणि अशा माणसांनी आपल्या हृदयातील शाहप्रेमाला अक्षर रूप दिले. याचे उत्तम उदाहरण कार्यरत असलेल्या विजय तुकाराम शिंदे यांचे ‘शाहूराजं’ हे १६० पृष्ठांचं पुस्तक होय. ‘शाहूराज’ हे पुस्तक म्हणजे जीवनाधारीत खंडकाव्यरूपी पोवाडा आहे.
लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचे कर्तृत्व बहुआयामी होते. समाजातल्या रंजल्या-गांजल्याबद्दल त्यांना कणव होती. त्यांनी लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी, कल्याणासाठी केलेले कार्य हे अलौकिक स्वरुपाचे ठरले आहे. राजर्षी शाहूंचे विचार, सिद्धांत अनुभवांवर आधारलेले होते. त्यांनी जेजे पाहिले, अनुभविले, त्या अनुभवांचे मंथन करुन मानव मुक्तीसाठी त्यांनी तसे प्रयत्न केले. अर्थात् शाहू महाराज ‘राजा’ होते, त्यांच्याकडे सत्ता होती म्हणूनच त्यांनी हे अवाढव्य आणि अलौकिक कार्य केले असे म्हटले तर इतर राजांनी, सत्ताधाऱ्यांनी असे कार्य का केले नाही; असाही विचार मनात येतो. याबाबत पुढे जाऊन असे म्हणता येईल की, सत्तेला स्वयमेव असे मूल्य नसतेच, तर नवसमाज निर्मितीच्या कार्यात ती जे योगदान करील त्यावरून तिचे मोल ठरते, हे राजर्षी शाहूंच्या राज्यकारभाराचे मध्यवर्ती सूत्र होते. “
श्री शाहूंचे विस्मरण आत्मघाताचेच होईल
ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत व लेखक, दलितमित्र रा. ना. चव्हाण यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन-कार्यावर, विचारांवर प्रसंगानुसार वैचारिक व चिंतनशील लेख लिहिले आणि ते त्या त्या काळात विविध दैनिकांतून, साप्ताहिके व मासिकांतून प्रसिद्ध झाले होते. दलितमित्र रा. ना. चव्हाणांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजिव रमेश चव्हाण यांनी आपल्या कुटुंबियांच्या व मित्रांच्या सहकार्याने रा. ना. चव्हाण लिखित ‘लोकनेते राजर्षी शाहू महाराज काळ आणि कार्य’ (प्रकाशन सन २००२); ‘राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व काय’, (प्रकाशन सन २०१३); आणि ‘लोकशाही समाजवादाची प्रेरकशक्ती : राजर्षी शाहू’ (प्रकाशन सन २०२२) ही तीन पुस्तके प्रकाशित केलेली आहेत.
दलितमित्र रा. ना. चव्हाण लिखित ही तीन वाङ्मयीन स्मारके म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वैचारिक चरित्र आहे. या साहित्यकृतींचा, वैचारिक चरित्रांचा परिचय ‘राजर्षी शाहूंची वाङ्मयीन स्मारके’ मध्ये दिलेला आहे. ‘लोकशाही समाजवादाची प्रेरक शक्ती : राजर्षी शाहू मध्ये’ राजर्षी शाहूंचे श्रेष्ठत्व स्पष्ट करताना रा. ना. चव्हाण लिहितात, राजर्षी शाहूंचे पुण्यस्मरण श्वासोच्छवासाइतके महत्त्वाचे आहे, कर्तव्याचे आहे. तर ‘लोकनेते राजर्षी शाहू महाराज काळ आणि कार्य’ या पुस्तकातील ‘राजर्षी शाहू महाराजांचे स्मरण व ध्येय धोरण’ या लेखात ते लिहितात, “शाहू पक्ष आहे, शाही ही एक धार्मिक – सामाजिक-राजकीय नीती आहे. राजर्षी शाहू यांनी प्रांताच्या मर्यादा ओलांडून आपली राजकीय दृष्टी बाहेरच्या भारतात पोहोचविली होती. चालू व भावी राज्यकर्ते मग कोणतेही असोत, त्यांना श्री शाहू विस्मरण आत्मघाताचेच होईल! याच आशयाचे उद्गार पत्रकार व युवा लेखक चंद्राकांत पाटील यांनी ‘व्यवस्था : काल आणि आज’ या पुस्तकात उधृत केले आहेत. ‘कलासक्त राजा मिळाला, पण राज्यकर्ते ?’ या प्रकरणाचा समारोप करताना ते लिहितात, शाहू महाराज के विचारों से इतनाही मत टूटना की, लोग फरियाद करेंगे, बल्की उनके विचारों का इतना सन्मान करना की लोग आप को फिर याद करेंगे।
पुस्तकाचे नाव – राजर्षी शाहूंची वाङ्मयीन स्मारके
लेखक – डॉ. जे. के. पवार
प्रकाशक – राज प्रकाशन, कोल्हापूर मोबाईल – 9420586622, 9665159556
किंमत – ९०० रुपये ( सवलतीच्या दरात – ५०० रुपये )
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.