आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
थंडी, पाऊस, गारपीट व पुन्हा थंडी अशा समिश्र वातावरणाचा आठवडा ‘
थंडी –
आज व उद्या (सोमवार व मंगळवार दि. २३ व २४ डिसेंबर) ला मुंबई, कोकणसहित संपूर्ण महाराष्ट्रात बोचऱ्या वाऱ्यासहित माफक प्रमाणात थंडीची शक्यता ही कायम आहे.
उबदारपणा –
परवा व नंतर, बुधवार आणि गुरुवार दि. २५-२६ डिसेंबरला ढगाळ वातावरणासहित किंचितशीच थंडी कमी होवून संपूर्ण महाराष्ट्रात ऊबदारपणा जाणवेल.
पाऊस-
गुरुवार ते शनिवार दि. २६ ते २८ डिसेंबर दरम्यानच्या तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.,
त्यातही विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगांव, मालेगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, छ.सं.नगर, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम, शेगाव, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात व लगतच्या परिसरात पावसाची शक्यता अधिक जाणवते.
गारपीट –
सध्याच्या वातावरणीय घडामोडी पाहता शुक्रवार दि. २७ डिसेंबर ला संपूर्ण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात असे एकूण २५ जिल्ह्यांत तूरळक ठिकाणी किरकोळ गारपीटीची शक्यता जाणवते.
त्यातही विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, छ.सं.नगर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम ह्या जिल्ह्यात व लगतच्या परिसरात गारपीटीची शक्यता अधिक जाणवते.
गारपीटीची शक्यता कश्यामुळे वाढली?
सध्याच्या २६ डिसेंबर दरम्यान देशात प्रवेशलेले प्रखर पश्चिम प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून व राजस्थानच्या आग्नेयला दिड ते दोन किमी. उंचीपर्यंतच्या पातळीतील थंड कोरडे चक्रीय वाऱ्यांची व ८०० मीटर उंचीपर्यंतच्या खालच्या पातळीतील अरबी समुद्रातून नैरुक्त दिशेकडून तर बं. उपसागरातून पूर्वे दिशेकडून आलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांची अश्या तीन वाऱ्यांच्या टक्करीतून कमी उंचीवरच सांद्रीभवन घडून येते-न -तेच घनीभवन होवून म्हणजेच डायरेक्ट द्रविकरणाची स्टेज लगेचच ओलांडून घनीभवन होवून गारपीट होण्याची शक्यता निर्माण होत आहे.
पुन्हा थंडी-
मात्र वर्षाअखेरीस म्हणजे सोमवार दि. ३० डिसेंबर पासून हळूहळू थंडीत वाढ होवुन नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची शक्यता आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.