June 18, 2024
Dipawali Special article by Sunetra Joshi
Home » उजळता एक पणती…
मुक्त संवाद

उजळता एक पणती…

मनात नैराश्य असेल तर तिथेही एक आशेचा दिवा आपणच लावायचा. प्रयत्न आणि इच्छाशक्ती असायला हवी. मग यशाचा दिवा पण उजळतोच आपल्या आसपास असणार्‍या लोकांना आपण आनंद दिला तर आपला आनंद सुध्दा द्विगुणित होतो.

सौ. सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी

दिवाळी उत्सव दिव्यांचा.. दिव्याच्या प्रकाशाचा.. प्रकाशातील तेजाचा.. तेजातील जिवाचा आणि जिवाजीवांच्या विश्वासाचा.. विश्वासू नात्यांचा..दिवाळी मधे पणतीला विशेष महत्त्व असते. इवलीशी पणती पण पूर्ण सामर्थ्याने जळून अवघ्या अंधकाराला पळवून लावते. तशीच घरात सुध्दा जळणारे अनेक दिवे… आई शांत तेवणाऱ्या समईसारखी..तर बायको.. निरांजन सारखी.. तिच्या शिवाय पुजा पूर्ण होणारच नाही. आणि मुलगी.. घरावरच्या लखलखणाऱ्या रोषणाई सारखी जिच्या मुळे प्रकाश तर पडतोच पण घराला शोभा देखील येते.
आणि मग याच तिच्या नात्यांचा हा उत्सव… दिव्यांचा तसेच नात्यांचा.

थोडे पणती विषयी..

उजळता एक पणती
ज्योतीने तेजाची आरती…
इवलीशी ती तरी तिचा प्रकाश
सभोवतीच्या तमाचा करी नाश
कोपऱ्यातली ती मिणमिणती…

अवघे जीवन लोकार्पण
शिकावे तिजपासून समर्पण
सांगते संस्कार अन संस्कृती…

दिवाळी म्हणजे तिची कहाणी
ज्योतीने ज्योत द्यावी उजळुनी
बनते प्रकाशाला झगमगती…

लावू ज्ञानदिप अंतरी
ऐक्य नांदो घरोघरी
मिळुनी करू या राष्ट्राची प्रगती..
उजळता एक पणती…

दिवाळी येते तिच आप्त मित्र यांच्या भेटीचे संकेत घेऊन. आणि मग मन जसे आंबट गोड खमंग अशा आठवणींनी भरते तसेच डब्यांमधे सुध्दा खमंग गोड पदार्थ भरल्या जातात. आणि एकमेकांना भेटून जशा आपण आठवणी शेअर करून पुनःप्रत्ययाचा आनंद घेतो तसाच फराळ सुध्दा एकमेकांना देऊन आनंद वाटतो. मग आठवणीने जसे ठेवणीतले पदार्थ केल्या जातात तसे आठवणीतल्या मित्रमैत्रिणींना फोन किंवा मेसेज करुन जुन्या संबंधांना नव्याने उजळल्या जाते.

घराचा कानाकोपरा जसा झाडून पुसून लख्ख करतो तसेच मनातल्या आठवणी सुध्दा झाडून येत राहतात. आणि मन पुन्हा आठवणीने आनंदी होते. घरातली अडगळ जशी बाहेर फेकतो तसेच मनातल्या कडू आठवणी सुध्दा बाहेर टाकायला हव्यातच. पण तरीही जशी एखादी वस्तू फेकता फेकता असू दे येईल कधीतरी उपयोगी म्हणून आपण ठेवतोच तसेच मनही काही आठवणी नाही विसरू शकत.. असो तो एक स्वतंत्र विषय आहे. आता आपली आनंदाची दिवाळी आहे. छान रांगोळ्या काढून आपल्यातल्या कलागुणांचे कौतूक करून घ्या. चविष्ट पदार्थ करून पाककलेत शाबासकी मिळवा. सुंदर नटून सजून स्वतःच्या प्रेमात नव्याने पडा.

या दिवाळीत नाती घट्ट होण्याला खूप वाव असतो. पाडव्याच्या दिवशी मुलगी वडीलांना औक्षण करते. आपल्या डोक्यावर असलेले मायेचे छत्र सदैव राहो म्हणून औक्ष चिंतिते.तसेच बायको नवर्‍याला औक्षण करुन त्याच्या आयुष्याची कामना करते म्हणजे अशीच सोबत कायम असावी असे मागते. तर नवरा सुध्दा तिला ओवाळणी घालतो. प्रेमाची स्नेहाची आठवण म्हणून. भाऊबीज तर बहीण भावाच्या प्रेमाचा सण. सतत पाठीशी आहे हे सांगणारा. आणि बहीण प्रेमाचे माहेर मागणारी.

कधीतरी विसावा हवा म्हणून दोन दिवसाचे हक्काचे माहेर असावे त्याकरता भावाला औक्ष लाभावे म्हणून ओवाळणारी… तर असे हे नात्यांचे बंध कधी काही कारणाने दुरावतात. पण ते विसरून पुन्हा एकत्र या सांगणारी ही दिवाळी… दिवे उजळायचे म्हणजे नुसती तेलवातच नव्हे तर ज्ञानाचे स्नेहाचे अंतरातले दिवे सुध्दा उजळायचे. ज्या प्रकाशात आपली पाऊलवाट तर उजळेलच पण इतरांनाही त्या प्रकाशात चालता यायला हवे.

मनात नैराश्य असेल तर तिथेही एक आशेचा दिवा आपणच लावायचा. प्रयत्न आणि इच्छाशक्ती असायला हवी. मग यशाचा दिवा पण उजळतोच आपल्या आसपास असणार्‍या लोकांना आपण आनंद दिला तर आपला आनंद सुध्दा द्विगुणित होतो. आज खूप ठिकाणी मुले परदेशी आईवडील किंवा कधीकधी एकटीच आई किंवा बाबा उदास असतील… तर तिथे जाऊन त्यांना भेटून क्षणभर आनंद द्या. खरे तर या निमित्ताने तरी मुलांनी त्यांना भेटायला यावेच.. आपल्याला परमेश्वर कृपेने जे मिळाले असेल त्यातले चिमुटभर तरी इतरांना देऊ शकतोच ना? मग थोडा आनंद इतरांना देऊन बघा. आत आनंदाची कारंजी उसळतांना तुम्हाला जाणवतील… असा हा सण दिवाळी… आनंदाचा..

Related posts

महर्षी शिंदेंना टिळकांनी या प्रश्नावर स्वाक्षरी देणे टाळले – डॉ. जनार्दन वाघमारे

वैशाखवणवा

पसायदान पुरस्कारासाठी कविता संग्रह पाठविण्याचे आवाहन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406