September 8, 2024
Abhang of Saints is loyal to society and people
Home » संतांचे अभंग हे समाजनिष्ठ अन् जनतानिष्ठ
मुक्त संवाद

संतांचे अभंग हे समाजनिष्ठ अन् जनतानिष्ठ

ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनि म्हणती साधू ॥ १ ॥
अंगा लावुनिया राख । डोळे झाकुनी करीती पाप ॥ २ ॥
दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा || ३ ||
तुका म्हणे सांगो किती । जळो तयाची संगती ॥४॥

ढोंगी लोक भगवी कफनी वगैरेसारख्या अनेक गोष्टी परिधान करतात. आपण साधू असल्याचे भासवत असतात. तुकारामांनी अशा लोकांचे अक्षरशः अनेक अभंगातून वर्णन केले आहे. ही बाह्य उपाधी विविध प्रकारची असून साधू आपले साधुत्व मिरविण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी अंगाला राख फासलेली. हातात भोपळ्याचे वाद्य, टाळ, मृदुंग इत्यादी घेतात. उंची टोपी घालतात. भगवी वस्त्रे घालतात. कीर्तनाच्या वेळी तल्लीनतेचे नाटक करतात. तसे दाखविण्यासाठी रडतात, पडतात वा लोळतात. मुद्राभिनय तर इतका तंतोतंत करतात समोरचे भक्त त्यांच्या साधुत्वापुढे नतमस्तक होतात.

प्रत्यक्षात अशा भोंदू साधूंची वृत्ती खरी भक्ती मुळीच नसते. सर्वांगाला राख फासून लोकांचे डोळे चुकवून पाप करतात. जगामध्ये वैराग्य दाखवितात. परंतु त्यांची खासगी जीवनशैली ही ऐषारामाची आणि भोगांची असते. विषयांचा सोहळा भोगतात. तुकाराम महराज म्हणतात, अशांच्या संगतीला आग लागो. अशांच्या सहवासात राहणे म्हणजे पापाचा धनी होणे होय. अशा भोंदू साधूंविषयी किती सांगावे ? लोभी, साधू, फसवे संत, अहंकारी वैदिक त्यांच्या पाखंड विळख्यातून समाजाला मुक्त करून खऱ्या धर्माची ग्वाही फिरविणे, नामसंकीर्तनाचा महिमा वाढविणे हेच खरे तुकारामांचे जीवित प्रयोजन ठरलेले होते. ढंग, ढोंग, अनाचार, अहंकार – अंधश्रद्धा या पापातून समाजाला मुक्त करण्यासाठी मी तीक्ष्ण शब्दांचे बाण हातामध्ये फिरत आहे असे ते मोठ्या निर्धाराने व आवेशाने एका अभंगात आपले विचार व्यक्त करतात. यामागे ढोंगी साधूंचे पितळ उघडे पाडणे व भोळ्या समाजाला खऱ्या भक्तिमार्गाकडे वळविणे हा हेतू आहे.

तुकारामांची दृढ श्रद्धा ही भक्तिमार्गावर आहे. म्हणूनच दुसऱ्या एका अभंगातून त्यांनी ढोंगी साधुत्वावर ताशेरे ओढले. ते या अभंगाच्या विचाराशी सहमती दर्शविणारे आहेत. भगवी छाटी धारण करून संन्यास घेणे, गंध – माळा-टिळा-भस्म लेणे, तीर्थयात्रा करणे, उपास-तापास, नवस-सायास करणे म्हणजे खरा धर्म नव्हे. ही धर्माची उपांगे आहेत. उपांगाच्या जोरावर साधुत्व मिरविणे तुकारामांना नामंजूर आहे. खरे तर तुकारामाच्या अस्सल साधुत्वामुळे त्या भोंदू साधूंना त्यांचा दरारा वाटत होता हे नक्कीच. त्यांच्या पुढे भगवी वस्त्रे परिधान करून उभारण्याचे धैर्य अशा या साधुत्वाचे ढोंग करणाऱ्या मंडळीमध्ये नसे. त्यामुळेच तुकारामांच्यावर त्यांचा राग होता. त्यातूनच तुकारामांचा मानसिक छळ करण्यात छुप्या रीतीने सहभागी होत असत.

‘काय भस्म करील राख। अंतर पाक नाही तों। अंतरीची बुद्धी खोटी । भरले पोटी वाईट ।।’ या अभंगातही तुकाराम भस्म लावून साधुत्वाचे ढोंग घेणे सोप, पण अंत:करणाची शुद्धता महत्त्वाची ठरते. ती नसेल तर साधुत्वाचा लवलेशही त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सापडणार नाही. बुद्धी भ्रष्ट असेल, अंत:करणात खोटेपणा असेल आणि पोटात वाईटपणाची भावना असेल तर त्याने अंगाला राख लावण्याचा काय उपयोग? राखेलाच महत्त्व द्यायचे असेल तर ….. तुकाराम म्हणतात राख लावी गाढव ।। गाढव देखील राखेत लोळते. बक ध्यान धरी । सोंग करूनि मासे मारी । बगळा ध्यान धरल्याचे सोंग करून मासे मारतो, तसे साधूचे ढोंग करणारे लोक स्वार्थावर नजर ठेवून असतात. लोक कशी भोंदूगिरी करतात । वासनेचे कर्म करून स्वतःला साधू म्हणवून घेतात.

तुकारामांनी ‘बुडती हे जन न देखवी डोळा’ अशा कळवळ्यापोटी समाजाला उद्धाराचा मार्ग दाखवून दिला. त्यांचा पिंड तर परखड समाज सुधारकाचाच आहे. जीवनाच्या वाटा उजाळण्याचा प्रयत्न करणे व त्याचसाठी ढोंगी साधुत्वाची भोंदूगिरी समाजाने ओळखावी म्हणून त्यांनी अनेक अभंग लिहिले, जेणेकरून भोळ्या भाबड्या समाजाच्या जाणिवा जागृत होतील. अभक्त, ब्राह्मण, गोसावी, ढोंगी साधू या सर्वांच्यावरच त्यांनी आपल्या अभंगातून हल्ला चढविला, त्यातून त्यांची परखड समाज सुधारकांची भूमिकाच स्पष्ट होते.

तुकारामांनी अनेक तऱ्हेने, वेगवेगळ्या शब्दात निरनिराळ्या उपमा देऊन ढोंगी साधूंची अवगुणी नीती उजेडात आणण्याचे जणू व्रत घेतले. पण आजच्या काळात समाजात जी स्थिती आहे ती काय दर्शविते ? तुकारामांच्या विचार मार्गाने समाज जात आहे का? त्यांनी सांगितलेला आचार धर्म आपण स्वीकारत आहोत काय? समाजात शिक्षण आले, ज्ञान-विज्ञान आले, माहिती – तंत्रज्ञान आले, अवकाश यात्रा सफल झाल्या, चंद्रावर जाण्याइतपतची संशोधन पातळी गाठण्याच्या मार्गावर देश आहे. कॉम्प्युटर आणि अन्य सर्व प्रकारच्या कम्युनिकेशन्स सुविधा तर आहेत. संरचनामध्येही वाढ व दर्जा सुधारणा होत आहे. सेवा क्षेत्रातही खूप आशादायक झेप आपण घेत आहोत.

तरीही आज ढोंगी साधू व भोंदू महाराज यांची कमतरता नाही आणि त्यांच्या नादी लागणाऱ्यांचीही उणीव नाही. महाराज, बाबा, बापू, आचार्य अशा मंडळीच्या साधुत्वाबद्दल शंका घेण्यासारखे प्रकार घडत असल्याच्या बातम्या वाचनात येतात. भक्ताचे ब्लॅक मेलिंग करून त्यांच्याकडून पैसा, आश्रमासाठी जमीन, सोने, माणिक रत्ने हे लुटले जात आहेत ते भक्तीचा देखावा करून. मत्सरही काहीजणांमध्ये इतका की खून करण्यापर्यंतची मजल जाणे घडत आहे. स्त्रियांची अभिलाषा, त्यांच्याकडून सेवा आणि त्यांना आपल्या नादी लावणे घडत आहे. म्हणूनच कलियुगातील साधू, बैरागी यांच्या भक्ती, ईश्वरनिष्ठा वगैरेबद्दल तपास करूनच त्यांच्याबद्दलचे मत बनवायला हवे.

संतांचे अभंग हे केवळ धार्मिक नाहीत तर ते समाजनिष्ठ आणि जनतानिष्ठ आहे याचा सार्थ अभिमान सर्वांनाच लागेल. तुकारामांनी तर जीवनभर याच धर्तीवर आपले अभंग बेतले. कीर्तन, भजन, प्रवचन वगैरे माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविले. त्यांचे विस्मरण होऊन चालणार नाही.

डॉ. लीला पाटील, कोल्हापूर.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

एका प्रेमाची गोष्ट…

किर्लोस्कर कुटुंबातील न्यायालयीन “दंद्व टोकाचे !

ज्ञानेश्वरांचा समान नागरी कायदा

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading