या कथासंग्रहातील ‘माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ ही शीर्षककथा शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, वशिलेबाजी, मधुरी, कामचुकारपणा याकडे वाचकांचे लक्ष वेधते.
डॉ. शिवाजी एकनाथ काळे
‘माकडाच्या हाती कोलीत’ ही म्हण सर्वज्ञात आहे आणि त्यातील गर्भितार्थही सांगण्याची आवश्यकता नाही. विघ्नसंतोषी माणसाच्या हातात महत्त्वाचा कारभार सोपवणे असा याचा अर्थ आहे. असे केल्यानंतर त्याचे फलित काय असणार हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज काय ? जो मुळातच मूर्ख त्याला समाजाच्या हिताची संधी आली तरी तो समाजाच्या अहितातच विचार करतो. त्यातच त्याला आनंद मिळतो. समाजात पूर्वीपासून बोटावर मोजण्याइतकी का होईना पण अशी विघ्नसंतोषी माणसे आहेत आणि आपण म्हणतो तशा विचाराने प्रगल्भ झालेल्या आजच्या समाजातूनही ही विकृती लोप पावलेली आहे. किंबहुना कमी झाली आहे, असेही म्हणवत नाही याची प्रचिती पदोपदी येते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या ‘माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ या कथासंग्रहातील शीर्षककथा ही सामाजिक दृष्टीने याच विकृतीवर प्रकाश टाकते.
डॉ. बाबुराव उपाध्ये हे मराठीतील नामवंत आणि सिद्धहस्त लेखक म्हणून सुपरिचित असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. मराठीतील बहुतेक वाङ्मय प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. ग्रामीण भागात वास्तव्य केल्यामुळे आणि अतिशय खडतर जीवनसंघर्ष वाट्याला आल्यामुळे त्यांच्या साहित्यात, प्रबोधन, समाजशिक्षण आणि नैतिक विचार सामावलेला असतो. कथा, कविता, कादंबरी यासारख्या त्यांच्या साहित्यप्रकारातील यापूर्वी प्रकाशित झालेले कोणतेही पुस्तक याला अपवाद ठरलेले नाही. मग हा कथासंग्रह तरी वेगळा कसा ठरेल. समाजात उघड्या डोळ्याने वावरणाऱ्या कोणत्याही माणसाला कितीतरी न पटणाऱ्या गोष्टी दररोज दिसतात. बहुतेकजण त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातात. तथापि ज्यांच्याकडे संवेदनशील मन आहे ती व्यक्ती त्याबाबत व्यक्त होते. अशा व्यक्त होणाऱ्यांचे प्रतिनिधी असलेल्या डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या या कथासंग्रहातून चांगल्या गोष्टींचे स्वागत करतानाच अनेक सामाजिक, अस्वीकारार्ह घटनांचा परामर्श घेतला आहे.
या कथासंग्रहातील ‘माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ ही शीर्षककथा शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, वशिलेबाजी, मधुरी, कामचुकारपणा याकडे बाचकांचे लक्ष वेधते. शासनाने एका उदात्त हेतूने शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू केली. मात्र अध्यापनाच्या महत्त्वाच्या कामापेक्षा अशैक्षणिक कामात पडलेली ही एक भर म्हणून शिक्षकाच्या डोक्यावर मारली गेली. त्यातही एखादा असा वशिल्याने आलेला कामचुकार शिक्षक त्या कामात जबाबदारीने लक्ष घालीत नाही, त्यावेळी काय घडू शकते याचे मार्मिक वर्णन या कथेत येते. असा कामचुकारपणा आणि मग्रुरी निरागस विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकते याचे भान शिक्षकांनी ठेवायला हवे, असा संदेश यातून देण्याचा हा प्रयत्न आहे. शिक्षण क्षेत्रातील बहुतेक माणसे प्रामाणिक आणि आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असली तरी अशा एखाद्या व्यक्तीमुळे सबंध व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभे करण्याची संधी समाजाला मिळते. ती मिळू नये म्हणून या क्षेत्रातील जाणकारांनी जागृत व्हावे यासाठीचा हा प्रयत्न स्तुत्यच म्हणावा लागेल.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील या आणि अशा अनेक शिक्षणतपस्वी महानुभावांनी आयुष्यभर कष्ट सोसून बहुजनांच्या शिक्षणासाठी परिश्रम घेतले. त्याच क्षेत्रात शिरलेल्या विकृती, लाचखोरी, भ्रष्टाचार, संस्थाचालकांची मुजोरी हे सारेच सहन न होणारे आहे. या बदलत्या व्यवस्थेचे भयाण वास्तव ही कथा वाचकांपुढे उभे करते.
‘माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ या डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या कथासंग्रहातील कथा समाजातील अशा न पटणाऱ्या अनेक गोष्टींवर भाष्य करतात. समाजाला नीतिमत्तेचे धडे विडंबात्मक आणि विनोदी कथांच्या माध्यमातून देण्याचा प्रयोग डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केलेला आहे.
ग्रामीण भागात काही अशी माणसे असतात ज्यांना दररोज काहीतरी आग लावल्याशिवाय जेवण गोड लागत नाही. ‘कुंभाराची भागुबाई’ ही अशीच व्यक्तिरेखा आहे. कोणत्याही माणसाला निनावी पत्र लिहायचे, त्यात काहीतरी खरेखोटे लिहून पाठवायचे आणि मग लागलेल्या आगीत होरपळणारी मने गंमत म्हणून पहायचे, ही विकृत मनोवस्था या कथेत मांडली आहे. अर्थात अशी माणसे समाजापासून दुरावतात, त्यांना अखेरच्या काळात दुर्दैवी आणि एकाकी जीवन जगावे लागते, हा संदेशही ही कथा देते. ‘भोंगा आणि पोंगा’ या कथेत रेखाटलेल्या दोन भावाच्या व्यक्तिरेखाही अशाच समाजातील विकृत माणसाचे प्रतिनिधित्व करतात. समाजात खऱ्याखोट्या बातम्या पसरवून गैरसमज करणारे हे भाऊ अनेकदा चांगले काम करणाऱ्या माणसांबद्दल समाजात खोटी माहिती पसरवतात. अशा समाजातील विघ्नसंतोषी माणसांच्या कारवाया म्हणजेही ‘माकडाच्या हाती दिलेले कोलीतच आहे.
डॉ. बाबुराव उपाध्ये हे अगदी नकळत्या वयापासून पोरकेपणाचे जीवन जगले आहेत. त्यांच्या जन्मानंतर लगेचच वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे गरीब आणि विधवा आईला लेकरांना सांभाळत पोटाची खळगी भरणे अवघड झाले होते. भावाच्या आधाराने राहणाऱ्या तरुण विधवेला समाजातील विखारी नजरांपासून सांभाळणेही अवघडच. अखेरीस त्यांच्या आईने पोरांना पोरके करून घर सोडले. अनाथ झालेला मुलगा अनेक घरात आश्रित म्हणून वाढला आणि शिकून स्थिरस्थावर झाला. कालांतराने त्यांना आईचा शोध लागला. यानंतरच्या तिच्या अल्प सहवासातून मिळालेले प्रेम आणि तिच्या अखेरच्या काळातील आठवणी डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ‘एक होती आई’ या कथेतून खूपच कारुण्यमयी भावनेने मांडल्या आहेत.
अशीच एक आई ‘कुंभारवाड्यातील कोरोना’ या कथेतूनही भेटले. कोरोना काळात सर्वात जास्त समस्या वाट्याला आल्या त्या गरीब आणि हातावर पोट असलेल्या माणसांना. अशीच एका खेडेगावातील कुंभारवाड्यातील ‘कुसुम’ ची गोष्ट. कोरोना काळात जगण्यासाठी आणि पोटासाठी धडपडताना तिला कोरोनाने गाठले आणि नेमके त्याच काळात मुलीचे बाळंतपण येते. यावेळी बहिणीने केलेल्या मदतीमुळे सारे सुरळीत पार पडले. कोरोना काळात काही माणसे या आजाराच्या विळख्यात सापडली. काही जगली, पुष्कळ दगावली. काही कोरोनाने तर काही मानसिक धक्क्यानेच मेली. या सर्वांचे वर्णन करतानाच या कथेत एका आईच्या भावावस्थेचे आलेले चित्रण वाचकाला अंतर्मुख करणारे आहे.
लग्नविधी हा अलीकडच्या काळात विधी न राहता समारंभ झाला आहे. एका लग्नाला जाण्यासाठी घरून निघताना उशीर झाल्यावर लग्नाला वेळेवर पोहोचता येईल का ? हा प्रश्न असतानाच प्रवासाच्या वाटेवर येणाऱ्या अडचणी, भेटलेल्या माणसांमुळे होणारा विलंब यातून डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी विनोद निर्मिती करतानाच समाजचित्रणही साधले आहे. एवढे करूनही लग्नस्थळी खूपच विलंबाने पोहोचणार आणि लग्न लागून गेलेले असणार म्हणून धावपळ करून लग्नस्थळी पोहोचल्यावर लक्षात येते की लग्न लागलेलेच नाही. लग्न समारंभात ‘मुहूर्त’ बगैरे गोष्टींचे महत्त्व कमी होऊन सत्कार, आशीर्वादाची भाषणे, पुढाऱ्यांचे मिरवणे आणि नवरदेवाच्या मिरवणुकीतील नाचगाणे, गंमतीजमती यामुळे होणारा बिलंब यावर ‘अखेर लग्न हाती लागले’ या कथेत केलेले वर्णन म्हणजे विनोदाच्या माध्यमातून सामाजिक व्यंगावर गेलेले भाष्य असून ते वाचकांना विचार करायला लावणारे आहे.
‘वंशाचा दिवा’ ही कथा तरुण पिढीचे भरकटलेपण आणि आळा सुटलेल्या पेंढीतून कडब्याने वाऱ्यावर उडावे तशा अवस्थेत गेलेल्या समाजाचे विस्कटलेपण यावर प्रकाश टाकते. शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण, शेतकऱ्यांची उदारवृत्ती, प्रामाणिक शेतमजूर, नव्या पिढीत शिरलेली व्यसनाधीनता अशा अनेक प्रश्नांचा उहापोह या कथेत केलेला आहे. आपल्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना आपल्या घरातलेच समजून वागविल्यास ते प्रामाणिकपणे काम करतात. शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये यांच्यातील स्नेहभावाचे दर्शन या कथेत घडते.
भावनेच्या आणि क्षणिक सुखाच्या मोहापायी तरुण तरुणी चुकीचे निर्णय घेतात. तारुण्याच्या कैफात आणि बेगडी प्रसिद्धीच्या मोहात बहकलेल्या तरुणांकडून ‘प्रेम’ या पवित्र शब्दाची व्याख्याच बदलून टाकली आहे. केवळ शारीरिक आकर्षण आणि स्वैराचारामुळे मुलीही सुखाच्या भ्रामक कल्पना उरात बाळगून कुणाच्याही सल्ल्याचा विचार न करता आयुष्याचा जोडीदार निवडतात. अखेरीस बैफल्य आल्यावर सत्याला सामोरे जाण्याचे धाडस गमावून बसलेल्या या मुलींवर आत्महत्येची वेळ येते. आईबापाच्या निखळ प्रेमाला अव्हेरून तरुणाच्या भूलथापी प्रेमाला स्वीकारणाऱ्या बहकलेल्या तरुणींच्या डोळ्यात अंजण चालण्याचा प्रयत्न ही कथा करते. नैतिक मूल्यांपासून ढळलेल्या आणि वास्तवापेक्षा कल्पित जगात वावरणाऱ्या नवतरुणांना सावध करणारा ‘हे कसलं प्रेम ?’ या डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर वाचकांना शोधावे लागेल.
खेडेगावात कष्ट करून जगताना उज्वल भविष्याकडे वाटचाल करणारे तरुण आहेत. नेमके त्याच्या उलट सर्व सुखे पायाशी लोळत असताना भविष्याला अंधाराच्या गर्तेत लोटणारी तरुण पोरेही असतात. सुष्ट आणि दुष्ट या प्रवृत्तींचा संघर्ष न संपणारा असला तरी प्रकाश अंधारावर मात करतो, हे ही नाकारता येणार नाही. हे वास्तव ‘गावच्या भल्यासाठी’ या कथेतून भिन्न स्वभावाच्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून साकार झाले आहे. ज्यांनी आपल्या गावात इज्जत कमावून सन्मानाने गावात वास्तव्य केले त्यांच्या मुलांनी व्यसनाच्या आहारी जाऊन गैरवर्तन केल्यावर गावापुढे बापाला मस्तक टेकवायची वेळ येते तेव्हा त्या बापाला कसे वाटत असेल? हा मन विदीर्ण करणारा प्रश्नही या कथेच्या निमित्ताने समोर येतो. चांगले वर्तन असलेल्या माणसांना काही काळ त्रास सहन करावा लागला तरी दृष्टप्रवृत्ती संपतेच हा आशावाद या कथेतून व्यक्त झाला आहे.
‘घर वापसी’ ही कथा आणखी एक वेगळा विचार मांडणारी आहे. एखादे झाड उगवलेल्या मूळ मातीतून उपटून दुसरीकडे लावले तर त्या परक्या जागेत त्याची मुळे घट्ट होऊन झाड तिथेही रुजण्यासाठी धडपडते. पण त्या झाडाचे मन खरेच त्या जागेत रमत असेल का? ते कुढत कुढतच वाढते. फक्त त्याला व्यक्त होता येत नाही आणि चालता येत नाही म्हणून त्याला पुढील आयुष्य नाईलाजाने त्याच मातीत काढावे लागते. माणसांचे तसे नाही. उदरभरणासाठी भारत हा आपला स्वदेश सोडून परदेशात स्थायिक झाले तरी त्यांची मुळं तिथं रुजत नाहीत. त्या व्यक्तीला शक्य झाले नाही तरी त्यांची पुढची पिढी पुन्हा मायदेशी परतण्याची इच्छा मनात बाळगून असतात. सर्वच तसा प्रयत्न करतात असे नाही. पण ज्यांना आपल्या प्रथा, परंपरा, संस्कृतीची ओढ असते, छत्रपती शिवाजीराजे छत्रपती संभाजीराजे, गौतम बुद्ध, भगवान महावीर, ज्ञानेश्वर, तुकाराम, श्रीचक्रधर, गुरुनानकजी यांच्यापासून थेट महात्मा गांधी, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि तत्त्वावर ज्यांची श्रद्धा आहे ते पुन्हा परत येतात. आपल्या मायमातीच्या कुशीत विसावण्याचा आनंद घेतात. हे सर्व या कथेत मांडताना डॉ. बाबुराव उपाध्ये भारतीय मूल्यव्यवस्थेचे महत्त्वच अधोरेखित करतात.
व्यसनाधिनता ही ग्रामीण भागातील मोठी समस्या आहे. तरुण पिढी व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागली आहेत. …आणि लग्न लागलं’ या कथेत एका सुशिक्षित मुलीचे लग्न अशाच व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाबरोबर निश्चित झालेले आहे. ऐनवेळी चांगल्या मुलीचे आपल्याबरोबर लग्न होऊन अहित होऊन नये म्हणून नवरदेव पळून जातो. दुसरा शिकलेला तरुण ऐकवेळी लग्नास तयार होतो आणि कथेचा शेवट सुखान्त होतो. तथापि, या कथेच्या निमित्ताने ग्रामीण भागातील लग्नातील अनेक प्रथा, रूढी, ग्रामजीवन, ग्रामीण भागातील लग्नातील अनेक विधी यांचे बहारदार वर्णन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केलेले आहे. व्यसनांच्या आहारी जाणारी तरुण पिढी ही या देशासमोरील मोठी समस्या आहे, याकडे ही कथा लक्ष वेधते.
‘कविसंमेलनातील गोंधळ’ ही कथा म्हणजे उत्साही कवी, सूत्रसंचालक आणि आयोजकांच्या गोंधळाचे वर्णन करणारी विनोदी कथा आहे. कवीला कवितेसाठी कुठलाही विषय वर्ज्य नसतो या सत्याचे सुंदर विडंबन या कथेत आढळते. कविता कशाशी खातात याचे भान नसलेल्या तथाकथित कवींच्या उथळ कविता कविसंमेलनात ऐकत बसावे लागणाऱ्या सर्जनशील कवींच्या नाईलाजाचे विनोदी वर्णन वाचल्यावर हे भयाण वास्तव अनुभवलेल्या कवींना हसायला आल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या मुलामुलींना लाडाने वाढविणाऱ्या आणि त्यांच्या भविष्याचीच चिंता घेऊन जगणाऱ्या आईबापाच्या स्वप्नांचा चुराडा करून ती मुले स्वैरपणे बागतात तेव्हा त्या आईबापाची अवस्था काय होते याचे कारुण्यमयी चित्रण ‘गेल्या घरी तू सुखी रहा’ या कथेत वाचायला मिळते. आपल्या लाडक्या मुलीला उच्च शिक्षण दिल्यावर तिच्यासाठी चांगले स्थळ बघून लग्न लावून देण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या बापाला अंधारात ठेवून मुलगी जेव्हा परस्पर लग्न करते तेव्हा त्या बापाची अवस्था काय होत असेल? तरीही अखेरीस नातवाच्या प्रेमापोटी सगळे विसरून आईबाप मुलीशी जुळवून घेतात. मात्र मुलांना आईबापाचे मन कळत नाही का? आईबापाच्या अपेक्षा महत्त्वाच्या नाहीत का? पंखात बळ आल्यावर घरटे सोडून आकाशात भरारी घेण्यापूर्वी लहानपणापासून चोचीत चोच घालून चारा भरविणाऱ्या आईबापाच्या अपेक्षांचा विचार या पिलांच्या मनात येत नाही का ? असे अनेक प्रश्न ही कथा मागे सोडते.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पोरकेपणाचे दुःख सोसले आहे. अगदी नकळत्या वयात अनेकांकडे आश्रितासारखे राहून, पडेल ती कामे करून, जागा मिळेल तिथे पथारी पसरून, त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य झाले. शिक्षण हे माणसाच्या जीवनात किती महत्त्वाचे आहे, शिक्षणाने माणसाच्या जीवनात किती परिवर्तन होते हे ही कथा सांगण्याचा प्रयत्न करते. शिक्षण माणसाला ‘रावाचा रंग करण्यास मदत करते. अनेक समाजसुधारकांनी दिलेला हा मूलमंत्र डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी या कथेतून स्वानुभवातून दिलेला आहे. ‘कष्टाची कमाई’ या कथेतून त्यांनी ‘बापू’ या व्यक्तिरेखेच्या निमित्ताने आपल्या पूर्वायुष्याला उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या वागण्या बोलण्यात ऋजुता असेल आणि निर्मळ आणि प्रामाणिक मन असेल तर पोरकेपणही प्रगतीच्या आड येऊ शकत नाही, असा आशावाद या कथेतून व्यक्त होतो.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या ‘माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ या कथासंग्रहातील कथा या विनोदी शैलीच्या असल्या तरी त्यातून लोकशिक्षण आणि प्रबोधनावर भर दिलेला दिसून येतो. प्रबोधन हे साहित्याचे महत्त्वाचे प्रयोजन आहे. वाट चुकलेल्यांना पुन्हा मूळ मार्गावर आणण्याचे काम साहित्य करीत असेल तर ते साहित्य निकोप समाजनिर्मितीसाठी पोषकच ठरते. हे काम या कथासंग्रहाच्या माध्यमातून घडेल.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या या कथासंग्रहातील कथा ग्रामीण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर घडतात. बहुतांश कथा या ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात लोप पावत चाललेल्या दिनक्रमाचा कथेमधून येणारा उल्लेख पूर्वीच्या ग्रामजीवनाची आठवण करून देतो. मंदिरातून ऐकू येणारा घंटानाद, घरासमोर घातला जाणारा सडा, रांगोळी, देवळातली भजनं, तुळशीची पूजा, शेतात जाण्याची लगबग, पहाटेच गावात येणारे स्मशानजोगी, वासुदेव, दारात चिमण्यांसाठी टाकले जाणारे दाणे, वासराचं हंबरणं, गाईच्या कासेला दुसण्या देणं, कोंबड्याची बांग हे सारं खेड्यात आता कुठं राहिलंय, अनेक कथांमधून गावाचं दिसणारं हे चित्र वाचकांना पुन्हा भूतकाळात अनुभवलेल्या खेड्याच्या रम्य आठवणीत घेऊन जातं.
दुष्काळ, दारिद्र्य, शोषण, अज्ञान, अंधश्रद्धा, शासकीय अनास्था यासारख्या समस्यांनी ग्रामीण माणूस ग्रासलेला आहे. शेतीच्या दुरावस्थेमुळे ग्रामजीवन उद्ध्वस्त होत चालले आहे. शेतकरीच विस्थापित होण्याच्या मार्गावर असताना त्यांच्या आश्रयाने जीवन जगणाऱ्या बलुतेदारांची अवस्था काय होईल हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. या वंचित असलेल्या बलुतेदार समाजातील माणसांच्या जीवनव्यवहाराचे चित्रण या कथासंग्रहात प्रभावीपणे रेखाटलेले आहे. बदलत्या खेड्यातील बिघडत असलेल्या समाजस्वास्थ्यावर या कथा भाष्य करतात. मात्र यामुळे सारे काही बिघडले आहे असे नाही तर यातूनही नवा सूर्य प्रकाशमान होईल असा आशावादही या कथांतून आढळतो. तरुण पिढी लगाम सुटून उधळलेल्या चारूप्रमाणे वागताना आढळते. अशावेळी भारतीय संस्कृतीची मूल्यव्यवस्था ढासळण्याचा धोका या कथांमधून अधोरेखित होत आहे.
शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात शिरकाव झालेल्या विकृतीमुळे नव्या पिढीत शाश्वत मूल्ये कशी रुजणार ? तरुण पिढीत वाढीस लागलेली व्यसनाधीनता आणि बेफिकीर वर्तन यामुळे उद्याचा भारत कसा असेल? स्वैरवर्तन आणि व्यक्तिस्वातंत्र्यांचे वाढणारे स्तोम समाजाला आणि विशेषतः स्त्रियांच्या भविष्यासाठी घातक आहे का? असे अनेक प्रश्न या कथा वाचकांसमोर उभे करतात. दुसरीकडे आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यश मिळते. त्याला शिक्षणाची जोड मिळाल्यास प्रगतीच्या वाटेवरचे सारे अडसर दूर होतात असा विश्वास डॉ. बाबुराव उपाध्ये यांची कथा देते. लेखकाने स्वतः असा खडतर जीवनप्रवास केलेला असल्यामुळे त्यांच्या या मांडणीला स्वानुभवाचे बळ आहे. या कथासंग्रहातील अनेक कथा शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या आहेत. दारिद्र्य, अज्ञान, व्यसनांचा विळखा, राजकीय व्यवस्थेकडून होणारा वापर हे तरुण पिढीच्या प्रगतीतील अडथळे असून यापासून अंतर राखल्यास याच तरुणांच्या हातात नवा भारत सुरक्षित राहील यावर ही कथा विश्वास ठेवते.
एकंदरीत काय तर समाजात होत असलेल्या बऱ्या वाईट घटनांचे प्रतिबिंब ‘माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ या कथासंग्रहातील कथांमध्ये उमटताना दिसते. त्यामुळे काही कथात नैराश्याची भावना व्यक्त होत असतानाच काही कथा आशावादी सूर लावतात. हे विरोधाभासी चित्र वाटत असले तरी त्या त्या प्रसंगी जे समोर आले ते मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न डॉ. बाबुराव उपाध्ये यांची कथा करते. पूर्वग्रहदुषित दृष्टिकोन ठेवून एकांगी विचाराने काही न लिहिता जे सत्य आहे ते मांडण्याचा पारदर्शी प्रयत्न ही कथा करते आणि म्हणूनच त्यामध्ये समाजाचे वास्तव प्रतिबिंब पहावयास मिळते.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी यापूर्वी लिहिलेल्या साहित्यातूनही प्रबोधनाचीच भूमिका घेतली. भारतीय मूल्यव्यवस्थेवर त्यांचा दृढविश्वास आहे. बदलत्या जगासोबत होणारा सकारात्मक बदल त्यांना मान्य असले तरी त्यातून शिरणाऱ्या विकृतीचा संभाव्य धोकाही ते दाखवितात आणि या विकृती ओळखून त्यापासून दूर राहण्याचा सल्ला या कथा देतात. म्हणजेच विविध कथांमध्ये विनोदी, विद्वेषनात्मक आणि गंभीर कथाविषय असला तरी त्यातून प्रबोधन करण्याचा डोळसपणा लेखकाजवळ असेल तर समाजस्वास्थ्यासाठी ते हितावह असते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या या कथासंग्रहातील ‘शाळेची खिचडी’ जरी माकडांच्या हातात गेली असली तरी ‘मूल्यव्यवस्था’ शाबूत असून ती समाजातील सुसंस्कृत माणसांच्या हातात सुरक्षित आहे हे नाकारून चालणार नाही. या सकारात्मक विचाराकडे घेऊन जाणाऱ्या या कथांचे वाचक स्वागत करतील यावर माझा ठाम विश्वास आहे.
डॉ. शिवाजी एकनाथ काळे ९९६०६०७६३३
पुस्तकाचे नाव – माकडांच्या हाती शाळेची खिचडी’
लेखक – डॉ. बाबुराव उपाध्ये
प्रकाशक – स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे
किंमत – २०० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.