February 15, 2025
Darvin Luttana means protest against a corrupt system
Home » ‘डार्विन लुटताना’ म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धचा आसूड
काय चाललयं अवतीभवती

‘डार्विन लुटताना’ म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धचा आसूड

‘डार्विन लुटताना’ म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धचा आसूड
डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन
जिल्ह्यातील प्रतिष्ठित डॉक्टरांसह बहुसंख्येने काव्य रसिकांचा प्रतिसाद

कणकवली – मानवी नात्याची ओढ, समूहाबद्दलची आपलेपणाची भावना आणि प्रेमाची असोशी त्याचबरोबर भ्रष्ट व्यवस्थेबद्दलचा आसूड या सगळ्या संदर्भाची मांडणी ‘डार्विन लुटताना’ या काव्यसंग्रहा मधील कवितेत करण्यात आली आहे असे प्रतिपादन कवी तथा भारतीय साहित्य अकादमीचे माजी सल्लागार सदस्य अजय कांडर यांनी येथे केले.

प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ तथा कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘डार्विन लुटताना’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा येथील हॉटेल नीलम कंट्री साईटच्या सभागृहात कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

यावेळी बोलताना कांडर यांनी ‘डार्विन लुटताना’ मधील कविता अतिशय गंभीरपणे लिहिली गेली असून भविष्यात डॉ.आंबेरकर यांच्या कवितेचा भविष्यकाळ मराठी साहित्यात उज्वल असल्याचेही आग्रहाने सांगितले.

नाट्यकर्मी डॉ. राजेंद्र चव्हाण, कवी डॉ. अमूल पावसकर, कवयित्री डॉ. दर्शना कोलते, वर्षा आंबेरकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला डॉ. कुमार ननावरे (कोल्हापूर), डॉ. आकेरकर, डॉ. विद्याधर तायशेटे, कवी डॉ.अनिल धाकू कांबळी,कवी मधुकर मातोंडकर, रंगकर्मी वामन पंडित, डॉ. शमिता बिरमोळे, डॉ. सुहास पावसकर, डॉ.विनय शिरोडकर, डॉ. संदीप नाटेकर, डॉ. प्रतिभा नाटेकर आदीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित डॉक्टर व बहुसंख्येने साहित्य रसिक उपस्थित होते.

डॉ. चव्हाण म्हणाले, डॉ आंबेरकर यांची कविता म्हणजे निरागस, लोभस, नाजूक आणि विशुद्ध नात्याचा शोध आहे. स्वतःवरचं निसर्गाचं ऋण जपणारी कविता आहे. सेवाभावी डॉक्टरचं जगणं हा जणू मोक्ष मार्ग आहे असा हा कवी जाणून आहे. सावित्रीबाईंची जगण्याची दिशा त्याला भारावून टाकते. चंद्र नसलेल्या रात्रीही बहरण्याची आस तो धरतो. सरणावर जळतानाही आपण आसमंत उजळणार आहोत हे त्याला महत्त्वाचं वाटतं आणि अंतिम राखेला सुगंध यावा ही त्याची मनीषा खरंच थोर आहे. अशा या कवीच्या कवितेला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास वाटतो.

डॉ. पावसकर म्हणाले, कवी डॉ आंबेरकर यांची कवितेची निष्ठा मी जवळून बघितलेली आहे. प्रत्येक जगण्याच्या अनुभवाकडे ते सकारात्मकतेने पाहतात.

डॉ. कोलते म्हणाल्या, ‘डार्विन लुटताना’ मधील कविता चिंतनाच्या पातळीवर व्यक्त होते. या कवितेला स्वतंत्र वाचक मिळेल.

डॉ.आंबेरकर म्हणाले, कविता खूप वर्ष लिहितो परंतु मध्यंतरीच्या काळात आपण काही चांगलं लिहू असा आत्मविश्वास नव्हता. मात्र पुढे अनेक मित्रांच्या प्रोत्साहनामुळे मी लिहू लागलो आणि ‘डार्विन लुटताना’ काव्यसंग्रह निव्वळ प्रभा प्रकाशनामुळे निघू शकला. माझ्या कवितेची पहिली वाचक माझी पत्नी वर्षा. कवीच्या लेखनाला प्रोत्साहन मिळतं तेव्हाच ते लेखन सातत्याने होत असतं. आज आपण सर्वांनी जी प्रेरणा दिली त्यातून भविष्यात सातत्याने काव्य लेखन होत राहील.

वर्षा आंबेरकर म्हणाल्या कवीची तगमग काय असते हे मी अनुभवले मात्र कविता लिहीत असतानाही डॉ. आंबेरकर यांनी संसाराकडे दुर्लक्ष केले नाही. वैद्यकीय व्यवसाय खूप प्रामाणिकपणे केला याचा आनंद होतो. यावेळी कवी मधुकर मातोंडकर,डॉ. नितीन शेट्ये, डॉ संजय सावंत यांनीही विचार व्यक्त केले.

सूत्रसंचालन प्रा. मनीषा पाटील यांनी केले, प्रास्ताविक डॉ.विनय शिरोडकर यांनी केले तर आभार डॉ. संदीप नाटेकर यांनी मानले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading