इचलकरंजी – एकीकडे दुःख आणि दुसरीकडे सार्वत्रिक जल्लोष सुरू असताना समाजात लेखकाने भान राखायला हवे. समाजाच्या तळाशी जाऊन लेखकाने विचार करायला हवा. तो कृतिशील असावा,शब्दांच्या पलीकडे जाऊन जो भूमिका घेऊन लिहितो तोच खरा लेखक असतो,असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी सायमन मार्टिन (वसई ) यांनी केले.
संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने कै. सुभद्रादेवी माने सभागृहात आयोजित पाचव्या संस्कृती साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष पदावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक शामसुंदर मर्दा, उद्योजक मदन कारंडे, काकासो माने मेमोरियल ट्रस्टचे सचिव शिवाजी जगताप, कवी संमेलनाध्यक्ष चंद्रकांत पोतदार, कवी अजय कांडर, मधुकर मातोंडकर, संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कादंबरी, समीक्षा, काव्य प्रकारातील लेखकांना पुरस्कार वितरीत करण्यात आले.
यामध्ये लक्ष्मण कांबळे (जिंदा) स्मृती संस्कृती कादंबरी पुरस्कार प्रा. डॉ. रमेश साळुंखे (कोल्हापूर), दगडूलाल मर्दा स्मृती संस्कृती समीक्षा पुरस्कार प्रा. जिजा शिंदे ( छत्रपती संभाजीनगर), वसंत – कमल स्मृती संस्कृती काव्यसंग्रह पुरस्कार उदय जाधव (मुंबई) यांचा समावेश होता. तसेच बे दुणे शून्य या कादंबरीचे लेखक रवींद्र गुरव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी महावीर कांबळे यांच्या खुरपं या कवितासंग्रहाचेही प्रकाशन करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत संस्कृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष पंडित कांबळे यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष महावीर कांबळे यांनी केले. सचिव अनुराधा काळे यांनी सूत्रसंचालन केले. सदस्य सुनील कोकणी यांनी आभार मानले. डॉ. अमर कांबळे, प्रसाद कुलकर्णी, संजय होगाडे, दत्तात्रय लाळगे पाटील, मच्छिंद्र आंबेकर, विभावरी कांबळे, राजू कोठावळे, सौ.कोठावळे, पी.डी.शिंदे, कवी दस्तगीर नदाफ, कादंबरीकार अशोक जाधव यांसह शहर व परिसरातील साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात चंद्रकांत पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. वेगवेगळ्या विषयावर सादर झालेल्या कविताने संमेलनाला रंगत आणली. यामध्ये संचिता चव्हाण (मुंबई),संचित कांबळे, श्वेता लांडे, प्रियंका भाटले, महेश सटाले, गोविंद पाठक (बीड), कुमुदिनी मधाळे, राहुल राजापुरे, अमोल कदम, दिनकर खाडे आदी कवींचा सहभाग होता. सूत्रसंचालन संजय रेंदाळकर यांनी केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
