ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..अनिता मोरे
धाडसी, नीडर, कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपले निर्णय घेऊन योग्य ती कारवाई व कार्यवाही करणाऱ्या, सर्वसामान्यांना सतत मदतीचा हात देणाऱ्या आधुनिक दुर्गा अनिता ताईंना मानाचा मुजरा..!!
ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244
सहाय्यक पोलिस आयुक्त कोतवाली विभाग नागपूर येथे सध्या कार्यरत असलेल्या अनिता मोरे या पोलिस खात्यातील एक धाडसी, शिस्तबद्ध, सर्व सामान्यांना मदत व मार्गदर्शन करणारे असे व्यक्तिमत्व..! त्यांचे शालेय शिक्षण व बालपण चिंचवड पुणे येथे मोरया गोसावी मंदिराच्या सानिध्यात, नदीकाठी खेळत, निसर्गाचे निरीक्षण करत गेले. त्यामुळे निसर्गात भटकंती करायची आवड त्यांना निर्माण झाली. त्यातूनच पोलिस निरीक्षक म्हणून मुंबईला नियुक्ती झाल्यावर पुणे – मुंबई प्रवासात खंडाळा, लोणावळा, डोंगरदऱ्या, पावसाळ्यात धबधबे या कायम मनात निसर्गाची ओढ निर्माण करत राहिले. मैत्रीणींच्या आग्रहामुळे ताईंनी कैलास- मानस सरोवर यात्राही पूर्ण केली व त्या अनुभवांवर आधारित पुस्तकही लिहिले.
ताईंचे वडील एसकेएफ चिंचवड कंपनीत कार्यरत होते. आई पुणे मनपामधे शिक्षक म्हणून कार्यरत होती. तीन बहिणी व एक भाऊ असे कुटुंब. परिस्थिती खूप बेताची होती. वडिलांवर त्यांच्या कुटुंबाचा पूर्ण भार होता. आई शिक्षिका असल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व आईला माहिती होते त्यामुळे तिनही मुलींना उत्तम शिक्षण दिलं. मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव त्यांनी कधीही केला नाही. ताईंचे आजोबा पोलिस खात्यात होते. त्यामुळे लहानपणापासून पोलिस खात्याचे आकर्षण होते.
बी.एस.सी. हॅास्पिटल मॅनेजमेंटचा कोर्स करून ताईंनी एमपीएससीची तयारी सुरु केली व त्यात त्या यशस्वी झाल्या. पोलिस सब इन्स्पेक्टर या पदावर त्यांची नियुक्ती झाली.ताईंचे सासर सातारा. पण सासरे टेल्को कंपनीत असल्याने सासूबाईंनी टेल्को गृहउद्योगात प्रपंचाला हातभार लावण्यासाठी अतोनात कष्ट केले. पती उदय मोरे हे चाकण येथे मर्सिडीज बेन्झ कंपनीत नोकरीला आहेत. ताईंचा मुलगा डेटा सायन्समध्ये अमेरिकेमध्ये कोलोराडो स्टेटला बोल्डर युनिव्हर्सिटी येथे एम.एस. करत आहे. ताईंनी पोलिस अधिकारी म्हणून काम करताना त्यांच्या पतीने व सासूबाईंनी आजवर अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळल्या व त्यांना जीवनात उत्तम साथ दिली. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी मानसिक धैर्य वाढवायला मदत केली.
पोलिस खात्यात कायमच अनेक नवनव्या आव्हानांना सामोरे जावे लागते. पोलिस अधिकारी असले तरीही महिला म्हणून कित्येकदा विचित्र प्रसंग पुढे येतात मात्र महिला आहे हे विसरून धाडसाने योग्य ते पटापट निर्णय घ्यावे लागतात. तसे ताईंनी अनेकदा घेतले आहेत. पुणे ग्रामीण देहूरोड येथे कार्यरत असताना नवरात्रीच्या वेळी एका फिर्यादीने त्याचा मोबाईल एकाने चाकूचा धाक दाखवून चोरल्याचे सांगितले. फिर्यादीने सांगितलेल्या गुन्हेगाराच्या वर्णनावरून अनिताताईंनी संशयित गुन्हेगारांची फाईल काढली व त्या सराईत गुन्हेगाराला पकडून आणले. त्याने ‘मला अटक केली तर मी लॅाकअपमधे आत्महत्या करेन व तुम्हांला कामाला लावेल’ असे धमकावले. मी मोबाईल चोरी केली नाही असेही सांगितले. त्यानंतर ताईंनी पोलिसी खाक्या दाखवल्याने त्याने जमीनीवर स्वतःला झोकून दिले व श्वास रोखून धरला. ताईंनी घाबरून त्याला तातडीने हॅास्पिटलमधे ॲडमिट केले. श्वास रोखून धरल्याने त्याला श्वास घेण्यात अडथळा आला असल्याचे डॅाक्टर म्हणाले. सलाईन लावल्यावर ठीक होईल असे सांगितले त्यानंतर ताई पोलिस स्टेशनला आल्या. तिकडे त्याने परत सलाईन काढून टाकले व तो हायपर झाला. पुन्हा अनिताताई हॅास्पिटलला गेल्या, ‘यावर तू कशासाठी असे नाटक करतोस ?’ असा जाब पोलिसी खाक्यात विचारताच त्याने गुन्हा कबूल केला. त्याला मोबाईल चोरीच्या संदर्भात तीन महिने शिक्षा झाली. याआधी त्याने ही श्वास रोखून धरायची विद्या, पोलिसांना कसे घाबरवायचे हे तुरुंगातच शिकला असल्याचे सांगितले. ताईंसमोर असे अनेक प्रसंग आले परंतु त्या आपण महिला आहोत हे विसरून त्यांनी शांतपणे व धाडसाने अनेक निर्णय घेतले आहेत.
मार्चमधे नागपूरला काही कारणाने हिंदू मुस्लीम दंगल झाली. शिवाजी पुतळा व मशीद शेजारी असणाऱ्या चौकात ही दंगल झाली. तीही गंभीर परिस्थिती त्यांनी नीडरपणे हाताळली, त्या तीन दिवस तीन रात्री आपले कर्तव्य बजावत दोन धर्मात संवाद साधत सलोखा निर्माण करायचे काम करत होत्या. त्यांचे पोलिस खात्यात खूप कौतुक झाले. हाताखालच्या पोलिस स्टाफला धीर देत, स्वतःसोबत पोलिसांचे मनोबल वाढवत आरोपीच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता ताई कार्यरत आहेत हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
अनिताताईंनी आजवर विविध विभागात केलेल्या कारवायांवर एक वेगळं पुस्तक होऊ शकतं. पुण्यात भरोसा सेलच्या वरिष्ठ निरीक्षक म्हणून काम करताना त्यांनी एका विद्यार्थ्याची आर्थिक फसवणूक केलेल्या तोतया पोलिस अधिकाऱ्याला पकडण्याची कारवाई केली होती. भरोसा सेलच्या माध्यमातून पुण्यात ताईंनी अनेक महिला, मुली व ज्येष्ठ नागरिक यांना न्याय मिळवून देण्याचे कामही त्यांनी केले. सुरक्षित पुणे हे ब्रीद घेऊन दामिनी पथक निर्माण करून शाळांमधून मुलींसाठी जगजागृतीचे कार्यक्रम करून त्यांना गुड टच व बॅड टच यांची माहिती द्यायचे मोठे काम त्यांनी सुरु केले.
अनिताताईंनी आजवर मुंबई एअरपोर्ट सिक्युरिटी, भोसरी पोलिस स्टेशन, गुन्हे अन्वेषण विभाग, ॲन्टी करप्शन ब्युरो, ट्रायबल रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पुणे ग्रामीण, ट्रेनिंग सेंटर खंडाळा, पुणे क्राईम ब्रांच व भरोसा सेल येथे उत्तम कामगिरी केली आहे. सध्या त्या नागपूर येथे आपले कर्तव्य बजावत आहेत.
‘अनिता मोरे मॅडम’ नाम तो सुना होगा असे त्यांचे व्यक्तित्व व कर्तृत्व आहे. मी ‘ताई’ हा शब्द वापरून त्यांचे कर्तृत्व कमी करू इच्छित नाही. त्यांना ‘लेडी सिंघम’ असे संबोधले तरीही चालेल असे अतिशय डॅशिंग व्यक्तिमत्त्व त्यांचे आहे. कोणतेही शहर सुरक्षित रहावे तसेच महिला व मुलींची सुरक्षितता याविषयी त्या विशेष दक्ष असतात. अशा धाडसी, नीडर, कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपले निर्णय घेऊन योग्य ती कारवाई व कार्यवाही करणाऱ्या, सर्वसामान्यांना सतत मदतीचा हात देणाऱ्या आधुनिक दुर्गा अनिता ताईंना मानाचा मुजरा..!!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
