पुणे – येथील पुण्यभूषण फाउंडेशनच्यावतीने नवीन वर्षात विविध महत्त्वाचे उपक्रम राबविणार आहे. यामध्ये यावर्षीपासून दिवाळी अंकास पुरस्कार देण्यात येणार आहे. अशी माहिती संजय भास्कर जोशी यांनी दिली आहे.
श्री जोशी म्हणाले, मराठी अस्मितेचे एक सांस्कृतिक केंद्र अशी आपल्या दिवाळी अंकांच्या शंभराहून अधिक वर्षाच्या परंपरेची ओळख सांगता येईल. अशा या वैभवशाली परंपरेला पुन्हा एकदा दैदिप्यमान स्वरूप प्राप्त व्हावे म्हणून उत्तमोत्तम दर्जेदार दिवाळी अंकांना प्रोत्साहन देणे अगत्याचे आहे. याच हेतूने या वर्षापासून पुण्यभूषण संस्थेतर्फे दर वर्षी सर्वोत्तम दिवाळी अंकास एक लाख रुपये आणि सुवर्णमुद्रांकित प्रशस्तीपत्र असा पुरस्कार देण्याचे ठरवले आहे.
पुण्यातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्वास दिला जाणारा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्याप्रमाणे एक मानदंड झाला आहे तसाच हा ‘पुण्यभूषण दिवाळी अंक पुरस्कार’ एक मानदंड ठरेल यात संशय नाही.
संजय भास्कर जोशी
त्याचबरोबर दर वर्षी दिवाळी अंकातील उत्तम साहित्यास कथात्म गद्य, ललित / वैचारिक गद्य, आणि काव्य असे तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. या प्रत्येक पुरस्काराचे स्वरुप ११, हजार रुपये आणि मानपत्र असे आहे., असेही श्री जोशी यांनी सांगितले.
या वर्षीच्या पुरस्कार योजनेसाठी दिवाळी अंकाच्या (दोन प्रती) १५ जानेवारी २०२१ पर्यंत पुस्तक पेठ, लक्ष्मीछाया, आयडियल कॉलनी, आयडियल ग्राउंड जवळ, पौड रोड, पुणे ४११०३८ या पत्यावर पाठवाव्यात. या संदर्भात अधिक माहितीसाठी संजय भास्कर जोशी (९८२२००३४११) आणि महेंद्र मुंजाळ ( ७७४४८२४६८५) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.