September 16, 2024
Book review of GeetGovind Sunetra Joshi book
Home » गीतगोविंदमध्ये कृष्णकृपेचा वरदहस्त अन् राधेच्या विरहाची व्याकुळता
मुक्त संवाद

गीतगोविंदमध्ये कृष्णकृपेचा वरदहस्त अन् राधेच्या विरहाची व्याकुळता

कृष्णकृपेचा वरदहस्त आणि राधेच्या विरहाची व्याकुळता सुनेत्रा यांच्या हृदयात आहे आणि म्हणूनच अत्यंत उत्कट असा अनुवाद, गीतगोविंद या मूळ संस्कृत काव्याला जराही धक्का नं लावता सुनेत्राताईंनी केला आहे. उलट या संस्कृत काव्याला मराठीतून अनुवादा चे हिऱ्याचे कोन्दण लाभले आहे.

लेखिका निलीमा नंदुरकर

मी गो. नि. दांडेकर यांचे ‘पद्मा’ पुस्तक दोन तीन वर्षांपूर्वी वाचले . प्रसिद्ध कवी जयदेव आणि त्यांची पत्नी पद्मा यांच्या प्रितीची अद्भुत कहाणी या पुस्तकात गोनिदा यांनी लिहिली आहे, आणि यातच गीतगोविंद काव्याच्या निर्मितीची कथा आहे. तेव्हापासून मी अत्यंत उत्कटतेने यु ट्यूब वर गीत गोविंद काव्य ऐकते आहे. विरहात लिहिलेले शृंगार काव्य, उत्कट प्रितीने भगवन्ताला प्रसन्न करून घेणे, हे एकमेवाद्वितीय काव्य..

मूळ संस्कृत काव्यातील गोडवा टिकवून सुनेत्रा ताईंनी अत्यंत मनमोहक अनुवाद केलेला आहे, लोकव्रत प्रकाशन च्या गीतगोविंद या मराठी काव्यानुवाद पुस्तकात! कृष्णाचा विरह राधेचा शृंगाररस.. भक्तीप्रेममयी राधा आणि प्रितीचा गाभा श्रीकृष्ण ..

संस्कृत कवी जयदेवांचे गीत गोविंद हे स्वर्गीय असे लेणे आहे. जयदेवांच्या गीत गोविंदला मराठीत अनुवादित करण्याची केवळ कल्पना करणे यालाही फार मोठे सामर्थ्य हवे. राधाकृष्णांच्या भेटीचे वर्णन केवळ वाचतानाही भान हरपून जाते. म्हणूनच या ग्रंथाची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे.

गीतगोविंद हा जरी धार्मिक ग्रंथ असला, पूजनीय ग्रंथ असला तरीही सर्वसामान्य माणसाला मंत्रमुग्ध करण्यासाठी, आपल्या आयुष्याची उंची समजण्यासाठी त्याचा हा अनुवाद मराठीतून समजावून घेणे खूप गरजेचे आहे. सौ. सुनेत्रा जोशी यांची तन्मय करणारी लेखणी अनुभवणे हे अद्भुत आणि आनंददायी आहे. जयदेवांची प्रतिभा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेली ही एक ईश्वरी योजनाच असावी.


लोकव्रत प्रकाशन

अत्यंत व्याकुळ विरहाची मनस्थिती आणि भक्ती, प्रीती भगवन्ताच्या भेटीसाठी मनाची उत्कट अवस्था ही जितकी व्याकुळ राधेची असते तितकाच व्याकुळ भगवन्त ही असतो, हेच राधा कृष्णा च्या प्रेम विरह या भावनेतून आकलन होते. शृंगार रसाचे सौन्दर्य अनुभवायचे असेल गीतगोविंदचा मराठी अनुवाद जरुर वाचावा. आपल्या उत्कट प्रितीने जयदेवाने हे गीत गाऊन पत्नी पद्मा हिला जीवन्त केले, कृष्णाला प्रसन्न केले. जगन्नाथ पुरीत घडलेले हे पौराणिक कथानक, गीतगोविंदच्या जन्माचे!

कृष्णकृपेचा वरदहस्त आणि राधेच्या विरहाची व्याकुळता सुनेत्रा यांच्या हृदयात आहे आणि म्हणूनच अत्यंत उत्कट असा अनुवाद, गीतगोविंद या मूळ संस्कृत काव्याला जराही धक्का नं लावता सुनेत्राताईंनी केला आहे. उलट या संस्कृत काव्याला मराठीतून अनुवादाचे हिऱ्याचे कोन्दण लाभले आहे. मूळ गीता समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वरीचे वाचन फलदायी असते, त्याचप्रमाणे मूळ संस्कृत काव्याचा अनुवाद करून गीतगोविंद मराठी काव्यानुवाद माझ्यासारख्या अनेक सामान्यजनांना, वाचून समजून घेणे व कृष्णभक्तीत रंगून जाण्यासाठी अधिक फलदायी नक्कीच ठरेल.

चंदन चर्चित नीलकलेवर पितवसन वनमाली
केलिचलनमणी कुंडल मंडीत गंड युग :स्मित शाली
नीलमाधवाने लेपून सुगंधी चंदन उटी सर्वांगाला
पितांबर कटी नेसून गळ्यात घातलीसे वनमाला
रत्नकुंडले सुशोभीती आणि किरणे तयाच्या कपोला
स्मितहास्य करुनी सुखवितो पहा कसा तो सकला
किती सुंदर आणि गोड वर्णन आहे ना निलमाधवाचे संस्कृत काव्याचे मराठीतून !
गीतगोविंदचा मराठी पद्यानुभव वाचताना उत्कट भक्ती प्रिती, विरह आणि शृंगार रस समजून घेतानाच मन कृष्णप्रेमाने वेडावून न गेले तरच नवल !

पुस्तकाचे नाव – गीतगोविंद
लेखिका – सौ. सुनेत्रा विजय जोशी
प्रकाशक – लोकव्रत प्रकाशन
पृष्ठसंख्या.. 114 किंमत..175 रुपये
पुस्तकासाठी संपर्क.. 9860049826


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मुले भगवंताची रूपे

मराठी भाषेची गंमत…

नादब्रह्मच्या बासरीधुनची गुरुवंदना…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading