November 21, 2024
Call for submissions for the Vaidharbhaya History of Marathi Literature Project
Home » मराठी वाङ्मयाचा वैदर्भीय इतिहास प्रकल्पासाठी माहिती पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

मराठी वाङ्मयाचा वैदर्भीय इतिहास प्रकल्पासाठी माहिती पाठविण्याचे आवाहन

मराठी वाङ्मयाच्या समग्र इतिहास लेखनात महाराष्ट्रातील विविध विभागांच्या, विविध वाङ्मय प्रकारांच्या इतिहासाची दखल पुरेशी घेतली जाऊ शकलेली नाही आणि वाङ्मयाचे प्रादेशिक इतिहास लेखन करण्याचेही काम देखील या अगोदर झालेले नाही. एखाद्या वाङ्मय प्रकाराचा त्या त्या प्रदेशातील समग्र इतिहासाचा ग्रंथ देखील उपलब्ध नाही. त्यामुळे प्रादेशिक लेखन, लेखक, त्यांचे कार्य, कर्तृत्व, प्रादेशिक प्रतिभा यांचे उल्लेख देखील मराठी वाङ्मयाच्या उपलब्ध इतिहासात जवळ जवळ वगळलेच गेले आहेत. त्यांचे धावते, पुसटसे, अपवादात्मक उल्लेखच तेवढे येतात.

इतिहासातून सुटून जाणाऱ्या महत्त्वाच्या आणि उल्लेखनीय असूनही अनुल्लेखित राहणाऱ्या प्रादेशिक प्रतिभेचे दर्शन, वेगळ्या वाटा, प्रवाह, वळणे, प्रतिभा आदीवर भर असणाऱ्या नोंदीचे स्थानिक, प्रादेशिक वाङ्मय इतिहास लिहिले जाण्याची गरज आहे. त्या दृष्टीने ‘मराठी वाङ्मयाचा वैदर्भीय इतिहास ‘ हा एक प्रकल्प हाती घेण्यात आला होता.मात्र बराच काळ त्याचे काम पुढे सरकले नव्हते. आता नव्याने या प्रकल्पाची पुनर्आखणी करून हे काम सुरू करण्यात आले आहे.

विदर्भातील कविता, कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा, ललित गद्य, चरित्र -आत्मचरित्र, बालसाहित्य, वैचारिक/शास्त्रीय लेखन, सैद्धांतिक/तात्त्विक लेखन, अनुवादित साहित्य, लोकसाहित्य, भाषा अशा विविध प्रकारातील प्रत्येकी सुमारे २५० पृष्ठांचा एक खंड या प्रकल्पांतर्गत लिहून घेऊन ते खंड प्रकाशित केले जाणार आहेत. प्रत्येक खंडातील प्रत्येक प्रकारात प्राचीन काळापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत स्वातंत्र्यपूर्व कालखंड,१९४७ ते १९९० हा स्वातंत्र्योत्तर कालखंड व १९९० ते आजतागायत असा नव्वदोत्तरी कालखंड असा वाङ्मयाचा प्राचीन ते अद्ययावत इतिहास उपलब्ध करून दिला जाणार आहे. प्रत्येक खंडात वाङ्मय प्रकारानुसार काही परिशिष्टे देखील समाविष्ट असणार आहेत. प्रत्येक खंडाला संपादकांची विवेचक प्रस्तावना असणार आहे. प्रत्येक कालखंडातील महत्वाचे तसेच उल्लेखनीय लेखक, त्यांचे लेखन, लेखनकृती, प्रकाशक, प्रकाशन वर्ष, नियतकालिकांची नावे आदीसह त्या त्या लेखकांचे वाङ्मयीन महत्त्व, वैशिष्ट्ये, वेगळेपण याचीही माहिती प्रत्येक खंडातून दिली जाईल.

प्रत्येक वाङ्मय प्रकाराच्या प्रत्येक खंडातील इतिहासातून विदर्भातील सर्वच पिढ्यांचे लेखक, लेखन, प्रवाह, दर्जा, गुणवत्ता,प्रभाव, परिणाम यांचे एकत्र असे प्रातिनिधिक दर्शन या प्रकल्पामुळे प्रथमच घडणार आहे. प्रत्येक वाङ्मयप्रकारात महत्वाचे आणि उल्लेखनीय असे काही राहून जाऊ नये आणि हे खंड अधिकाधिक सर्वसमावेशक व्हावे यासाठी संबंधित खंड लेखकाला, लेखकांनी, वाचकांनी, अभ्यासक, संग्राहक, तसेच ज्याला ज्याला अशी माहिती पुरवावीशी वाटेल त्या साऱ्यांनी कृपया ती पुरवून सहकार्य करावे, असे आवाहन संपादक डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी (9960493622) यांनी केले आहे.

या पुनर्आखणी केलेल्या नियोजित प्रकल्पातील खंडांच्या लेखनासाठी जे लेखक सहकार्य करत आहेत त्यांची नावे, वाङ्मय प्रकार आणि संपर्क क्रमांक असे –

१. कथा – डॉ रवींद्र शोभणे ( 9822230743)
२. चरित्र/आत्मचरित्र -डाॅ मोना चिमोटे ( 9422155088)
३. वैचारिक/शास्त्रीय – डॉ इंद्रजित ओरके (9422147585) आणि सीमा रोठे (9422938040)
४. भाषा – डॉ काशीनाथ बर्हाटे (9420124714) डॉ विशाखा कांबळे (9850150861) प्रा.बळवंत भोयर (9028897027)
५. कादंबरी – डॉ नरेंद्र घरत (9881920628)
६. बालसाहित्य – डॉ अलका गायकवाड (9922626297)
७. नाटक- डॉ विशाखा कांबळे (9850150861)
८. समीक्षा – डॉ विनिता हिंगे (9921548890)
९. ललित गद्य – डॉ भारती सुदामे
(94221 25956)
१०. कविता – डॉ राजेंद्र नाईकवाडे (98503 51025)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading