December 14, 2024
Ignorance is removed by enlightenment and self-knowledge is met
Home » बोधानेच दूर होते अज्ञान अन् भेटते आत्मज्ञान
विश्वाचे आर्त

बोधानेच दूर होते अज्ञान अन् भेटते आत्मज्ञान

मग तें ही अव्यक्त । बोध वाढता झिजत ।
पुरलां बोधी समस्त । बुडोनि जाय ।। ११०१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – मग तेंहि अज्ञान, जसजसा बोध वाढत जाईल तसतसे नाहीसें होते व पूर्ण बोधांत ते अज्ञान संपूर्ण नाहीसे होते.

अध्यात्माकडे आपण कसे वळतो ? त्याची गोडी कशी लागते ? हा प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगवेगळा असतो. प्रत्येकाला आध्यात्मिक विचार पटतातच असे नाही. माणसाचा अंहकार माणसाला याची अनुभुती देत असतो पण त्यावर विश्वास कोण ठेवतो यावर हे सर्व अवलंबून आहे. व्यक्तीनुसार, त्याच्या विचारसरणीनुसार त्याला होणारा बोध हा त्याच्या प्रगतीसाठी पुरक असतो. फक्त यात अवधान हे महत्त्वाचे आहे. अवधान अन् भक्ती यावर बोधाने ज्ञान होत असते.

कोणी सांगते म्हणून आपण देवधर्म करत नसतो. देवधर्माची ओढ असावी लागते तरच देवाचे दर्शन घडते. अध्यात्माच्या अभ्यासाची ओढ असेल तरच त्या विचारांचा बोध होतो. तरच ते ज्ञान समजते अन्यथा पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखेच आहे. पालथा घडा कधी भरत नाही. घडा हो योग्य प्रकारेच ठेवायला हवा तरच तो भरेल अन्यथा सर्व पाणी वाया जाते. ज्ञानाचे, बोधाचेही तसेच आहे. हे ज्ञान समजण्यासाठी, बोध होण्यासाठी योग्यतेची गरज आहे. योग्य अवस्थेची गरज आहे. तरच त्याचे ज्ञान, बोध होईल. हजारो वारकरी पायी जातात म्हणून आपणही जाऊन पाहावे असे आपणास वाटते तेव्हा आपली भक्ती, विचारसरणी कशी आहे यावर आपणास त्याचा बोध होतो. अन्यथा आपण म्हणालो काय ते पायी जाऊन फुकट वेळ घालवायचा त्यातून कसले दर्शन घडते असे म्हणालो तर ते सर्व व्यर्थच जाते. त्या चालण्याचा आनंद आपणास कधीच समजत नाही.

अध्यात्माची ओढ असेल तरच अध्यात्म समजते. अन्यथा हजारो पारायणे करूनही काहीही बोध होत नाही. पारायण का करायचे हे जोपर्यंत समजत नाही तो पर्यंत पारायणाचा बोध होत नाही. एकतरी ओवी अनुभवावी हे कशासाठी म्हटले आहे. ? एका ओवीचा बोध घेता आला तर बाकीच्या ओव्या आपणाशी जरूर बोलत राहातात. ज्ञान देत राहातात. बोध देत राहातात. यासाठी मनाची तशी अवस्था असायला हवी. ते ज्ञान समजून घेण्याची ओढ असायला हवी. वर्गात लक्ष असेल तरच शिकवलेले लक्षात येते. अन्यथा शिकवणाऱ्याचे सर्व श्रम हे व्यर्थच जातात. मनामध्ये येणाऱ्या शंकाचे, प्रश्नांचे निरसण होणे गरजेचे आहे. या शंका, हे प्रश्न बोधाने दूर होतात. म्हणजेच त्याचे निरसण होते. तेंव्हाच अध्यात्माची गोडी आपणास लागेल.

बोध होतो म्हणजे तरी काय ? मनात असणाऱ्या शंकांना, प्रश्नांना योग्य उत्तर आपले आपणासच भेटते. म्हणजेच त्या प्रश्नाचा बोध होतो. या उत्तरातून आपण जागे व्हायला हवे. त्याचा बोध घेऊन आपण आपली प्रगती साधायला हवी. आपण जागे जसे होऊ तसे बोधाची प्रक्रिया वाढत जाते. बोधाने मग सर्व अज्ञान दूर होते. प्रश्नांची उत्तरे आपोआपच आपणास मिळत राहातात. मनापासून आपण त्याची आराधना केल्यास हा आत्मबोध नित्य राहातो. डोळे मिटून शांतपणे आपण त्याचे मनन, चिंतन केले तर त्याचा बोध होऊन आपल्या प्रश्नांची उत्तरे आपणास मिळतात. हा होणारा बोध जसजसा वाढत जाईल तसतशी आपली आध्यात्मिक प्रगती होत राहाते. अन् सर्व अज्ञान दूर होऊन आत्मज्ञानाचा बोध नित्य आपणास येत राहातो.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading