November 21, 2024
Chronology of Principle Dr N S Kokode bramhapuri
Home » राष्ट्रसंतांचे पाईक : प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे
मुक्त संवाद

राष्ट्रसंतांचे पाईक : प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे

१२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी होऊ घातलेल्या १८ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे यांचा अल्पपरिचय…

प्रा. डॉ. मोहन कापगते
ब्रम्हपुरी

पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी हे महाविद्यालय १९६२ पासून शिक्षणाची गंगोत्री विद्यार्थ्यांच्या दारी अविरत पोहचविणारे महाविद्यालय म्हणून प्रख्यात आहे. या महाविद्यालयाचे वेगळेपण म्हणजे ब्रम्हलीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. कर्मयोगी मदनगोपालजी भैया यांच्या दातृत्त्वातून या महाविद्यालयाची पायाभरणी झाली. ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या या महाविद्यालयाचे डॉ. नामदेव श्रीराम कोकोडे हे प्राचार्य होते. आपल्या प्रदीर्घ सेवेतून ते ३१ जुलै २०२२ रोजी निवृत्त झाले.

सुरूवातीला ते भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक विषयाचे प्राध्यापक.मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकंदर पैलूंचा विचार करता त्याच्यावर महात्मा ज्योतिबा फुले व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि तुकारामदादा गीताचार्य यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. विज्ञान शाखेतील असूनही त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्व विषयांना स्पर्श करणारे आहे.

अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून संघर्ष करीत यशाचे एक एक शिखर पादाक्रांत करीत राहिले. त्यांचे विचार कधीही निराशावादी राहिले नाहीत. कष्टाळू व सहनशील स्वभावाच्या डॉ.कोकोडे यांनी त्यावर सकारात्मकदृष्ट्या मात केली. मध्यंतरीच्या दोन वर्षाचा कालखंड गोंडवाना विद्यापीठातील बीसीयूडी डायरेक्टर म्हणून सोडला तर मे २००४ ते जुलै २०२२ पर्यंत एकूण १६ वर्ष ते प्राचार्यपदी राहिले. तर त्यांची नोकरी तब्बल ३७ वर्ष १० महिन्यांची झाली. एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर ते ३१ जुलै २०२२ मध्ये प्राचार्य पदावरून निवृत्त झाले.

त्यांनी नेवजाबाई महाविद्यायात शिक्षण घेतले आणि याच महाविद्यालयात नोकरी केली. याच महाविद्यालयातील प्रा. प्रभाकर सुपले यांच्या कन्येशी म्हणजेच माधुरीताईशी त्यांचा विवाह झाला. सुपले सरांचे घर म्हणजे राष्ट्रसंतांच्या विचारांचे. तुकारामदादा गीताचार्य यांच्या आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडी वरील कार्यात हे कुटुंब समर्पित झालेले. तुकारामदादा गीताचार्य यांचा प्रत्यक्ष सहवास त्यांना लाभला.

नागपूरला एम. एस्सी. ला शिकत असताना गुरुकुंज मोझरीकडे जाणारी पालखी पदयात्रा बघून राष्ट्संतांच्या कार्यात सामील होण्याचा निश्चय त्यांच्या तरुण मनात निर्माण होत होता. नागपूरचे पदव्युत्तर शिक्षण आटोपून सर नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात नोकरीला लागले. याच महाविद्यालयात प्रा. प्रभाकर सुपले राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांच्या निवास्थानी एके दिवशी तुकारामदादा आले. सुपले सरांनी कोकोडे सरांना दादांच्या भेटीसाठी बोलविले. यापूर्वी कोकोडे सरांनी अनेकदा तुकारामदादांना भेटण्याचा प्रयत्न केला होता; मात्र भेट घडून आली नाही. अनेक वर्षानंतर, अनेक प्रयत्नानंतर भेट न झाल्यावर योगायोगाने तुकारामदादांशी भेट घडून येत होती. जीवनात महापुरुषाच्या पहिल्या भेटीला अत्यंत महत्त्व असते. सर धन्य झाले. धोतर व सदरा घातलेले, डोक्यावर भगवी टोपी, अतिशय तेजस्वी रूप, करारी आवाज, प्रेमळ हावभाव, प्रचंड ज्ञानयोगी, बोलण्यात जिव्हाळा, आस्थेने विचारपूस, लहानसहान गोष्टी बारकाईने ऐकणारे, शक्तिशाली महात्मा डोळ्यात साठवून घेत होते. निघताना त्यांच्या पायावर डोके ठेवले. आणि दादांनी भरभरून आशीर्वाद दिले. पुढे त्यांच्या आशिर्वादानेच त्यांना महत्वाची प्रगती साधता आली. कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.

समाजसेवा, कार्यतत्परता आणि निष्काम सेवा हे दादांपासून डॉ. कोकोडे यांनी घेतलेले गुण होत, असे मला वाटते. १९९० मध्ये त्यांना भौतिकशास्त्र विषयात पीएच. डी. मिळाली. म्हणून पूज्य दादांचे दर्शन घ्यायला ते सपत्नीक अड्याळ टेकडीला गेले. नमस्कार करण्यासाठी पुढे झाले तेवढ्यात पूज्य दादा जोराने म्हणाले, ‘या प्रिन्सिपल साहेब…’ सर एकदम लाजले, म्हणाले दादा मी साधा प्राध्यापक आहे. त्यावर दादा म्हणाले, मी भविष्यातील प्रिन्सिपालला या म्हटलं! दादा पुढे म्हणाले, अरे तुम्ही पीएच. डी. झालात, शेवटची पायरी पास झाली. आता तुमचा मार्ग मोकळा. झाले तुम्ही प्रिन्सिपाल! यानंतर दादांच्या हयातीत सन २००४ मध्ये नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाचे ते प्राचार्य झाले. इतकेच नाही तर त्यांनी गोंडवाना विद्यापीठात दोन वर्ष बीसीयूडी डायरेक्टर म्हणून कार्य केले.

सायन्स अॅन्ड टेनॉलॉजी फॅक्लटीचे अधिष्ठाता बनले. गोंडवाना विद्यापीठ प्राचार्य फोरमचे अध्यक्ष व महाराष्ट्र प्राचार्य फोरमचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. विद्यापीठाच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले. सिनेट, मॅनेजमेंट कॉन्सिल, अॅकेडमिक कॉन्सिलचे ते सदस्य झाले. त्यांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठने २०१० मध्ये व गोंडवाना विद्यापीठाने २०१७ मध्ये ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्कार देवून गौरव केला. अनेक संशोधक विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनात पीएच. डी. मिळाली. अनेक मानांकित जर्नल्स मध्ये त्यांनी संशोधनपर लेखन केले. अमेरिका, इंग्लंड, तुर्कस्थान आणि थायलंड येथील संशोधन आंतरराष्ट्रीय परिषदेत ते सहभागी झाले. एकाप्रकारे दादांचा आशीर्वाद व भविष्यवाणी खरी ठरली, असे म्हणता येईल.

सतत कार्यंमग्न राहून त्यांनी महाविद्यालयीन स्तरावर, विद्यापीठ स्तरावर आणि सामाजिक स्तरावर विविध उपक्रम राबविले. आत्यंतिक गरीब परिस्थितीतून आल्यामुळे त्यांना गरीब विद्यार्थ्यांची परिस्थिती कळत होती.त्या दृष्टीने महाविद्यालयात गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. ‘कमवा व शिका’ या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्यासाठी महाविद्यालयात सोई-सुविधा वाढविण्यावर त्यांनी भर दिला. विद्यार्थी आर्थिक साह्य्यता निधीतून आजारी-अपंग विद्यार्थ्यांना मदत दिली. विद्यापीठ स्तरावर व महाविद्यालयीन स्तरावरील राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे सरांनी भूवैकुंठ अड्याळ टेकडीवर आयोजित केली.

विद्यार्थ्यांच्या मनावर यामुळे उत्तम श्रमसंस्कार होऊन जीवनात काही करण्याची प्रेरणा निर्माण झाली. विद्यापीठात बी.सी.यु.डी. डायरेक्टरपदी असताना त्यांची दोन वर्षांची कालकीर्द महत्त्वपूर्ण राहिली. नुकत्याच स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठाला डिजिटल बनविण्यात त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले. नव विद्यापीठ उभारणीत योगदान महत्त्वाचे ठरले. अनेक संवैधनिक पदांवर त्यांनी कार्य केले. ज्या समाजाने आपल्याला मोठे केले त्या समाजाचे आपण देणे लागतो हा विचार त्यांनी समोर ठेवला. त्यांचा जन्म माळी समाजात झाला असल्याने त्यांनी समाजबांधवांसाठी कार्य केले. ते चंद्रपूर जिल्हा माळी महासंघाचे अध्यक्ष आहेत.आपला समाज रोजगाराभिमुख व्हावा म्हणून त्यांनी रोजगार मेळावे घेतले. समाजातील बांधवांसाठी सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करून, समाज भवन, वसतिगृह आणि आर्थिक मदत निर्माण व्हावी म्हणून पतसंस्थेचे संकल्प ठेवले.

पूज्य तुकारामदादांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडीच्या अनेक कार्यात सहभाग घेतला. ग्रामगीता विद्यापीठाच्या रचनेत त्यांनी मदत केली. अनेक ग्रामसभांना मार्गदर्शन केले. आदर्श गाव, चरशौचालय यांचा प्रचार केला. राष्ट्संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण सरांचे मित्र. ते तुकारामदादांना खूप मानायचे. त्यामुळे तुकारामदादांचे कार्य समजून घेण्यास त्यांना फार मदत झाली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यापीठीय शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात सरांनी कुलगुरुंना अड्याळ टेकडीवर आमंत्रित केले. तुकारामदादासोबत बसून त्यांनी ग्रामगीता अभ्यासक्रम तयार केला. तो अभ्यासक्रम बी. ए. व बी. कॉम. च्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर व अमरावती विद्यापीठात सुरू व्हावा म्हणून युजीसीचे चेअरमन डॉ. निगवेकर यांच्याशी ते दादांसोबत जावून भेटले. आज हा अभ्यासक्रम दोन्ही विद्यापीठात सुरू आहे. त्यांनी तुकारामदादांचे कार्य नागपूर विद्यापीठात पोहोचविल्यामुळे पूज्य तुकारामदादांच्या कार्याची महती पटून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने तुकारामदादाना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देवून सन्मानित केले.खासदार निर्मलाताई देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पंजाबातील जालंधर येथील अमन मेळ्यात सहभागी झाले.

भारत-पाकिस्तान या दोन्ही देशात सन्मानजनक शांती निर्माण होण्यासाठी या ‘अमन मेला’ चे आयोजन करण्यात आले होते. असाच मेला पाकिस्थानात घेण्याचे ठरले होते. मात्र त्याला परवानगी मिळाली नाही, म्हणून पाकिस्थानातील शिष्टमंडळ जालंधरला आले. याच काळात डॉ. कोकोडे सपत्नीक दादांसोबत सरदार भगतसिंग यांच्या जन्मगावी आणि वाघा बोर्डरवर जावून आले. तुकारामदादांच्या सहवासातील हे क्षण दोघांसाठीही अनमोल ठरले.

त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि पूज्य तुकारामदादांचा वसा पुढे नेण्याचे कार्य आपल्या परीने केले आणि करीत राहतील. सरांनी अनेकांच्या जीवनात शिक्षण घेण्याची प्रेरणा निर्माण केली. महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे या दाम्पत्याचे प्रेरणास्थान ठरले. अशा या विद्यार्थी प्रिय, कर्मचारी प्रिय व समाजप्रिय माणसावर त्यांच्या कार्याचा, सेवेचा गौरव करण्यासाठी “गौरव ग्रंथ” समितीने ‘राष्ट्रसंतांचे पाईक’ नावाचा ‘गौरव ग्रंथ’ काढला आहे. शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय अनुभव, जीवनानुभव त्यांनी अत्यंत परिश्रमातून मिळविले आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading